- अप्सरा आगा
भारतात अंदाजे 12 कोटींच्या आसपास महिला सॅनिटरी पॅड्स वापरतात, विशेषत: शहरी भागात याचा वापर जास्त आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) नुसार, 15-24 वयोगटातील 64 टक्के मुली आणि महिला सॅनिटरी पॅड्स वापरतात. एका महिलेच्या आयुष्यात सरासरी 8,000 ते 15,000 सॅनिटरी पॅड्स वापरले जातात.
आता इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होत असल्याने साहजिकच कचराही तितकाच मोठा तयार होतो. सॅनिटरी पॅड्समध्ये पॉलिप्रॉपिलीन, पॉलीइथिलीन, आणि डायऑक्सिनसारखी रसायने असतात, ज्यामुळे ते विघटनशील नसतात. त्याचे विघटन होण्यास तब्बल 500-800 वर्षे लागू शकतात. हा कचरा जर जमिनीत पुरला तर मातीची सुपीकता नष्ट होते, आणि जर जाळला तर हानिकारक वायू उत्सर्जित होतात, जे पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरतात.
महिलांना साधारणपणे वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षांपासून मासिक पाळी सुरु होते जी अंदाजे वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत राहते. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, योग्य आहार आणि पुरेसा आराम घेणं गरजेचं आहे. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता न पाळल्यास होणाऱ्या संसर्गांपासून, आजारांपासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता खूप गरजेची आहे.
मासिक पाळीच्या काळात महिला मोठ्या प्रमाणात कापड आणि सॅनिटरी पॅडस वापरतात. जर महिला कापड वापरत असतील तर ते कापड स्वच्छ धुणं आणि उन्हात सूर्यप्रकाशात वाळवणं गरजेचं आहे. कापड वाळल्यानंतर बंद पिशवीत घालून स्वच्छ ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छतेसाठी पॅड वापरणं महत्वाचं आहेच पण वापरून झालेल्या पॅडची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 
घरोघरी जाऊन कचरा वेचणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सॅनिटरी पॅड्सच्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या समस्या, जसे की त्वचेचे आजार आणि श्वसनाचे विकार, उद्भवतात. म्हणून पुणे महानगरपालिकेने कचरा वेचकांसाठी सॅनिटरी कचरा ओळखण्यासाठी आणि त्याचे वर्गीकरण करण्यासाठी ‘रंग-कोडेड’ डब्यांचा वापर सुरू केला आहे. तसेच नागरिकांनी सॅनिटरी कचरा कागदात गुंडाळून त्यावर लाल बिंदू (रेड डॉट) द्यावा असा नियम देखील करण्यात आला. त्यामुळे कचरा वेचकांना कचरा वर्गीकरण करणं सोपं होईल. मात्र ही कल्पना उपयुक्त असली तरी त्याबद्दल लोकांमध्ये फारशी जनजागृती झालेली नाही.
पुण्यात अनेक कचरा वेचक घरोघरी जाऊन वेगवेगळा कचरा घेतात. त्यामुळे हा कचरा कमी करण्यासाठी आणि या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी 'बदलाव सोशल रिफॉर्म फाऊंडेशन’ विविध प्रकारे प्रयत्न करत आहे.
कचरा वेचकांच्या आयुष्यातील ‘बदलाव’...
राधिका धिंग्रा आणि रोजली श्रेष्ठ या दोघी ‘बदलाव सोशल रिफॉर्म फाऊंडेशन’ च्या संस्थापक आहेत. राधिका धिंग्रा या जर्मनीमध्ये पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये मास्टर करत होत्या. तिथेच रोजली श्रेष्ठा आणि राधिका यांची भेट झाली. त्यांच्या एकूण वेस्ट मॅनेजमेंट, सॅनिटेंशन रिलेटेड अभ्यासाबाबत चर्चा करताना त्यांना वाटलं की भारतामध्ये या गोष्टी खूप प्रामुख्याने दिसतात त्याच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे. मग संस्था सुरु करावी का? हा विचार सुरु झाला. रोजली या जर्मनीत राहिल्या आणि राधिका या भारतात परत आल्या आणि 6 नोव्हेबर 2019 ला 'बदलाव सोशल रिफॉर्म फाऊंडेशन’ ही संस्था सुरु केली.
घनकचरा व्यवस्थापनापासून संस्थेचं काम सुरु झालं. सुरुवातीला पुण्याच्या आझम कॅम्पसपासून घनकचरा व्यवस्थापनाची सुरुवात झाली. मार्चमध्ये कोरोना आला आणि ते सगळं काम थांबलं. कोरोनाच्या काळात मासिक पाळी दरम्यान अनेक समस्या महिलांना येत होत्या. सॅनिटरी प्रोडक्ट त्यावेळी आवश्यक गोष्टींमध्ये समावेश केलं नव्हतं.
संबंधित लेख वाचा: 1) सॅनिटरी पॅड आता केवळ एका रुपयात मिळणार…. |
मग तिथूनच एक मार्ग सापडला की मासिक पाळी आणि त्याकाळातील स्वच्छता यासाठी काम करावं. त्याच्यामध्ये मासिक पाळीबाबत जागरूकता हा एक भाग आणि मासिक पाळीत महिलांना टिकाऊ आणि परवडणारे कापडी पॅड, मेन्स्ट्रुअल कप वस्ती पातळीवर, शाळेत उपलब्ध करून देण्यापासून सुरुवात झाली. शाळांमध्ये सातवीपासूनच्या मुलींना मासिक पाळीबाबत माहित मिळावी म्हणून सेशन घ्यायला सुरुवात झाली.
सॅनिटरी पॅडला पर्याय काय असू शकतो?
मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या संसर्गापासून, आजारांपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वछता. प्रामुख्याने महिला कापड आणि सॅनिटरी पॅड या दोन पर्यायांचाच जास्त वापर करतात. त्यामुळे रेड डॉटबद्दल महिलांशी बोलताना सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे महिलांना काय समस्या येतात हे कळू लागल्यामुळे त्याला पर्याय काय पर्याय बाजारात उपलब्ध आहेत याबाबत महिलांना सांगायला सुरुवात केली.
सॅनिटरी पॅडच्या वापराने शरीराच्या नाजूक भागात खाज सुटणे, रॅश येणे, छोट्या जखमा होणे अशा समस्या उद्भवतात, असं महिला सांगू लागल्या. त्यावर उपाय म्हणून ‘बदलाव’ने बाजारातल्या सॅनिटरी पॅडला पर्याय असलेली आणि पुनर्वापरास योग्य अशा साधनांबद्दल सांगायला सुरुवात केली. ही साधनं माफक दरात महिलांपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी हाती घेतलं.
सॅनिटरी पॅडला एक पर्याय म्हणजे कापडी पॅड जे मऊ असतात. हे पॅड धुवून पुन्हा वापरता येतात. हे कापडी पॅड दर चार ते सहा तासांनी बदललंच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे ते कापडी पॅड वापरल्यानंतर थंड पाण्यात धुणं आणि सूर्यप्रकाशात वाळवणं आणि वाळल्यानंतर ते बंद पिशवीत घालून स्वच्छ ठिकाणी ठेवणं जेणेकरून ते पुन्हा वापरता येतील. यात रासायनिक घटकांचा वापरही केलेला नसतो. त्यामुळे नीट वापरले तर आरोग्यास देखील हानिकारक नसतात.
त्याबरोबरच ‘बदलाव’ने या महिलांना मेन्स्ट्रुअल कपचीही ओळख करून द्यायला सुरुवात केली. हा कप आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असून दीर्घकाळ वापरता येतो. हा पर्याय वस्तीतल्या महिलांसाठी नवा होता. पण तरीही कमी वयोगटातील मुलींनी, महिलांनी तो स्वीकारायला सुरुवात केली. ‘बदलाव’ने सुचवलेल्या दोन्ही पर्यायांमुळे पैशांची बचत होत असल्याने ते स्वीकारण्याकडे महिलांचा कल दिसू लागला. ‘बदलाव’तर्फे कापडी पॅड आणि कपच वाटपही केलं गेल्यामुळे उपयोगिता आणखी वाढली.
वस्तीतील महिलांना रोजगार देऊन त्यांना सशक्त करण्याचा 'बदलाव' चा प्रयत्न
वस्तीतील महिलांपर्यंत पोहोचायचं तर त्यासाठी स्वयंसेविका हव्यात. त्यादृष्टीने ‘बदलाव’ने वस्तीतल्या इच्छुक महिलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या महिलांनी वस्तीतील इतर महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि या उपक्रमात त्यांनाही सहभागी करून घ्यावं, असा प्रयत्न सुरू केला. जागरूकता निर्माण करण्याचं हे काम दोन स्तरांवर होतं.
पहिला स्तर म्हणजे स्वयंसेविका घरोघरी जाऊन, तर कधी महिलांचे गट करून मासिक पाळी आणि आरोग्य याविषयी माहिती देतात. दुसरी पायरी म्हणजे, या स्वयंसेविका इच्छुक मुली आणि महिलांना कापडी पॅड आणि मेन्स्ट्रुअल कप अगदी कमी किंमतीत उपलब्ध करून देतात.वस्तीपातळीवर मासिक पाळी आणि सॅनिटरी कचऱ्याच्या विल्हेवाटी संदर्भातील जनजागृतीबरोबरच वस्तीतील महिलांना रोजगार देऊन त्यांना सशक्त करण्याचा 'बदलाव' चा प्रयत्न आहे.
मंगळावर पेठेतील अश्विनी ताई या ' बदलाव' सोबत स्वयंसेविका म्हणून काम करतात, त्या घरोघरी जाऊन मासिक पाळीबाबत जनजागृती करतात. किशोरवयीन मुलींच्या पहिल्या पाळीपासून त्यांच्या शरीरात होणारे बदल, मासिक पाळीच चक्र कस असतं त्याबद्दल माहिती देतात. हेल्दी पाळी कशाला म्हणतात त्याच्याबद्दल माहिती देतात.
सॅनिटरी वेस्टसाठी डस्टबीनची सोय
अश्विनी ढावरे सांगतात,' मी गेली तीन वर्ष 'बदलाव'सोबत काम करत आहे. काम करताना सुरुवातीला मासिक पाळी आणि सॅनिटरी वेस्टवर काम करत होतो. पण आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि सॅनिटरी वेस्टचा मुद्दा आहेच पण त्याच्यावर कोणी बोलत नाही, त्याला कोणी सिरीयस घेत नाही. आम्ही सुरुवात केली ते सार्वजनिक शौचालयांपासून. सॅनिटरी पॅड हे खिडक्यांमध्ये ठेवलेले असायचे, शौचालयाच्या बाहेर फेकलेले असायचे. मग आम्ही ठरवलं कि महिलांपर्यंत जर जायचं असेल तर त्यांना धरून कोणता तर मुद्दा उचलावा लागेल जो त्यांना त्रासदायक आहे आणि त्याबाबत कोणी काही करत नाही.
मग आम्ही सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न केला. सॅनिटरी वेस्टसाठी डस्टबीनची सोय कशी करता येईल, तिथे दैनंदिन स्वच्छता कशी होईल यासाठी प्रयत्न केले. आम्ही टॉयलेट्स दररोज स्वच्छ होतील यासाठी यंत्रणेच्या सतत संपर्कात राहिलो, शौचालयांच्या बाहेर बकेट ठेवले आणि त्याबाबत महिलांमध्ये जागरूकता केली. महिलांना मासिक पाळीत महिला जंतूसंसर्ग होऊ शकतो पुरळ,खाज येऊ शकते. तर त्या कोणाशी बोलत नाहीत. त्यांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे. त्यासाठी त्यांचं एक माध्यम बनण्याचा प्रयत्न केला. ‘
हर्षदा आडसुळे सांगतात, 'मी सुरुवातीला सॅनिटरी पॅड्स वापरत होते. त्याच्यामुळे मला खूप रॅशेस व्हायचे आणि लिकेज झालं कि खाज सुटायची, कचरा पण खूप होत होता आणि पैसे पण खूप खर्च होत होते. मग मी अश्विनी ताईच्या मार्गदर्शनामुळे मेन्स्ट्रुअल कप वापरू लागले.तेव्हापासून पैशाची बचत पण होते. आणि कचरा पण होत नाही.'
पुण्यातील मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि गाडीतळ, जनता वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत (महर्षी नगर), रामनगर (वारजे), लक्ष्मीनगर (येरवडा), हडपसर रेल्वे स्टेशन या वस्त्यांमधील 25 हजार किशोरवयीन मुली आणि महिलांना आत्तापर्यंत मासिक पाळी व्यवस्थापनाची माहिती दिली गेली. तसेच बारामतीमधील वाघाळवाडी या ग्रामीण भागातही ‘बदलाव’ने हेच काम सुरू केलं आहे. हे काम वाढावं यासाठी अशा वस्त्यांमध्ये काम करणाऱ्या ‘आशा’ सेविका आणि महापालिकेच्या समूह संघटिकांसाठी ‘बदलाव’च्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षणही घेतलं जातं.
‘बदलाव’मार्फत शाळा आणि कॉलेजमधील मुला-मुलींसाठी मासिक पाळीविषयी सत्र घेतली जातात. वयात येताना होणारे शारीरिक आणि भावनिक बदल, मासिक पाळीची शास्त्रीय माहिती, मासिक पाळीत वापरता येणारी साधनं आणि वैयक्तिक स्वच्छता या विषयांची माहिती दिली जाते; त्यावर चर्चा केली जाते. वस्तीतील महिलांना अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळण्यासाठी ‘स्वास्थ्य सखी' नावाचा फिरता दवाखाना सुरू केला आहे.याचा फायदा वस्तीतील गरीब आणि गरजू किशोरवयीन मुली आणि महिलांना होईल.
पुण्यात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीत येणाऱ्या अडचणी, मासिक पाळीबाबत जनजागृतीच काम जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावं यासाठी 'बदलाव' चे प्रयत्न चालू आहेत. मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा सॅनिटरी कचरा कमी होऊन या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापण करून त्यातून पर्यावरण रक्षण होईल. असे प्रयत्न 'बदलाव सोशल रिफॉर्म फाऊंडेशन’ सुरु आहेत.






