भारत देशात विमानात बसणं हे एखाद्याला लॉटरी लागल्यात आनंद देऊ शकतं आणि विमान चालवता येणं आणि पायलट बनणं हे तर अनेकांचं लहानपणापासूनचं एक स्वप्न असतं. त्याच्या साठी धडाडी, शौर्य, निर्णयक्षमता हे आणि इतर अनेक गुण आवश्यक असतात. एकदा वैमानिक बनल्यावर पैसा, उंची जीवनशैली आणि सामाजिक प्रतिष्ठा हे हे सगळंच वैमानिकाला मिळतं. भारतातच नव्हे तर इतर अनेक देशातसुद्धा वैमानिकाला हे सारं मिळतं. पण, आपली विवेकबुद्धी शाबूत असेल अशा वैमानिकाचा जेव्हा आपल्या विवेक बुद्धीशी संघर्ष सुरू होतो आणि हे सगळं त्याला निरर्थक वाटायला लागतं तेव्हा…?
‘फ्लाईंग शेम’ म्हणजे नेमकं काय?
जगभरात ‘फ्लाईंग शेम’ नावाची एक चळवळ सुरू आहे. ‘फ्लाईंग शेम’ ही संकल्पना सर्वप्रथम स्वीडिश भाषेतील ‘फ्लाईंग स्केम’ वरून उदयाला आली. विमान प्रवासामुळे होणारे अधिकचे कार्बन उत्सर्जन पर्यावरणाच्या हिताचे नसल्यामुळे अशा प्रवासाबद्दल अपराधी वाटणे म्हणजे ‘फ्लाईंग शेम’ होय… 2017 मध्ये स्वीडनमध्ये या चळवळीला सुरूवात झाली. स्वीडिश गायक स्टाफन लिंडबर्ग याने विमान प्रवासातून होणारे कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी एका कॉन्सर्टच्या निमित्ताने करावा लागणारा विमान प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला. लिंडबर्गने इतरांनाही शक्य असेल तेव्हा विमान प्रवास टाळून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आणि या चळवळीने जोर धरला. पुढे ग्रेथा थनबर्ग आणि तिचे आई-वडीलही या चळवळीचे पुरस्कर्ते झाले.
ग्रेटाने हवामान बदलाच्या विषयात आवाज उठवण्यास सुरूवात केली आणि स्वत: रेल्वेने सबंध युरोपभर प्रवास केला. ते बघून अनेकांनी विमान प्रवासाचा नव्याने विचार करण्यास सुरूवात केली. या सगळ्या घडामोडी युरोपमध्ये रुजल्या आणि पुढे जगभर त्याचा प्रसार झाला. विमान प्रवासामुळे होणारे कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी शक्य तिथे विमानाऐवजी रेल्वे किंवा बससारखे पर्याय वापरणे, कारपुलिंग किंवा वाहन शेअर करून प्रवास करणे, प्रवास न करता व्हर्च्युअल भेटी आणि संवादाला प्राधान्य देणे असे मार्ग या फ्लाईंग शेम चळवळीने सुचवले आहेत.
ही गोष्ट आहे विवेकबुद्धीशी झगडणाऱ्या एका वैमानिकांची…
ही गोष्ट आहे विवेकबुद्धीशी झगडणाऱ्या एका वैमानिकांची आणि त्याने आपल्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची. आपण रोजच्या रोज हवेत मोठा प्रदूषणकारी धूर सोडून फार मोठं गुन्हेगारी कृत्य करत आहोत अशी अपराधभावना त्यांच्यापैकी काहींना वाटली असणार आणि अशा विवेकी वैमानिकांनी मग त्यानंतर काय केलं…?
यांपैकी एक वैमानिक जॉर्ज हिब्बर्ड याने ‘द गार्जियन’मध्ये याविषयीच्या कार्यकर्तेपणाविषयी स्वत:चा अनुभव लिहिला आहे.
या लेखात तो म्हणतो, मला उड्डाण करायला खूप आवडतं... मी लहानपणापासून पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. चिचेस्टर, वेस्ट ससेक्स येथे मी वाढलो, जिथे गॅटविक नावाचे विमानतळ होते. दररोज आकाशातून अनेक विमान उड्डाण करताना मी पाहायचो आणि हरखून जायचो. 2019 मध्ये वैमानिकाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि विमान उडवण्यास पात्र ठरल्यानंतर मी ‘ईझी जेट’या विमान कंपनीसाठी वैमानिक म्हणून काम सुरू केलं. विमान वाहतुकीमुळे मला कॅनडामध्ये राहणाऱ्या माझ्या कुटुंबीयांशी जवळीक साधता आली, विविध संस्कृतींचा परिचय झाला आणि वैमानिक म्हणून मी अविस्मरणीय करिअर घडवलं…
संबंधित लेख वाचा: 1) काय फायदा आपण जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल असूनही..? 200 पेक्षा जास्त वैमानिक तर गमावले! |
…आणि त्यादिवशी मी माझं वैमानिकाचं ओळखपत्र ‘सरेंडर’ केलं!
पण मग तो दिवस आला जेव्हा नोव्हेंबर 2022 मध्ये मी माझं वैमानिकाचं ओळखपत्र ‘सरेंडर’ केलं, म्हणजेच मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. आपल्या या विमान उद्योगाचा पृथ्वी ग्रहावर होणारा विपरित परिणाम पाहून माझी काळजी वाढत चालली होती, आणि माजा आतला आवाज मला सांगत होता की, हवामान संकटाबद्दलची माझी चिंता पायलट म्हणून माझ्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतेय…
जरी मी आता या विमान सेवा कंपनीत काम करत नसलो, तरी विमान वाहतुकीवरील माझं प्रेम मला पुढील पिढ्यांसाठी उड्डाणाची क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवृत्त करत आहे. विमान उद्योगासमोर उभ्या असलेल्या या अस्वस्थ वास्तवांकडे पाहायला व त्यांना सामोरे जायला मला यामुळेच प्रेरणा मिळाली आहे. सगळ्यांना माहिती आहे की विमान वाहतूक क्षेत्राचं कार्बन उत्सर्जन खूप मोठं आहे. 2022 मध्ये, यूकेच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधून 29.3 दशलक्ष टन CO2 समकक्ष उत्सर्जन झाले, जे यूकेच्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सुमारे 7% होते. हे प्रमाण 2030 पर्यंत 11% इतकं वाढेल, कारण इतर क्षेत्रांमध्ये उत्सर्जन कमी होत असताना, विमान वाहतुकीचं उत्सर्जन स्थिर राहणार किंवा वाढणारच आहे.
विमान प्रवासामुळे होणारे कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी
अनेक काळापासून हरितगृह वायूंच्या (Greenhouse Gases) उत्सर्जनात विमानं देखील एक प्रमुख घटक मानली जात आहेत. पण उत्सर्जनाचा प्रश्न आणखी मोठ्या समस्येतून निर्माण होतो. एका संशोधनपर अहवालात गेल्या 25 वर्षांतील विमान कंपन्यांनी निश्चित केलेल्या उत्सर्जन कमी करण्याच्या आणि कार्यक्षमतेच्या उद्दिष्टांचे परीक्षण केले गेले; त्यात एक वगळता सर्वच उद्दिष्टे अपयशी ठरली आणि शांतपणे सोडून देण्यात आली. उद्योगाला माहीत आहे की विमानं ही हवामान संकटासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात, पण या समस्यांवर उपाययोजना करण्यात त्यांना अपयश आले आहे.
एअरलाईन्स कंपन्या नफा मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. या कंपन्या सरकारांवर दबाव आणतात की आवश्यक उपाययोजना राबवू नयेत, ज्यामुळे उत्सर्जन कमी होईल आणि उद्योग दीर्घकाळ टिकेल. दरम्यान, सरकारने या क्षेत्रातील नियमनासाठी फार कमी प्रयत्न केले आहेत. रोजगार आणि उपजीविका टिकवण्यासाठी विमानतळ विस्ताराचे समर्थन करणाऱ्या युनियनमध्येही हेच अल्पदृष्टीचे विचार दिसतात.
पृथ्वी वाचवण्यासाठी नेमकं काय करायला हवं…?
भविष्यात योग्य अशी विमान वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी अनेक कल्पना उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात पहिले म्हणजे, उत्सर्जनासाठी एक कडक बजेट तयार करणे, जे विमान वाहतुकीद्वारे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायू आणि कार्बन डायऑक्साइडचे एकूण प्रमाण मर्यादित करेल. विमान वाहतुकीवर योग्य कर लावला पाहिजे (सध्या जेट इंधनावर कोणताही कर नाही).
सरकार वारंवार प्रवास करणाऱ्यांवर (विशेषतः अतिश्रीमंत लोकांवर) अतिरिक्त कर लावू शकते, ज्यामुळे कमी-कार्बन तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकासासाठी निधी मिळेल आणि त्यामुळे अधिक कुशल नोकऱ्या तयार होऊ शकतील. भविष्यात, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कमी-कार्बन हायब्रिड इलेक्ट्रिक विमानांमधून हळूहळू अनेक टप्प्यांत प्रवास केला जाईल, तर कमी अंतरावरील आवश्यक उड्डाणे, उदा. स्कॉटिश बेटांवर जाण्यासाठी, लहान इलेक्ट्रिक विमानांनी केली जातील.
मी याबाबतीत काहीतरी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे 2020 च्या वसंत ऋतूमध्ये मी 'सेफ लँडिंग' या समुदायात सामील झालो. हवामानबदलासाठी (विमान) उद्योगाने चांगलं काम करावं अशी अपेक्षा असलेले विमान वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी यात आहेत. त्यासाठी हा गट काम करतो.
आम्ही कामगार परिषदा आयोजित करत आहोत जिथे विमान कर्मचाऱ्यांना या गंभीर आणि राजकारणात दुर्लक्षित राहिलेल्या विषयांवर मनमोकळा विचार करता येतो. आमच्या या प्रयत्नांमुळे सरकार आणि कामगार संघटनांनाही प्रेरणा मिळावी अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून त्या त्यांच्या स्वतःच्या कामगार परिषदा आयोजित करून, उद्योगात होणाऱ्या बदलांबाबत (या कंपन्या) कामगारांचा आवाज ऐकू शकतील.
हवामान संकटाशी लढा देताना सर्वात मोठी हानीकारक गोष्ट म्हणजे लोकांवर जबरदस्तीने धोरणे लादणे. कामगार परिषदा सामाजिक दरी भरून काढू शकतात, लोकांना त्यांच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवून देऊ शकतात आणि राजकारणातील विश्वास पुन्हा प्रस्थापित करू शकतात."
(जॉर्ज हिब्बर्ड हे माजी एअरलाईन पायलट असून, सध्या ‘सेफ लँडिंग’सोबत काम करून विमान वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी असेम्ब्ली आयोजित करतात.)






