1981 मध्ये प्रदर्शित झालेला आणि बॉलीवूडमधील सर्वांत प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘उमराव जान’ आजपासून पुन्हा थिएटरमध्ये पाहता येईल. मुझफ्फर अली दिग्दर्शित या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटाची कथा, संगीत व दिग्दर्शनासाठी खूप कौतुकास्पद कामगिरी झाली. चित्रपटाच्या री-रिलीजची घोषणा पीव्हीआर आयनॉक्सने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये पीव्हीआरने लिहिले आहे- ‘भव्यता, प्रेम व अमर संगीताची कहाणी. ‘उमराव जान’ पुन्हा एकदा पाहा, एका आश्चर्यकारक 4K अनुभवासह.’
न बस ख़ुशी पे है जहाँ, न गम पे इख़्तियार है |
‘उमराव जान’ असं फक्त उच्चारलं तरी डोळ्यासमोर थेट रेखा उभी राहते हे जरी खरं असलं तरी आज मात्र ‘बाईमाणूस’च्या वाचकांना आम्ही सिनेमातल्या ‘उमराव जान’चं नव्हे तर खऱ्याखुऱ्या ‘उमराव जान’बद्दल सांगणार आहोत.
बुला रहा है कौन मुझको चिलमनों के उस तरफ,
मेरे लिए भी क्या कोई उदास बेक़रार है |
ये किस मक़ाम पर हयात मुझको लेकर आ गई,
न बस ख़ुशी पे है जहाँ, न गम पे इख़्तियार है |
शहरयार' च्या या गझलेच्या लफ्ज़ मध्ये उमराव जानची सर्व व्यथाच व्यक्त होते. 'उमराव जान' ही 'मिर्ज़ा हादी रुस्वा' यांची मूळ कादंबरी आणि लेखक खुशवंत सिंग यांनी 'मिर्ज़ा हादी रुस्वा’ यांची ही 'उमराव जान अदा' ही हिंदीत कादंबरी अनुवादित केली. मिर्झा हादी रुसवाच्या "उमराव जान अदा" ही एक सुंदर आणि गुणी, तवायफची कहाणी आहे, उमरावजान ही 'अवधची' शान होती, ती एक उत्तम शायरा देखील होती.त्यावेळेस तिचा मुजरा बघण्यासाठी 'अवध 'येथील कोठ्यावर आणि आसपास तिचे हजारो चाहते जमत असत.
संबंधित लेख वाचा: 1) ‘सामना’ची ‘पन्नाशी’ अन् सर्जेरावची भूमिका साकारणाऱ्या विलास ‘बापू’ रकटे यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा…! |
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस लखनौ हे उर्दू भाषिक जगताचे निर्विवाद सांस्कृतिक केंद्र होते. गोड उर्दू, अदबदार शायरी, नृत्य आणि संगीताच्या या शहरात एक महत्त्वाचा घटक होता, तवायफबाजी, म्हणजेच तवायफ संस्कृती. परंतु,या तवायफ म्हणजे नेमक्या कोण होत्या? आपली इतिहासाची पाठ्यपुस्तकं 1857 च्या बंडानंतर अवधच्या राजसत्तेचा अस्त तर सांगतात, पण त्या काळात सांस्कृतिक केंद्रस्थानी असलेल्या तवायफांची कहाणी मात्र आपल्या इतिहासाने कुठेच नोंदवलेली नाही. मिर्झा हादी रुसवा लिखित ‘उमराव जान अदा’ ही उर्दू कादंबरी हीच विस्मृती उलगडण्याचा प्रयत्न करते.
अमरीन होते उमराव जानचे खरे नाव...
ही कादंबरी उमराव नावाच्या एका रहस्यमय लखनवी तवायफीची कथा सांगते, जी केवळ एक सुंदर स्त्री नव्हती, तर प्रतिभासंपन्न कवयित्रीही होती. उमराव जान हे सामाजिक वास्तववादाच्या सीमारेषांवर उभे असलेले साहित्य असून, नवाबी काळातील परंपरा, शिष्टाचार आणि स्त्रीजन्माच्या गुंतागुंतींची शोकांतिका यात गुंफलेली आहे.
उमराव ही मूळची उच्चवर्गीय, प्रतिष्ठित घरातील मुलगी. पण लहान वयात तिचं दिलावर खान नावाच्या गुन्हेगाराने अपहरण केलं आणि खानुम जान नावाच्या एका प्रतिष्ठित तवायफच्या कोठ्यावर तिला विकण्यात आलं. तिथून सुरू होतो तिच्या आयुष्याचा एक वळण घेणारा प्रवास, जो लखनौच्या तवायफ संस्कृतीशी गुंफलेला आहे.
1857 पूर्वी लखनौमध्ये नजाकत (कोमलता), नफासत (शालीनता) आणि शराफत (सौजन्य) या नवाबी मूल्यांचा अधिराज्य होतं आणि याचा गाभा होता तवायफांचा कोठा. हे कोठे केवळ शरीराची विक्री करणाऱ्या जागा नव्हत्या, तर संगीत, नृत्य, उर्दू-फारसी शायरी, भाषाशुद्धता आणि सुसंस्कृत वर्तन यांच्या शाळा होत्या.
खानुम जान स्वतः एक जाणकार शायरा आणि संगीतकार होती. ती आपल्या ‘मुलींना’ उत्तम शिक्षण, भाषा आणि अदब शिकवायची. तवायफींना फारसी, उर्दू, अरबीचा गाढा अभ्यास असायचा. उमराव स्वतः म्हणते, "रक्ताचं नातं बळकट असतं, पण कोणताही सन्माननीय माणूस मला भेटायला का येईल?" तिच्या या वाक्यात संपूर्ण समाजरचनेतील पिळवट स्पष्ट दिसतो.
एक वेळ अशी येते की उमराव आपल्या भावाला विणवते, "आईला शेवटचं एकदा भेटायचंय." तेव्हा तो म्हणतो, "अशी कल्पनाही करू नकोस, तू पुरेसा अपमान आधीच केला आहेस." पतिव्रता गृहिणी आणि बाजारातली स्त्री यांच्यात समाजात एक स्पष्ट रेषा आखलेली होती, त्या रेषेच्या पलीकडे गेलेल्या स्त्रीला पुन्हा ‘घरातली’ होण्याचा अधिकार नव्हता.
या कोठ्यांमध्येही एक पदानुक्रम होता. ठकाही म्हणजे सामान्य नागरिकांसाठी देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया. खांगी या परद्यात राहणाऱ्या, आर्थिक गरजांमुळे छुपा देहव्यवसाय करणाऱ्या आणि मग होत्या तवायफ, ज्या केवळ नवाब, जमिनदार यांसारख्या प्रतिष्ठित वर्गासाठी राखीव. त्यांना मौल्यवान दागिने, बक्षिसं, आणि सांस्कृतिक सन्मान मिळत असे.
पहिल्याज मुजऱ्यात सुलतान शाहच्या प्रेमात पडली होती उमराव...
उमराव जानचा पहिला मुजरा हा लखनऊचे नवाब सुजाअत अली खांच्या मुलाच्या लग्नात झाला होता. त्याचदिवशी ती नवाब सुलतान शाहच्या प्रेमात पडली होती. त्या रात्री उमराव आणि सुलतान शाह एकत्र होते. पण तेवढ्यात तिथे एक बदमाश आला. उमरावर तो बळजबरी करु लागला. नवाब साहबने अखेर त्या बदमाशावर गोळी झाडली. या घटनेनंतर नवाब सुलताना शाह आणि उमराव जान यांची पुन्हा कधीच भेट झाली नाही.
यानंतर एकेदिवशी फैज अली नावाची एक व्यक्ती उमरावच्या आयुष्यात आली. त्याने तिला लग्न, संसाराची स्वप्ने दाखवली. काही दिवसांनी उमराव लखनऊहून उन्नावसाठी निघाली होती. पण वाटेत गढीचा राजा शम्भूनाथ सिंहच्या फौजने उमराव आणि तिच्यासोबतच्या लोकांना ताब्यात घेतले. या कैदेतून फैज पळण्यात यशस्वी ठरला. पण उमराव मात्र अडकली. या घटनेनंतर उमरावचे लग्न करण्याचे स्वप्नच भंगले. राजा शम्भूनाथ सिंह शायरची इज्जत करायचे. त्यांना उमरावची ओळख पटल्यानंतर त्यांनी तिला सोडून दिले होते. उमराव हळूहळू नाचगाण्यांना वैतागली आणि हजला निघून गेली. परतल्यानंतर काही दिवस लखनऊत राहिली आणि नंतर वाराणसीला आली.
उमरावच्या शेवटच्या काळाविषयी कदाचितच कुणाला ठाऊक नसावे. ही 1857 ची गोष्ट आहे. इंग्रजांनी लखनऊ येथे आतंक निर्माण केला होता. चारही बाजुंना रक्तपात आणि दरोड्याच्या घटना घडत होत्या. सर्वकाही उद्धवस्त झाले होते. राजे-रजवाडे उद्धवस्त झाले, मैफिली बंद पडल्या. 1857 च्या बंडानंतर सगळं उलटलं. इंग्रजांच्या नजरेत नवाबी जीवनशैली ही अविचाराने बेधुंद जगणं होती. त्यांनी व्हिक्टोरियन नैतिकतेच्या आधारावर लखनौच्या संस्कृतीचं 'शुद्धीकरण' सुरू केलं आणि त्यात तवायफांचं प्रस्थ संपुष्टात आलं.
पूर्वी शहराच्या मध्यवर्ती वाड्यांमध्ये राहणाऱ्या तवायफींना शहराच्या सीमांवर ढकलण्यात आलं. त्यांच्या कमाईवर कर लादण्यात आले, शरीराच्या तपासण्या सुरू झाल्या. आता त्या फक्त सैनिकांचं मनोरंजन करणाऱ्या 'रोगी' बायका झाल्या होत्या. रोग झाल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकलं जायचं. उमराव जान तिच्या आयुष्यात एकटी होती. तिचे हजारो दिवाने होते. पण आयुष्याच्या वाटेवर ती एकटीच होती.
मैफिलीत मिळालेल्या पैशांनी करायची क्रांतिकाऱ्यांची मदत
उमरावच्या बाबतीत मात्र इंग्रज अधिकाऱ्यांना सहानभूती होती. उमरावने लखनौ सोडून जाऊ नये अशी इंग्रज अधिकाऱ्यांची इच्छा होती. पण उमरावने इंग्रजांचे ऐकले नाही. 1922 साली तिने लखनौ सोडले आणि ती बनारसला आली. वाराणसीतील लोकं त्यावेळी त्यांच्या मुलांना उमरावकडे संगीत शिकायला पाठवायचे. जिल्ह्याच्या बाहेरूनदेखील अनेक मुलं उमरावची तालिम घ्यायला यायचे.
इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेकदा उमरावने त्यांच्यासाठी मैफिल घ्यावी म्हणून खूप प्रयत्न केले, पण ती कधीच त्यासाठी तयार झाली नाही. वाराणसीमध्ये उमरावबद्दल लोकांना प्रचंड आदर होता, जेव्हा इंग्रज अधिकारी तिला शोधायला कोठीवर यायचे तेव्हा लोकं तिला त्यांच्या घरी लपवून ठेवायचे. स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या क्रांतीकारकांना उमराव आर्थिक मदत करायची असेही म्हटले जायचे. 
मुजफ्हर अली व जेपी दत्ता यांनी 70 एमएम पडद्यावर रेखाटलेली उमराव जानची कहाणी त्यांना स्वतःला इज्जत, शोहरत आणि भरपूर प्रसिद्ध मिळवून गेली. पण तसं यश आणि पैसा दुर्देवी उमराव जानला मिळाला नाही. तिची उतरत्या आयुष्यातील शोकांतिका मांडण्यात हे सिनेमे कमी पडले कारण, त्यांचं खरा उद्देश पैसा आणि प्रसिद्धी हेच होतं. उमराव जान त्यांच्या जीवनातील चमक धमक सोडून नाचगाण्यापासून दूर बनारसला एका तवायफ सारखं न राहता साध्या राहणीमान स्त्री सारखे गुमनामीत आयुष्य व्यथित करू लागली.
‘उमराव जान’ सिनेमात शहऱयारची एक गझल खऱ्या उमराव जान अदाचा सारा संघर्षच सांगते,
जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने
तुझ को रुसवा न किया ख़ुद भी पशेमाँ न हुए
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने
कब मिली थी कहाँ बिछड़ी थी हमें याद नहीं
ज़िन्दगी तुझ को तो बस ख़्वाब में देखा हमने
ऐ 'अदा' और सुनाए भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने
सर्व आयुष्य उध्वस्त झालं होत. म्हणूनच उतरत्या वयात त्या काशीला आल्या. बनारस येथे दालमंडीजवळ दगडांच्या गल्लीतील घरात राहू लागल्या. उमराव यांनी आपले उर्वरित आयुष्य येथेच घालवले. जाणकारांनी सांगितले की उमराव जान वाराणसीत कुठल्याही मैफिली सजवत न्हवत्या की कुठलाही मुजरा करत नव्हत्या. त्या फक्त नमाज करत असत. त्यानीं कुराणच पठण करण्यात आणि आपल्या अल्लाह बरोबर माफी आणि तलाफि करण्यात दिवस घालवले. उमराव जान यांच्या आयुष्यातील शेवटचा भाग अंधारातच गेला. ज्या वेळेस शरीरातील अंतिम श्वास सोडून गेला तेव्हा बनारस येथे तिची कबर तिच्या आयुष्याची आजही कहाणी सांगते.
उमरावची कबर आजही काही सांगू पाहतेय…
उमराव जानची कबर सुमारे 23 वर्षांपूर्वी डर्बी शायर क्लबचे प्रमुख शकील अहमद यांनी शोधून काढली होती. डर्बी शायर क्लबचे अध्यक्ष शकील अहमद बबलू हे वाराणसीत वास्तव्याला असून येथे ते समाजसेवा करतात. त्यांचे येथे एक घड्याळ्यांचे दुकान आहे.
त्यांची संस्था कलाकारांसाठी काम करते. जुन्या कलाकारांच्या आठवणी जपून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. उमराव जानच्या कबरविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला. शकील यांनी सांगितले, 26 डिसेंबर 1937 रोजी उमराव जानचे निधन काशीत झाले होते. एकेकाळी उमराव जानचे वडील नवाबांच्या कबरवर प्रकाश द्यायचे काम करत होते. पण आज त्यांच्या मुलीच्या कबरवर अंधार पसरला आहे. उमरावच्या कबरची अवस्था तिच्या खासगी आयुष्यापेक्षा काही वेगळी नाही. कबरीवरचा कचरा बाजुला केल्यानंतर त्यावर अरबी लिहिलेला एक दगड आढळून आला. त्यावर लिहिले होते,
''कितने आराम से है कब्र में सोने वाले,
कभी दुनिया में था फिरदौस में अब है मस्कान,
कब्र किस अहले वफा की,
अल्लाह-अल्लाह सबको गम जिसका है,
वह दोस्त हो या दुश्मन।
-उमराव बेगम, लखनवी।''






