ध्वनी प्रदूषणावर मात करण्यासाठी न्यायालयाने सर्वच धार्मिक आस्थापनांवरील लाऊडस्पिकर आणि भोंग्यावर कडक निर्बंध आणण्याचे निर्देश दिल्यानंतर सरकारनेही कडक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील मशिदींनी आता भोंग्यांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. काही मशिदींनी तर भोंग्याशिवाय अजान देत जास्तीत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला आहे.
ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई शहरात धार्मिक आस्थापनांवरील 1,608 भोंग्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 1,149 भोंगे मशिदीवरील होते, तर 48 मंदिरावरील, 10 चर्च आणि 147 गुरुद्वारील भोंगे होते. सदर माहिती विधिमंडळात देण्यात आली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात मुंबई लाऊडस्पिकर मुक्त केल्याचाही दावा केला होता.
पोलिसांनी लाऊडस्पिकर, भोंग्यावर कारवाई केल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. 
माहीम दर्ग्यात ऑनलाइन अजानची गुंज !
मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात सध्या प्रश्न उपस्थित केले जात असताना काही मशिदींनी मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत नाविन्यपूर्ण पर्यायांचा विचार सुरू केला आहे. मुंबईतील दोन मशिदींनी आता ऑनलाईनचा तोडगा शोधून काढला आहे. आवाजाच्या डेसिबल समस्येवर आणलेल्या अँपच्या या नव्या पर्यायाला मुस्लिम समुदायाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईसह राज्यातील मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. भाजप, मनसे यांच्याबरोबरच काही सेलिब्रेटी, गायकांनी सुद्धा याबाबत समाज माध्यमांवर मत व्यक्त केले होते. माहीम मधील रहिवासी सिराज पेटीवाला यांनी यावर अँपचा उपाय शोधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे दक्षिणेतील ‘ऑनलाइन अजान’ या कंपनीशी सहकार्य करून अजान आता अँपवर ऐकण्यासाठी सध्यातरी तात्पुरता उपाय करण्यात आला असल्याचे पेटीवाला यांनी सांगितले.
संबंधित लेख वाचा: 1) नमाज, सभा अन् चर्चा… महिलांसाठी मशिदी कशा बदलत चालल्या आहेत? |
माहिम येथील प्रसिद्ध जुमा मशीद आणि माहिम मधीलच झुला मैदान जवळच्या एका लहान मशिदीमध्ये आता अँपवर अजान ऐकली जात आहे. जुमा मशिदीमध्ये या उपक्रमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली असून पहिल्या दोन तासांत 150 सदस्यांची नोंदणी झाली आहे. नेटवर्क आणि इंटरनेट सेवा चांगली असल्यास ऑनलाईन अजानचा लाभ घेता येईल असेही त्यांनी सांगितले.
माहीम मधील सामाजिक कार्यकर्ते इरफान मच्छीवाला यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले आहे. घरातील आजरी, दिव्यांग व्यक्तींसाठी ऑनलाईन अजान फायदेशीर ठरेल. विशेष करून महिलांना याचा उपयोग जास्त होऊ शकेल. आवाजाची मर्यादा पाळण्याच्यादृष्टीने हा उपाय हितकारक आहे. सर्वच विभागामध्ये ऑनलाईनचा अँपचा वापर चांगला पर्याय ठरू शकतो असे ते म्हणाले.
इमारतीच्या फ्लॅटमध्येच स्पीकर
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील एका सोसायटीने तर इमारतीच्या फ्लॅटमध्येच स्पीकर बसवले आहेत, जे जवळच्या मशिदीशी जोडलेले आहेत. मानखुर्द येथील सोसायटीत स्पीकर बसविण्यात पुढाकार घेणाऱ्या रझाक शेख यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, फ्लॅटमधील स्पीकर आमच्या मशिदीशी जोडले गेलेले आहेत. इथे अजान सुरू होताच, ती घरोघरी ऐकायला मिळते. या युक्तीमुळे आता अजानवर इतरांचा आक्षेप घेण्याचा प्रश्न उरणार नाही.
शेख पुढे म्हणाले की, पोलिसांची भोंग्यावर कारवाई होईल, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर पासूनच घरांमध्ये साऊंड सिस्टम बसविण्यास सुरुवात केली. सध्या तब्बल 50 घरांमध्ये अजान ऐकली जाते.






