(स्नेहा महाले)
अलीकडेच मुंबईच्या पवई परिसरात चक्क रस्त्यांवर मगर आल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. त्याच्या काही महिने अगोदर असाच किस्सा चिपळूण शहरात घडला होता. चिपळूणमध्येही मगरीचा रस्त्यांवर मुक्त वावर पाहून नागरिकांची भंबेरी उडाली होती. हे असं का होतं यावर अलीकडेच भारतात एक संशोधन झाले.
संशोधनातून असे समोर आले आहे की मानवी वस्तीच्या जवळपास राहणाऱ्या मगरी या, कमी वस्तीच्या किंवा कमी संघर्षाच्या परिसरात राहणाऱ्या मगरींपेक्षा जास्त तणावग्रस्त असतात. या संशोधनासाठी वडोदरा आणि तिथून ४५ किमी दूर असलेल्या चरोतर गावातील मगरींचा यात अभ्यास करण्यात आला. वडोदरात मगर आणि माणूस यांच्यातील संघर्ष जास्त आहे तर चरोतरमध्ये मगर आणि माणूस यांच्यात एक सामंजस्यपूर्ण सहअस्तित्व दिसून येतं. 
मानवी वस्तीच्या जवळपास राहणाऱ्या मगरींवर संशोधन
मगरींच्या शारिरीक प्रतिक्रिया या त्यांच्या वस्तीनुसार वेगवेगळ्या असू शकतात आणि पर्यावरणातील कारणांमुळे त्यात चढ-उतार येतात. वडोदरात प्रदूषित वासिष्ठी नदी आहे आणि शहरी वातावरण आहे, तर चरोतरमध्ये स्वच्छ पाण्याचे तलाव आहेत आणि लोक मगरींची पवित्र प्राणी म्हणून पूजा करतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या मगरींमध्ये फार भिन्न प्रकृति जन्माला आली आहे. या अभ्यासातून वन्यजीवांवर मानवी हालचाली व पर्यावरणीय परिस्थितीचा होणारा परिणाम यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
तसेच त्यांच्या संरक्षणासाठी त्यानुसार योजना तयार करण्याचे सुचवण्यात आले आहे. अहमदाबाद विद्यापीठ व मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट यांच्या या संयुक्त अभ्यासात दिसून आलंय की शारिरीक ताणाचा प्राण्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. दीर्घकालीन तणावामुळे त्यांची प्रजनन व प्रतिरक्षा शक्ती बाधित होते. एखादी प्रजाति संकटात आहे की नाही याचीही या अभ्यासातून माहिती मिळते.
अहमदाबाद विद्यापीठाच्या जैविक व जीवन विज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका व अभ्यासाच्या लेखकांपैकी एक असलेल्या रत्ना घोषाल सांगतात, “भारतात बहुसंख्य जैव-अधिवास हे प्रदूषण, वस्ती विखंडन, शहरीकरण आणि वाढत्या मानव-प्राणी संघर्षाने वेढलेले आहेत. या आव्हानांमुळे प्राण्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आणि पर्यावरणीय व्यवस्था अस्थिर होते. त्यामुळे मगरींसारख्या मानवी वस्तीजवळ राहणाऱ्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी पर्यावरणाची माहिती व आकलन असणे गरजेचे आहे. पर्यावरण धोरणांची योग्य अंमलबजावणीही त्यासाठी महत्त्वाची ठरते.”
भारतात मगर अनेक ठिकाणी आढळतात. ते सध्या असुरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना संरक्षण प्राप्त आहे. नदी-तलाव परिसंस्था व अन्नसाखळीत मगर शीर्षस्थानी असतात. त्यांची संख्या वाढत असेल तर पर्यावरण योग्य आहे असा संकेत ते देतात. ते मासोळ्या, उभयचर प्राणी, पक्षी, लहान स्तनधारी प्राणी यांची शिकार करतात. यातून ते अन्नसाखळी शाबूत ठेवतात, आजार नियंत्रणात आणतात आणि पोषणचक्रात आपले योगदान देतात.
भारतात मगरींनी माणसांवर हल्ले करण्याची संख्या पाच पटीने वाढली
2008-13 दरम्यान झालेल्या एका अभ्यासानुसार, समुद्री मगर, नील-मगर यांच्यानंतर गोड्या पाण्यातील मगर हे माणसांवर हल्ले करण्यात तिसऱ्या क्रमांकावर येतात. भारतात मागील दोन दशकात, मगरींनी माणसांवर हल्ले करण्याची संख्या पाच पटीने वाढली आहे. 2001-10 मध्ये 57 हल्ले झाले होते तर 2011-20 मध्ये 338 हल्ले झाले. वडोदरामध्ये यातील बहुसंख्य हल्ले नोंदवण्यात आले. घोषाल म्हणतात, “मगर हवामान बदलांचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त मॉडेल आहेत. त्यांच्या पर्यावरणीय महत्त्वापेक्षाही पाळीव प्राणी व माणसांवरील हल्ल्यामुळे त्यांना नकारात्मक दृष्टीने बघण्यात येते. ही धारणा परिसंस्था व्यवस्थेतील त्यांची भूमिका कमकुवत करते आणि त्यांच्या संरक्षणाचीही गरजही अधोरेखीत करते.”
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ तनुज सिंह गुजरातमधील मगरींचा अभ्यास करत आहेत. ते सांगतात, “आंघोळ, मासेमारी तसेच नाव चालवणे इत्यादींमुळे माणसं मगरींच्या जवळ येत असतात. मगरींना मोकळ्या जागी उन्हं खाण्याची गरज असते. इथेच त्यांचा माणसांशी संघर्ष उडतो. प्रजनन काळात मगर अधिक आक्रमक होतात आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी कोणावरही हल्ले करू शकतात. त्यामुळे मगर-माणूस यांच्यातील संघर्ष जगभर सुरू आहे. पण चरोतरसारख्या ठिकाणी यांच्यातील एक शांतीपूर्ण सह-अस्तित्त्वही दिसून येते हे महत्त्वाचे आहे.”
अभ्यासकांनी प्रजनन व अ-प्रजनन काळातील फिकल ग्लुकोकॉर्टीकॉईड मेटाबोलाईट्सचे अनुक्रमे 107 व 22 नमुने गोळा केले. जे मगरीच्या विष्ठेतून गोळा केले जातात. प्राण्यांमधील तणाव मोजण्यासाठीची ही लोकप्रिय पद्धती आहे. मगरींना पकडण्याआधी ते पकडल्यानंतरच्या एफजीसीएम स्तरात 11 पटीने वाढ झाली होती. वडोदरात हा स्तर चरोतरातील स्तरापेक्षा खूप जास्त म्हणजेच उच्च तणावाचा होता. हेच वडोदराच्या मगरींच्या आक्रमक वृत्तीचे कारण होते. हा उच्च स्तर त्यांच्यासाठी घातक आहे का याचाही अभ्यास करण्यात आला.
घोषाल सांगतात, “अपेक्षांच्या उलट, प्रजनन व अ-प्रजनन काळातील तणावाच्या स्तरात महत्त्वपूर्ण अंतर दिसलं नाही. कैदेतील तसेच चरोतरमधील स्वतंत्र मगरींमध्ये तणावाची पातळी सारखीच होती. त्यामुळे कैदेत असणं या मगरींसाठी इतकं तणावाचं नव्हतं जसं की आधी वाटलं होतं. कदाचित नियमीत देखरेख आणि सुरक्षित वातावरण यामुळे हे घडलं होतं.”
भारतात जल-परिसंस्था व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी मगर फार महत्त्वाची
अभ्यासातून दिसलं की मगरींच्या शारिरीक प्रतिक्रिया या त्यांच्या भिन्न परिसंस्था व अधिवासांप्रमाणे वेगवेगळ्या होत्या. वडोदरात वर्षभर मगरी तणावात दिसून आल्या. पण हा दीर्घकालीन तणावाचा संकेत आहे की अनुकूलतेचं लक्षण आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यासाठी आणखी अभ्यासाची गरज आहे. कारण शरीरात ग्लुकोकॉर्टीकोडस (तणावाचे हार्मोन) आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी उर्जा मिळवण्यासाठी स्त्रवत असतात आणि त्यामुळे ते नैसर्गिकरित्या अनुकूल असतात.
घोषाल सांगतात, “वडोदरातील प्रदूषित आणि संघर्षाचं वातावरण, शांत चरोतर प्रदेशाच्या तुलनेत मगरींमध्ये जास्त तणाव निर्माण करतो. जास्त तणाव हा शारिरीक अनारोग्याचा संकेत असला तरीही, कठीण परिस्थितीत तो अनुकूलनाचा संकेत असू शकतो.” भारतात जल-परिसंस्था व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी मगर फार महत्त्वाचे असतात. त्यांची तणाव प्रतिक्रिया व परिसंस्थीय अनुकूलन समजून घेणे, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योग्य योजना तयार करण्याच्या कामी मदत करू शकतात.
सिंह सांगतात, “संरक्षणाचे प्रयत्न हे स्थानिक परिस्थितीनुसार केले गेले पाहिजेत, सर्वांसाठी एकच दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. भविष्यात याचाही अभ्यास करायला पाहिजे की मगर विभिन्न अधिवासांशी अनुकूलन कसे साधतात. नैसर्गिक परिसंस्थेतील त्यांच्या महत्त्वाविषयी सार्वजनिक शिक्षण व सुरक्षित परंपरांना प्रोत्साहन दिले तरी मगर-मानव संघर्ष कमी होतील आणि संरक्षण प्रयत्नांना यश लाभेल.”
(साभार - मोंगाबे इंडिया)






