9 एप्रिल 2020 रोजी गुलफिशा फातिमाला भेदभावपूर्ण सीएए-एनपीआर-एनआरसी (नागरिकता संशोधन विधेयक) यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. 11 एप्रिल 2020 रोजी तिला परत युएपीए अंतर्गत उत्तर-पूर्व दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये जातीय दंगली भडकवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तरुण विद्यार्थी नेता असलेल्या गुलफिशाने 22 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर-पूर्व दिल्लीतील एका धरणे आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे तिथल्या रस्त्याचा एक भाग बंद झाला होता.
याप्रकारामुळे भडकलेल्या करावल नगरच्या कपिल मिश्रा या भाजप आमदाराने जे सध्या दिल्ली सरकारमध्ये कायदा आणि न्याय मंत्री आहे, धमकी दिली की दिल्ली पोलिसांनी रस्ता सुरू केला नाहीतर ते रस्ता चालू करेल. काही तासांनीच हिंसाचार उसळला जो पाच दिवस धुमसत राहिला आणि 53 लोकांचा जीव घेऊन आणि 700 लोकांना दुखापत करून थंड झाला.
मागच्या आठवड्यात दिल्ली न्यायालयाने या दंगलीत हात असल्याच्या कारणावरून कपिल मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास दिल्ली पोलिसांना आदेश दिले. मोहम्मद इलियास यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने हा आदेश दिला कारण त्याआधी पोलिसांनी मिश्राच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती. पण पोलिसांनी मिश्रा यांना अजूनही अटक केली नाही. पोलिसांनी याच दंगलीच्या आरोपावरून आंदोलनात सहभागी अनेक विद्यार्थ्यांवर युएपीए अंतर्गत खटले दाखल केले होते, यात शाजरील इमाम, मीरान हैदर तसेच उमर खालिद यांचा समावेश आहे. हे सर्व अजूनही तुरुंगातच आहेत. कोणालाही जामीन मिळालेला नाही. 
गुलफिशा फातिमा कोणत्या गुन्ह्याखाली तुरुंगात आहे?
गुलफिशाला 28 जुलै 2020 रोजी तुरुंगातच पुन्हा एकदा अटक करण्यात आली. ती आणि अन्य दहा मुस्लिम तरुणांवर, तसेच विद्यार्थी आंदोलक नताशा नरवाल, देवांगना कालिता यांना 19 वर्षीय मुस्लिम मुलाचा दंगलीदरम्यान खून केल्याचा आरोप आहे. तिला युएपीए अंतर्गत दाखल झालेल्या खटल्यात आधी जामीन मिळाला पण दिल्ली पोलिसांनी त्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर जामीन रद्द करण्यात आला.
15 जून 2021 रोजी सहआरोपी देवांगना कालिता, नताशा नरवाल आणि आसिफ इक्बाल तन्हा यांना जामीन देतांना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले, “आम्हाला हे म्हणायला भाग पडत आहे की, असे दिसतेय की विरोधाची आग विझवण्याच्या काळजीने आणि गोष्टी कदाचित हाताबाहेर जातील या भीतीने, राज्याने घटनेने दिलेला ‘विरोधाचा हक्क’ आणि ‘दहशतवादी कारवाया’ यांच्यातील अंतर पुसून टाकले आहे.”
संबंधित लेख वाचा: 1) मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 'मार्टी' का महत्त्वाची? |
गुलफिशाच्या जामिनाला दिल्ली पोलिसांचे आव्हान
या जामिनाला दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 2 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही हा जामीन उचलून धरला पण त्याचा ‘उदाहरण’ म्हणून वापर करण्यात येणार नाही असेही निर्देश दिले. तरीसुद्धा न्यायालयाने असेही म्हटले की अन्य सह-आरोपींना जर या निकालाचा आधार घेऊन जामीनासाठी अर्ज करायचा असेल तर आम्ही त्याचा विचार करू शकतो. या निकालाचा आधार घेत गुलफिशाने तिच्यावरील खूनाच्या आरोपासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला कारण तीही यात सह-आरोपी आहे, पण दोन वर्षे उलटूनही दिल्ली न्यायालयात तिच्या अर्जावरील निकाल लागलेला नाही आणि ती तुरुंगातच आहे.
कोण आहे गुलफिशा?
गुलफिशा ही उत्तर-पूर्व दिल्लीच्या सिलमपूरची रहिवासी आहे. तिचे वडील घराजवळच एक किराणा सामानाचे दुकान चालवतात. तिच्या घरातली ती पहिली बीए व एमए (उर्दू साहित्य) करणारी मुलगी आहे. तिने नंतर एमबीएही पूर्ण केले. काही काळ तिने आकाशवाणीसाठी उर्दू रेडियो जॉकी म्हणूनही काम केले.
समान नागरी कायद्या विरोधात आंदोलन करताना स्थानिक भागातून अनेक तरुण मुस्लिम महिला पुढे आल्या ज्यांनी या आंदोलनाला बळ दिले. कोणत्याही आंदोलनाचा पूर्व अनुभव नसतानाही गुलफिशाने लोकशाही मार्गाने आंदोलनात भाग घेतला. सिलमपूर येथील धरणे आंदोलनात ती रोज प्रौढ मुस्लिम महिलांसाठी साक्षरता वर्ग घ्यायची ज्या आंदोलनात सहभागी व्हायला येत होत्या. 
गुलफिशावर दोन आरोप आहेत. एकात जामीन मिळाल्यानंतर तिला तुरुंगात असतानाच खुनाच्या आरोपाखाली अटक झाली पण त्यात जामीन न मिळाल्यामुळे गेली पाच वर्षे ती तुरुंगातच सडत आहे. दिल्ली उच्च न्यायालयात तिच्या जामीन अर्जावर तब्बल 65 वेळा सुनावणी झाली आणि तरीही निकाल मात्र देण्यात आलेला नाही. खुनाच्या आरोपात सह-आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मिळाल्यावर गुलफिशाला जामीन मिळण्याच्या आशा वाढल्या.
तिने दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला पण त्यावर अजूनही निकाल लागलेला नाही. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुलफिशाला युएपीए अंतर्गत अटक झाल्याच्या संदर्भात आदेश दिला की दिल्ली उच्च न्यायालयाने तिच्या जामिनावर नियुक्त तारखेवर सुनावणी घ्यावी. पण अद्याप तारखा मिळण्याशिवाय गुलफिशाला काहीही मिळाले नाही.
गुलफिशा तुरुंगात लहान मुलांना शिकवण्याचं काम करते
न्याय मिळण्यात प्रचंड दिरंगाई होत असतानाही गुलफिशाने पाच वर्षांच्या तुरुंगवासात यातना भोगताना संयम बाळगला आहे आणि आपले हास्य हरवू दिलेले नाही. तुरुंगात आपल्या सहकारी कैद्यांसाठी ती एक महत्त्वाची सोबती आहे जे तिच्याकडे आपल्या अडचणींवर सल्ला मागण्यासाठी येतात, शिकण्यासाठी येतात, आपले अर्ज लिहून घेण्यासाठी येतात, त्यांच्यावरील आरोपपत्रांचा अर्थ समजून घेण्यासाठी येतात, ही यादी दीर्घ आहे.
गुलफिशा तुरुंगात लहान मुलांना शिकवण्याचं काम करते ज्यांना त्यांच्या आयांमुळे तुरुंगात रहावं लागतंय. सध्या ती ‘पढो - पढोओ’ योजनेखाली तुरुंगात सहकारी कैद्यांना शिकवण्याचं कामही करत आहे. तुरुंगातील जगणे सुसह्य व्हावे म्हणून आपले अनुभव ती कवितेमधून व्यक्त करते, चित्रं काढते आणि आपल्या मित्रांना पत्रं लिहीते. न्यायासाठी तिची प्रदीर्घ लढाई अजूनही सुरूच आहे.
सौजन्य - सबरंग इंडिया
अनुवाद - प्रतिक पुरी






