(अप्सरा आगा)
डिजिटल युगात जगभरातील पुस्तकांची उपलब्धता वाढली असताना, साहित्याकडे कमी होत असलेल्या रुचीमुळे चिंता आता वाढू लागली आहे. 'जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन' दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवसाला, जागतिक पुस्तक दिन म्हणूनही ओळखलं जातं. या दिवशी वाचन, प्रकाशन यांना प्रोत्साहन दिलं जातं. जेवढं चांगलं वाचाल, तेवढीच चांगली प्रगती होते, हे सर्वांनाच माहित आहे.
पुस्तक हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे, असं म्हणतात. तो कोणत्याही परिस्थितीत माणसाला एकटं सोडत नाही. सोशल मीडिया अनेकांसाठी वाचनाच्या मार्गातला अडथळा ठरतो. सद्याच्या परिस्थितीत सलग अर्धा तास वाचन करणे शक्य होत नाही. प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणजे वाचन, वाचनाची गोडी मनात रुजवली तर माणूस वाचतो अन् मग सुरू होतो, वाचनाचा प्रवास. असाच प्रवास सुरू करायचा असेल, तर मग सांगली जिल्ह्यातील पुस्तक घरपोच करणारे ‘किताब घर’ या अनोख्या संकल्पनेविषयी.. 
पवार कुटूंबाच्या किताब घरा बद्दल…
सांगली जिल्ह्यातील पवार कुटुंब… या कुटुंबाने 2022 सालापासून ‘किताब घर’च्या माध्यामातून सांगली शहरात घरपोच पुस्तके देण्याची संकल्पना सुरू केली. रत्नप्रभा पवार आणि दिपक पवार यांना वाचनाची खूप आवड, त्यामुळे त्यांनी आपली मुलगी केतकीलाही वाचनाची सवय लावली होती. अनेक लोकांना वाचायचे असेल, तर कोणत्या तरी ग्रंथालयात जाऊन पुस्तके आणावी लागत. केतकीही वाचनासाठी पुस्तके आणण्यासाठी ग्रंथालयात जात होत्या. हाच विचार करत कुटुंबाने 'आपण लोकांना घरपोच पुस्तके उपलब्ध केली, तर लोक वाचू लागतील,' हा विचार केला.
सध्याच्या धकाधकीच्या जगात लोकांना ग्रंथालय, वाचनालयात जाऊन पुस्तके पाहायला, आणायला सहसा वेळ मिळत नाही. ज्या लोकांना पुस्तके मिळत नाहीत, अशा लोकांना घरापर्यंत पुस्तके उपलब्ध करून देऊ, अशी चर्चा त्यांच्या कुटुंबात रंगली आणि मग कुटुंबाच्या संकल्पनेतून ‘किताब घरा'ची संकल्पना उभी राहिली.
केतकी पवार या सध्या गोव्यात नोकरी करतात. तसेच, सांगलीतील 'किताब घर' सांभाळतात. पुस्तकांची ऑनलाईन मागणी, पुस्तक खरेदी आदी कामे त्या तिथूनच करत असतात. सांगलीत असणारी त्यांची आई रत्नप्रभा आणि दिपक पवार हे दुचाकीवरून पुस्तक घरपोच करण्याचे काम करतात. केतकी यांनी स्वत: पैसे खर्च करून ही संकल्पना उभी केली आहे. 2022 साली सांगली जिल्ह्यात सुरू झालेले हे 'किताब घर' सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात पोहचले. सुरूवातीला बारा सदस्य होते. आता त्याची संख्या शेकडोमध्ये गेली आहे.
संबंधित लेख वाचा: 1) आठवड्याचं पुस्तक : महाराष्ट्राच्या काही प्रश्नांचा आणि आंदोलनांचा परामर्श |
सुरूवातीला बारा सदस्य, आता त्याची संख्या शेकडोमध्ये गेली आहे…
लहान मुलांची पुस्तके मोठे फोटो आणि चित्रांसह जास्तीत जास्त इंग्रजी आहेत. त्यामुळे मुले त्याचा आनंद घेऊ शकतात. त्यातून वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतात. कल्पनारम्य, विज्ञान कथा, भयपट, कॉमिक थ्रिलर, इतिहास, काल्पनिक, नॉन फिक्शन, पौराणिक कथा, रोमॅटोक, चरित्र, रहस्य, कविता, क्लासिक्स, परीकथा, प्रेरणा, शेअर बाजार अशी बरीच वेगवेगळी पुस्तके येथे उपलब्ध आहेत. आता स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची पुस्तकेही काही उपलब्ध करुन देण्याचा कुटुंबाचा मानस आहे.
जुनी आणि नवीन संग्रह असलेली सर्व प्रकारची पुस्तके आहेत. यासाठी ते वाचकास पुस्तकांच्या यादीची पीडीएफ फाइल देतात आणि नंतर लोक त्यातून पुस्तके निवडतात. घरी मुले असतील, तर त्यांच्यासाठी किड्स लायब्ररी मोफत आहे. सदस्यत्वासाठी मासिक चार पुस्तके मोजक्या किंमतीमध्ये आणि मुलांना विनामूल्य सदस्यत्व मिळते. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध वाचतील, अशी सर्वच पुस्तके ‘किताब घर’ येथे उपलब्ध आहेत. जवळपास साडे चार हजारहून अधिक पुस्तके आहेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांचे पुस्तक उपलब्ध आहेत. 
80 वर्षाच्या आज्जीही खास पुस्तक वाचण्यासाठी घरी येतात
केतकी सांगतात की, ''स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सेट/नेट परीक्षांसाठीही अभ्यास पुस्तके आमच्याकडे उपलब्ध आहेत. जी आवश्यकतेनुसार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली जातील. हा संपूर्णपणे पुस्तकांचा घरपोच प्रकल्प आहे. आमच्या घरी आम्ही इतरांसाठी पुस्तके वाचण्यासाठी एक लहान जागा तयार केली आहे. जर तुम्ही तेथे येणार असाल, तर पुस्तके निवडा आणि निवांत वाचत बसा. येथे वाचन विनामूल्य असेल. खरेतर 80 वर्षाच्या आज्जीही खास पुस्तक वाचण्यासाठी घरी येतात.''
पुढे त्या सांगतात की, ''आमचे ग्रंथालय समाजासाठी एक केंद्र बनेल. जिथे लोक एकत्र येऊ शकतील, विचारांची देवाणघेवाण करू शकतील आणि एकमेकांना प्रेरणा देऊ शकतील. वाचनाला जीवनाचा एक आवश्यक भाग म्हणून प्रोत्साहन देणे आणि पुस्तकांच्या प्रेमातून लोकांना जवळ आणणे, हे आमचे ध्येय आहे. याशिवाय नवोदित लेखकांना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी आणि त्यांचे कार्य प्रकाशित करण्यासाठी आम्हाला एक व्यासपीठ तयार करायचे असल्याचे.''
आपल्या ग्रंथालयातील एक तरी पुस्तक सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक घरात जावे, यासाठी देखील हे कुटुंब स्वत: राबत आहे. हे किताब घर प्रत्येक जिल्ह्यात कसे नेता येईल, याचाही विचार सांगलीतील पवार कुटुंब करत आहे. शेवटी सांगण्याचा मुद्दा हाच की, वाचन ही एक भूक आहे. ती सतत वाढावी आणि माणसाने वाचत राहावे, तेव्हा आत्मविश्वास वाढेल.






