- अप्सरा आगा
नद्याचे होत चाललेले नाले, नद्यात साचलेला कचरा, गाळ..कधी कधी नदीवर पसरलेली जलपर्णी..ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकेकाळी जेथे नदी शांत, निर्मळ अन् जीवनदायिनी होती, आज त्या नद्यांनी विचित्र आणि भयावह रूप धारण केले आहे. पूर्वीच्या नद्यांतून शुद्ध पाणी वाहत होते, आता मात्र त्या गटारीसारख्या सडलेल्या नाल्यांमध्ये परिवर्तित झाल्या आहेत.
शहरांमधून येणारे सांडपाणी, कारखान्यांचा विषारी रासायनिक कचरा, प्लास्टिकचा डोंगर, मोठ्याप्रमाणात होणाऱ्या अतिक्रमणामुळे नद्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी अनेक लोक धडपडत, झटत आहेत, त्यातीलच एक ' गिरीश पाटील.'
गिरीश पाटील नावाचा एक तरुण जळगावच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येतो आणि त्याच्या कॉलेजमधील मित्रांसह 'कुछ करना है' उद्देशाने योगी फाउंडेशनची स्थापना करतो. गिरीश हा जळगाव जिल्ह्यातील अंजनी नदीकाठावरील वाघळूद खेडेगावचा तरुण. शेतीमातीत राबणारे त्याचे कुटुंब. पाचवीत असताना त्याच्या शाळेमध्ये नरेंद्र दाभोलकर आले होते. त्यांच्या प्रभावात अंधश्रद्धा निर्मुलनावर त्याने नाटिका सादर केल्या. इथून पुढे त्याला साहित्याची आवड निर्माण झाली. गिरीश नववीत होता, त्यावेळी त्याने पेपरमध्ये कुमार साहित्य संमेलनाची बातमी वाचली. युवकांना सहभागी होण्याचे आवाहन त्यात होते. तेच कात्रण घेऊन गिरीश थेट शिक्षकांकडे गेला.
सहभागी होण्याची गळ घातली. 'केवळ सहभागी कशाला, तूच अध्यक्ष हो,' असा सल्ला शिक्षकांनी दिला. मग तो थेट अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरला. निवड समितीने तुला अध्यक्ष केलं नाही तर? हा मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला, तेव्हा 'तुम्ही असं करुच शकत नाही' हे त्याचं अतिउत्साही उत्तर होतं. अखेर विवेकानंद प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित उत्तर महाराष्ट्रस्तरीय कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर गिरीश बसलाच. 
पर्यावरण, नद्यांमध्ये हित...
गिरीश अकरावीत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाला. 'प्रिन्सिपल साहब एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो' आंदोलने करत नारेबाजी केली. दरम्यान, संदीप वासलेकर, अतूल देऊळगावकर, नंदा खरे यांची पुस्तके गिरीशने वाचली. तो आतून समृद्ध होत राहिला. हळूहळू आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील सहभाग पूर्ण बंद केला. युवक कल्याण विभाग व क्रिडा मंत्रालय महाराष्ट्र शासन युवा संसद महाराष्ट्राच्या विधिमंडळात आयोजित करते, यात जळगाव जिल्ह्याचा प्रतिनिधी गिरीश होता. यात तो मुख्यमंत्री म्हणून निवडला गेला.
दोन दिवस चाललेल्या कामकाजात सर्वोत्कृष्ठ युवा संसदपटू म्हणून एक लाख रुपयांचा पुरस्कार त्याला बारावीत मिळाला. पण त्याचं हे सर्कल नव्हतं. त्याची आवड पर्यावरण, नदी या विषयात आहे, म्हणून या विषयात काहीतरी करायचं ठरवलं. गिरीशची बारावीची परीक्षा संपली आणि कोरना काळात लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनच्या काळात गिरीश आणि त्याचा मित्र प्रणिल दोघांनी मिळून चर्चा केली. नदी, पर्यावरण या विषयात काम कारणाऱ्या लोकांशी चर्चा करायची ठरवलं. त्यामध्ये मेधा पाटकर, राजेंद्रसिंह यांच्याशी चर्चा झाली. त्यातूनच त्यांना काय करायला पाहिजे, याची माहिती मिळाली आणि दोघेही याच्या कामाला लागले.
संबंधित लेख वाचा: 1) काळविटांची शिकार रोखायला गेला अन् अपघातात जीव गमावला… ‘राधेश्याम बिश्नोई’च्या मृत्यूने पर्यावरण विश्वाची मोठी हानी |
...अन् तिथून प्रवास सुरू झाला
गिरीश आणि प्रणिल यांनी अकरा मित्रांची टीम तयार केली आणि 5 जून रोजी योगीची (युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया) स्थापना केली. या फाऊंडेशनच्या उदघाट्नला तुषार गांधी, विना गवाणकर उपस्थित होत्या. गिरीश सांगतो, 'आम्ही नदी या विषयाबाबत काम करणारे कोण आहे, बघत होतो, या विषयाबाबत राजेंद्रसिंह हे देशातील मोठं नाव आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचलो. काय करायचं, कसं करायचं, असा विचार करत होतो . अजून आमचं काय ठरलं नव्हतं. एवढं मात्र होत की गावांमध्ये पर्यावरणाबाबत काय तर करायचं, त्याचदरम्यान मी महात्मा गांधी यांचं ग्रामस्वराज्य वाचत होतो. आपसूकच गावांमध्ये काम करायचं ठरलं. मग तिथून आमचा प्रवास सुरू झाला.' 
लाॅकडाऊनमध्येही भटकंती सुरूच...
पुढे गिरिश सांगतो की, 'लाॅकडाऊनमध्ये आम्ही 30-40 गावं फिरलो. सातपुड्याच्या कुशीत, महाराष्ट्र- मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं गौऱ्यापाडा हे आदिवासी गाव आहे. या गावापासूनच आम्ही कामाला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही गावामध्ये बैठका घेऊ लागलो. गावात ग्रामसभा झाली पाहिजे. अशी चर्चा करायला सुरुवात केली. गावातील शाळांना भेटी दिल्या. गावातील एक शाळा आमदार निधीतून बांधून दिली. गावातील जमीन ही फॉरेस्टची जमीन आहे.
ती जमीन लागवडीखाली आणून, तिथे 'मनरेगा'तून ज्या फळबागा मिळतात, त्या काही येथील शेतकऱ्यांना मिळतील का? त्या वनजमीन आहे, त्याचे सातभारे शेतकऱ्यांकडे नसतात, पण ते ती जमीन करत असतात, पण त्यांना 'मनरेगा'च्या लाभ मिळत नाही. हा आदिवासी भाग आहे. पावसाळ्यात लोकांना खूप त्रास होतो. गेल्या पाच वर्षांपासून या गावात शाश्वत ग्रामीण विकासासाठी काम करत आहे. अनेक दशकांपासून गाळाने पूर्ण भरलेला नाला आता पुन्हा पाणी साठविण्यासाठी आणि जमिनीत झिरपण्यासाठी मोकळा झाला आहे. पन्नास हजार सिट्सबाॅलचे बिजारोपन गावात केले आहे.'
'गिरणा नदी वाचवा' चळवळीतून निरीक्षण- 'सेव्हिंग मेहरुण तलाव' ह संशोधन अहवाल’
गिरीशच्या मामाचे गाव गिरणा नदीच्या काठावर वसलेले आहे. वाळू तस्करीमुळे नदीचे सौंदर्य बिघडले. तिथे 'गिरणा वाचवा' चळवळ आयोजित करण्यात आली होती. जळगाव शहराच्या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारशाचा एक महत्त्वाचा भाग असलेला मेहरूण तलाव 12व्या शतकातील आहे.
तथापि, तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावणे, जैवविविधतेचा नाश, सांडपाणी आणि कचऱ्याचे गैरव्यवस्थापन, तलावाकाठच्या जमिनीचा अनियंत्रित वापर, पाणी साचणे यामुळे हा तलाव धोक्यात असल्याचे आढळून आले. या समस्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर 'सेव्हिंग मेहरुण तलाव' या संशोधन अहवालात महत्त्वाची निरीक्षणे आणि उपाययोजना समाविष्ट केल्या आहेत.
जलपरिषदेसाठी सहभागी होता आले...
जलपुरुष जल बिरादरीचे राजेंद्रसिंह यांच्यासोबत जोडला गेल्यामुळे नोव्हेंबर 2020 मध्ये गिरीशला जलपरिषदेसाठी सहभागी होता आले. जलबिरादरीत युवकांचा सहभाग नाही, हे गिरीशने हेरले. ही खंत त्याने बोलून दाखवली. नुकतेच अग्रणीच्या खोऱ्यात संमेलन झाले.
संमेलनात जलबिरादरी राजेंद्रसिह यांनी घोषित केले कि गिरीश या युवा जल बिरादरीचा राष्ट्रीय संयोजक आहे. गिरीशची भूमिका स्पष्ट आहे की, तो देशभरात नद्यांना वाचविण्यासाठी तरुणांची चळवळ उभी करतोय. युवा जलबिरादरी संशोधन, प्रशिक्षण, जनजागृती व प्रत्यक्ष जमिनीस्तरावरील कामाला महत्त्व देतो . डॉ. सुमन पांडे यांच्या मार्गदर्शनात पुण्यात दोन 'नदी की पाठशाळा' कार्यशाळा झाल्या. यामध्येही गिरीशसह, कल्याणी शिंदे आणि मंत्रमंडळी संयोजक होती. 
'जळगाव क्लायमेट वॉरियर्स' उपक्रम
नुकतेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव महानगरपालिका, योगी (युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया) आणि 'आपण फाउंडेशन' यांनी संयुक्तपणे 'जळगाव क्लायमेट वॉरियर्स' हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढवणे आणि प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी उपाययोजना राबवणे आहे.
पहिल्या टप्प्यात शहरातील शाळांमध्ये प्लास्टिक टिफिन बॉक्स, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि पुस्तकांवर प्लास्टिक कव्हर वापरणे बंद केले जाईल आणि शाळा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्टील टिफिन, बाटल्या आणि कागदी कव्हर इत्यादींचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
गिरीश आणि त्याचे मित्र पर्यावरणाला जपणारे आहेत. गिरीश अनेक संस्था, संघटना, मित्र, अनेक अभ्यासू लोकांसोबत जोडला असून, नदीसाठी काम करण्याची धडपड कायम अंगी आहे. खरंतर नदीचे निर्माण झालेले सध्या विचित्र रूप केवळ पर्यावरणीय प्रश्न नाही, तर ती आपल्या नैतिकतेची, सामाजिक जबाबदारीची सुद्धा परीक्षा आहे. जर नदी वाचली तर गाव वाचेल; जर गाव वाचले तर आपण सर्व वाचू. हा संघर्ष पर्यावरण संतुलित राहण्यासाठी आहे.


