- भागा वरखडे
हे गणनायका,
तुझा उत्सव आजपासून सुरू होतो आहे. तू गणांचा म्हणजे जनांचा नायक आहे. तुला भक्तांसोबत राहायला आवडतं. तू भक्तांचा लाडका आहे. तुझ्या उत्सवाला अमाप गर्दी लोटते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप दिलं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना केली. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाचा वापर प्रबोधन आणि ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्र करण्यासाठी केला; परंतु आता या उद्देशाचा विवेकी वापर होतो का, हे ठरवण्याची वेळ आली आहे.
भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची आहे. ती तिसऱ्या क्रमांकाकडं वाटचाल करीत आहे. असं असताना या देशातील सामान्य लोकांच्या जीवनात किती फरक पडला, हे तू जाणतोस ना? देशात गरीब आणि श्रीमंतातील दरी वाढत चालली आहे. गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालले आहेत. तुला हे कसं पाहावतं? लोकांच्या हातातोंडाची गाठ पडू दे. म्हणजे ते तुझ्या भक्तीत अधिक रममाण होतील. तुझं येणं म्हणजे प्रचंड ऊर्जा, प्रचंड गर्दी हे समीकरण झालं आहे.
तू यावंस यासाठी लोक तुझ्या विसर्जनापासून आगमनापर्यंत डोळे लावून बसतात. तुझा उत्सव हा अनेकांच्या घरात चुली पेटवणारा असतो. अनेकांना रोजगार देणारा असतो. तुझ्या उत्सवात किमान एक लाख कोटी रुपयांची उलढाल होते. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा ती जास्त आहे. बाजारातील मरगळ दूर होणं चांगलंच; परंतु त्यातून काही चांगलं घडावं, ही अपेक्षा वावगी नाही, ना ?
हे गणनायका,
गणेशोत्सव आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याची ख्याती आता जगभर पोचली आहे. काश्मीर खोऱ्यात तू पोचला आहेस. तुझ्या भक्तात जात, प्रांत, धर्मभेद राहिलेला नाही. त्या अर्थानं तू समता, समभावाचा पुरस्कर्ता झाला आहे. तुझं मोहक, व्यापक रुप, भव्यता मनाला प्रसन्नता मिळवून देते; परंतु ही प्रसन्नता ठराविक वर्गापुरती मर्यादित ठेवू नकोस रे! यंदा पाऊस लवकर सुरू झाला. नंतर तो थांबला आणि आता तो पुन्हा सुरू झाला, तर थांबायलाच तयार नाही.
हातातोंडाशी आलेला बळीराजाच्या तोंडचा घास काढून घेतला जात असताना राज्यकर्त्यांना मात्र बळीराजाला मदत द्यायचं अजून सुचत नाही. राज्यकर्ते बळीराजालाच नुकसान सहन करायला शिका, असं ‘ज्ञानामृत’ पाजायला लागले आहेत. बळीराजा उभा राहिला नाही, तर त्याचा फटका इतरांनाही बसतो. महागाई वाढते आणि सामान्यांचा खिसा हलका होतो, हे धोरणकर्त्यांच्या मेंदूत भरव रे बाबा!
भारतात जशी संकटं आहेत, तशीच ती बाहेरूनही लादली जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नावाचं एक ग्रहण सध्या जगाला लागलं आहे. या ग्रहणामुळं जग चिंतीत आहे. ‘ट्रम्प टॅरिफ’ नावाचं नवं अस्त्र जगावर भिरभिरतं आहे. अमेरिकेत शिक्षण घेणारी मुलं, व्यापारी, राज्यकर्ते सारेच धास्तावले आहेत.
संबंधित लेख वाचा: 1) गणपती या देवतेचा गणदेवता म्हणून सुरू झालेला प्रवास आजच्या 'इष्टदेवता' रूपापर्यंत कसा येऊन पोचला? |
या ट्रम्प महाशयांना अशी बुद्धी दे, की संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणं अमेरिकेबरोबरच विश्वकल्याण करण्याचं त्यांना सुचू दे! शेतकरी, कारागीर, कामगार सारेच सध्या एका संक्रमणावस्थेतून जात आहेत. कधी नव्हे एवढी अनिश्चित्ता झाली आहे. व्यापक विचार करण्याऐवजी संकुचित विचार करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. तुझ्या उत्सवाचं महत्त्व न कळालेले काही नतदृष्ट दरवर्षी उत्सवाला गालबोट लावण्याचं काम करतात. अशा सडक्या मानसिकतेच्या लोकांच्या डोक्यात काही तरी प्रकाश पाड!
हे लंबोदरा,
तुझे कान लांब आहेत. तुला दूरवरचं सर्व ऐकू येतं. काहीही सहन करण्याची तुझी क्षमता आहे; परंतु तुझ्या पामर भक्तांची ती नाही. तुझा उत्साह जोमात साजरा व्हायला हवा. याबाबत दुमत असण्याचं काही कारणही नाही; परंतु तुझ्या उत्साहात कर्णकर्कश आवाजातील धांगडधिंग्याची गाणी लोकांचे कान बधिर करतात. ध्वनिवर्धकांच्या भिंती कानाचे पडदे फाडतात. आवाजाच्या उच्च पातळीनं दहा दिवस लोकांचं जगणं हराम होतं.
काहींना हृदयविकाराचे झटकेही येतात. काहींचे बळीही जातात. लहान मुलं, आजारी माणसं यांचा विचार करण्याची सद्बुद्धी मंडळाच्या अशा कार्यकर्त्यांना दे! गणेशोत्सवातील सजावटी, देखावे आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. त्यासाठी दहा दिवस रस्ते गर्दीनं फुलून जातात. उठसूठ टीका करणाऱ्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात घेतलेली भूमिकाही लक्षात घ्यायला हवी.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून सुरू असलेल्या प्रस्थापित गणेशोत्सवांचं नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केलं. हिंदूच्या घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे; पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचं स्वरूप दिलं. या उत्सवाच्या निमित्तानं भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपानं तिच्यात जनजागृती निर्माण करता येईल.
आपली संस्कृती आणि धर्म याबाबत तिच्या मनात नवी अस्मिता जागृत होईल, अशी ही भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती. सर्व भारतीय लोकांनी आप-आपसातील मतभेद सोडून एकत्र यावं, ही लोकमान्य टिळकांची इच्छा होती. लोकमान्य टिळकांची ही इच्छा फलद्रुप झाली. महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित म्हणून गणेशोत्सवाकडं पाहिलं जातं. आता गणेशोत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. जगभरात गणेशोत्सव पोचला आहे. गणेशोत्सव हे कार्यकर्ते घडवणारी कार्यशाळा असते. गणेश मंडळाचे अनेक नेते, पदाधिकारी आमदार, खासदार मंत्री झाले. धोरणकर्ते झाले. त्यांना गणेशोत्सवाला विधायक रुप देण्यासाठी निर्णय घेण्याची शक्ती दे!
हे विनायका,
तू बुद्धीचंही दैवत. त्यामुळं तूच आता राज्याला या संकटातून बाहेर काढण्याची दिशा द्यावी, अशी अपेक्षा बाळगली, तर त्यात वावगं काहीच नाही. लालबागच्या राजानं प्लाझ्मा दान चळवळ सुरू केली. अनेक मंडळं सार्वजनिक उपक्रम राबवतात. पुण्यात पुनीत बालन यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मोहीम हाती घेतली आहे. राज्यात अशी अनेक मंडळं व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर देखावे साजरे करीत आहेत. त्यांचं अभिनंदन! परंतु, हे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतकं न राहता त्यात व्यापकत्व आलं पाहिजे.
‘ट्रम्प टॅरिफ’मुळं बेरोजगारी वाढली आहे. ‘सीएमआयई’ या संस्थेनं दिलेल्या अहवालात बेरोजगारीचं वास्तव मांडलं आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली आहे. तू हे सारं पाहतो आहेस ना बाबा! लोकांनी जगायचं कसं, हाच खरा मोठा प्रश्न आहे. नोकरी गेली, व्यवसाय बंद, असं सहन करण्याची क्षमताच लोकांमध्ये राहिली नाही. शेतकरी काळोखाची वाट सोडायला तयार नाही. आता तरुणही त्याच मार्गावरून चालत आहेत. अनेक अशा हताश कुटुंबांनी काळोखाची वाट धरली. अजूनही किती लोक या वाटेवरून जायला तयार आहेत, याची गणतीच नाही. तुझ्या हे लक्षात येतंच असेल म्हणा!
हे वक्रतुंडा,
सध्याच्या या संकटाच्या काळात लोकांना धीर दे. जगण्याचं बळ दे. संकटातून सावरण्याचं धैर्य त्यांना दे. राज्य आणि केंद्रातील सरकारमधील धुरिणांना जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची सद्बुद्धी दे. लोकांच्या पायात धावण्याचं बळ दे. चुकणाऱ्यांचा कान पकड. स्वतः पुरतं पाहणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडव. समाजमाध्यमांत गुरफटलेल्या, त्याच्या आहारी गेलेल्यांना तुझ्या उत्सवानिमित्त तरी त्यांच्यापासून ‘दो गज दूर’ राहता आलं तर ते चांगलंच आहे. लोकांचं परस्परांवरील प्रेम, आदर कमी होता कामा नये. देशातील एक टक्का कोट्यधीशांना आपल्या काही संपत्तीतील वाटा गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची बुद्धी दे. कामगारांचं शोषण करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना तू चांगलीच अद्दल घडव.
लोकांच्या अपेक्षा फार आहेत. त्या कुणीही पूर्ण करणार नाही. करू शकणार नाही, हे खरं असलं, तरी किमान हाता-तोंडाची गाठ पडावी आणि हाताला कामं मिळावं, एवढी तरी माफक अपेक्षा पूर्ण कर. अशी अपेक्षा पूर्ण करणं हे जगन्नियत्या तुला नक्कीच अशक्य नाही. तुझं उदर मोठं आणि लांब आहे. तुझ्या या भक्तांचं काही चुकत असेल, तर त्यांचे गुन्हे पोटात घे. त्याला माफ कर आणि संकटातून मात करण्याची शक्ती त्याला दे. अर्थव्यवस्थेची चाकं गतिमान कर. तू विघ्नहर्ता आहेस. त्यामुळं सध्याची विघ्नं दूर करणं तुला अशक्य नाही, रे बाबा!






