(अलमिना खातून)
55 वर्षांच्या अकीला, अनेकवेळा एम्स किंवा सफदरजंग रुग्णालयाच्या वॉर्डात लंगडत उपचारासाठी चालत असतात.. गुडघेदुखी व पाठीच्या दुखण्यावर इलाजासाठी. पण त्यांना शारिरीक दुःखापेक्षा, त्यांना नमाज पठनासाठी जागा मिळत नाही याचं जास्त दुःख होतं. या गुन्ह्यापासून वाचण्याचा रस्ता त्यांना आता सापडला आहे. एम्सपासून 10 मिनिटांच्या अंतरावर ग्रीन पार्क मशिद त्यांना सापडली आहे. तिथं स्त्रियांसाठी वेगळी जागा आहे, ज्यात वॉशरुम आणि वजूची (मशिदीत जाण्याआधी हात-पाय धुण्याची व्यवस्थाही) सोयही आहे.
स्त्रियांना धार्मिक स्थळी जाणं हा कोणत्याही धर्मांत नेहमीच एक संघर्षाचा मुद्दा राहिलेला आहे. हिंदू असो वा मुस्लिम त्यांचे आपले खास जुने सामाजिक नियम आहेत. काही नवे नियम पुरुषांनी तयार केले आहेत. केरळमध्ये शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी स्त्रियांनी न्यायिक लढा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूनं निकाल दिला. दिल्लीत जामा मशिद प्रशासनानं अश्लील हालचाली रोखण्यासाठी एकटी स्त्री, मुलगी यांना प्रवेशावर बंदी आणली होती. आता मुस्लिम बायका याचा विरोध करत आहेत. भारतात महिलांनी मोठ्या संख्येनं मशिदीत जाऊन नमाज पठन करणं अजूनही नवीन आहे. पण आता मशिदी त्यांच्यासाठी जागा तयार करत आहेत. दिल्लीत 500 हून जास्त मशिदींपैकी फक्त काहींमध्येच स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था आहे. 
दिल्लीतील अनेक मशिदींमध्ये आता महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
ग्रीन पार्क मशिद, मोती मशिद, कॅनॉट प्लेस येथील औलिया मशिद, जमाते इस्लामी हिंद द्वारा संचालीत इशाअत-ए-इस्लाम मशिद यापैकी काही आहेत. काही ठिकाणी पूर्ण मजला तर काही ठिकाणी एक खोली या बायकांना मिळते. पण इथं महिलांचं स्वागत आहे हा संदेश इथून मिळत आहे. “घरी आणि मशिदीत नमाज पठनाचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. हा आमचा अधिकार आहे,” 21 वर्षीय फराह शकील सांगते. ती दर शुक्रवारी जमाते इस्लामी हिंद मशिदीती जुम्मेची नमाज अदा करण्यासाठी जाते. “जर जागा चांगली असेल तर स्त्रियांनी नमाज वाचायलाच पाहिजे. ज्यामुळे मशिदीत स्त्रियांनी नमाजसाठी येणं सामान्य होईल.”
ग्रीन पार्क मशिदीचा पत्ता लागल्यानंतर अकीला यांनी इतर स्त्रियांनाही याविषयी माहिती दिली. मशिदीचे इमाम, मुफ्ती निजामुद्दीन सांगतात की या परिसरातून जाणाऱ्या बायका अनेकदा इथं नमाजसाठी थांबतात. “इथं जवळपासच्या हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या महिला डॉक्टर्स देखील नमाजसाठी मशिदीत येतात,” ते सांगतात. 
मुलं इथं खेळतात, धावतात, हसतात. तर डझनभर बायका पांढऱ्या संगमरवरी लादीवर टाकलेल्या लाल सतरंजीवर बसून तस्बीह फिरवतात, काही मोबाईलवर कुराण वाचतात. काही आपल्या लहान मुलांना इबादत करायचं शिकवतात. जमाते इस्लामी हिंद मशिदीतला हा नेहमीचा नजारा आहे. शुक्रवारी इथं शंभराहून जास्त बायका येतात. त्या दूरवरच्या इलाक्यातून येतात, एकमेकांशी गप्पा मारतात. “मशिदीत स्त्रियांसाठी जागा आहे आणि इतक्या बायका इथं रोज येत आहेत, यावरून हेच दिसतंय की अशा जागेची किती गरज होती,” अमीना बानो सांगतात, ज्या मशिदीपासून जवळच राहतात.
संबंधित लेख वाचा: 1) तीन तलाक कायदा… नुरी, सलमा, खतिजा, रुबिना यांच्या आयुष्यात पाच वर्षांनी काही फरक पडला का? |
“अल्लानं बायकांना सगळीकडे जाण्याची अनुमती दिली आहे मग मशिदीत का नाही?”
“अल्लानं बायकांना सगळीकडे जाण्याची अनुमती दिली आहे मग मशिदीत का नाही?” मशिदीत स्त्रियांसाठी वेगळ्या जागेची मागणी अलिकडेच आली आहे. ‘ऑल इंडिया मुस्लिम वुमेन्स एसोसियेशन’च्या अध्यक्षा डॉ. असमा जहरा सांगतात की भारतातून मोठ्या प्रमाणात बायका उमरा आणि हजसाठी जाऊ लागल्यानंतर ही मागणी करण्यात आली. मक्का आणि मदिना इथे बायकांसाठी प्रत्येक मशिदीत वेगळी व्यवस्था असते. तसं भारतात कमीच दिसून येतं. त्यानंतर भारतातही अशी जागा हवी अशी मागणी करण्यात येऊ लागली. “पारंपरीक दृष्ट्या पाहिलं तर भारतात बायका नमाज पठनासाठी मशिदीत जात नव्हत्या. पण ग्लोबलायजेशनमुळे बायकांनी मशिदीत नमाज वाचण्याची संस्कृती मध्य पूर्व व दक्षिण-पूर्व आशियातील देशांमधून भारतात येत आहे,” जहरा सांगतात. 
2019 मध्ये काही स्त्रियांनी ‘मुस्लिम वुमेन मस्जिद प्रोजेक्ट’ची सुरूवात केली. ‘मुस्लिम वुमेन स्टडी सर्कल’ने यासाठी पुढाकार घेतला. याची स्थापना सानिया मरियमने केली होती. लोकांना जागरूक करणं आणि मशिदींमध्ये स्त्रियांचा समावेश व्हावा असा या संघटनेचा उद्देश होता. जहरा म्हणतात, “समाजाकडून याला काही विरोध झालेला नाही. काही मशिदींमध्ये स्त्रियांसाठी जागा होतीच. ज्या नवीन मशिदी तयार होत आहेत त्यातही ही सुविधा करण्यात येत आहे.”
शुक्रवारी दुपारी 1 वाजता मरकज मशिदीच्या तळमजल्यावर पुरुष एका रांगेत उभे आहेत. इमाम माईकजवळ जाताच सर्वांना सलाम करतात. मुख्य नमाज ठिकाणाच्या वरती पहिल्या मजल्यावर बायकाही रांगेत उभ्या राहतात. इमाम आपलं निवेदन सुरू करतात. आजचा विषय वादग्रस्त आहेः वक्फ बिल. पुढच्या तासभरात ते विस्तारानं याविषयी सांगतात. वक्फ संपत्ती काय असते, नव्या वक्फ कायद्यामुळे मुस्लिम समुदायात चिंतेचं वातावरण का आहे वगैरे. ते याला सरकारची चुक म्हणतात ज्यामुळे देशभरातील मुस्लिमांचे अधिकार व मालमत्ता यांच्यावर गंभीर परिणाम होणार आहेत.
‘’आम्ही मशिदीत फक्त नमाज पठनासाठीच येत नाही तर…’’
आम्ही मशिदीत फक्त बघण्यासाठी किंवा नमाज पठनासाठीच येत नाही, बानो सांगतात, “मशिद फक्त इबादतची जागा नाही, इथं दर आठवड्याला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक मुद्द्यांवर गंभीर चर्चा होते. आमच्या आसपासच्या गोष्टी समजून घेण्यास त्यामुळे आम्हाला मदत होते. जे घरी क्वचितच होतं किंवा ज्यासाठी आम्हाला वेळ मिळत नाही. मरकज मशिद एका शांत आणि हिरव्यागार परिसरात आहे. झाडं, फुलझाडांच्या बागा, स्वच्छ इमारती आहेत. स्त्री-पुरुष इथं येत-जात असतात. काही नमाज पठनासाठी, काही सामुदायिक कामांसाठी, काही क्लासेससाठी. या मशिदीचं संचालन जमाते इस्लामी हिंद करते. देशातील ही मोठी मुस्लिम संघटना आहे. याच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय सचीव रहमतुन्निसा आहेत. त्या सांगतात, “मशिदीत येणं हा आपल्या समुदायाशी जोडलं जाण्याचा तसेच लोकांशी संपर्क साधण्याचा एक मार्ग आहे. ही एक गरज आहे आणि अधिकारही आहे, जो स्त्री-पुरुष दोघांनाही आहे.”
शांत मरकज मशिदीपासून 14 किमी दूर, कॅनॉट प्लेस येथील मोती मशिदीत वेगळाच नजारा असतो. इथल्या व्यस्त गल्ल्यांमध्ये पुस्तकांची दुकानं, कपड्यांचे स्टॉल्स आणि जोड्यांची दुकानं आहेत. यातच ‘मोती मस्जिद’ असं लिहिलेला लहानसा बोर्ड दिसतो. त्यावर उर्दू आणि हिंदीत लिहीलं आहे- “महिलाएं पहली मंज़िल पर नमाज़ अदा कर सकती हैं.” आत एक विशाल हॉल आहे जिथं पुरुष नमाजसाठी जमा होतात. वरच्या मजल्यावर बायका बसतात.
इथंच 26 वर्षीय अनमही आहे जी आपल्या हॉटेलच्या कामातून थोडा वेळ आराम घेण्यासाठी इथं येत असते. ती सांगते, “या जागेत मला शांत वाटतं. मी इथं नमाज वाचायला येते. पण अनेकदा असं खास काही कारण नसतं. मला थोडा वेळ मिळाला की मी इथं येऊन एखाद्या कोपऱ्यात चुपचाप बसून राहते.” कॅनॉट प्लेस मधल्याच औलिया मशिदीत महिलांसाठी विशेष जागा असल्याविषयीचा कोणता फलक नाही. पण इथेही पहिल्या मजल्यावर त्यांच्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. इमाम अहमद सांगतात की ही मशिद व्यस्त व्यापारी भागात असल्यामुळे बायका इथं नियमीतपणे येत नाहीत. पण रमजानच्या महिन्यात, विशेषतः शुक्रवारी त्या येतात, नमाज पठन करतात आणि जातात. अहमद सांगतात, “स्त्रियांच्या इथं येण्यावर कोणतीही बंदी नाही. त्यांच्यासाठी विशेष जागा आहे की नाही हे मशिदीच्या रचनेवर, ती कोणत्या जागी आहे यावर ठरतं. धार्मिक आधार त्याला कारणीभूत नाही. जुन्या आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मशिदी या कमी जागेत तयार केल्या आहेत. त्यामुळे तिथं बायकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली नाही आणि आताही तसं करणं कठीण आहे.”
2023 मध्ये पुण्यातील कार्यकर्त्या व वकील फरहा अनवर हुसैन शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका सादर केली व म्हटलं की मशिदींमध्ये बायकांना येण्यास मनाई करणं ही प्रथा बेकायदेशीर आहे. तेव्हा ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने म्हटलं की त्यांनी अशी कोणतीही सामान्य बंदी लादलेली नाही. इस्लाम बायकांनाही मशिदीत नमाज पठनाची अनुमती देतो. पण पुरुष व स्त्रियांच्या एकत्र बसण्यावर मात्र मनाई आहे. बायकांना इमामच्या मागे बसणं अनिवार्य नाही, जसं की पुरुषांसाठी आहे. त्यामुळे बायकांनी पैगंबराच्या काळात मशिदीतील सभांमध्ये भाग घेतला नव्हता. 
नव्या मशिदीत बायकांसाठी वेगळी व्यवस्था केली जावी यासाठीही बोर्डाने आवाहन केलं. ग्रीन पार्क मशिदीचे इमाम निजामुद्दीन सांगतात की मशिदीत बायकांचं येणं मुळातच कमी आहे. पण मोती मशिदीत येणाऱ्या अनाम जहाँ सांगतात की स्त्रियांसाठी वेगळी सुरक्षित जागा असणं महत्त्वाचं आहे, भलेही त्या तिथं नेहमी येत नसतील. “आमच्या घरापेक्षा बाहेर असं एखादं स्थान असेल जिथं आम्हाला आमच्या प्रार्थनेवर लक्ष केंद्रीत करता आलं तर आम्हाला एक वेगळी शांती मिळते, जी घरी मिळू शकत नाही.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






