सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या अनेकांनी या महामानवाच्या आठवणींचे जतन करून ठेवले आहे. महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नुसतं एकदा पाहिलेली, अनेकदा पाहिलेली, त्यांचा थोडा तरी सहवास लाभलेली माणसं हळूहळू आता दुर्मीळ होत चाललेली आहेत. या लेखात ‘बाईमाणूस’ने बाबासाहेबांच्या अशा अनेक आठवणींचा खजिना समोर आणला आहे.
‘’पण ही गाडी मी विकणार नाही, कारण त्यात बाबासाहेब बसले होते…’’
बाबासाहेब आंबेडकरांचे आताच्या छ. संभाजी नगर आणि पूर्वीच्या औरंगबाद शहराशी एक खास जिव्हाळ्याचे नाते होते. याच शहरातील एक आठवण सांगतात 91 वर्षांचे लालासिंग चौहान… फक्त 12 मिनिटांसाठी लालसंग यांनी बाबासाहेबांच्या गाडीचे सारथ्य केले होते आणि ती 12 मिनिटे लालसिंग यांना आयुष्यभर पुरली.
‘’आज मी 91 वर्षांचा आहे, पण आजही तो दिवस अगदी लख्खपणे सेकंद ना सेकंद आठवतो. मी 19 वर्षांचा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पीपल्स इंजिनिअरिंग कॉलेज ते जुना बाजार घेऊन जाण्याची जबाबदारी मला मिळाली होती. उंची कमी असल्याने ड्रायव्हिंग सीटवर दोन उशा ठेवून मी बसलो. बाबासाहेबांनी मला विचारले, ‘बाळा, तू एवढा लहान आहेस, गाडी तू चालवणार का?’ मी फक्त ‘हो’ असे उत्तर दिले. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव दिसत होते. एकूणच ते माझ्या गाडीत बसले, हाच मला त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे’’ हे सांगताना लालासिंग चौहान यांच्या अंगावर शहारे आलेले होते. वयाच्या 91व्या वर्षीही ते बाबासाहेबांसोबतच्या त्या अवघ्या 12 मिनिटांची आठवण उत्साहाने अन् अशा रीतीने सांगत होते की, तो संपूर्ण प्रसंग ऐकणाऱ्याच्या डोळ्यांपुढे उभा राहील.
संबंधित लेख वाचा: 1) मुर्तीकार राम सुतार यांनी तयार केलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यात अनेक दोष… डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट |
लालासिंग यांच्या निवासस्थानी बाबासाहेब ज्या गाडीत बसले होते ती 1929 सालची गाडी आजही अतिशय दिमाखात उभी होती. गाडी मोठया दिमाखात दिसते. बाबासाहेबांना बसवलेली फोर्ड गाडी अन् तिची अनेक वैशिष्ट्ये लालसिंग सांगतात. अगदी 196 वर्षांच्या या गाडीची चाके आता मिळत नाहीत, पण असलेली चाके खराब होऊ नयेत म्हणून लालासिंग यांनी गाडीला जॅक लावून उभे केले होते. गाडीचा प्रत्येक पार्ट ओरिजनल आहे याची खात्री कशी करता येईल हेदेखील ते उत्साहाने बोनेट उघडून सांगत होते.
बाबासाहेबांच्या ‘त्या’ भेटीबद्दल विचारल्यावर लालासिंग म्हणाले, मी फक्त 19 वर्षांचा होतो. आजच्यासारखी वेगवान माध्यमे तेव्हा नव्हती, पण बाबासाहेबांनी घटना लिहिली आहे अन् सामाजिक समता स्थापित केली आहे याची पूर्ण माहिती मला होती. एवढा मोठा प्रज्ञावान व्यक्ती माझ्या गाडीत बसणार ही बाब माझ्यासाठी गौरवाच्या क्षणाची अनुभूती देणारी होती. पीईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात मी गाडी घेऊन थांबलो. काही क्षणांतच बाबासाहेब आले. अतिशय भव्य आणि तेजस्वी दिसणाऱ्या बाबासाहेबांनी नेव्ही ब्लू रंगाचे ब्लेझर घातले होते. मी गाडीचे दार उघडले अन् ते गाडीमध्ये बसले.
मी त्यांच्यापुढे ‘बच्चा’ दिसत असल्याने त्यांनी मला ‘बाळा, तू गाडी चालवणार का? असे विचारले होते. पाणचक्की, ज्युबिली पार्कमार्गे आम्ही जुना बाजारात गेलो. ते क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहेत. तेव्हा या शहरात फक्त 3 चारचाकी गाड्या होत्या. त्यापैकी एक माझी ही फोर्ड गाडी होती. ओपन गाडी तेव्हा फक्त सिनेमात पाहायला मिळायची.
ही गाडी माझे वडील संग्रामसिंग यांनी 400 रुपयांमध्ये मुंबईतून आणली होती. आजच्या काळात व्हिंटेज कार म्हणून हिच्याकडे पाहिले जाते. ५० लाखांहून अधिक किमतीत मला ही गाडी मागितली गेली आहे, पण मी ही गाडी कधीच विकणार नाही. कारण ती बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आहे. ही गाडी प्रज्ञासूर्याच्या मंदिरापेक्षा कमी नाही.
मुरबाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खुर्चीरूपी आठवण जपली
अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवन काळात अनेक घटना प्रसंगांना सामोरे जात अस्पृश्यतेला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला. अशाच एका सामोपचाराच्या प्रसंगात डॉ. आंबेडकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ज्या खुर्चीवर बसून वाद मिटवला होता. ती खुर्ची येथील भराडे कुटुंबीयांनी अजूनही जपून ठेवली आहे. लेखक आणि इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांच्या संशोधनात ही नुकतीच समोर आली. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील डॉ. आंबेडकरांच्या आठवणी टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाबाई यांचे वडील मेजर धर्मा सुभेदार आणि त्यांचे सहा भाऊ हे सहाव्या फलटणीत सुभेदार होते. धर्मा सुभेदार यांना चार मुले व दोन मुली होत्या. त्यापैकी धाकटी मुलगी भीमाबाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माता होय. त्यांचे माहेरचे आडनाव मुरबाडकर पंडित होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा देदीप्यमान इतिहास मुरबाड तालुक्याला लाभला आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मे 1941 रोजी सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारे अनंत धोंडू भराडे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट दिली होती. तेव्हा गोविंद बाळू थोरात यांच्याही अंगणात ते आले होते. भाऊराव कृष्णराव तथा दादासाहेब गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.
दिनांक 19 मे 1941 रोजी गावाच्या मध्यभागी असलेली फौजदारांची किंवा गायकरांची विहीर असलेल्या जागेत पाणी भरण्यावरून वाद झाला होता. हा वाद विकोपास जाऊ नये म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुरबाडला येऊन सामोपचाराने हा वाद मिटवला. हा संपूर्ण इतिहास माता भिमाई पुस्तकाचे लेखक, इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांनी त्यांच्या मुरबाड इतिहास व संदर्भ या ग्रंथात संकलित केला आहे.
ज्या खुर्चीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते. ती ऐतिहासिक खुर्ची आजही कौशिक अनंत भराडे आणि भराडे कुटुंबीय यांनी स्मृती रुपाने जतन केली आहे. महामानवाच्या मुरबाड मधील आगमनाच्या आठवणीही लाकडी खुर्ची जागवत आहे. या सर्व आठवणींचा संग्रह आणि जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे बांगर यांनी व्यक्त केली आहे.
‘’कौतुकाची थाप आयुष्यभर पुरली’’
महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नुसतं एकदा पाहिलेली, अनेकदा पाहिलेली, त्यांचा थोडा तरी सहवास लाभलेली माणसं हळूहळू आता दुर्मीळ होत चाललेली आहेत. 'मिलिंद'मध्ये शिपाई राहिलेले शिवराम जाधव व बाबासाहेबांची दाढी, कटिंग करून शाबासकी मिळवलेले बाबूलाल गारोल, मिलिंद मैदानाची त्याकाळी देखभाल करणारे रज्जाक आपल्यात नाहीत.
छ. संभाजी नगर येथील 'मिलिंद महाविद्यालया'च्या बांधकामाच्या वेळी सुतारकीची कामे करणारे कचरुबाबा कुंजाळे आज वयाच्या 107 व्या वर्षी ढिंबर गल्लीत आजारी अवस्थेत आहेत. या सर्व मंडळींनी बाबासाहेबांना पाहिले होते. ज्या टेबलावर बाबासाहेब जेवले होते, तो टेबल शिवराम जाधव यांनी सांभाळून ठेवलेला. दाढी, कटिंग चांगली केली म्हणून बक्षिसापोटी दिलेले दहा रुपये गारोल यांनी सांभाळून ठेवलेले. आता ही सारी माणसं काळाच्या पडद्याआड गेली. बोटावर मोजता येतील, अशी काही माणसांशी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संवाद साधण्याचा केलेला हा प्रयत्न......
‘’बाबासाहेब इंग्रजीतून विचारतील, या भीतीने मी बाबासाहेबांपुढे जात नसे’’
आंबेडकर घराण्याचा व वराळे घराण्याचा ऋणानुबंध होता. बळवंतराव वराळे हे माझे मामा. त्यामुळे बाबासाहेबांना पाहण्याचा मला योग आला. पुढे मिलिंद महाविद्यालयात शिकायला आल्यानंतर जेव्हा बाबासाहेब औरंगाबादला येत, तेव्हा मला त्यांना पाहण्याचा योग आला; परंतु मला इंग्रजी चांगले येत नव्हते, म्हणून मी त्यांच्यापुढे जाऊ शकत नव्हतो. कानडी ही माझी मातृभाषा. औरंगाबादला आल्यानंतर मला भाषेची अडचण जाणवू लागली. बाबासाहेब इंग्रजीतून काही विचारतील, या भीतीने मी बाबासाहेबांपुढे जात नसे.
धारवाडला एकदा मातोश्री रमाई यांनी मला उचलून घेतले. माझ्या आईला उद्देशून म्हणाल्या, 'तुझा मुलगा काळा आहे, पण गुटगुटीत आहे.' 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. 'युगयात्रा' नाटकाच्या प्रयोगासाठी नाट्यकलावंत म्हणून मी वराळे कुटुंबीयांसमवेत नागपूरला गेलो होतो. धम्मदीक्षेचा तो ऐतिहासिक सोहळा पाहिला. बाबासाहेबांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. ते दृष्य आजही माझ्या मनःचक्षूसमोर जसेच्या तसे उभे राहते. बाबासाहेबांचे हे शेवटचेच दर्शन होते.
‘मिलिंद’मध्ये बाबासाहेबांची खुर्ची रोज मी आणून ठेवायचो’’
वयाच्या पंधराव्या वर्षी मला मिलिंद कॅम्पसमध्ये नोकरी लागली होती. बाबासाहेब कधी मुंबईहून तर कधी दिल्लीहून औरंगाबादला 'मिलिंद'चे बांधकाम पाहण्यासाठी यायचे. सकाळी ते आरामखुर्चीत बसायचे. सोबत माईसाहेबही असायच्या. रुंजाजी भारसाकळे यांच्या खोलीतून बाबासाहेबांची खुर्ची आणून ठेवली जात असे. बाबाबाहेबांची बसण्याची व्यवस्था म. भि. चिटणीस करायचे, तिथे खुर्ची नेऊन ठेवण्याचं काम मी करीत असे.
आजही 'मिलिंद'च्या वस्तूसंग्रहालयात ही खुर्ची आहे. मला हे काम खूप विशेष वाटत होते. त्यांच्याजवळ उभे राहण्याची मला संधी मिळत होती. 1955 नंतर माझी बाबासाहेबांची भेट झाली नाही; मात्र पुढे तिथेच काम करण्याची संधी मिळाली. आज मी 82 वर्षांचा आहे. बाबासाहेबांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत, त्या सर्वांसोबत 'शेअर' करीत असतो.
‘’माझं शिकवणं पाहून बाबासाहेब उद्गारले, अरे हा तर पंतोजीसारखा शिकवतोय’’
बाबासाहेब जाण्यापूर्वीची ही गोष्ट आहे. मी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होतो. टीचर्स डे होता. मुलंच शिक्षक बनून वर्गावर जाऊन शिकवीत असत. मी ज्या वर्गात शिकत होतो, त्याच वर्गावर मी गणिताचा शिक्षक म्हणून शिकवीत होतो. मी शिकविण्यात मग्न होतो आणि व्हीलचेअरवर बाबासाहेब वर्गात आले.
माझं शिकवणं पाहून बाबासाहेब उद्गारले, अरे हा तर पंतोजीसारखा शिकवतोय. वर्गातून बाबासाहेब गेल्यानंतर माझ्या वर्गमित्रांनी माझं अभिनंदन करीत सांगितलं, हा तर पंतोजीसारखा शिकवतोय, असं बाबासाहेब म्हणत होते. तुझं कौतुक करीत होते. बाबासाहेबांनी त्याकाळी दिलेली ही कौतुकाची थाप मला आयुष्यभर पुरली. पुढे मी गणिताचा शिक्षक म्हणूनच मी नावारूपास आलो. गणित हा माझ्या आवडीचा विषय राहिला. सामाजिक कार्यात बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान राहिले.






