'गोंविदा रे गोपाळा...' 'अरे बोल बजरंग बली की जय...'
असे सूर कानावर पडत राज्यात दहीहंडीचा उत्सव सुरू होतो. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गाण्यांचे सूर कानी पडू लागले आहेत.
16 ऑगस्ट होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करून वर्चस्वाची हंडी फोडण्यासाठी राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उंच थर रचण्याची स्पर्धा वाढू लागली आहे.
परंतु हल्ली हा सण जन्माष्टमिचा पारंपरिक उत्सव म्हणायचा की वादाचा असे म्हणण्याची वेळ आली आहे. दरवर्षी दहीहंडीचा सण जसा जवळ येतो तसा पुन्हा पुन्हा दहीहंडीची उंची, मानवी थर किती असले पाहिजेत, गोविंदा पथकांची सुरक्षा आणि विशेषत: बालगोविंदांचा त्यात असलेला सहभाग अशा विषयांवरून वाद सुरू होतो.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री मुंबईत घडलेल्या एका भयावह घटनेमुळे दहीहंडीबाबत उपस्थित करण्यात आलेले हे सगळे मुद्दे किती महत्वाचे आहेत हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
मुंबईत दहीहंडीच्या सरावावेळी सहाव्या थरावरुन पडून बालगोविंदाचा मृत्यू
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे सोमवारी रात्री दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरुन खाली कोसळल्याने एका बालगोविंदाचा मृत्यू झाला. दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीडपाडा परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला होता. यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव ज्याचे वय अवघे 11 होते, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर आल्याने तो रात्री साधारण पावणेदहाच्या सुमारास गोविंदा पथकासोबत सराव करत होता. महेश हा सहाव्या थरापर्यंत चढत जात होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल गेला अन् तो खाली पडला. थेट जमिनीवर कोसळल्याने त्याला गंभीर इजा झाली.
गोविंदा पथकातील तरुणांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी नवतरुण मित्रमंडळ गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार याच्यावर गुन्हा दाखल केला.
आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात
पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नंतर महेशच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसंनी गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार याच्यावर निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महेश जाधव हा दहिसर पूर्वेला धारखडी परिसरात राहत होता. त्याची आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात. त्याला तीन लहान भावंडे आहेत.
याप्रकरणी आयोजक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दहिसर पोलिसांनी दिली. सराव करताना मंडळाने सुरक्षेचे उपाययोजना करणे आवश्यक होेते. मात्र ते केलेले दिसून आले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार नेमका कसा घडला, यामध्ये कोणाची चूक होती, त्याचा पाय सटकला की नेमके काय झाले, याचा तपास सध्या दहिसर पोलिसांकडून सुरु आहे. महेश जाधव हा पाय घसरुन खाली पडला की, यामागे काही घातपात आहे, याचा तपासही पोलिसांकडून सुरु आहे.
१२ वर्षाखालील मुलांना बंदी असतानाही…?
काही वर्षांपूर्वी दहीहंडीची उंची, मानवी मनोरे व मुलांचे वय सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्यानंतर मुंबईत शेकडो गोविंदा नाराज झाले होते. न्यायालयाने धार्मिक सणांमध्ये ढवळाढवळ का करावी, असाही मतप्रवाह समाजाच्या विविध थरांतून व्यक्त होत होता. मनसे नेते राज ठाकरे यांनी तर ‘स्टुलावर उभे राहून दहीहंडी फोडायची का’, असा खोचक प्रश्न उपस्थित करून आपल्या पक्षाच्या ‘पोरांना’ तुम्ही तयारीला लागा, कोर्टाचे बघून घेऊ, अशी दर्पोक्ती केली.
त्यानंतर मुंबईत न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध म्हणून काही गोविंदा पथकांनी काळ्या फिती लावून चार थर लावले, काहींनी आडवे झोपून मानवी मनोरे रचून ‘निषेध हंडी’ फोडली, तर एका मंडळाने न्यायालयाचा निर्णय धुडकावून नऊ थरांची विक्रमी हंडी रचली. त्या वेळी गोविंदा मंडळांकडून व राजकीय पक्षांकडून असे वातावरण तयार केले की, जणू काही ही कायदेभंगाची उदात्त चळवळ आहे! पण दहीहंडीच्या नावाने जो बीभत्सपणा सुरू होता व धाडसाच्या नावाखाली लहान मुलांच्या जिवाशी खेळ खेळला जात होता त्याला आवर घालणे गरजेचे होते.
राज्याचे प्रशासन दहीहंडी मंडळांवर नियमांचे पालन करण्याची सक्ती करत नाही व पोलिस सगळ्याच गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, याला कुठे तरी अंकुश असावा, असा व्यापक पण कायद्याच्या चौकटीत पक्का न बसणारा विचार करून न्यायालयाने मनोऱ्यांची संख्या व मुलांच्या वयांची सक्ती केली होती.
या सक्तीमागे सणाच्या निमित्ताने समाजाचे जे बिघडलेले स्वास्थ्य दिसून येते त्यावर अंकुश घालण्याचा न्यायालयाचा प्रयत्न होता. पण न्यायालयाचे हे एक पाऊल त्यांच्या मर्यादेच्या बाहेर पडले व हा विषय तसा चिघळत राहिला.
त्यानंतर दहीहंडी उत्सवात बारा वर्षांखाली मुलांना बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायलयाने दिला असतानाही राज्य सरकारने या विषयीच्या न्यायालयीन अवमान याचिकेत उलट भूमिका घेतली. ‘सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केलेला आहे, त्यामुळे तो आता लागू नसल्याचा मुद्दा मांडत याप्रकरणी आदेशभंग झाला नसल्याचा दावा सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.
न्यायालय विरुद्ध राज्य सरकार
उच्च न्यायालयाने सन 2014 मध्ये दहीहंडी उत्सवात 18 वर्षांखालील गोविंदाच्या सहभागाला बंदी घातली होती. तसेच दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त असू नये, असेही आदेश दिले होते. सन 2014 मध्ये आधी बालहक्क आयोगाने बारा वर्षांखालील मुलांच्या सहभागाला बंदी घातल्यानंतर याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2014 मध्ये 18 वर्षांखालील मुलांच्या सहभागाला बंदी घातली होती. त्याविरोधात काही गोविंदांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यावेळी उत्सव तोंडावर असल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2014 मध्ये गोविंदांचे ते अपील निरर्थक ठरवत निकाली काढले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाचा बंदी आदेश कायम झाला होता आणि त्याचे पालन राज्य सरकार व प्रशासनाने करणे बंधनकारक होते, असा दावा करत पाटील यांनी न्यायालयीन अवमान याचिकेत केला होता. मात्र, सरकारने या उलट भूमिका मांडली.
उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2014 च्या निर्णयात कायम केली असा सरकारचा दावा आहे. त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांचा उत्सवातील सहभागावर बंदी आणि हंडीच्या उंचीसाठी 20 फुटांची मर्यादा ही लागू होत नाही. त्यामुळे 2015 च्या दहीहंडी उत्सवात त्याचे पालन करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे म्हणणे सरकारने मांडले.
अपघात झाल्यास सरकार देणार 10 लाखांची मदत
गेल्या काही वर्षांपासून दहिहंडीच्या सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या वर्षी, सुमारे 1.50 लाख गोविंदांना विमा सरंक्षण देण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दहिहंडीतील गोविंदांसाठी विमा संरक्षणाची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने गोविंदा समन्वय समिती (महा.) च्या माध्यमातून ही योजना लागू केली आहे. यानुसार तब्बल 1.50 लाख गोविंदांना “ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी” द्वारे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
विमा संरक्षणाचे स्वरूप आणि भरपाई
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या या विमा योजनेत अपघातानुसार वेगवेगळ्या प्रकारची भरपाई दिली जाणार आहे.
- मृत्यू झाल्यास: दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा दहीहंडीच्या वेळी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई मिळेल.
- अपंगत्व: दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात-पाय गमावल्यास देखील 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल.
- अंशतः अपंगत्व: एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास 5 लाख रुपयांची भरपाई मिळेल.
- वैद्यकीय खर्च: याव्यतिरिक्त, मानवी मनोरे रचताना झालेल्या दुखापतींवर उपचारासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्चही या विमा योजनेत समाविष्ट आहे.
उत्सव की राजकीय आखाडा?
आपण हे मान्य केले पाहिजे की, दहीहंडीचा सण हा पूर्णपणे एक मार्केटिंग इव्हेंट झाला आहे. पूर्वी दहीहंडीचे प्रायोजकत्व गुटखा कंपन्या करायच्या. आता त्यांना मागे सारून कॉर्पोरेट कंपन्या, बँका व प्रसारमाध्यमांनी त्यांची जागा घेतली आहे. मराठीच नव्हे, तर हिंदी न्यूज चॅनेल थेट महत्त्वाच्या दहीहंडीच्या प्रक्षेपणाचे हक्क घेतात. नटनट्यांची दिलखेचक नृत्ये, डीजेचा दणदणाट, बक्षिसांच्या रूपाने लाखो रु.ची उधळपट्टी सोबतीला आहेच; पण गल्ली सम्राट, आमदार-खासदारांची ऊठबसही यात प्रामुख्याने दिसते.
हा मुद्दा सणाच्या बाजारीकरणाच्या पुढे जाऊन समाजस्वास्थ्याचा, कायदा सुव्यवस्थेचा, सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या शांततेचा झाला आहे. त्यामुळे कायदेमंडळाची जबाबदारी अधिक आहे.
राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. दहीहंडी उत्सवात दही किंवा फळं ठेवलेली हंडी एका उंचीपर्यंत नेण्यात येते. काही ठिकाणी तर अगदी जमिनीवर उभं असलेल्या माणसाला स्पष्ट हंडी दिसत नाही इतकी ती उंचावर नेली जाते. यासाठी गोविंद पथक मानवी मनोरा तयार करतात. मग हंडी फोडण्यासाठी तरुण मंडळांमध्ये स्पर्धा रंगते. जे गोविंदा पथक सर्वाधिक थर लावत सर्वप्रथम हंडी फोडणार त्याला बक्षीसाची रक्कम दिली जाते.
गोविंदा पथकांचे एकावर एक असे थर लागत असताना दुसरीकडे मोठ्या आवाजात संगीताचे कार्यक्रम सुरू असतात. कुठे लाईव्ह म्यूजीक तर कुठे डिजे. काही ठिकाणी गोविंदा पथकांच्या अंगावर पाणी टाकलं जातं. या दरम्यान सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेत्यांची रेलचेल पहायला मिळते. व्यासपीठावरून राजकीय नेत्यांचे भाषण सुरू असतात.
कलाकारांचेही विविध कार्यक्रम असतात. आणि हे सगळं पाहण्यासाठी शेकडो तरुणांची गर्दी त्याठिकाणी जमलेली असते. विशेषत: मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेते आपआपल्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करताना दिसत असल्याचं दिसतं.






