(अप्सरा आगा, पुणे)
22 एप्रिलला जम्मू-काश्मीर मधील पहलगाममध्ये अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारत हादरला. मृतांची संख्या पाहून देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. प्रत्येक स्तरावर म्हणजेच गल्ली ते दिल्ली या घटनेचे पडसाद उमटले. कॅबिनेट सुरक्षा समितीने पाच मोठे निर्णय घेतले. देशाच्या विविध भागात शिक्षण आणि व्यवसायानिमित्त आलेल्या काश्मिरी तरुणांना धमक्या दिल्याच्या घटना भारतातील अनेक भागात घडल्या.
काही ठिकाणी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे ही समोर आले. या घटनेमुळे हिंदू-मुस्लिम वादाला पुन्हा नव्याने तोंड फुटले. अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे लोकांनी जमिनीवर लावले, त्याच्यावरून लोकांना चालायला सांगितले, मुंबईत मुस्लिम फेरीवाल्याला मारहाण, पुण्यातील काश्मिरी विद्यार्थ्यांना धमकीवजा मॅसेजेस असे अनेक प्रकार समोर आले..
पुण्यातील काश्मिरी तरुणांसाठी सरहद ही संस्था काम करते. पुण्यातही काश्मिरी विद्यार्थ्यांना या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. या सर्व पार्शवभूमीवर पुण्यातील काश्मिरी तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा खुलासा करून सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. 
पुण्यात घेतलेला शिक्षणाचा वसा काश्मीरमधील पुढच्या पिढीकडे पोहोचवायचा आहे...
आकिब भट हे काश्मिरी तरुण आहेत . ते सरहद संस्थेशी जोडलेले आहेत. बाईमाणूसशी बोलतांना त्यांनी सांगितलं, "पहलगाममध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याचा स्थानिक काश्मिरी लोकांच्या नावावर, प्रतिष्ठेवर डाग लावला जात आहे. यामध्ये काश्मिरी लोकांचा दोष काय? याउलट झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सर्व पर्यटकांना स्वतःच्या घरामध्ये राहण्यास जागा दिली. या घटनेचा काश्मिरी लोकांनी स्वतः आंदोलन करून निषेध केला .
स्थानिक काश्मिरी लोकांचा दोष नसतांनाही छत्तीसगड, उत्तराखंडमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे महाराष्टात पुण्यासह अन्य भागात राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे."
पुढे आकिब भट सांगतात, "पुणे शहरात दरवर्षी शिक्षणासाठी काश्मीरची मुलं येतात. शिक्षणाच्या माध्यमातून एकप्रकारे महाराष्ट्राशी त्यांची आपुलकीची नाळ जोडली गेली आहे. पुण्यातून शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी हल्ल्यानंतर पर्यटकांची काळजी घेतली. या मागचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनता आणि काश्मिरी युवक यांच्यात भावबंध जुळलेले आहेत. पुण्यात घेतलेल्या शिक्षणाचा वसा आम्हाला काश्मीरमधील पुढच्या पिढीकडे पोहोचवायची इच्छा आहे."
काश्मीरचा मंझूर बशीर सांगतो, 'मी शिक्षण घेण्यासाठी 2004 पासून पुण्यात राहत आहे. पुणे शहराने आम्हाला खूप काही दिले आहे. पुण्यातील लोक खूप सहकार्य करणारे आहेत. पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर काही लोकांनी आम्हाला ट्रोल करायला सुरुवात केली. काही लोकांनी धार्मिक मुद्द्याचा राग मनात धरुन ट्रोल केलं. सध्याची परिस्थिती पाहता मला घरच्यांचे सारखे फोन येत आहे. तेथील परिस्थीती कशी आहे? त्रास होत असेल तर घरी निघून या, असे माझ्या घरचे म्हणतात. पण, मी त्यांना सांगतो की, इथे सगळं काही व्यवस्थित आहे. काहीच अडचण नाही.
इथली लोक खूप सहकार्य करतात. आमच्या सोबत आहेत. आम्ही घेतलेले शिक्षण सरदह संस्थेद्वारे जम्मू-काश्मीरमधील आमच्या मूळ गावातील विद्यार्थ्यांना देऊन त्यांना देखील आत्मविश्वासू व स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा मानस आहे. यासाठी काश्मीर आणि महाराष्ट्रातील एकात्मता, प्रेम, जिव्हाळा अखंडित राहावा, अशी आम्हा सर्व काश्मिरी तरुणांची इच्छा आहे. महाराष्ट्रातून काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र दूत म्हणून आम्ही भविष्यात काम करणार आहोत."
संबंधित लेख वाचा: 1) ‘’युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचं लचके तोडणं…’’ शहीद वैमानिकाच्या आईचे देशवासीयांना पत्र! |
'धर्म पूछ के मारा था.. धर्म बोल के मारेंगे' असे धमकीचे मॅसेज...
'मी गेल्या 20 वर्षांपासून पुण्यात राहतोय. पुणे शहरातच लहानाचा मोठा झालो. माझं बालपण पण इथेच गेलं. त्यामुळे इथल्या लोकांशी माझी आपुलकीची नाळ जोडली आहे. मला इथल्या लोकांनी वेळोवेळी आपुलकीने साथ दिली आहे, मदत केली आहे. मात्र, पहलगाव येथे झालेल्या घटनेनंतर मला इंस्टाग्रामवर धमकीचे मॅसेज आलेत. ''धर्म पूछ के मारा था.. धर्म बोल के मारेंगे' असे स्टेट्स ठेवून एकप्रकारे धमक्याच दिल्या जातात.' धमक्यांचे असे प्रकार घडत झाले. त्याबाबत आज 5 वाजता पोलिस आयुक्तांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे. आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही,पण आम्ही भीतीच्या छायेखाली जगत आहोत' असे प्काश्मीरच्या आरागाम येथील अकीब भट म्हणाले.. 
पहलगाम घटनेनंतर कॅबिनेट संरक्षण समितीने घेतले 'हे' पाच मोठे निर्णय..
- भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.
- अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे पाकिस्तानसोबतची वाहतूक आणि संवाद थांबले.ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे. त्या पाकिस्तानी नागरिकांनी 1 मी 2025 पर्यंत या मार्गाने भारत सोडण्याचे आदेश
- दहशतवादाला मदत करणाऱ्या देशांविरुद्ध कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यात आर्थिक निर्बंध आणि राजनयिक संबंध तोडणे यांचा समावेश होता.
- देशाच्या सीमेवर आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यात अधिक सैनिक आणि सुरक्षा उपकरणे तैनात करणे यांचा समावेश होता.
- नागरिकांमध्ये दहशतवादाच्या धोक्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि धोक्याची माहिती देणे यांचा समावेश होता






