टीम बाईमाणूस
नाशिकच्या तपोवनात सध्या एकच खळबळ आहे. कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली अठरा हजार झाडांवर कुऱ्हाड लागणार आहे. साधुग्रामच्या निर्मितीसाठी हिरवाईचा बळी देण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे, आणि नाशिक शहरात एकच प्रश्न पेटलाय.. कुंभमेळ्यासाठी नाशिकची फुफ्फुसे कापली जाणार का? एकीकडे प्रशासनाचा दावा, "व्यवस्थेसाठी झाडे काढावीच लागतील", तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमींच्या ‘चिपको आंदोलना'ने संपूर्ण तपोवन दणाणून गेलंय. झाडांवर लाल चिन्हे… जनतेचा आक्रोश… आणि मंत्री गिरीश महाजनांची धावती पाहणी. नाशिकची हिरवाई वाचणार की कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचा रस्ता हिरव्या झाडांवरून जाणार या प्रश्नावरच संपूर्ण शहरातील लोकांचे लक्ष लागून आहे.
साधुग्राम विकासासाठी 1700 झाडांना नष्ट करण्याची तयारी....
आगामी 2026 ते 2028 दरम्यान नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. वर्षानुवर्षे लाखो साधू-महंत, देश-विदेशातील भाविक, आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी नाशिकला भेट देतात. या प्रचंड गर्दीची व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील साधुग्राम परिसराचा विस्तार आणि उभारणी सुरू आहे. यासाठी नाशिक महानगरपालिकेने साधुग्राम परिसरातील 1700 हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. मनपाने याबाबत 17 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. तेव्हापासून हा निर्णय शहरभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या साधुग्राम परिसरात सुमारे 3500 झाडे आहेत, त्यापैकी जवळपास निम्मी झाडे काढून टाकली जाणार आहेत. यात प्रामुख्याने बाभूळ, कशिद आणि इतर स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. मात्र वड, पिंपळ, उंबर यांसारख्या फायकस प्रजातींच्या झाडांना शक्यतो जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे."
महापालिकेची मोठी घोषणा: 17,000 रोपे लावणार....
झाडांच्या बदल्यात नवीन लागवड करण्यासाठी महापालिकेने ‘एक झाड = त्याच्या वयानुसार झाडे’ अशी योजना जाहीर केली असून, उदाहरणार्थ एखादे झाड २० वर्षांचे असेल तर त्याऐवजी २० नवीन रोपे लावली जाणार आहेत. साधारण सरासरी वय 10 वर्षे धरल्यास, तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात सुमारे 17,000 नवीन झाडे लागणार आहेत. कागदोपत्री पाहता ही योजना आकर्षक वाटते; मात्र पर्यावरणप्रेमींच्या मते एक झाड उगवून आले की त्याची जागा दुसरे झाड लगेच घेत नाही. दहा-वीस वर्षांच्या झाडाने निर्माण केलेली सावली, फांद्यांचा विस्तार, पक्ष्यांची घरटी, परिसंस्थेला मिळणारा आधार आणि हवेत पसरलेला शुद्ध ऑक्सिजन हे गुण कोणत्याही रोपाला एका दिवसात किंवा वर्षात प्राप्त होत नाहीत.
राजकीय नेत्यांवर आरोप : ‘नाशिकचे तापमान जळगावसारखे करायचे आहे का?’
झाडतोडीच्या निर्णयावर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना राजकीय नेत्यांवरही आरोपांची सरबत्ती केली. नाशिकसारख्या थंड हवामान असलेल्या शहरातील हजारो झाडे तोडून शहराचे तापमान वाढवण्याचा आणि निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा “पण” राजकीय नेत्यांनी केल्याचा आरोप नागरिकांनी केला. नाशिकमध्ये उन्हाळ्यात तापमान आधीच सातत्याने वाढताना दिसत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडतोड झाल्यास शहराची स्थिती जळगावप्रमाणे उष्ण व दमट होईल, अशी गंभीर भीती आंदोलकांनी व्यक्त केली.
मंत्री गिरीश महाजनांची पाहणी आणि आश्वासन... 
परिस्थिती तीव्र होत असल्याचे पाहून मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः तपोवनातील चिन्हांकित झाडांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. आंदोलकांची भूमिका योग्य असून निसर्ग संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्पष्ट मान्य केले. मात्र कुंभमेळा हा 12 वर्षांतून एकदा होणारा जागतिक सोहळा असल्याने आणि यावेळी मागील वेळेपेक्षा तिप्पट–चौपट गर्दी अपेक्षित असल्याने साधुग्रामसाठी काही झाडे काढणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी खात्री दिली की, "ज्या झाडांची पुनर्लावणी शक्य आहे, ती अन्यत्र स्थलांतरित केली जातील, ‘एक झाड = दहा रोपे’ या सूत्रानुसार मोठ्या प्रमाणात नवीन रोपे लावली जातील आणि फक्त अत्यावश्यक तितकीच झाडे तोडली जातील."
नाशिककरांची हाक: हिरवाई नष्ट करून कुंभमेळा नको...
नाशिकमधील रोशन केदार यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले, "जे 1700 झाड तोडायचे आहे त्यामध्ये निम्मी झाडे अशी आहेत की जी आपल्या कवेत देखील मावणार नाहीत. झाडाची फांदी देखील कवेत मावत नाहीत. ही झाडे झाडे नसून हेरिटेज वृक्ष आहेत. या झाडांनी अनेक कुंभमेळे बघितलेत आणि आज तीच तोडली जाणार आहेत. म्हणजे ज्या झाडांखाली बसून तप करायचा असतो तोच वन तोडून कोणते साधू इथे राहू इच्छिता हे आम्हा नाशिकरांना ऐकायचे आहे. " 
प्रसाद जोशी हे सुद्धा नाशिकचे रहिवासी आहेत त्यांनी बाईमाणूसशी बोलतांना असे सांगितले, "की आम्हाला झाडे तोडून कुंभमेळा साजरा करायचा नाही आहे. हे माननीय मुख्यमंत्री यांनी लक्षात घ्यावे. म्हणजे निसर्गाचे सौंदर्य नष्ट करून जर मुख्यमंत्र्यांना मानवनिर्मित विकास दाखवायचा असेल तर असा विकास नाशिककरांना नको आहे. नाशिक हे कायम हरित, स्वच्छ आणि निसर्गाशी प्रामाणिक असलं पाहिजे अशीच नाशिककरांची इच्छा आहे. "
नाशिकच्या भविष्यासाठी संघर्ष : परंपरा की पर्यावरण?
कुंभमेळा हा नाशिकचा अभिमान असून लाखो भाविकांच्या आगमनामुळे शहराची प्रतिमा, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते, पण त्याचवेळी नाशिकची हिरवाई हा त्याचा खरा आत्मा आहे. नदीकाठची झाडे, साधुग्रामचा परिसर आणि तपोवनातील शांतता यांमुळेच या शहराची ओळख साकारली आहे. त्यामुळे इथे प्रश्न निर्माण होतो तो विकास, परंपरा आणि पर्यावरण या त्रिकोणी संतुलनाचा. नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि प्रशासन यांच्यात संवाद सुरू असला तरी निसर्गाच्या कुशीत वाढलेल्या नाशिककरांच्या मनात एकच अपेक्षा आहे. निर्णय काहीही असो, शहराची हिरवाई आणि निसर्गाचा समतोल अबाधित राहावा.






