"मी हे कोणालाही सांगितले नव्हते. मला हे यश माझ्या बहिणीला समर्पित करायचे आहे, जी गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त आहे. सुदैवाने, आता तिची प्रकृती स्थिर आहे. जेव्हा जेव्हा मी चेंडू पकडत होतो, तेव्हा मला ती माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. हे प्रदर्शन तिच्यासाठी आहे."
अशा शब्दांत टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
इंग्लंडयेथील एजबेस्टन कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 336 धावांनी ऐतिहासिक पराभव केला आणि या विजयासह पाच सामन्यांची मालिका आता 1-1 च्या बरोबरीवर आली आहे. शुभमन गिलने फलंदाजीमध्ये आणि आकाश दीपने गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आकाश दीपने सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या आणि त्याने हे यश त्याच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या बहिणीला समर्पित केले.
टीम इंडियातील सीनियर आणि इंग्लंडमध्ये अनेक टेस्ट मॅच खेळलेल्या चेतेश्वर पुजारासोबत एका खास इंटरव्यूमध्ये आकाश दीपने हा खुलासा केला. सध्या बहिणीची तब्येत थोडी ठिक असल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केलं. तिची तब्येत थोडी ठीक आणि स्थिर आहे. माझ्या कामगिरीने ती सर्वात जास्त आनंदी असेल. मागच्या दोन महिन्यात मानसिक दृष्टया तिने बरच काही सहन केलय. मी मैदानावर जेव्हा केव्हा चेंडू पकडायचो, तेव्हा माझ्या नजरेसमोर तिचा चेहरा यायचा. मला तिच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा होता. हा विजय मी तिला समर्पित करतो” असं आकाशदीप म्हणाला.
इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा आकाश दीप दुसरा भारतीय गोलंदाज
रविवारी 6 जुलैला एजबेस्टन टेस्टच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाने इंग्लंडला 271 धावांवर गुंडाळलं. 336 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आकाश दीपने टेस्टच्या अखेरच्या दिवशी 4 विकेट काढले. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने एकूण मिळून 6 विकेट्स काढले. पहिल्या इनिंगमध्ये आकाश दीपने 4 विकेट्स काढले होते. अशा प्रकारे 10 विकेट्स काढून त्याने आपल्या नावावर रेकॉर्ड नोंदवला. इंग्लंडमध्ये एका टेस्ट मॅचमध्ये 10 विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
सहा महिन्यांत वडील अन् मोठा भाऊ गमावला…
आकाश दीप हा भारतीय क्रिकेटपटू असून वेगवान गोलंदाज आहे. आकाशदीपचा जन्म 15 डिसेंबर 1996 रोजी झाला असून तो मूळचा बिहारचा आहे. 28 वर्षीय आकाशदीपचे मुळ गाव सासाराम (रोहतास-बिहार) हे असून त्याला सासाराम एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाते.
आकाश दीपला क्रिकेट खेळण्यास त्याच्या वडीलांचा विरोध होता. वडिलांसोबत भांडत नोकरीच्या शोधात तो काकाच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये आला आणि स्थानिक क्रिकेट अकादमीत सहभागी झाला. आकाश दीप वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होऊ लागला, परंतु आकाशला सहा महिन्यांत त्याचे वडील आणि मोठा भाऊ गेल्याने कुटुंबावर दुःखाचा सामना करावा लागला.
यामुळे त्याला तीन वर्षांसाठी खेळ सोडावा लागला. आकाशच्या घरात पैसे नव्हते. त्याला त्याच्या आईची काळजी घ्यावी लागली. यामुळे त्याने तीन वर्षे क्रिकेट सोडले. नंतर आकाशला वाटले की तो जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. त्यानंतर तो दुर्गापूरला गेला. तिथून तो पुन्हा कोलकाताला गेला. आकाशने कधीच हार मानली नाही. कोलकातामध्ये आल्यानंतर त्याने CAB च्या दुसऱ्या विभागीय लीगमध्ये युनायटेड क्लबकडून सुरुवात केली.
आकाश दीपची कारकीर्द
आकाशने बंगालसाठी 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने 138 विकेट्स घेतल्या. 28 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 48 टी-20 सामन्यांमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळला आहे. या वर्षी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये 10 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश खालच्या फळीत फलंदाजी करतो आणि मोठे फटके मारण्याचीही त्याच्यात क्षमता आहे.






