एक काळ असा होता की, ‘राष्ट्रीय नाट्यप्रशाला’ अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून प्रशिक्षण घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या कलावंतांकडे हेटाळणीच्या नजरेने पाहिलं जायचं. त्यांची, त्यांच्या गुणवत्तेची टिंगलटवाळी केली जायची. म्हणूनही अनेकदा एनएसडीचे कलावंत आपली ओळख शक्यतो लपवायचा प्रयत्न करायचे. पण मल्टिप्लेक्स संस्कृती आली. या संस्कृतीने जसा पारंपरिक मसाला चित्रपटांना सामावून घेतलं, तसंच प्रयोगशील, निर्माता-दिग्दर्शकांना, हाडाच्या कलावंतांनाही पडदा खुला केला.
त्यातूनच गुणवान निर्माता-दिग्दर्शक स्थिरावले आणि त्यांनी हिऱ्यांचा शोध घेता घेता पुन्हा आपली नजर गुणी कलावंतांची खाण असलेल्या एनएसडीकडे वळवली. पुन्हा एकदा एनएसडी चर्चेत आली आणि पुन्हा एकदा एनएसडीच्या मांडवाखालून गेेलेल्या विद्यार्थ्याला फिल्म इंडस्ट्रीत प्रतिष्ठा आली. याच काळानुरूप बदलत गेलेल्या परस्पर प्रभावाची नामवंत कलावंतांनी घेतलेली नोंद…
मोठ्या पडद्यावर टिकणं हे ‘एनएसडियन्स’साठी आव्हानच - रोहिणी हट्टंगडी
मी एनएसडीतून बाहेर पडले, ताे काळ चित्रपटांमध्ये स्थिरावण्यासाठी तसा सर्वांसाठीच आव्हानात्मक काळ हाेता. त्यात आम्ही ‘एनएसडी’चे विद्यार्थी. जे शिकायला एरवी दहा वर्षे लागतात, ते सगळे आम्ही तीन वर्षांमध्ये शिकून आलाे हाेताे. केवळ भारतीय रंगभूमीच नव्हे, तर आंतराराष्ट्रीय रंगभूमीशी आमचा जवळून परिचय झाला हाेता. मी व माझे पती जयदेव हट्टंगडी दाेघांनी मिळून एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर रंगभूमीवर काम केले. त्या वेळी व्यावसायिक रंगभूमीवर सुहास जाेशी, विनायक चासकर यांसारखी माेजकीच मंडळी काम करीत हाेती. चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकाेन अर्थातच उपहासात्मक असायचा. ‘एनएसडी’तून शिकून आलात, साे व्हाॅट...! 
पण माझ्या सुदैवाने पुढे मला वयाच्या 27-28व्या वर्षीच ‘गांधी’ या चित्रपटाने हात दिला. पण जसजशी कामे करीत गेले, तसतसे माझ्यासारख्या कलाकारांना टाइपकास्ट करायला लागली, ही चित्रपटसृष्टी. माझ्याकडे ‘एनएसडी’च्या मुशीत तयार झालेला अभिनय हाेता, व्यक्तिमत्त्व हाेते, पण मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीला, टीव्हीवरील छाेट्या पडद्याला लागते तसे ग्लॅमर वा सौंदर्य नव्हते. त्यामुळे मला ‘आई’च्याच भूमिका अधिक मिळायला लागल्या. एक वेळ अशी आली की, आता काम नाही मिळाले तरी चालेल पण आईच्या भूमिका नकाेत... पण मग सरवायव्हलचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी मला सांगितलं की, ‘तू आईची भूमिका जितक्या समर्थपणे साकारतेस तितकी कुणी सध्या साकारत नाही. तुझ्यावर लाेक या भूमिकेकरता अवलंबून आहेत. त्यामुळे हेच आव्हान समज आणि या भूमिकेत जीव ओत.’
भट्टाचार्य यांच्या या सल्ल्यामुळे अशा भूमिकांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकाेन बदलला. देखण्यांच्या चित्रपटसृष्टीत स्थिरावण्याकरता माझ्यासारख्या एनएसडीतून अभिनय शिकून आलेल्या अभिनेत्रीसाठी हाच एक पर्याय हाेता. आपल्या चित्रपटसृष्टीची विशेषत: बाॅलीवूडची ही मर्यादा आजही काही प्रमाणात आहेच. त्यामुळे परस्पर प्रभावातून एक प्रकारचा बंध निर्माण झाला असला तरीही. एनएसडीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा वापर आजवर म्हणावा तितका बाॅलीवूडकडून झालेला नाही, हे खरेच आहे.
देखण्यांच्या जगात एनएसडीनेच तारले - मिलिंद शिंदे
अवतीभवतीच्या समाजाचे भान यायला लागले, चारचाैघांमध्ये जेव्हा मिसळायला लागलाे, तेव्हापासून म्हणजे जाणत्या वयापासून कळत-नकळत अभिनयाची गाेडी लागलेली. महाविद्यालयीन पातळीवर नाट्यस्पर्धा खुणावू लागल्या तसे अभिनयाचे वेड मनात झिरपत गेले. याच वेडाखातर 1995 ते 98च्या बॅचमध्ये मी एनएसडीला प्रवेश घेतला. एनएसडीत शिकत हाेताे त्या वेळी सगळी चित्रपटसृष्टी देखण्यांची हाेती. एनएसडीतही माझ्याभाेवती सगळे ताकदीचे कलाकार हाेते, प्रतिभेसाठी त्यांचा लाैकिक हाेता. ग्रंथ वाचन हा त्यांचा गुणविशेष होता. माझ्याजवळ त्यांच्यापाशी असलेलं काहीही नव्हतं. ना माझ्या गावात मला उत्तमाेत्तम जगभरातील पुस्तके उपलब्ध हाेती, ना रंगभूमीची व्यापकता काय असते हे समजावणारे तज्ज्ञ, ना शाळा.
संबंधित लेख वाचा: ‘शिवाजी अंडरग्राउंड’... या जिरेटोपाचं माप आपल्या सगळ्यांच्या मेंदूशी जुळो...! |
अभिनय शिकायचा नसताे, हे खरंय; पण त्यासाठी लागणारा हाेमवर्क कसा करावा, त्यासाठी काय काय पाहावं, वाचावं याची उपलब्धीच माझ्या गावात नव्हती. एखाद्या स्पर्धेचा करंडक जिंकला की, आम्ही स्वत:ला नट समजायचाे, अभिनेता समजायचाे, ही माझ्या गावाची वृत्ती. त्यामुळे एनएसडीत प्रवेश केला, तेव्हा सुरुवातीला माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला हाेता. आपल्याकडे ज्ञानाचा आवाका नाही, हे मला कळून चुकले हाेते. शिवाय एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर देखण्यांच्या चित्रपटसृष्टीत आपला निभाव लागेल का, ही शंकादेखील सतावत हाेती.
पण एनएसडीने मला या साऱ्या शंकांच्या जंजाळातून बाहेर काढले. बाहेरचे अफाट पसरलेले जग दाखवले. अभिनय हा उपजत असावा लागणारा गुण आहे, हे खरे आहे; पण त्याबराेबरीने स्वत:चा असा एक अभ्यास असावा लागताे, भवतालातल्या कलात्मकतेचे भान असावे लागते. ते मला नगरच्या एवढ्याशा सांस्कृितक विश्वात कधी मिळेल याची शाश्वती नव्हती. ही शाश्वती मला एनएसडीने दिली. एनएसडीने माझ्यातले सगळे न्यूनगंड मला झटकायला लावले. मी काय वाचायला हवे, हे आपसूकच शिकत गेलाे.
माझ्या वरवरच्या दिसण्यापेक्षा माझ्यातल्या अभिनयाचे साैंदर्य अधिक माेलाचे आहे, ही जाणीव मला एनएसडीतील तीन वर्षांनी दिली. गंमत म्हणजे, मी शिकून बाहेर पडलाे तेव्हा चित्रपटसृष्टी बदलली हाेती. सामान्य माणसांभाेवती केंद्रित असलेले चित्रपट येऊ लागले हाेते. त्यामुळे माझ्या रांगड्या दिसण्यापेक्षा माझ्या अभिनयाला, एनएसडीतल्या अनुभवाला अर्थातच मागणी आली. त्यामुळेच ‘नाॅट ओन्ली मिसेस राऊत’सारखे चित्रपट मला मिळाले.
तरीदेखील एनएसडीच्या कलाकारांना मराठीमध्येदेखील पूर्णत: सकारात्मक परििस्थती नाही, अनेक चढउतार या कलाकारांना नेहमीच सहन करावे लागले. सध्या मराठीत अपवादात्मक चित्रपट वगळता स्टारडमचा अट्टाहास नाही, त्यामुळे खरे तर अभिनय करणाऱ्या कलाकारांना मागणी आहे. तरीदेखील मेन स्ट्रीमचा चित्रपट करायचा म्हटलं की, अनेक अडचणी येतात. बाॅलीवूडप्रमाणे मराठीतही ज्या वेळी केवळ मसालेदार चित्रपटांची लाट हाेती, त्या वेळी एनएसडीतून बाहेर पडलेले कलाकार हे हेटाळणीचा, उपहासाचा विषय असायचे.
अर्थात, हाही काळ पुन्हा बदललाच म्हणा. याला केवळ चित्रपट दिग्दर्शकच नव्हे, तर प्रेक्षकांची वाढत गेलेली उमजही कारणीभूत आहे. प्रेक्षकाला उपऱ्या विषयाचा व वरकरणी देखण्या पण अभिनय करून शकणाऱ्यांकडूनही चित्रपट करवून घेऊन सादर केलेले पॅकेज चालणार नाही, हे आता चित्रपटसृष्टीत प्रत्येकाच्या येथे लक्षात येऊ लागले आहे.
साधी गाेष्ट आहे, विनाेदी अभिनेत्याकडून ‘फॅन्ड्री’सारखा वास्तववादी चित्रपट करून घेता येत नाही. तसे करायला गेले तर चित्रपट फसताे. असे फसलेले प्रयाेग आजवर मराठीत अनेकदा झाले आहेत. तसे हाेऊ नये, याकरता खरा चेहरा लागताे; मुखवटा नाही, ही उमज मराठीला आता निश्चितच आली आहे. तरीदेखील बहुश्रुत कलाकार असायला हवा, ही काळाची गरज आहे; जी एनएसडी मूलभूत पातळीवर पूर्ण करते. अलीकडे असे आश्वासक बदल ‘फॅन्ड्री’, ‘धग’, ‘अस्तु’सारख्या चित्रपटांनी जाणवून दिल्याने एनएसडीच्या कलाकारांना तुलनेत चांगले दिवस सध्या आहेत.मलादेखील ‘बाबू बँड बाजा’सारखा चित्रपट त्यामुळेच करता आला.
बाॅलीवूडमध्येदेखील या बदलामुळे कुठला कलाकार अभिनय करू शकताे, याची वर्गवारी अलीकडील दिग्दर्शक नीट करायला लागले आहेत. ‘पानसिंग ताेमर’साठी एनएसडीतून बाहेर पडलेल्या तिग्मांशू धुलीयाने इरफान खानची निवड केली, रणबीर कपूरची नाही. ‘बुलेट राजा’मध्ये मात्र त्याने सैफ अली खानला घेतले. कुठे अभिनय लागताे, कुठे स्टारडम, याची तिग्मांशूला चांगली जाणीव आहे. या जाणिवेचा पायाच मुळात एनएसडीमध्ये तयार हाेताे.
एनएसडीमध्ये तुम्ही व्यापक पातळीवर रंगभूमी शिकता. त्यामुळे एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर हे व्यापक शिक्षण चित्रपटात कामी येते. अमुक एका प्रांताचे, भाषेचे बंधन त्यामुळे अभिनयासाठी येत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर कनार्टकचे एक ‘प्रसन्न’ म्हणून शिक्षक आम्हाला माेठ्या तन्मयतेने शिकवत. त्यांनी अभिनयातली वैिश्वकता इतक्या सहजतेने शिकवली की, आपलं शरीर, मन अभिनयातून कसं त्या त्या पात्रात शिरायला हवं, हे कळत गेलं. शेक्सपिअरच्या मिड्स समरनाइट ड्रीम्स’ या नाटकात मी एनएसडीत असताना काम करत हाेताे.
प्रत्येक भूमिकेला डबल कास्ट हाेेेती. 12-15 शाेज हाेते. माझ्या भूमिकेसाठी मात्र डबल कास्ट नव्हती. माझी भूमिका मीच करायचाे. असं म्हणता येईल की, माझ्या दिग्दर्शकाने, शिक्षकाने माझी ताकद ओळखली हाेती. त्यामुळे त्या भूमिकेमध्ये केवळ मीच जीव ओतावा, अशी त्यांची इच्छा हाेती, आज्ञा हाेती. हाच बदल सध्या मराठी चित्रपटक्षेत्रात मला जाणवताे आहे. केवळ दिसण्यावर आता चित्रपटसृष्टी जात नाही, वा लाेकप्रियतेवरही जात नाही. ज्याला ज्या भूमिकेत चपखलपणे शिरता येते, त्यालाच चित्रपटातील ती ती भूमिका देण्यात येते. हा बदल सुखावह आहे, जाे याेग्य दिशेने जायला हवा.
एनएसडीचे वलय मागे सोडून वावरलो - हृषीकेश जोशी
मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्या वेळी मी ‘एनएसडी’चा आहे, हेच कुणाला सांगितलं नव्हतं. निदान स्वत:हून तरी एनएसडीचा विद्यार्थी आहे, हे मला कुणाला सांगायची इच्छा नव्हती. हेतू खरे तर हा हाेता की, माझी कला बघितली जावी, माझे काम बघितले जावे, आणि मग माझे मूल्यमापन या चित्रपटसृष्टीने व प्रेक्षकांनी करावे. माझ्या कामामध्ये जर माझ्या प्रशिक्षणाचा परिणाम दिसला नसता, तर मी ‘एनएसडी’चा असणे वा नसणे, याने काहीच फरक पडणार नव्हता.
या हेतूबराेबरच आणखी एक कारण हाेते; ते म्हणजे, मला एनएसडीचा शिक्का माझ्यावर बसू द्यायचा नव्हता. कलाकार ‘एनएसडी’तून बाहेर पडतात व सतत आपण एनएसडीचे आहाेत, असे वलय भाेवती घेऊन वावरतात; त्यांच्याकडे चित्रपटसृष्टी मधल्या काळात व आजही काही प्रमाणात काहीशा थट्टेनेच बघत आली आहे.
इथल्या चित्रपटसृष्टीच्या नियमानुसार कलाकाराला चालावे लागते. इथल्या व्यवस्थेशी स्वत:ला जुळवून घ्यावे लागते. त्यामुळे स्वत:ला वेगळे काढल्याने कलाकार मागे पडत जाताे. खरे तर ‘एनएसडी’मधून प्रशिक्षण घेऊन आल्याने मला लवचिकरीत्या काम करण्याचा फायदाच झाला आहे. मी काॅमेडी करताे, स्टँडअप काॅमेडी करताे, गंभीर भूमिकांमध्येही समरस हाेऊ शकताे, पडद्याबराेबर रंगभूमीवरही वावरू शकताे.
खरे तर ‘एनएसडी’त न गेलेला कलाकारही अनुभवाने ही लवचिकता अंगी बाळगू शकताे. ताे अनुभवातून सगळे शिकत असताे. फक्त त्याला अनेकदा कळत नाही की, आपणही शिकतच अाहाेत. एरवी, नाटकांचा, चित्रपटांचा अभ्यास असावा लागताे, जाे मला ‘एनएसडी’मुळे करता आला.
काेल्हापूरसारख्या भागातून 1994 ते 1997 या काळात मुंबई-पुण्याबाहेरचं जग ठाऊक नसताना एनएसडीत प्रवेश घेतला, सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेत शिकल्यामुळे. पुढे जाण्याची आकांक्षा निर्माण झाली आणि त्यातूनच मी ‘एनएसडी’त प्रवेश घेतला. पुढे एनएसडीच्या प्रशिक्षणाचा फायदा मला झाला. मी एनएसडीचा आहे हे जाणवू न दिल्यामुळे. रंगभुमीवरच्या कलाकारांच्या वाट्याला येणारी साचेबद्धता मी अनुभवली नाही. त्यामुळे मला नेहमी वाटत आलंय की, एनएसडीतून बाहेर पडलेला कलाकार हा ‘टॅबू’ हाेऊ नये, त्याची चेष्टा हाेऊ नये, याकरता तेथील प्रशिक्षणाचा योग्य वापर करत स्वत:ला चित्रत्रपटसृष्टीत जुळवून घेण्यातच कलाकाराचं हित आहे.
माझं एक नाटक निषेधाचं - रसिका आगाशे
मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी…मोहम्मद जिशान अयुब ज्याला आपण आज बॉलीवूडमधल्या रांझणा, तनू वेड्स मनू, फँटम, रईस, शाहिद अशा मोठ्या सिनेमांमध्ये ताकदीचा अभिनय करताना पाहिलंय. त्याची आणि माझी लव्हस्टोरी एनएसडीमध्येच सुरू झाली. खरं तर हा मला एनएसडीमधला ज्युनियर. नाटकांच्या तालमी झाल्यावर अनेकदा तो संध्याकाळपर्यंत थांबायचा. गप्पा मारायचा. तालमी संपल्यानंतर आम्ही रात्र - रात्रभर बाइकवरून भटकायचो. गप्पा, आजूबाजूच्या परिस्थितीवर चर्चा, कविता ऐकता-वाचताना आमची घनिष्ठ मैत्री झाली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेऊन आम्ही लग्नही केलं.
हे झालं जिशान आणि माझ्याबद्दल, पण एनएसडीने मला नेमकं काय दिलं…? तुम्ही नटी असता, म्हणजे नक्की काय असतं? तुमचं ठरावीक वेळेत न बांधलेलं, पण एक वेळापत्रक असतं. प्रयोग असतात. शूट असतं. घरदार असतं. आणि या सगळ्या व्यापात बाहेरचं अत्याव्यस्त जगही असतं. माझंही होतं; पण, दिल्लीमध्ये नृशंस बलात्कारात ज्योती नावाची (बरेच लोक तिला ‘दामिनी’ किंवा ‘निर्भया’ नावाने ओळखतात, पण तिच्या पालकांनीच तिचं नाव सांगितलं. तिचं नाव लपवायला तिने कुठलीही चूक केलेली नाहीये, हा त्यांचा विश्वास!) मुलगी होरपळी तोवर. या घटनेमुळे अनेकांचं जग बदललं. माझंही. निषेध म्हणून रस्त्यावर उतरायला त्या वेळी नुकतंच अण्णांनी शिकवलं होतं.
आमची सगळी पिढी फेसबुक, ट्विटर वगैरे माध्यमांतून व्यक्त होत होती. मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणं चालू होतं. एक दिवस उत्स्फूर्तपणे मीही सामील झाले त्यात. पण घरी आल्यावर वाटू लागलं, याने काय होणार? त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात मला परिवर्तनाची वाट काही सापडेना. मला वाटत होतं, त्यापेक्षा या ‘बाहेरच्या' जगातल्या व्यभिचारानं मला आतून हलवून सोडलं होतं. काय करावं, कळत नव्हतं. पण इतकं कळत होतं, की काहीतरी केलं पाहिजे. पण मला तर फक्त थिएटर करता येतं, मी आणखी काय करणार? मग वाटलं, हेच, नाटक हेच माझं माध्यम आहे निषेधाचं!
काल-परवापर्यंत फक्त नट्या म्हणून वावरणाऱ्या आम्ही अचानक ‘फेमिनिस्ट’ झालो होतो! आमच्या आसपास होणाऱ्या छोट्या छोट्या अन्यायांविरुद्ध लढत होतो. भांडत होतो. पहिल्या दिवशी दिल्लीतल्या निर्घृण बलात्कारामुळे अस्वस्थ झालेल्या, आणि कुठल्या तरी स्कँडल्सबद्दल बोलणाऱ्या माझ्या मैत्रिणी, रंगमंचावर त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगायला तयार झाल्या. तेव्हा मला माझी नटी म्हणून, दिग्दर्शक म्हणून, आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जबाबदारी वाढतीये, याची तीव्रपणे जाणीव झाली. आणि कुठेतरी खंतही वाटली, की ही जबाबदारी मी आधीच का नाही घेतली?
दर वेळी काम करताना कुठल्या तरी सामाजिक विषयावर नाटकं करू या, असं ठरवून आम्ही कधीच नाटकं निवडली नाहीत. तर प्रत्येक वेळी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर, समस्यांवर प्रतिसाद म्हणून आम्ही नाटकं करत गेलो. इब्सेन फेस्टिवलसाठी ‘व्हेन वुई डेड अवेकन’ नाटक (इब्सेनने त्याला दिलेलं मूळ नाव ‘रिसरेक्शन डे’) दिग्दर्शित करा, अशीच ऑफर होती.
एक शिल्पकार, त्याची मॉडेल, आणि त्याची पत्नी असं नातेसंबंधावर भाष्य करणारं हे नाटक. पण शिल्पकार बनवत असलेली मूर्ती आमच्या नाटकात रूपांतर करताना आदिमाया बनून आली. स्त्रीची मूर्ती बनवून तिला कशा पद्धतीने मखरात ठेवलं जातं आणि सोयीस्कररीत्या वापरलं जातं, या विषयावर नाटक भाष्य करू लागलं. या नाटकांचं कौतुक व्हावं, सत्कार व्हावेत, असा उद्देश कधीच नव्हता. पण ही नाटकं जर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उपस्थित करत असतील, तर ते आम्हाला हवंच होतं.
हे सगळं करताना नाटक हे मनोरंजनाचं साधन आहे, आणि नुसता प्रचारकी आवेश असून चालणार नाही, याचं भान आम्ही बाळगायचा प्रयत्न केला. कारण, या पद्धतीने नाटकातून व्यक्त होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षक बघायला तर आलेच पाहिजेत. त्यामुळे अगदी पथनाट्याच्या मार्गावर न जाता जे लोकांना बघायला आवडेल आणि ज्यातून मला माझं म्हणणंही मांडता येईल, असा मध्यम मार्ग शोधण्याचा माझा प्रयत्न राहिला.
मी ज्या क्षेत्रात काम करते तिथल्या लोकांकडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा असतात. कारण कलाकार म्हणून आम्ही जास्त संवेदनशील आहोत, असा सगळ्यांचा समज असतो. आणि अनेक कलाकार वेगवेगळ्या पातळ्यांवर काही ना काही समाजाभिमुख काम करत असतातही. पण सर्वसामान्यरीत्या आपल्याला काय करायचंय? आपलं बरं चाललंय ना? असा एक संकुचित दृष्टिकोन असतोच. मग प्रवाहाबरोबर राहायचं का विरुद्ध जाऊन पडायचं, हे कळेनासं होतं.
मला अनेकदा वाटतं की, नाव म्हणून, पैसे म्हणून आपल्याला अजून खूप कमवायचं आहे खरं, पण एकदा त्या शर्यतीत घुसलं की, आपल्या मनाचं काम करणं कठीण होऊन बसतं. अभिनय करता करता दिग्दर्शन करायचा निर्णय हा त्यामुळेच झाला होता. कारण सतत वाटायचं की, लेखकांनी लिहिलेली वाक्य, आशय पोहोचवणं, इतकंच आपलं काम आहे, की अजून काही म्हणायचंय? मग रस्ता शोधत राहिले. अथक. अविश्रांत.






