- प्रा. डॉ. निखिल राजवर्धन
आदिम जमातीच्या चित्रकारांच्या पॅलेट वरील पहिले रंग काळे, पांढरे होते. त्यापैकी काळा रंग अगोदर की पांढरा रंग अगोदर हे मात्र निश्चित सांगता येणार नाही.अनेक गुहाचित्रे त्याने कोळशाने रंगविले. काळा, पांढरा आणि तांबडा ही त्याची विकसित पॅलेट होय. पर्शियन ब्राऊन, ट्रान्सपरंट ऑक्साईड ब्राऊन, इंडियन रेड, ब्रंन्ट सिएना, रॉ अंबर, ब्रंन्ट अंबर, यलोऑकर, अल्ट्रामरीन ब्लू, ऑरेंज, सॅप ग्रीन इत्यादी गडद कांती रंगवण्यासाठी पॅलेट पुढे अधिक विकसित होत गेली.
मानवाची अभिभाववृत्ति काळ्या रंगासोबत साहचर्य करते. काळ्या अवकाशाभोवती मानवी विश्व फिरते. रंग हे प्रकाशाची घटना आहे तर प्रकाशाचा अभाव म्हणजे काळा. अंधार हा सार्वभौम आहे. लोलकाद्वारे काळा रंग द्रगोचर होत नाही. प्रकाशाच्या प्रतिबिंबातून काळा रंग वगळता इतर रंग दृश्यमान होतात. त्यामुळे काळा रंग आहे का? असा प्रश्न उद्भवणे अगदी सहाजिक आहे. इंद्रधनुष्यात तो नाही पण इंद्रधनुष्य ज्यावर दृश्यमान होते क्षणैक त्याच्या पार्श्वभूमीला कुठेतरी हा काळा रंग निदर्शनास येतो.
रंग पाहण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. काळा प्रकाशाच्या अभावात दिसतो. काळा म्हणजे प्रकाशाचा अभाव असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. काळा निसर्गात कोणत्याही प्रकाशाच्या अभावी अस्तित्वात असू शकतो. प्रत्येक रंग मोजता येतो पण काळा रंग मोजता येत नाही. प्रकाशाच्या अभावात दिसणारा काळा आणि प्रकाशात दिसणारा काळा रंग पाहण्याची स्थिती वेगळी असली तरी परिणाम सारखा आहे पण प्रकाशात काळा रंग कधी दिसतो? अगदी सर्व प्रकाश किरण वस्तुकडून आपल्याकडे परावर्तित होत असतील तेव्हा पांढरा प्रकाशाचा रंग दिसतो. तसे अगदी सर्व प्रकाश किरण वस्तुकडून शोषून घेतले की काळा रंग दिसतो.
खरे तर काळ्या रंगाला अवार्णिक (Archromatic) रंग अशी विशेष संज्ञा आहे. दृश्यतः तो जड आहे पण बोजड नाही. काळ्या रंगाच्या वजनदार उठावामुळे आकार अधिकाधिक घनभासतात काळया रंगाचे चारित्र्य,ठळक,गडद, गुढ आणि गहिरे राहिले आहे. हे त्याचे नैसर्गिक मूल्य होय. तो घन असूनही आक्रमक नाही. गजराजाप्रमाणे विशाल आणि ताकद असून विनम्र आहे. काळ्या रंगावर पडणाऱ्या प्रकाशाने त्यातील सौम्य आकर्षकता दृगोचर होते. काळे रंगद्रव्य बनवण्यासाठी लेड ऑक्साईडचा उपयोग केला जातो. प्राकृतिक काळा रंग हस्तिदंत जाळून आयव्हेरी ब्लॅक किंवा दिव्याच्या काजळीपासून अथवा कोळशापासून काळा बनवला जातो.
शब्दकोशात आणि व्यवहारात काळा या शब्दापासून बनलेले अनेक अर्थ, शब्द बहुदा नकारात्मक आहेत. काळ्या शब्दापासून काळाजहर, काळाकरंद असे अनेक शब्द येतात, काळा शोक आणि दुःखाचा रंग? 'काळा'च्या चेतनेतून प्रकट होणारे मानवी भावनेला जोडला जाणारा आशय भिन्नभिन्न असू शकतो ,काळ्या रंगाच्या दृकसंवेदनेचा अर्थ कोणी लावला? त्याचा निकष कोणता? काळा म्हणजे वाईट, कृद्य, नकारात्मक हे कोणी ठरवले? न्यूटन(1643-1727), शेवरूल (1786-1889) यांनी रंगावर भाष्य केले पण काळ्या रंगावर फारसे भाष्य केल्याचे निदर्शनास येत नाही अथवा स्पष्टपणे प्रतिपादिले नाहीत.
यात अधिक स्पष्टता येणे अपेक्षित आहे. अमुक एका रंगाविषयीचा अर्थ प्रतिपादताना अमुक एक 'असा'च अर्थ आहे, असे म्हणणे निश्चित धाडसाचे ठरते. मात्र अमुक एका रंगाच्या अनेक अर्थछटा निश्चित सांगता येतील. अशा अनिश्चित अर्थछटांचा आधार घेऊन चित्रकार वास्तविक भावना अभिव्यक्ती करतो. प्रकीर्ण (विखुरलेल्या) असलेल्या अर्थछटेतून संकीर्ण (संमिश्र) अर्थ बहुदा चित्रात आणतो. अनेक अर्थासवे काळ्या रंगाच्या नावे विविध अर्थछटा आहेत.
इतिहासाच्या पुनरावृत्तीत, पुराणातील कथेत, चित्रपटात, पुस्तके- कथा, कादंबरीत, प्रिंट मीडिया, जाहिरात अथवा टेलिव्हिजन यांद्वारे बहुदा सकारात्मक, सोज्वळ चांगले असणारे व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी गोऱ्या कांतीची, पांढऱ्या रंगांची व्यक्ती आणि वाईट माणूस काळ्या रंगात दृष्टांत देतो. हे अगदी लहानपणापासून बिंबविले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून वैदिक, ग्रीक इत्यादींमध्ये काळ्या रंगाचे नकारात्मक अर्थ प्रचाररत आहेत, मात्र प्राचीन इजिप्त मध्ये रंगाचे संरक्षणआणि सृजनक्षमतेचा सकारात्मक अर्थ होता. काळा रंग कधीच कोणत्या रंगात संमिश्र होत नाही, तो वाईट, नकारात्मक म्हणताना संभवतः धर्मसंस्थेची चिकित्सा अपुरी पडते.
संबंधित लेख वाचा: 1) ‘’मला काळा रंग आवडतो, मला माझ्या रंगाचा अभिमान आहे.’’ |
ज्ञानार्जनाचा आरंभ करताना काळ्याकुट्ट पाटीवर गिरवलेली पहिली- वहिली अक्षरे, ती अनुभूती आजन्म सुस्मरणात राहते.काळ्या फळ्यावर विद्यार्थ्यांचे भविष्य रेखाटले जाते, तो हाच काळा रंग आहे! पांढऱ्या कागदावर मुद्रित केलेली काळी विशद अक्षरे नितांत सुंदर वाटतात. मातेच्या गर्भात बाळ नऊ महिने वाढत असते, तेव्हा तेथील काळोख हाच त्याचा सोबती असतो. तो जेव्हा गर्भातून बाहेरच्या जगात येतो, त्यावेळी त्याचा संबंध प्रकाशाशी येतो. काळ्या रंगात चित्र निर्मिती करणारे चित्रकार चंद्रकांत चन्ने (1949-) म्हणतात... काळ्या रंगाचे आकर्षण अगदी सुरुवातीपासून आहे आणि काळा माझा स्थायीभाव आहे. या रंगाचा संबंध आईच्या उदराशी आहे. आपण काळ्यातून येतो आणि काळ्यात सामावून जातो. काळ्या रंगाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि म्हणून माझी चित्रे ही काळा साज लेवून येतात.
जगात बहुदा सर्व भाषांमध्ये काळ्या रंगाला कमालीचे कमी लेखले गेले, हे कितपत योग्य आहे? काळ्या रंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. तो का नकारात्मक आहे? शामली अशुभ का आहे? हा प्रश्न संभवतः कोणाला पडत नाही. अनेकांना हे स्पष्ट होत नाही की नकारात्मक आणि सकारात्मक कसा? कथितरीत्या दृष्ट लागू नये, बाधा होऊ नये, म्हणून काळा टीका किंवा काळी बाहुली बांधली जाते आणि त्यामुळे दृष्ट किंवा बाधा होत नसेल तर तो काळा रंग वाईट कसा? पांढऱ्या किंवा गोऱ्या रंगाला दृष्ट लागत असेल बाधा होत असेल तर तो चांगला कसा? अगदी साधा तर्क आहे. आधुनिक दृकप्रत्ययवादा(1874) सारखी एखादी कला चळवळ काळ्यारंगाचा निषेध करते. किंबहुना सृष्टीत त्यांना काळा रंग कुठेही दृगोचर होत नाही. आजही जलरंगात काळा आणि पांढऱ्या रंगाचा वापर केला जात नाही.
ग्रामीण भागात जमिनीला काळी म्हणतात. काळीज, हृदय, अंतःकरण, ब्लॅक ब्युटी हे काही चांगले शब्द प्रयोग आहेत. त्यातही ब्लॅक ब्युटी हे थोडे चेष्टापूर्वक वाटते. ब्लॅक असूनही ब्युटी कशी? क्वचित अपवाद, एखाद्याच्या स्वभावातला ग्रे शेड जरा जास्तच डार्क आहे. तो डार्क म्हणजे पुन्हा वाईट आणि पांढरा रंग म्हणजे शांतीचा. अगदी दाक्षिणात्य किंवा आफ्रिकन सगळी काळी माणसे मग वाईटच का? त्यांच्यात सोज्वळ, सात्विक, शांतीची छटा नाही का? सौंदर्य हे गोरा रंग, गुलाबी ओठ, घारे डोळे यातच वसते असे नाही. चित्रपट अभिनेत्री मधुबालाच्या(1933-69) नैसर्गिक सौंदर्याला शामल रंगाने अवघ्या समाजाला भुरळ घातली होती. 
तिची मोहिनी आजही कायम आहे. तिचे नितळ सौंदर्य, काळेभोर केस, काळेशार डोळे, कमानदार भुवया, तरुण शरीर सौष्ठवाचा वर्ण अशा काळ्या सौंदर्यातून तितकीच किंबहुना काकणभर अधिक सुंदर दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891-1956) चित्रकारही होते, ते अजिंठ्याच्या 'शामली' काळ्याराणीवर इतके भाळले की मी जर अविवाहित असतो तर हिच्याशीच लग्न लावले असते, असे तिला पाहून म्हणाले. यात कोणत्याही किमतीवर कलेवर किती जीव ओवाळून टाकावा, हे सांगणारे त्यांचे कलाप्रेमी मन स्पष्ट होते.
सोबतच काळ्या रंगाचे अभिसौंदर्य विशद करणारे त्यांचे विधान होते. अजिंठा, बाघ, सित्तनवासल, बदामी येथील लेण्याचित्रात अनेक स्त्री-पुरुषांच्या कांती गडद रंगात रंगवलेल्या आहेत, प्रेम, करुणा, वात्सल्य, अहिंसा, शालिनता, विनय, उपासना, आनंद, सौंदर्य, पावित्र्य, मैत्रीभाव केवळ अंत:करणाला भिडतात. स्त्री रूप आदर्श रूप दाखवले आहे. त्या शारीरिक आकर्षणाच्या केंद्रस्थानी नाहीत, चित्रात अर्धनग्न असूनही शालीन, निरागस वाटतात. चित्रकारांचे कसब केवळ कल्पनेच्या पलीकडचे आहेत.
काळ्या रंगातून येणारे लावण्या रेषेच्या जाड, नाजूक, सुडौल सौष्ठातून अभिव्यक्त होते. स्थिमितता, करूण, शांतता, निश्चल संवेदना तसेच तारुण्य, कमनियता, संघर्ष हे काळ्या रंगात अभिव्यक्त होते.काळ्या रंगांमध्ये व्यक्तिचित्र रंगवताना टिंट, टोन आणि शेडचा अचूकपणा शोधणे, त्याचे रंग मिश्रण करून लावताना चित्रकाराला आपले कसब पणाला लावावे लागतात.
क्वचित चित्रकारांना काळ्यारंगावर आपली हुकूमत मिळवता येते. चित्रकार जे. पी. सिंघल(1934-), चंद्रकांत चन्ने (1949-), पिअर सुलाज (1919-2021), दत्ता बनसोडे (1969-2017), गणेश तरतरे (1967-), सौरभ कनावजे आणि उमाकांत कानडे(1965-) यांची काळ्या रंगातील चित्रे अप्रतिम सौंदर्याने बहरलेली आहेत. उपरोक्त चित्रकार काळ्या रंगाशी तादाम्य पावलेली आहेत. त्यांनी हृदयाच्या अभ्यंतरातून चित्रे रंगवलेली आहेत.
दुःख, व्याकुळता, विरह इत्यादी अभिभावनांचा समग्राशय काळ्यारंगातून अनुरागीला जातो. अवकाशातील अनेक रंगांना काळी रेषा आकार देते, अर्थ देते. एखाद्या वर्णाला, रंगाला अर्थ, सौंदर्य देण्याचे सामर्थ्य काळया रंगात आहे. हुसेन (1915-2011), रझा (1922-2016) यांच्या चित्रात हे सौंदर्य अनुभवण्यास मिळते. काळ्या रंगातून विरह, व्याकुळता, शोकाची प्रतिती येते. खरे तर विरह, व्याकुळता या फार सुंदर जाणीवा आहेत.
या अतिव जाणीवेतून प्रेमाचा सच्चेपणा जाणवतो. प्रेमासारखी अप्रतिम नितांत नितळ, सुंदर सुहृद्य अभिभावनेची जाणीव होण्यासाठी काळा रंग उपयोगात येतो तर काळा रंग कृद्य कसा? वास्तविक जीवनातील प्रतिकूल परिस्थिती चित्रावकाशात काळ्या रंगाने रंगवली तर ती वाईट कशी? प्रत्यक्ष जीवनात प्रतिकूल परिस्थिती प्रेमाची आणि द्वेशाची जाणीव करून देते,आपले आणि परके यातील सीमा रेषा अधिक ठळक करते. मुळात काळ्या रंगाचा दृकप्रत्याय चांगला किंवा वाईट नसतो तर तो ज्या ठिकाणी ज्या आशयी वापरला जातो त्यावर त्याचे प्रतिकात्मक सौंदर्यमूल्य ठरते.
मानसशास्त्राच्या संशोधनानुसार ज्यांना काळा रंग किंवा काळे कपडे घालायला आवडतात ते महत्त्वकांक्षी, संवेदनशील असतात. त्यांची प्रत्येक कृती अर्थपूर्ण असते. अमेरिकेतील निग्रोंनी 'निग्रो' संबोधून घेण्यापेक्षा स्वतःला 'ब्लॅक' म्हणवून घेतले. त्यांच्या महत्त्वकांक्षेने पुढे 1966 मध्ये ब्लॅक पॅंथर चळवळ उभी राहिली. या ब्लॅक मागचा आशय मानव मुक्तीचा आहे, अस्मितेचा आहे. ही त्यांच्यासाठी सर्वांग सुंदर गोष्ट होय. खरे तर काळा रंग ही त्यांची वेदना आहे.
त्या वेदना, विद्रोहावर त्यांनी अपार प्रेम केले. हूआन डे परेजा (1606-1970) हा काळा स्पॅनिश चित्रकार होता. बरोक (16 ते 17 वे शतक) कालीन डिएगो व्हेलाझक्वज(1599-1660) या चित्रकाराचा गुलाम होता. गेरार्ड सेकोटो(1913-1993) ब्लॅक आर्ट आणि सामाजिक वास्तववादाचा प्रणेता होता. बेन ऐनओनोऊ (1917-1994) हा नायजेरियन काळा चित्रकार आणि शिल्पकार होता, जो विसाव्या शतकातील प्रभावशालींपैकी एक होता. हेन्री ओसावा टॅनर(1859-1937) हे अमेरिकन कलाकार आणि आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवणारे आफ्रिकन अमेरिकन चित्रकार होते, जे दृकप्रत्यावाद(1874) प्रतीक वाद(1885) अमेरिकन वास्तववादाशी(1900) संबंधित होते. बार्कले एल. हॅन्ड्रिक्स (1945-2017) हे समकालीन अमेरिकन चित्रकार, यांनी ब्लॅक पोर्ट्रेट आणि रचनात्मक चित्रांसाठी अग्रगण्य योगदान दिले. 
सार्जंट क्लाड जॉन्सन (1888-1937) यांची व्यक्तिचित्रणे विशेष प्रख्यात आहेत. ही काही ब्लॅक चित्रकार आहेत ज्यांच्या कुंचल्यातून काळा रंग बोलका झाला. निग्रोंच्या जाणिवा 'काळा' रंगातून प्रगल्भ होतात आणि मानव केंद्रित सौंदर्यतत्त्वज्ञान देतात. काळ्या रंगाचा अन्वयार्थ लावणे वास्तविक सोपे नाही पण अर्थ उमगत नाही असेही नाही. निग्रोंचे सौंदर्य वेदनेवर आधारलेले आहे, त्यामुळे काळ्यांचे सौंदर्य वेगळे ठरते. तद्वतच काळ्या रंगाचे सौंदर्य रंग म्हणून आहे, त्यापेक्षा तो जिथे योजिला आहे, तिथे त्याचा आशय विशेष सुंदर आहे. मुळात कोणताही रंग असुंदर-अशुभ, वाईट नाही, त्या प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
ओशो (1931-90) म्हणतात 'प्रकाशात तुम्ही एकटे राहणे कठीण आहे. कारण कोणी ना कोणी तुम्हाला दिसते, काही ना काही दिसते मग तेव्हा प्रकाशात एकांत कुठे आहे? अंधारात आपण एकटे असू शकतो, त्याला अर्थ आहे. स्वतःच्या घरातही एकटे असू शकतो मग अंधाराची (काळ्या रंगाची) भीती का? एकटे असणे नवीन नाही, भर बाजारातही आपण एकटे असू, मुलाबाळांतही एकटे असू, पत्नीसोबत असतानाही एकटे असू, अगदी जिवलग मित्र- मैत्रिणी सोबतही एकटे असू, त्यावेळी प्रकाश असल्याने किती फरक पडतो? शेवटी एकटेच आहोत ना? प्रकाश असूनही अंधारच आहे, मग अंधाराची अनुभूती घ्यायला शिकलो, अंधार वाचू लागलो तर तिथेही हलका प्रकाश जाणवू लागेल. हा अंधार खोल, गहरी शांती देईल, आनंद देईल, अंतःकरणातील भीती अंधारात विरून जाईल, हा एकांत स्वतःला शोधण्यास सहाय्य ठरेल, स्वतःला स्वतःची प्रचिती करून देईल, प्रकाशाची जाणीव अंधारामुळेच होते, प्रकाशाचे अस्तित्व अंधारामुळे आहे'.
डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटल्यानंतर सर्वत्र काळाशार अंधार पसरलेला जाणवतो, या शार अंधारात एकाग्र ध्यानाची समाधी लागते समाधीतून स्वतःचा नवजन्म होतो. या जन्मात आपण स्वतःला ओळखलेले असते. स्वतःचे स्वतःशी मिलन होते. इथे- तिथे भिरभिरणारी चंचल नजर निश्चल, विनम्र होते. कसलेही भय नाही, अगदी सुरक्षित निर्धारस्त प्राज्ञ अभ्युदित होते. ही या साधनेची सचेतना अभ्यंतरातून परिवर्तन घडवते, त्यामुळे संपूर्ण मनाच्या अणु- रेणूंवर सम्यक संस्कार घडवते. आता देहाला स्पर्श करणारी सौम्य हवा जाणवते, पक्षांचे किलबिल त्यांची बोली अधिक सुमधुर जाणवते, निसर्ग कधी नव्हे इतका सुसंवाद साधतो. श्वासाला आणि विचाराला जणू एक लय मिळून जाते.
सुहृदयाच्या अभ्यांतरात मनुष्य- प्राणी मात्रांप्रती केवळ आणि केवळ प्रेमाचा, कारूण्याचा अनुराग सर्जीत होतो. अंधाराच्या संयुतीने एका अर्थाने स्वयं प्रकाशित झालेल्या अभिजात सौंदर्यबुद्धाची प्रतिती अनुभवली जाते. अगदी स्वयंप्रकाशित अप्पो दिपो भव! काळा रंग सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम साधू शकते काळ्या रंगाला कितीही सकारात्मक पाहिले तरी उपरोक्त ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तवच काळ्या रंगाची जमेची बाजू होय. काळ्या रंगात शुद्धतेचा भाव आहे. तो सर्वत्र आर्पियला आहे, म्हणून ज्ञानेश्वर माऊली (1275-96) म्हणतात…
मनमुरडोनी डोळा लेइले |
काळेपण मिरविले रूप त्याचे
बरवे रूप काळे अमोलिक |
म्हणोनिया सांगतसे शुद्ध भावे |
रुखुमादेविवरु अगाध काळे |
म्हणोनि सर्वत्र आर्पियले…
(प्रा. डॉ. निखिल मा. राजवर्धन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ललित कला विभागात कला अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत.)






