स्टंटमॅनचं काम या देशातले लाखो-करोडो लोक बघतात. पडद्यावर आपले आवडते नायक-महानायक जे अचाट कारनामे करत असतात, ते खरं तर स्टंटमॅन लोकांनी केलेले असतात. पण प्रेक्षकांच्या मनात कौतुकाचं भरत येतं ते आपल्या आवडत्या हिरोबद्दल. आज रजनीकांत, अमिताभ बच्चन, सलमान खान अशा लोकांची जनमानसात ‘लार्जर दॅन लाईफ इमेज’ आहे, त्यामागे त्यांच्यासाठी जीवावर बेतणारे स्टंट करणाऱ्या शेकडो अनाम लोकांचा हातभार आहे. एक अतिशय धोकादायक पण थॅंकलेस काम ही स्टंटमॅन मंडळी करत असतात. त्यांच्या कामाला कोणी दाद देत नाही, त्यांच्यासाठी कुणाच्या डोळ्यात पाणी येत नाही, त्यांच्यासाठी कधी कौतुकाचे चार शब्द बोलले जात नाहीत.
ॲक्शन सीनवेळी दुर्घटना, कार उलटून स्टंटमॅनचा मृत्यू
भारतीय सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा स्टंटमॅन एसएम राजू याचा आज एका शुटिंगदरम्यान जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राजूचा हा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सगळीकडे व्हायरल झाला. यामुळे सुरक्षितता आणि जीव धोक्यात घालून आयुष्याशी खेळणाऱ्या स्टंटमॅनबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आर्या या सिनेमाच्या सेटवर स्टंट सीन शूट करताना स्टंटमॅन एसएम राजू याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा थरार सिनेमाच्या कमेरात कैद झाला आहे. हा अपघात रविवारी सकाळी तामिळनाडूच्या नागापट्टिनम येथे झाला. सिनेमात एका सीनमध्ये कार हवेत उडवत स्टंट शूट केला जात होता. या स्टंटदरम्यान कार उलटली आणि त्यात राजूचा मृत्यू झाला. राजू काळ्या रंगाच्या कारमध्ये बसला होता.
कार लाकडी टेबलावर आदळली, हवेत उडी मारली आणि अनेक वेळा उलटी पालटी झाली. अपघात झाल्यानंतर टीमला काहीच समजलं नाही पण काही सेकंदातच राजूला गंभीर दुखापत झाल्याचं लक्षात आलं. त्याला कारमधून बाहेर काढण्यात आलं. स्टंटमॅन राजू अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करत होता. त्याने अनेक सिनेमात अनेक साहसी दृश्य जीवावर उदार होऊन केले होते.
हिरोसाठी ‘लाईफ जॅकेट’ असल्याने तो वाचला, पण दोन स्टंटमॅन मात्र…
यापूर्वी कर्नाटकातील दोन स्टंट कलाकार राघव उदय आणि अनिल कुमार यांचा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मृत्यू झाला. हे दोघे कन्नड चित्रपट मास्तिगुडीच्या सेटवर एका धोकादायक स्टंटदरम्यान टिप्पगोंडनहळ्ळी तलावात बुडाले. हा तलाव बेंगळुरूपासून सुमारे 35 किमी पश्चिमेला आहे.
स्टंटमध्ये राघव, कुमार आणि अभिनेता विजय यांना हेलिकॉप्टरमधून सुमारे 500फूट उंचीवरून पाण्यात उडी मारायची होती. तिघांनीही पाण्यात उडी मारली, मात्र विजयच एकटाच बचावला, कारण तो एकटाच लाईफ-जॅकेट घालून होता. उदय आणि कुमार यांना शर्ट घालू नये, असे सांगण्यात आले होते, कारण अगोदरच्या सीनमधील ‘कंटिन्युटी’ कायम ठेवायची होती.
या घटनेनंतर जो काही तपशील समोर आला, तो निष्काळजीपणाचा गंभीर आरोप दर्शवणारा होता. चित्रपटाचे दिग्दर्शक नागशेखर, निर्माते सुंदर गौडा आणि अॅक्शन डायरेक्टर रवि वर्मा यांच्यावर बेजाबदारीचे आरोप झाले. शूटिंगच्या काही मिनिटे आधी, राघव आणि कुमार या स्टंटमॅननी पब्लिक टीव्ही या कन्नड वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की त्यांना पोहता येत नाही. कुमारने सांगितले की तो फक्त विहिरीत थोडा फार पोहत असे. उदयने सांगितले की, या स्टंटसाठी त्यांना विशेष तयारी दिली गेली नव्हती, आणि त्याला उंचीची भीती आहे.
शुटिंगदरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय नव्हते. ना दोर होते, ना पाणबुडे. फक्त एक डिझेल बोट होती, तीही सेटवर खूप दूर होती आणि वेळेवर सुरू झाली नाही. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ज्या जागी उडी मारण्यात आली, तिथे पाण्याखाली 30 ते 40 फूट गाळ होता आणि त्यात मासेमारीसाठीची अनेक जुनी जाळीही अडकलेली होती.
या घटनेनंतर निर्माते सुंदर गौडाला अटक करण्यात आली. 10 नोव्हेंबरला नागशेखर आणि वर्मा, जे अटक टाळण्यासाठी फरार झाले होते त्यांनी मॅगडी रोड पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर आयपीसी कलम 304 आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
‘द हिंदू’च्या अहवालानुसार, त्यांना तलावाच्या काठावर आणि बागेपर्यंत शूटिंगची परवानगी होती, पण स्टंट करण्याची अधिकृत परवानगी घेतली नव्हती. तिघांनाही रामनगर तुरुंगात ठेवण्यात आले. 15 डिसेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने वर्मा आणि नागशेखर यांना जामीन मंजूर केला, परंतु गौडा तुरुंगातच राहिला.
संबंधित लेख वाचा: 1) दिल थाम के बैठो, आ रही है गुजरात की पहली डेअर डेव्हील… पायल! |
शंभर कोटींच्या सिनेमा क्लबमध्ये स्टंटमॅनला मिळतात फक्त 3-5 हजार
सिनेमा ब्लॉगर आणि समीक्षक अमोल उदगीरकर यासंदर्भात विस्तृत मांडणी करतात. ते म्हणतात की, देशात जे ढीगभर चित्रपट पुरस्कार सोहळे होतात, त्यांच्यात त्यांच्या कामासाठी पुरस्काराची श्रेणीच नसते. तरी पण कधी कामावरच्या प्रेमापोटी तर कधी पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाज म्हणून अनेक लोक स्टंटमॅन म्हणून कार्यरत आहेत. स्टंटमॅन लोकांना शूटिंगच्या प्रक्रियेत सतत गृहीत धरलं जातं. त्यांनी जीवाचा धोका पत्करून ज्या सिनेमामध्ये काम केलेलं असतं, ते सिनेमे शंभर कोटी क्लबमध्ये जातात.
पण आठ तासाच्या एका शिफ्टचे या लोकांना फक्त साडेतीन हजार ते सहा हजार रुपये मिळतात. कामाचं स्वरूप खूप फिजिकल असल्यामुळे त्यांची कारकीर्द अल्प काळाची असते. या स्टंटमॅन लोकांचा कुठलाही विमा उतरवलेला नसतो. त्यामुळे सेटवर काम करताना गंभीर दुखापत झाली किंवा मृत्यू आला तरी या लोकांना कुठलीही भरपाई दिली जात नाही. अनेकदा अशा स्टंटमॅन लोकांचे परिवार त्यांच्या अपघातानंतर उघड्यावर आल्याची उदाहरणं आहेत.
आपल्याकडे फिल्मफेअर, स्टारडस्ट, आयफा, झी सिने अवॉर्डस असे ढीगभर चित्रपटविषयक पुरस्कार आहेत. पण एकाही पुरस्कार समारंभात या पडद्यामागच्या नायकांना जागा नाही. स्टंटचं क्षेत्र फक्त पुरुषांचं आहे असा एक गैरसमज आहे. या क्षेत्रात अनेक स्त्रियाही आहेत. 'शोले'मधला तो हेमामालिनीचा 'चल मेरी धन्नो'वाला पाठलागाचा सीन आठवत असेल.
त्या सीनमध्ये हेमामालिनीची बॉडी डबल म्हणून रेश्मा या स्टंटवूमननं काम केलं आहे. तो सीन करताना तिला बरंच खरचटलं होतं. सध्या प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ यांच्यासारख्या आघाडीच्या हिरोईनसाठी स्टंट करणारी सनोबर पाडीवाल ही आघाडीची स्टंटवूमन आहे. या स्टंटवूमनच्या स्वतःच्या अनेक समस्या आहेत.
अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांना मात्र काळजी
या लोकांच्या समस्याबद्दल या इंडस्ट्रीमधल्या फारसं कुणी बोलताना दिसत नाही. अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा अपवाद वगळता या विषयावर कुणी काही बोलल्याचं आठवत नाही. रोहित शेट्टी आणि अजय देवगणचे वडील स्वतः स्टंटमास्टर होते, म्हणून त्यांना या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल विशेष जिव्हाळा आहे. आपल्याकडे रोहित शेट्टी आणि त्याच्या सिनेमातल्या हवेत उडणाऱ्या गाड्या यांची टिंगल टवाळी नेहमी केली जाते.
रोहित शेट्टीचे सिनेमे ज्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे, त्यात या हवेत उडणाऱ्या गाड्या हे एक महत्त्वाचं कारण आहे. किंबहुना रोहितच्या सिनेमात ही एकच गोष्ट गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळते, असे विनोदही केले जातात. पण त्या गाड्या हवेत उडण्याचा जो काही सेकंदांचा सीन असतो, त्यासाठी त्या गाडीत बसणाऱ्या स्टंटमॅननं आपले प्राण पणाला लावलेले असतात.
रोहितनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, अशा अवघड स्टंट सीनमध्ये कितीही सेफ्टी मेझर्स घेतल्या तरी धोका पूर्णपणे टाळता येत नाही. असा सीन शूट करणं चालू असताना मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत असतो, असंही रोहितनं या मुलाखतीमध्ये म्हणाला होता. रोहितच्या शूटिंगच्या सेटवर कायम स्टंटमॅन लोकांसाठी अॅम्ब्युलन्स तयार असते.
'चेन्नई एक्स्प्रेस'चं शूटिंग चालू असताना अशाच एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान कारमधून पेट्रोल लिक झालं आणि शंकर नावाचा स्टंटमॅन भाजून निघाला. त्यानं फायर सूट घातला होता. तरी उपयोग झाला नाही. रोहितनं शूट थांबवलं आणि स्वतः शंकरला हॉस्पिटलला घेऊन गेला. त्याच्याजवळ थांबला. दोन दिवस तो तिथंच होता. पण रोहितसारखी माणसं विरळा आहेत. एरवी स्टंटमॅनना वाऱ्यावर सोडून देण्यासाठीच बॉलिवुड इंडस्ट्री कुख्यात आहे.
अमोल उदगीरकर पुढे सांगतात की, याबाबतीत हॉलिवुडशी तुलना करण्याचा मोह टाळता येत नाही. तिथं स्टंटमॅनसाठी सर्वोच्च दर्ज्याचे सेफ्टी मेझर्स घेतले जातात. स्टंट मास्टरला शूटिंग सुरू होण्याच्या अगोदर बाउंड स्क्रिप्ट मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विम्याचं संरक्षण आहे. भारतीय स्टंटमॅनना विम्याचं संरक्षण मिळावं म्हणून अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीसारखी मंडळी प्रयत्न करत आहेत, पण त्याला यश मिळत नाही.
दक्षिणेच्या सिनेमांना हवा असतो अधिक थरार, पण स्टंटमॅनच्या सुरक्षेचं काय?
कर्नाटकमधील स्टंट कलाकार आणि अॅक्शन डायरेक्टर्सना अनुक्रमे “फाइटर्स” आणि “फाइट-मास्टर्स” असे म्हटले जाते. त्यांची प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणजे ऑल कर्नाटका सिने स्टंट डायरेक्टर्स अँड स्टंट आर्टिस्ट्स असोसिएशन. या 150 सदस्यीय संघटनेचे अध्यक्ष विनोद वरधराज यांनी सांगितले की, स्टंट करताना जखमी होणे ही सामान्य गोष्ट मानली जाते. 
ते स्वतः 12 वर्ष स्टंट आर्टिस्ट होते आणि गेल्या चार वर्षांपासून अॅक्शन डायरेक्टर आहेत. “मी किमान पाच–सहा लोकांना ओळखतो ज्यांचे करिअर एका चुकीच्या स्टंटनंतर संपले,” असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर संघटनेने रवि वर्मा यांच्यावर 30 लाखांचा दंड ठोठावला. तसेच, उदयच्या कुटुंबाला ३ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ही रक्कम संघटनेतील प्रत्येक सदस्याने 1,000 रुपये भरून उभी केली होती. मात्र, कुमार हा सदस्य नसल्यामुळे त्याच्या कुटुंबाला कोणतीही मदत देण्यात आली नाही.
मास्तिगुडीसारख्या दुर्घटना दुर्मिळ असल्या तरी स्टंट कलाकारांचं आयुष्य कायमच धोकादायक असतं, विशेषतः दक्षिणेतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये, जिथे बजेट मर्यादित असते, पण प्रेक्षकांना हॉलिवूड किंवा बॉलिवूडप्रमाणेच थरार हवा असतो. परिणामी, अॅक्शन डायरेक्टर्स अनेकदा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करतात.
एम. एल. सुभाष हे स्टंटमॅन 1986 पासून कन्नड, तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये 400 स्टंट करत आलेले आहेत. यांनी सांगितले की त्यांनी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवले आहे. एका प्रसंगी त्यांना मोटरसायकलवरून उडी मारण्याचा स्टंट करायला बोलावलं गेलं. यासाठी त्यांना 15,000 रुपये मिळणार होते. ते म्हणाले, “मी 300 रिकाम्या कार्डबोर्डच्या बॉक्सची मागणी केली होती, पण फक्त शंभरच मिळाले. जर मी नकार दिला असता, तर कोणी तरी दुसरा तयार झाला असता, हे न सांगताच समजलेलं होतं.” त्यांनी स्टंट केला, पण लँडिंग स्पॉटच्या थोडं पुढे गेले आणि पाय फ्रॅक्चर झाला. “माझे दोन महिने गेले, आणि हाहातले कामही गेले,” असं त्यांनी सांगितलं.
देशभरात किमान दोन हजार स्टंटमॅन जीव धोक्यात घालतात
देशभरात 1500–2000 स्टंट कलाकार काम करत असून, मूवी स्टंट आर्टिस्ट्स असोसिएशन (MSAA) या संघटनेत सध्या 540 स्टंट कलाकार आणि 108 अॅक्शन डायरेक्टर्स आहेत. याशिवाय, चेन्नईस्थित साउथ इंडिया सिने स्टंट डायरेक्टर्स अँड आर्टिस्ट्स युनियन, हैदराबादस्थित आंध्र प्रदेश स्टंट मास्टर्स युनियन, आणि कोलकातास्थित मूवी स्टंटमेन असोसिएशन ऑफ ईस्टर्न झोन ह्या स्वतंत्र संस्था आहेत.
या संघटना स्टंट कलाकारांचे वेतन, सुरक्षा, आणि जबाबदाऱ्या यासाठी लढा देतात. भारतात स्टंट कलाकारांसाठी स्वतंत्र कायदा नाही. वर्कमेन कॉम्पेन्सेशन अॅक्ट 1923 नुसार, कामात जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास भरपाई मिळावी, असे नमूद आहे. मात्र, बहुतेक निर्माते ही भरपाई देण्यास नकार देतात. अॅक्शन डायरेक्टर एजाज गुलाब यांनी सांगितले की MSAA ने वारंवार प्रयत्न करूनही उत्पादक मंडळी ही भरपाई जास्त असल्याचं सांगून टाळतात.
त्यांनी 2004 मध्ये घडलेली एक घटना सांगितली: स्टंटमन जोसेफ रेगो याच्या शरीराला आग लावण्याच्या स्टंटमध्ये मृत्यू झाला. मात्र, निर्माते जय मेहता यांनी फक्त 4 लाख रुपयांची भरपाई दिली. संघटनेच्या सदस्यांनी अजून २ लाख रुपयांची देणगी दिली आणि त्याच्या मुलांसाठी 50,000 रुपयांचा रक्कम उभी केली. अनेकदा निर्माते संघटनेने ठरवलेल्या साध्या अटी स्वीकारतात. जसे की पूर्ण वैद्यकीय खर्च उचलणे आणि जर एखादा कलाकार काम करू शकत नसेल तर महिन्याला १५ शिफ्टचे पेमेंट देणे.
सर्व स्टंट आर्टिस्ट कायमचे सदस्य होत नाहीत. अनेकजण इतर कामांतूनही उत्पन्न मिळवत असतात. उदाहरणार्थ, 27 वर्षीय स्टंट आर्टिस्ट शालिनी सोनी… जी मध्य प्रदेशातील उज्जैनहून मुंबईला आली. ती चित्रपट, टीव्ही मालिका आणि जाहिरातीत काम करते. तिने सांगितले की, ती संघटनेची कायमची सदस्य नाही, कारण तिचे उत्पन्न वेगवेगळ्या ठिकाणाहून येते. पण तरीही तिचे स्टंटचे पैसे MSAA मार्फतच येतात. तिचे शेड्युल कधी आठवड्यातून दोन शूट्स असते, तर कधी आठवड्यातून एक. एका आठ तासांच्या शिफ्टसाठी तिला 3,500 ते 4,000 रुपये मिळतात.
शालिनी म्हणाली की, हिंदी चित्रपटसृष्टीत, विशेषतः मोठ्या बजेटच्या चित्रपटांत, सुरक्षेची काळजी जरा ती चांगल्या पद्धतीने घेतली जाते. “मास्तर (अॅक्शन डायरेक्टर) मूळ गरजा पूर्ण न झाल्यास शॉट सुरूच करायला देत नाही,” असे सांगून शालिनी पुढे म्हणाली की. एकदा ती एका अभिनेत्रीची ‘बॉडी डबल’ होती आणि तिला कारमधून खाली पडायचं होतं. ड्रेस छोटा असल्याने नी-कॅप घालता येत नव्हतं, त्यामुळे त्या जागी गादी टाकून पडण्याची व्यवस्था केली गेली.
"तुम्ही जाणीवपूर्वक जोखमीचे काम करता, कोणतीही कंपनी ‘विमा’ देत नाही’’
चांदनी चौक टू चायना, डी-डे, हिरो अशा चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक निखिल अडवानी यांनी सांगितले की, विदेशातील स्टंटमॅन 50 दिवसांच्या शूटसाठी 50 आठवड्यांची तयारी करतात. स्क्रिप्ट, सीन, सेफ्टी, स्टोरीबोर्ड अशा सगळ्यावर त्यांचा भर असतो. भारतात मात्र उलटं होतं. तसंच, ऑस्ट्रेलिया, यूके आणि थायलंडमध्ये स्टंट कलाकारांसाठी विमा अनिवार्य आहे. पण भारतात फक्त सेट आणि इक्विपमेंटचा विमा घेतला जातो. स्टंट आर्टिस्ट विम्यासाठी अपात्र ठरवले जातात.
डॅनी वोड्डुगलिया, जे 25 वर्षांपासून कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तुळू चित्रपटांत काम करत आहेत, त्यांनी सांगितले की विमा कंपन्या सांगतात, "तुम्ही जाणीवपूर्वक जोखमीचे काम करत आहात, त्यामुळे आम्ही विमा देऊ शकत नाही." गुलाब यांनी एलआयसी, बजाज-अलिअँझ, आयसीआयसीआय-लोम्बार्ड आणि न्यू इंडिया अशा पाच कंपन्यांशी संपर्क साधला, पण सगळ्यांनी नकार दिला. “एक सर्वसामान्य माणूस रस्ता ओलांडताना जास्त धोका घेतो, कारण स्टंटमन्सना तर प्रशिक्षण दिलं गेलेलं असतं,” असं गुलाब म्हणाले.
आयसीआयसीआय लोम्बार्डचे चीफ अंडररायटर संजय दत्ता यांच्या मते, जर विमान उद्योगात सुरक्षा संस्कृती अंगीकारली गेली असेल, तर फिल्म इंडस्ट्रीतही ती यायला हवी. “फायर स्टंट्स, उंचीवरून उड्या हे सध्या विम्याखाली येत नाहीत. निर्मात्यांनी आधी ही संस्कृती आणायला हवी,” असं ते म्हणाले.
गुलाब यांच्या मते, निर्माते थरार तर हवा म्हणतात, पण बजेटच्या मर्यादांमध्ये काम करायचं असतं. शिवाय, गेल्या दशकभरात झालेल्या स्टुडिओजच्या कॉर्पोरेटायझेशनमुळे काम अधिक किचकट झाले आहे. “पूर्वी निर्माता म्हणजे सगळ्यांशी जवळीक असायची, युनिट म्हणजे कुटुंब होतं. आज सगळं ईमेल आणि अप्रूवलवर चालतं,” ते म्हणाले. यामुळे अॅक्शन डायरेक्टरला असलेल्या गोष्टींमध्येच स्टंट पूर्ण करावा लागतो.
अडवानी म्हणाले की, जेव्हा एखादी विश्वसनीय टीम पुन्हा पुन्हा एकत्र काम करते, तेव्हा ती एक कुटुंब बनते. “मी डी-डे आणि हिरो मध्ये ज्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्यासोबतच कट्टी बट्टीच्या सेटवर काम होतं. एका सीनमध्ये, जिथे काही काचेचे तुकडे तुटून पडले, एका तरुण अभिनेत्याच्या हाताला गंभीर इजा झाली. स्क्रिप्टमध्ये फक्त ‘अॅक्शन’ असा उल्लेख होता, पण तरीही अॅम्ब्युलन्स आधीच तयार ठेवली होती,” त्यांनी सांगितलं.
रोहित शेट्टीचे उडत्या गाड्यांचे सीन असणारे चित्रपट काही लोकांना न आवडणं एकदमच स्वाभाविक आहे किंवा पडद्यावर नायक अॅक्शन सीनच्या नावाखाली जे अतर्क्य काम करतात, ते पसंत न पडणंही समजू शकतो. काय आवडावं काय आणि काय आवडू नये हा शेवटी आपापल्या अभिरूचीचा भाग असतो. पण अशा प्रसंगाची खिल्ली उडवताना थोडं तारतम्य बाळगलं जावं असं वाटतं. कारण हे सीन पडद्यावर आपल्याला दिसावेत म्हणून अनेक अनाम स्टंटमॅन आणि स्टंटवूमन लोकांनी आपले जीव धोक्यात घातलेले असतात.






