- संजीव बावस्कर
महाराष्ट्र अनेक लोककलांनी समृद्ध आहे. महाराष्ट्रात अनेक लोकपरंपरा, सण, उत्सव हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. हे उत्सव साजरे करण्याचा उद्देश म्हणजे लोकांनी बंधुता जपावी, एकोप्याने राहावे, मतभेद मिटावे हा तर आहेच, पण आपल्या रूढीपरंपरांच्या माध्यमातून आपला इतिहास जपावा हा आहे. या सर्व लोककला परंपरा निसर्गाशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यातून निसर्गाची पूजा तर होतेच परंतु आपला इतिहासही जपला जातो. म्हणून मौखिक असलेल्या या परंपरा, लोकगीते सांभाळून येणाऱ्या पिढीपर्यंत हा वारसा सुपूर्द करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
शिक्षणामुळे शिकून संपन्न झालेली प्रत्येक पिढी गाव सोडून शहराकडे स्थलांतर करीत आहे. त्यामुळे अनेक लोककला, लोकगीते, परंपरा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. काहींचे स्वरूप बदलत चालले आहे. येणाऱ्या काळात या परंपरा, सण, उत्सव, लोककला टिकून राहतील की नाही याची शंका वाटत आहे. आज प्रत्येक सण उत्सव पारंपारिक न राहता केवळ जल्लोष बनू पाहतोय. ही चिंतेची बाब आहे.आपल्या प्रत्येक सण उत्सवामागे एक सुंदर इतिहास लपलेला आहे. त्याचा उद्देश समजून त्यामागील उदात्त मानवी भावनांचा आदर करणे, आपले कर्तव्य नाही काय ? असाच एक ऐतिहासिक व सामाजिक मानवी मूल्यांची रुपेरी किनार लाभलेला खान्देश मराठवाड्यातील सण म्हणजे भुंजेरिया!
कोण आहे हा गढरी धनगर समाज?
उत्तर भारतातून खान्देश व मराठवाडा सीमेवर स्थिरावलेला गढरी धनगर हा समाज खान्देशातील आखतवाडे, बदरखे, कुसुंबा मेहुनबारे तर मराठवाड्यातील धामणी, फुलंब्री, पडेगाव, हरसूल, सांगवी, कन्नड, चिंचखेडा, पिंपळगाव पेठ, जामडी, भोकरदन, जातेगाव, सिल्लोड, नांद्रा, शिसारखेडा, कासारपेठ, बांदोडा, छत्रपती संभाजीनगर, बोरगाव, दहिगाव, आव्हाने, डोंगरगाव, उपली, मांडगाव इत्यादी गावी कायमचे वास्तव्य करून आहे. 
मोजून पस्तीस गावांच्या पलीकडे नसलेला हा समाज पूर्णपणे शेतीत एकवटला. शेतीमातीची इमाने इतबारे सेवा करीत नवीन पिढ्या शिक्षणाकडे वळल्या. समाजाने कुस बदलली. शिकून सवरून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रत्येक घरातील एक तरी तरुण शहरात स्थिरावला. कुसुंबा, बदरखे, आखतवाडे यांचे नोकरीत लक्षणीय प्रमाण आहे. शहरात स्थिरावल्यावर तो गावाला विसरला नाही. त्याचे एक बोट गावाकडे राहिले. ते बोट धरून नंतरच्या पिढ्यांना शहराचा मार्ग सुकर झाला. असे असले तरी आपले मूळ पारंपारिक सण उत्सव साजरे करण्यासाठी शहरातला चाकरमानी गावाकडे धावत येतो.
गढरी धनगर समाज हा महाराष्ट्रातील आपल्या आगळ्यावेगळ्या सणासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाशी भावनिक नाते असले तरी त्यांच्या रुढी, परंपरा, भाषा, वेशभूषा महाराष्ट्रातील धनगरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांचे बेटी व्यवहार होत नाहीत.
काय आहे गढरीया समाजाचा इतिहास?
उत्तर प्रदेशातील गढवाल प्रांतात स्थिरावलेला गढरीया हा मेंढपाळ समुदाय होता. स्वतःला भगवान श्रीकृष्णाचे वंशज मानणारा हा समुदाय गाई,गुरेढोरे व मेंढ्या चारण्यासाठी सतत भटकंतीवर असे. जंगलात भटकंतीवर असताना ताबडतोब राहूट्या ठोकून तात्पुरता निवारा करण्यात हे पटाईत होते. त्यामुळे महंमद तुघलक जेव्हा दिल्लीवरून दक्षिणेवर आक्रमण करण्यासाठी निघाला, तेव्हा त्याने या गढवाली गढरिया समुदायाला आपल्यासोबत राहुट्या ठोकण्यासाठी व सैनिकांची व्यवस्था लावण्यासाठी घेतले.
संबंधित लेख वाचा: 1) सण झाले सुरू… या घरकामाचं करायचं काय? |
इसवी सन १३२७ च्या आसपास हा समाज देवगिरीच्या परिसरात दाखल झाला व कायमचा इथेच स्थिरावला, अशी माहिती आखतवाडे येथील पितांबर गुरुजी हे भाटांकडे असलेल्या नोंदीचा दाखला देऊन सांगतात. कालांतराने उदरनिर्वाहासाठी काही मंडळी अजिंठा पर्वत उतरून खानदेशात स्थिरावली. महाराष्ट्रात आल्यावर येथील मूळ मराठी भाषा संस्कृती आत्मसात करत त्यांनी आपली भाषा व वेशभूषा, सण, उत्सव, परंपरा या मात्र आवर्जून जोपासल्या. या पारंपारिक सणांपैकीच एक म्हणजे भुंजेरिया सण !!!
गढरी समाजाचा श्रावणातील ‘भुंजेरिया’ हा अनोखा उत्सव…
निसर्गाशी एकनिष्ठ नाते जोपासणारा हा सण महाराष्ट्रातील गौराई सणाची साधर्म्य दर्शविणारा आहे. गौराई चैत्र वैशाख महिन्यात साजरा होतो, तर भुंजेरिया हा सण श्रावण महिन्यात साजरा होतो. श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शेतातून कोरी माती आणतात. बांबूच्या डालकीत माती भरून त्यात गहू, (साय)भात, राळे, मका, वरई, भगर इत्यादी तृणधान्यांपैकी कोणतेही पाच एकत्र करून पेरली जातात. त्यांना रोज पाणी दिले जाते. घरातच ते वाढवले जातात. रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी या रोपांची पाच सात इंचापर्यंत वाढ होते. यांनाच भुंजेरीया किंवा धान्या असे म्हणतात.
पूर्वी या समाजात सासरी गेलेली मुलगी नागपंचमीला माहेरी येत असे. आषाढातील पावसाळ्यात शेतात पेरणी झाल्यानंतर व निंदणी झाल्यानंतर सतत लागलेल्या पावसाच्या झडीमुळे कामासाठी थोडी उसंत मिळत असे. ती माहेरी आल्यावर तिच्या हातून धान्या पेरला जायचा. रक्षाबंधन या दिवशी पाहुणचार न करता भुंजेरीयाच्या दिवशी गोडाधोडाचा स्वयंपाक केला जात असे. त्या दिवशी जावई सासुरवाडीला येत असत. त्यांचा योग्य मान सन्मान केला जात असे. भूंजेरियाच्या दुसऱ्या दिवशी मुलगी सासरी निघत असे. आता नोकरी व्यवसायानिमित्त मुली जावई शहरातच राहतात. त्यामुळे क्वचित वेळा ते सणाला हजेरी लावतात. असे असले तरी आजही भुंजेरियाचे महत्त्व ग्रामीण भागात टिकून आहे.
ज्या घरात निधन झालं आहे, त्या घरातून सुरू होते मिरवणूक
भुंजेरिया मिरवणूक दुपारी सुरू होते. पूर्वी पारंपारिक वाद्यांच्या तालासुरात मिरवणूक निघायची. आता ढोल ताशा, डीजेच्या तालावर मिरवणूक निघते. घरात भुंजेरियाची रीतसर पूजा केली जाते. त्याला फुले वाहिली जातात. गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो. धान्याच्या रोपांना राख्या बांधल्या जातात. पूर्वी विसर्जनानंतर घरी आणलेल्या धान्याला राखी बांधली जायची. घर कुटुंबात सुख शांती नांदावी, शेतातील धान्याने घर भरून यावे, वेळोवेळी पाऊस पडावा, पशुंचे रक्षण व्हावे म्हणून मनोमन निसर्ग देवतेला आळवणी केली जाते.
भगवान श्रीकृष्णचा गोपालक असलेला हा समाज मनोभावे जलदेवतेला भुंजेरिया अर्पण करतो. डालक्यातील माती नदीपात्रात विसर्जन केली जाते. धान्याची रोपे घरी आणतात. सर्वप्रथम देवाला अर्पण करतात. नंतर दोन तीन काड्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीला देऊन त्यांचा नमस्कार केला जातो. ज्याप्रमाणे दसऱ्याला आपण सोने वाटतो, त्याप्रमाणेच ही प्रथा आहे.
गढरी धनगर समाजात भुंजेरिया मिरवणूक निघताना सर्वप्रथम समाजात त्यावर्षी ज्यांच्या घरी दुःखद निधन झाले आहे, तिथे जाते. सर्व महिला भंजेरिया घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात. त्यांच्या स्थानिक बोली भाषेत गीत गायले जाते. त्याचा अर्थ मानवी देह नश्वर असून त्याचे दुःख दीर्घकाळ न करता आपले कर्तव्य आनंदाने करीत राहावे. जगरहाटी प्रमाणे परमेश्वराच्या इच्छेचे आपल्याला पालन करावेच लागते, असा असतो. थोडक्यात त्या परिवाराला दुःखातून सांत्वना देत समाजाच्या मुख्य धारेत आणले जाते. घरातील सदस्यांना भुंजेरिया मिरवणुकीत आणली जाते.
सर्व समाज बांधवांची त्याला संमती असते. मिरवणूक प्रत्येक चौकात थांबते. भुंजेरियाच्या डालक्यांना मध्यभागी रचून त्या भोवती फेर धरला जातो. फेर धरताना पारंपारिक गीत गायन सामूहिकरीत्या केले जाते. यातून गोकुळ, ब्रज,वृंदावन, गोवर्धन यांची स्तुती केली जाते. गढरी धनगर या समाजाच्या बोलीभाषेवर ब्रज बोली, हिंदीसह मराठीचा प्रभाव आहे.आजही त्यांची बोली हिंदी मिश्रित आहे. अनुभवी वृद्ध महिलांना लोकगीते मुखोद्गत आहेत. विशेष म्हणजे भुंजेरिया सणाची गीते ही भूंजेरियालाच म्हटली जातात. नवीन पिढीने हा वारसा सांभाळला पाहिजे.
चौकात सर्व स्त्रिया त्या भोवती फेर धरतात. म्हणजे भुंजेरियाला वारंवार नमस्कार करतात. प्रत्येक परिवारातून आणलेली एकेक डालकी ही सर्वांसाठीच आदरणीय असते. त्यात गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद नसतो. सामाजिक समरसताच जणू यातून व्यक्त होत असते.
‘भुंजेरीया’ला या समाजात मुलीचं रुप मानलं जातं…
धनगर समाजात भुंजेरीयाला मुलीचे रूप मानतात. नदीवर विसर्जन करताना जणू आपण मुलीला सासरी रवाना करीत आहोत ही भावना तयार होते. नदीपात्रात विसर्जन करताना गीत, नृत्य, यांचा मुक्त संचार असतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना खूप मर्यादा असायच्या. त्यांच्या भावभावना, आनंद, अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी भुंजेरिया ही एक पर्वणीच होती. नदीला निर्मळ पाणी असे. नदीपात्रात वाळूच्या पटांगणात स्त्रियांना गायन, नृत्य, वादन, सामूहिक खेळ यांची जणू चढाओढच लागायची.
स्त्री स्वातंत्र्याचा जणू हा अविष्कारच होता. याचा मनमुराद आनंद स्त्रिया लुटत असत. विशेष म्हणजे पुरुष मंडळीचा त्यात अजिबात हस्तक्षेप नसे. शेकडो वर्षांपूर्वी स्त्री स्वातंत्र्यावर कठोर बंधने असतांना देखील भुंजेरीया परंपरेत या भटक्या समाजाने किती प्रगल्भता दाखवली होती. याचे आपल्याला विशेष नवल वाटते.
आज समाजाने दिशा बदलली आहे. स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करत मुलींना, सुनांना नोकरी व्यवसायात समान दर्जा दिला आहे. सरकारी सेवा, बँकिंग, वैद्यकीय सेवा, रेल्वे, टपाल, सैनिक, पोलीस, शिक्षण विभाग या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे.
कधीकाळी पशुपालनासाठी व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वणवण भटकणारा हा समाज आज आर्थिक दृष्ट्या स्थिरावला आहे. किरकोळ मतभेद असले तरी सर्वांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे ठेवणारा समाज म्हणून आज याकडे पाहिले जाते. खानदेश मराठवाड्यात अल्पसंख्य असला तरी अपार कष्ट सहन करण्याची शक्ती व शिक्षणाची धरलेली कास यामुळे महाराष्ट्रातील अन्य समाज बांधवांसमोर आदर्श ठरू पाहत आहे. हे निश्चितच समाधानाची बाब आहे.
(संजीव बावस्कर लिखित " खान्देशाचा वसा वारसा " या आगामी पुस्तकातून.)






