- सबीहा खानम
8 जुलै 2025…
तुरुंगात माझ्या मुलाला उमर खालिदला भेटल्यानं माझ्या आत्म्याला नवीन शक्ती मिळाली आणि माझा संकल्प अधिक दृढ झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून उमरशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क होऊ शकला नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे व्हर्च्युअल भेटी शक्य नव्हत्या,असं मला कळालं.
माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती, कारण हा अर्धवट भेटण्याचा मार्ग हाच एकमेव आधार होता आणि आता तोही हिरावला गेला होता. माझं मन जड झालं होतं आणि अश्रूंचा पूर थांबायचं नाव घेत नव्हता. पण अचानक, देवाच्या दयेने माझ्या मनात प्रत्यक्ष भेटीचा विचार आला.
जेव्हा मी माझ्या पतींना विचारलं, तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं काम असल्याचं सांगितलं आणि सोबत येऊ शकत नसल्याबद्दल माफी मागितली. पण मी हार मानली नाही आणि एकटीने जेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या वयात जेलमध्ये प्रत्यक्ष भेटायला जाणं ही एक कठीण आणि थकवा आणणारी प्रक्रिया आहे. पण जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वरावर विश्वास ठेवते आणि आपल्या संकल्पावर ठाम राहते, तेव्हा सर्वात कठीण मार्गही सुलभ होतात.
आज, अनेक महिन्यांनंतर, मी माझ्या मुलाला प्रत्यक्ष भेटायला जात होते. माझ्या मनात एक आगळा उत्साह आणि भावनांचा पूर उसळला होता. याला प्रत्यक्ष भेट म्हणतात, पण तरीही ही एक विचित्र भेट आहे. दोन स्तरांची काच आपल्याला वेगळं करते. एका बाजूला आपण उभे असतो आणि दुसऱ्या बाजूला उमर. आम्ही एकमेकांना स्पर्श करू शकत नाही, किंवा स्पष्टपणे पाहूही शकत नाही. जास्तीत जास्त, काचेच्या पलीकडे त्याचा अस्पष्ट चेहरा दिसतो आणि आम्ही इंटरकॉमद्वारे बोलतो.
शुक्रवारी सकाळी 9 वाजता, मी घरातून निघाले. तिहार जेल जामिया नगरपासून बरंच दूर आहे आणि रस्ता नेहमीच गर्दीचा असतो. तिथे पोहोचायला सुमारे एक तास लागला. मी उमरसाठी चामड्याच्या चपला घेऊन गेले होते, पण तपासणी काउंटरवर कोणतेही जोडे आत नेण्याची परवानगी दिली गेली नाही. मी त्याच्या गरजेचं कारण सांगून विनंती केली, पण त्यांनी ऐकलं नाही आणि मला चपला बाहेर ठेवाव्या लागल्या.
आत, आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा होत्या. पुरुष, महिला आणि मुलं. आज नेहमीपेक्षा जास्त लोक आले असावेत असं वाटत होतं. मीही एका रांगेत उभी राहिले आणि माझ्या नंबर कधी येतो याची वाट पाहू लागले. माझ्या मागे, दोन महिला त्यांच्या प्रियजनांबद्दल बोलत होत्या. एकीने सांगितलं की तिचा मुलगा गेल्या एका वर्षापासून बलात्काराच्या खटल्यात जेलमध्ये आहे, तर दुसरीने सांगितलं की तिचा दीर आठ महिन्यांपासून त्याच गुन्ह्यासाठी आत आहे. मी शांतपणे ऐकत होते. मी विचार करू लागले की त्यांना कसं समजावं की माझा लाडका मुलगा कोणताही गुन्हा न करता गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगवास भोगतोय.
माझे विचारचक्र फिरायला लागले… मला आठवलं की उमरला दोनदा, प्रत्येकी सात दिवसांसाठी, त्याच्या बहिणीच्या आणि चुलत भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पॅरोल मिळाला होता. ते सात दिवस, जे आनंद, कुटुंब आणि मित्रांनी भरलेले होते, डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत जे निघून गेले. या आठवणीत हरवलेली असताना, सुमारे एका तासानंतर माझी वेळ आली, आणि मला आत जाण्याकरिता स्लिप मिळाली.
संबंधित लेख वाचा: 1) इतके सगळे कायदे आहेत, मात्र तरीही दलितविरोधी हिंसाचार का थांबत नाहीये? |
पण पुढे जाण्यापूर्वी, उमरच्या मासिक खर्चासाठी पैसे जमा करण्यासाठी मला दुसऱ्या आणखी लांब रांगेत उभं राहावं लागलं. मी उमरशी बोलण्यापेक्षा जास्त वेळ रांगेमध्ये घालवला. शेवटी, हे कामही पूर्ण झालं, आणि मी आतील परिसरात जाण्यासाठी रांगेत आले. सर्वप्रथम, माझ्या चपलांना एक्स-रे मशीनमधून जावं लागलं, त्यानंतर मला शारीरिक तपासणीला सामोरं जावं लागलं. या औपचारिकता पार पडल्यानंतर, मी गेटमधून आत गेले. तिथून, भेटीच्या ठिकाणी, जेल क्रमांक 2, पर्यंत पोहोचण्यासाठी15 मिनिटे पायी चालत जायचे होते.
भेटीच्या विभागात, एक महिला कर्मचारीने माझी स्लिप घेतली आणि मला आपुलकीने पाहिलं. “अरे, म्हणजे तुम्ही उमरच्या अम्मी! मी त्याच्या मित्रांना येताना पाहिलं आहे, पण तुम्हाला पहिल्यांदा भेटतेय,” तिने कनवाळूपणे सांगितलं. तिने मला रजिस्टरमध्ये अंगठ्याचा ठसा घ्यायला लावला आणि प्रतीक्षालयात नेलं, म्हणाली, “उमर आल्यावर आम्ही तुम्हाला बोलावू.” तिचा सूर सच्चा आणि आदरयुक्त होता.
मी तिच्या डोळ्यांत उमरबद्दलचा खरा आदर पाहिला. मला वाटलं की हे उमरच्या दयाळू वर्तन आणि नैतिक चारित्र्यामुळे असावं. जेलमध्ये, मग कैदी असो वा कर्मचारी, सहसा फक्त शिवीगाळ आणि कठोर शब्दच ऐकू येतात. अशा वातावरणात, चांगल्या वर्तनाचा कैदी एक कायमस्वरूपी छाप सोडतो. आणि उमर, त्याच्या खाजगी आयुष्यातही, त्याच्या विनम्रपणासाठी आणि मैत्रीपूर्ण स्वभावासाठी ओळखला जातो. तो क्वचितच रागावतो. मला जाणवलं की जेलमध्ये त्याला काही मिळालं नसलं तरी, त्याने आदर निश्चितपणे कमावला आहे.
आता जेलमधील प्रत्येकजण चांगलं जाणून आहे की उमर निर्दोष आहे, आणि तो सरकारी छळाचा बळी आहे. प्रतीक्षालयात पक्ष्यांचा किलबिलाट खूप गोड वाटत होता. शहरी जीवनात, आपण निसर्गाच्या या सूक्ष्म भेटींपासून इतके वंचित आहोत. जेलच्या भिंतींमधील मोकळेपणाने उडणारे पक्षी जणू घोषणा करत होते, “आम्ही इथेही स्वतंत्र आहोत.”
मी विचार केला की भिंतीच्या एका बाजूला आपण स्वतःला स्वतंत्र म्हणतो, तर दुसऱ्या बाजूला, उमर आणि असंख्य इतर, असहाय कैदेत आहेत. उमरसारख्या व्यक्तीसाठी, जो नेहमी विद्यापीठात आणि बाहेर विविध उपक्रमांमध्ये गुंतलेला असायचा, जो जंतर मंतरवर आपला आवाज बुलंद करायचा आणि न्याय हक्कांसाठी देशभर प्रवास करायचा, ही कैद अत्यंत कठीण आणि परीक्षा घेणारी आहे. आणि ही एक-दोन दिवसांची बाब नाही, पाच प्रदीर्घ वर्षं झाली आहेत.
जर त्याला वाचनाची आवड नसती, तर मला माहीत नाही की त्याने हा वेळ कसा काढला असता. या पाच वर्षांत, त्याने 300 हून अधिक पुस्तकं वाचली आहेत.
दरम्यान, लाउडस्पीकरवरून वारंवार आवाज येत होता, कदाचित कैद्यांना त्यांच्या कोठडीतून बोलावलं जात होतं. अचानक, मी उमर खालिदचं नाव ऐकलं, आणि मी भेटीच्या ठिकाणाकडे धावले. मी त्याला एका खिडकीतून पाहिलं. त्याने माझ्यासाठी आतल्या एका झाडावरून एक छोटंसं फूल आणलं होतं. ते साधं फूल माझ्यासाठी सर्वात मौल्यवान भेटीपेक्षा जास्त मूल्यवान होतं. काच आणि जाळीच्या मागे, आम्ही इंटरकॉमद्वारे बोलायला सुरुवात केली. “अम्मा, खूप वेळ लागला. मी खूप वेळ वाट पाहत होतो,” उमर म्हणाला. मी उत्तर दिलं, “हो, बेटा, रांगांमध्ये खूप वेळ गेला.”
त्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन विचारपूस केली. तो विशेषतः त्याच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल चिंतित होता आणि त्याने त्याच्या बहिणी आणि त्यांच्या मुलांबद्दल विचारलं. त्याने मला आतल्या आयुष्याबद्दल सांगितलं. मी, नेहमीप्रमाणे, त्याच्या आहार आणि प्रकृतीबद्दल चिंतित होते.
“तू ठीक आहेस? सध्या काय वाचतोयस? खूप उकाडा तर नाही ना?” मी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्याने संयमाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि सर्वांची खुशाली विचारत राहिला. त्याने सांगितलं की तो नियमितपणे वृत्तपत्रांमध्ये त्याच्या वडिलांच्या सार्वजनिक उपक्रमांबद्दल वाचतो.
“त्यांना सांगा की जास्त प्रवास करू नका, आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या,” तो म्हणाला.
आमचं बोलणं खूप कमी वेळचं वाटलं,आणि लवकरच निरोप घेण्याची वेळ आली. उमर वेगवेगळ्या खिडक्यांतून जात एक्झिट गेटजवळच्या खिडकीपर्यंत पोहोचला. मी मागे वळून पाहिलं, पण काच मला स्पष्टपणे पाहण्यापासून रोखत होती. कदाचित तो तिथे उभा मला जाताना पाहत होता. मी जड अंतःकरणाने आणि मंद पावलांनी बाहेर पडले.
पण जेलमधून परतताना माझं मस्तक ताठ होतं… मला अभिमान होता की माझा मुलगा कोणत्याही गुन्ह्यासाठी नाही, तर अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे आणि एका क्रूर राज्याच्या कठोर कायद्यांना आव्हान दिल्यामुळे जेलमध्ये आहे.त्याने आपल्या पूर्वजांचा वारसा पुन्हा जागवला आहे, ज्यांनी ब्रिटिश वसाहतवादी कायद्यांना आव्हान दिलं, तुरुंगवासाचा सामना केला, पण कधीही नमले नाहीत.माझ्या दृढनिश्चयी मुलाला भेटल्यानं माझ्या आत्म्याला नवीन शक्ती मिळाली.
यह रुतबा ए बुलंद मिला जिस को मिल गया
हर मुद्दई के वास्ते दार ओ रसन कहां
त्याचे बलिदान, त्याचा निर्धार, त्याचा संयम एक दिवस निश्चितच गौरवला जाईल. आणि हाच परिणाम त्या सर्व असहमतीच्या आवाजांच्या संघर्षांचा असेल, जे आज फक्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे तुरुंगात आहेत. माझं मन त्या सर्व मातांसोबत एकजूट आहे, ज्या आपल्या मुला-मुलींच्या या वियोगाला शांतपणे सहन करत आहेत. आणि जरी त्या दुख सहन करत असल्या, तरी मला खात्री आहे की त्यांनाही तोच अभिमान वाटतो जो मला वाटतो.
शेवटी, जेव्हा या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा आमची मुलं आणि मुली अशा लोकांमध्ये गणले जातील ज्यांनी अन्यायासमोर शांत राहण्याचा निर्णय घेतला नाही. मला खूप अभिमान वाटला जेव्हा मला समजलं की सातासमुद्रापलीकडे, जगाच्या दुसऱ्या भागात, झोहरान ममदानीसारखे लोक माझ्या मुलाबरोबर ठामपणे उभे आहेत. इथेही, अनेकांनी गेल्या वर्षांपासून आमच्या घरी पाठिंबा, एकोपा व्यक्त करण्यासाठी भेट दिली आहे. त्यात प्रकाश राज आणि स्वरा भास्कर यांसारखे प्रसिद्ध अभिनेते आणि अनेक वरिष्ठ कार्यकर्ते सामील होते.
एक दिवस, अनपेक्षितपणे, 2017 मध्ये हरियाणात मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या 17 वर्षीय जुनैदच्या आईनेही आमच्या घरी भेट दिली. उमर त्या आवाजांपैकी एक होता ज्याने अशा झुंडबळी आणि द्वेषाच्या राजकारणाला कडाडून विरोध केला होता. ती इतक्या अडचणी सहन करून, फक्त मला भेटण्यासाठी, माझं मनोबल वाढवण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आली होती.
माझ्याकडे त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीत. यामुळे मला विश्वास वाटतो की हा अंधाराचा काळ निघून जाईल, आणि शेवटी ते लोक जिंकतील जे प्रेम,एकोपा आणि न्यायाची भाषा बोलतात.
मराठी अनुवादः भरत यादव (साभारः आउटलुक)
(सबीहा खानम एक उद्योजक आहेत आणि नवी दिल्लीत असलेल्या जमात-ए-इस्लामी हिंदच्या सदस्या आहेत.)






