छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे घराघरातील जिव्हाळ्याचा विषय… या मालिका घरातील स्त्रियांच्या अगदी जवळच्या. आताच्या मालिकांना प्रेक्षक कितीही नावं ठेवत असले तरी एक काळ असाही होता जेव्हा काही ठराविक मालिका पाहण्यासाठी घरातील सगळेच टीव्हीसमोर बसायचे. एकही भाग चुकवायचे नाहीत. अशाच काही मालिकांमधली एक होती 'क्योंकी कभी सास भी कभी बहू थी' ही मालिका. स्टार प्लसवरील या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड घातलं होतं.
आता हिंदीच्या छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय ठरलेली हीच 'क्यूँकी सास भी कभी बहू थी ' ही मालिका नव्या सीझनसाठी सज्ज झाली आहे. नवीन सीझनमधील तुलसीचा एक लीक झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो बघून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोनेरी जर असलेली मरून रंगाची साडी परिधान केलेल्या तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी यांच्या व्यक्तिमत्त्वात तेच सौंदर्य दिसून येतंय. साधं मंगळसूत्र, मोजके दागिने आणि त्यांची खासियत असलेली मोठं लाल कुंकू असा तुलसीचा लूक प्रेक्षकांसाठी नॉस्टॅल्जिक ठरतोय.
‘तुलसी विरानी’ पुन्हा येतेय…
या प्रोमोत पाहायला मिळतंय की, हॉटेलमध्ये कुटुंबातले काही सदस्य मालिकेबद्दल बोलतायत. याच मालिकेमुळे कुटुंबासोबत एकत्र जेवायला बसायची सवय लागली. पण आता स्मृती इराणी राजकारणात सक्रिय आहेत, त्यांना वेळ कसा मिळेल? 'क्यूँकी सास भी कभी बहू थी' च्या नवीन सीझनमध्ये स्मृती इराणी असणार की नसणार या बद्दल ते बोलत असतात. यानंतर एन्ट्री होते ती थेट स्मृती इराणी यांचीच, अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या तुलसीची.गेल्या 25 वर्षांपासून प्रेक्षकांशी माझं नातं घट्ट होतं, त्यामुळे आता मी पुन्हा आलेय... असं स्मृती इराणी म्हणतात.
'क्यूँकी सास भी कभी बहू थी' हा मालिका आता 29 जुलैपासून 'स्टार प्लस' वाहिनीवर रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांना पाहताना येणार आहे. तर जिओ हॉटस्टारवरही ही मालिका प्रेक्षकांना पाहता येईल.
संबंधित लेख वाचा: 1) काश्मीर फाईल्स, केरल स्टोरी नंतर आता 72 हुरें? |
प्रेक्षक हे मालिकेतील प्रत्येक पात्राला आपल्या घरातील सदस्य मानतात. त्याच्यवर भरभरून प्रेम करतात. या मालिकेच्या बाबतीतही तेच झालं. 'क्योंकी कभी सास भी कभी बहू थी' मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात भरलं. मालिकेतील तुलसी तर सगळ्यांची लाडकी आणि तिचा नवरादेखील. मात्र काही काळाने तुलसीच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने काही वैयक्तिक कारणाने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यामुळे निर्मात्यांनी मालिकेत त्याला मृत दाखवलं.
तुलसीचा पती गेला हे समजताच प्रेक्षक प्रचंड चिडले. विश्वास बसणार नाही पण लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. लोक मालिकेवर प्रचंड रागावले. ही सगळी परिस्थिती पाहून मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणण्यात आला. प्रेक्षकांना शांत करण्यासाठी निर्मात्यांनी तिच्या पतीला पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळेस त्याचा चेहरा खराब झाल्याने त्याची प्लास्टिक सर्जरी झाली असल्याचं दाखवण्यात आलं आणि अशा प्रकारे दुसऱ्या कलाकाराला मालिकेत घेण्यात आलं. प्रेक्षकांच्या रागामुळे मालिकेची कथाच बदलावी लागली होती.
"तुलसी विरानी" केवळ एक काल्पनिक व्यक्तिरेखा नव्हती तर ती एका संपूर्ण युगाची प्रतिनिधी होती. ज्या काळात भारतीय टेलिव्हिजनवर "आदर्श नारी" आणि "संयुक्त कुटुंब व्यवस्था" यांची स्वप्न रंगवली जात होती, त्या काळात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि तिची नायिका तुलसी ही संस्कार, कुटुंबप्रेम आणि स्त्रीत्वाचे प्रतीक बनली होती.
या मालिकेची ओळख म्हणजे संस्कार, परंपरा आणि नात्यांची ऊब. मात्र त्याचवेळी, ग्लॅमर, सेट्सची भव्यता आणि जीवनशैलीतील आधुनिकतेच्या झगमगाटातही ही मालिका रसिकांच्या मनात घर करून बसली.
‘क्योंकी’ ही मालिका पुरोगामी आणि प्रतिगामी…
2000 ते 2008 दरम्यान ही मालिका तब्बल 1,800 हून अधिक भागांपर्यंत पोहोचली. भारतीय टेलिव्हिजनवर संयुक्त कुटुंबाच्या संकल्पनेला मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणारी ही पहिली मोठी मालिका ठरली. सिनेमा अभ्यासक आणि लेखिका भावना सोमय्या सांगतात, "ही मालिका एकाचवेळी मागे घेऊन जाणारी आणि पुढे नेणारी होती. परंपरेशी नातं जोडून ती भावनिक संवादातून प्रेक्षकांशी संवाद साधत होती."
या मालिकेच्या यशामागे एक सांस्कृतिक गुंतागुंत होती. प्रो. शोमा मुंशी, ज्यांनी ‘Prime Time Soap Operas on Indian Television’ हे पुस्तक लिहिलं आहे, त्या म्हणतात की, "या मालिकेने स्त्रियांच्या प्रगतिशील प्रतिमांपासून दूर जाऊन आदर्श हिंदू व्यावसायिक संयुक्त कुटुंबाचं एक काल्पनिक विश्व उभं केलं. त्याकाळी दूरदर्शनर एकीकडे तारा आणि उडान सारख्या मालिका सुरू होत्या, मात्र ‘क्योंकी’मुळे महिला पारंपारिक चौकटीत कैद झाली." त्यांचा मुद्दा असा होता की ‘क्योंकि…’ सारख्या मालिकांनी समाजातील वास्तविक संघर्षांवर भाष्य करताना त्यात मेलोड्रामा आणि भावनात्मक अतिरंजितता भरून त्यांना ‘दृश्य शोभेचे’ बनवले.
पटकथा लेखिका स्वेक्षा भगत सांगतात की, एकता कपूरने ‘नॉस्टॅल्जिया गॅप’ ओळखून त्यावर आपले टेलिव्हिजन साम्राज्य उभं केलं. उदारीकरणानंतर जिथे कुटुंबं लहान होत होती आणि विचार अधिक स्वतंत्र होत होते, तिथे या मालिकेने एक आदर्श, स्वच्छ आणि नियंत्रित जग दाखवलं. शांतीसारख्या आत्मनिर्भर, करिअरधारित स्त्रिया बाजूला झाल्या आणि त्यांच्या जागी आल्या तुलसीसारख्या कुटुंबाभोवती फिरणाऱ्या, संयमित आणि त्यागमूर्ती स्त्रिया."
लेखिका शाबिया वालिया म्हणतात की, "तुलसीसारख्या व्यक्तिरेखा वास्तवदर्शी वाटत होत्या. त्यांच्यासाठी तुलसी एका आदर्शाची झलक होती. एक अशी स्त्री जी घराच्या केंद्रस्थानी होती, सगळ्यांना सांभाळणारी होती, परंतु तिची स्वतःचीही एक ओळख आणि मत होतं. माझ्यासारख्या लहान कुटुंबात वाढलेल्या मुलींसाठी एकत्र राहणाऱ्या कुटुंबाचं चित्र स्वप्नवत होतं. त्या तुलसीसारखं बनू पाहायच्या. केवळ एक सून म्हणून नाही, तर एक अशी व्यक्ती म्हणून जिला सगळे आपलंसं समजतात."
मालिकेतील स्त्रियांच संपूर्ण अस्तित्व "परिवारासाठी"
या मालिकेतील स्त्री पात्रं बहुधा स्वयंपाक करणारी, पोरंबाळं सांभाळणारी, पूजा करणारी आणि स्वतःच्या इच्छांवर तुळशीपत्र ठेवणारी असायची. त्या सशक्त असल्या, तरी त्या सशक्तीकरणाचं रूप नव्हत्या, कारण त्यांचं संपूर्ण अस्तित्व "परिवारासाठी" होतं, स्वतःसाठी नव्हे. या मालिकांमधील सासू म्हणजे कुटुंबातील अनुशासन राखणाऱ्या स्त्रिया. परंतु हा शिस्तीचा बडगा बहुधा फक्त सूनांसाठीच असायचा. पुरुष पात्रांच्या त्रुटींवर फारसा प्रकाश कधीच टाकला जात नसे.
प्रो. मुंशी मान्य करतात की, मालिकेत काही प्रगतिशील बाबी होत्या, पण त्या इतक्या परंपरेच्या साच्यात गुंडाळल्या होत्या की एकत्र कुटुंब त्याचं केंद्रबिंदू बनतं आणि तेव्हा प्रेक्षक एकत्र बसून बघणाऱ्या काळात हे चालून जात होतं.
पण आज, आज OTT प्लॅटफॉर्म्स, वेगळी मतं, तुकड्यात विखुरलेली कुटुंबं आणि मोबाइल स्क्रीनवरच्या सवयी,अशा परिस्थितीत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ पुन्हा येणं हे एक सांस्कृतिक प्रयोग ठरू शकेल का? आज जेव्हा जग फेमिनिझम, सिंगल मदरहुड, LGBTQ+ अधिकार, डिजिटल इंडिपेंडन्स, अशा अनेक स्तरांवर बदलत आहे, तेव्हा तुलसीसारख्या व्यक्तिरेखेचं पुनरागमन नक्की काय दर्शवतं?






