'घाशीराम कोतवाल'ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये. याचे कारण म्हणजे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि मराठी रंगभूमीवरील एक माईलस्टोन ठरलेलं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर प्रथमच हिंदी भाषेत सादर होणार आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांच्या संकल्पनेतून हे नाटक हिंदी भाषेत सादर केलं जाणार आहे.
या नाटकात नाना फडणवीसांची भूमिका हिंदी अभिनेते संजय मिश्रा साकारत आहेत, तर घाशीराम कोतवालच्या भूमिकेत अभिनेता संतोष जुवेकर दिसणार आहे. सोबत उर्मिला कानिटकर आणि सुमारे 55 ते 60 कलाकार या नाटकात योगदान देणार आहेत. भव्य संच, लाईव्ह संगीत आणि लाईव्ह कोरिओग्राफीसह हे नाटक प्रेक्षकांसमोर येणार आहे.
"मराठी साहित्य केवळ मर्यादित प्रेक्षकांपर्यंत न राहता ते अधिक व्यापक स्तरावर पोहोचावे, या उद्देशाने हे नाटक हिंदीत सादर केलं जात आहे," असं अभिजित पानसे म्हणाले. हे नाटक सुमारे 50 वर्षापूर्वी आलेलं आहे. आता ते नव्या स्वरूपात रंगभूमीवर येत असून, नव्या पिढीला ते नक्कीच भावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संजय मिश्रा म्हणाले, "हे नाटक आयकॉनिक आहे. ते जागतिक स्तरावर पोहचलं पाहिजे. या नाटकाच्या माध्यमातून मी 25 ते 30 वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. याचा मला खूप आनंद वाटत आहे." या नाटकात संगीत, नृत्य आणि सादरीकरणाचं वैभव अनुभवायला मिळणार असून या नाटकाचे हिंदी प्रयोग नक्कीच यशस्वी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये असताना हे नाटक मी पाहिलं होतं, वाचलंही होतं. भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील मैलाचा दगड असणारं हे नाटक आहे. अनेक वर्ष चित्रपटांमध्ये व्यग्र होतो. चांगलं नाटक करण्याची इच्छा मनात होती. त्यामुळे या नाटकासाठी विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. नाटकाचा दिग्दर्शक अभिजीत पानसेचा 'ठाकरे' हा माझा खूप आवडता चित्रपट आहे. आमची संपूर्ण टीम उत्तम आहे. नाटकाच्या तालमी करताना फार मजा येते आहे.
('घाशीराम कोतवाल' हे नाटक हिंदी भाषेत सादर होणार आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे आणि हिंदी अभिनेते संजय मिश्रा यांनी हे शिवधनुष्य पेललं आहे.)
'एनएसडी'च्या दिवसांना उजळा मिळतो आहे. नाना फडणवीस ही भूमिका फार वास्तवदर्शी आहे. मी अनेकदा या नाटकाचं वाचन केल्यावर या भूमिकेचे पदर मला जाणवत गेले. आपल्या समाजातल्या विसंगती, स्वभाववैशिष्ट्यं नानांच्या भूमिकेत आढळतात. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की हे सगळे बारकावे माझ्या कामातून दिसावेत, अशी प्रतिक्रिया अभिनेते संजय मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.
‘घाशीराम’ आणि ‘शिवसेना’ यांच्यात असा काय संबंध होता?
विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडविला होता. हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्रह्मवृंदाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती.
मुळात तेंडुलकरांच्या नाटकाचा विषय घाशीराम कोतवाल नावाची व्यक्ती हा नव्हताच. राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी घाशीराम सारखी माणसे (वा संघटना) निर्माण करतात. त्यांच्याकडून आपली सर्व प्रकारची अनैतिक कामे करून घेतात आणि ही माणसे डोईजड झालीच तर त्यांचा काटा काढतात. हे तेंडुलकरांना शिवसेनेच्या संदर्भात सांगायचे होते. ते त्यांनी त्या नाटकातून सांगितले. त्यासाठी त्यांच्या कामास आली, ती घाशीरामची दंतकथा. एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर फारसा आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा.
संबंधित लेख वाचा: 1) गौतम बुद्धांची जाणीवपूर्वक बदनामी, म्हणूनच सावरकरांनी लिहिलेल्या ‘संन्यस्त खड्ग' नाटकाला ‘वंचित’चा विरोध! |
घाशीराम कोतवाल हा विषयापासून सादरीकरणापर्यंत अत्यंत वेगळा असा प्रयोग होता. मराठी रंगभूमीवरल्या तोपर्यंतच्या ऐतिहासिक नाटकांना छेद देणारे हे नाटक होते. उत्तर पेशवाईत नाना फडणवीस हे मातब्बर प्रस्थ होते. त्यावेळी पुण्यात घाशीराम हा काही काळ कोतवाल होता. मात्र तेंडुलकरांना इतिहास मांडण्यात रस नव्हता. इतिहासातल्या काही पात्रांच्या आधाराने कालातीत अशी शाश्वत कथा त्यांना सादर करावयाची होती. घाशीराम कोतवाल हे नाटक ऐतिहासिक नव्हे. ऐतिहासिक आधार असलेली ही एक अनैतिहासिक नृत्यसंगीतमय दंतकथा आहे.
‘घाशीराम’ लिहिताना तेंडुलकरांच्या मनात नेमकं काय चाललं होतं?
पेशवाई, नाना फडणवीस, घाशीराम कोतवाल यांच्या इतिहासातील बर्यावाईट अव्वल अस्तित्वाविषयी मतप्रदर्शन करण्याचा कोणाताही हेतु लेखकाचा नव्हता. या दंतकथेमधील बोध वेगळाच आहे, अशी स्पष्ट भूमिका तेंडुलकरांची होती. मात्र वादाच्या गदारोळात त्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. ती नीट समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही. वादामुळे घाशीरामविषयी अनेक कथा आणि दंतकथांना मात्र जन्म दिला. आज पन्नास वर्षांनंतर घाशीराम कोतवाल या नाटकाकडे प्रयोगात्मदृष्टीने पाहताना हे नाटक कालबाह्य तर मुळीच झालेलं नाही. उलट आजच्या काळाला अधिक समयोचित वाटेल असे हे नाटक आहे. हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा इंदिरा गांधी सत्तेवर होत्या.
त्यांची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरु होती. महाराष्ट्रातही काँग्रेसची पकड घट्ट होती. शिवसेनेचा उदय झाला होता. संघाच्या पोटातून भाजपचा जन्म व्हायचा होता. मात्र त्यावेळच्या थेट राजकीय पार्श्वभूमीशी यात कुठेच संबंध येत नाही. मात्र सर्वच पातळ्यांवर राजकारणाची अधोगती सुरु आहे हे तेंडुलकरांसारख्या द्रष्ट्या नाटककाराला जाणवले असावे. पत्रकार म्हणून ते आसपास जे घडत होते, त्याचे निरीक्षण करत होते. त्या वास्तवाला नाटक, चित्रपट यामाध्यमातून समजूत घेत होते.
(‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर.)
तेंडुलकरांच्या बहुतेक नाटकांच्या मध्यवर्ती हिंसा केंद्रस्थानी असते. घाशीराम कोतवाल हे नृत्यसंगीतमय नाटक असले तरी त्याचा गाभा राजकीय आहे. त्या अर्थाने ते राजकीय रुपक आहे. या नाटकात नीचतम पातळीला गेलेला पेशवाईचा काळ आहे. भारतातल्या राजकीय वास्तवाकडे पाहिले तर नाना फडणवीस आणि घाशीराम यांची अनेक रुपे वेगवेगळ्या प्रकाराने अस्तित्वात असल्याचे दिसते.
नाना आणि घाशीराम हे सत्तेच्या राजकारणातील दोन वेगळी रुपे आहेत. राजकीय व्यवस्थेतून नाना फडणवीस निर्माण होतात. आपल्या राजकीय सोयीसाठी, अस्तित्वासाठी नानासारखे राजकारणी घाशीराम निर्माण करत असतात. त्यांच्या अनैतिक सौदेबाजीतून घाशीराम तयार होत असतात. उपयोगीता संपली की हेच घाशीराम पद्धतशीरपणे नाहीसे होतील याची दक्षता राजकारणी नाना घेत असतात. सत्तेच्या जीवघेण्या खेळात असे नाना आणि घाशीराम तयार होतात. काही काळ राज्यही करतात. पण ते मुळात तयार होतात त्याला कारणीभूत ठरते नीचतम पातळी गाठलेली समाज व्यवस्था. मग तो काळ पेशवाईचा असो की लोकशाहीचा. तेंडुलकरांना सांगायचे होते ते याच प्रकारचे असावे असे घाशीराम कोतवाल पाहताना वाटते.
घाशीराम कोतवाल कोण होता..?
मुळात माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यास स्वतंत्र कोतवाल नव्हता. त्यांच्या काळात पुण्याचे महत्त्व फार वाढले, तेव्हा मग शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार 18 फेब्रुवारी 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले. नाना फडणीस अर्थात बाळाजी जनार्दन फडणीस हे सांगतrल तसे काम करत जाणे असे त्यांना बजावण्यात आले होते.
नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले. शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा सत्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.
(‘घाशीराम कोतवाल’)
बाळाजी नारायण केतकरांनंतर बाबूराव राम, जनार्दन हरी, धोंडो बाबाजी व आनंदराव काशी असे कोतवाल झाले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.
'घाशीरामी कारभार' असं का म्हटलं गेलं…?
घाशीराम कोतवाल कनोजा ब्राह्मण कुटूंबातला होता. त्याच्या वडिलांचे नाव शामलदास किंवा सावलदास असल्याचं सांगण्यात येतं. मुळचा औरंगाबादचा असणारा घाशीराम पुण्यामध्ये अर्थार्जन करण्यासाठी आला होता. त्या काळी देशभरातून अनेकजण पुण्यात काम शोधण्यासाठी येत असत. अशाच पद्धतीने काहीतरी काम मिळवण्यासाठी घाशीराम कोतवाल पुण्यात आला होता. सुरवातीच्या काळात तो पुण्यामध्ये कोणते काम करत होता याचा निश्चित संदर्भ मिळत नसला तरी असं सांगितलं जातं की त्याच्या लाघवी बोलण्यामुळे तो पुण्याच्या दरबारी मंडळींच्या संपर्कात आला. काही काळातच त्याने नाना फडणवीसांची मर्जी संपादन केली.
त्या काळात लोकांमध्ये अशी चर्चा होती की, घाशीराम कोतवालास ललितगौरी नावाची अत्यंत देखणी मुलगी होती. तिच्यामुळेच त्याच्यावर नाना फडणवीसांची मर्जी बसली होती. याबाबत मात्र खऱ्या खोट्याचा संदर्भ मिळत नाही. पण घाशीरामाची कोतवालपदी नियुक्ती सर्वात प्रथम 8 फेब्रुवारी 1777 रोजी करण्यात आल्याचे संदर्भ मिळतात. त्याची ही पहिली नियुक्ती तात्पुरती होती. एक वर्ष ती टिकली. त्यानंतर 1782 मध्ये त्यांची नियुक्ती कायमस्वरुपी करण्यात आली.
घाशीराम कोतवालास एका वर्षासाठी 621 रुपये पगार होता. त्याची छत्री धरण्यासाठी 66 रुपये होता. कोतवाल्याच्या हाताखाली 78 शिपाई देण्यात आले होते नंतरच्या काळात त्यांच्या संख्येत वाढ करुन शिपायांची संख्या 115 पर्यन्त करण्यात आली होती. पुणे शहरात होणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवणे हे घांशीराम कोतवालाचे काम होते. त्या काळात गुन्हे कोणत्या स्वरुपाचे असायचे तर सरकारच्या परवागीशिवाय वेश्याव्यवसायात येणाऱ्या स्रीयांना दंड, बकरी बोकडांची विनापरवाना हत्या, मद्यपान करुन धिंगाणा घालणे, बहिष्कृत जमातीच्या लोकांसोबत जेवण करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे.
(‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील एक प्रसंग)
1790-91 या घाशीराम कोतवालाच्या शेवटच्या काळात सर्वाधिक गुन्हे हे मद्यपी, गर्भपात, जबरदस्तीने स्त्रीयांना पळवून नेणे आणि चोऱ्यांचे झाले होते. यावरूनच असा संदर्भ दिला जातो की पुण्यातील ब्राह्मण घाशीराम कोतवालाच्या कामावर नाराज होते. त्याच्या मनमनी कामाबद्दल ते चिडून होते. प्रत्यक्षात मात्र घाशीराम कोतवालावर नाना फडणवीसांची कृपा होती. त्यांने आपले पद कार्यक्षमरित्या संभाळले होते असे संदर्भ दिले जातात. दरबारातील अंतर्गत सत्तासंघर्षातून घाशीराम कोतवालाच्या विरोधात नाराजी पसरल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर घडे भरलेच.
‘घाशीराम कोतवाल’ने 34 ब्राम्हणांना कोंडून ठेवलं, ज्यात त्यांचा मृत्यू झाला
पुण्यामध्ये सर्व जातीच्या लोकांची वस्ती वाढत होती तशी ब्राह्मणांची संख्याही होती. यातील अनेक ब्राह्मणांचं अर्थाजनाचं साधन म्हणजे दक्षणा होतं. दक्षणा मिळवण्यासाठी देशाच्या विविध प्रांतातल्या ब्राह्मणांची पुण्यात गर्दी होत असे. थोरल्या माधवरावांनी 1765 मध्ये दक्षणा वाटपासाठी पर्वतीच्या पायथ्याच्या दक्षिणेस एक वास्तूच बांधली. त्याला पर्वतीचा रमणा असं नाव पडलं. सवाई माधवरावांच्या काळात आणि दुसऱ्या बाजीरावांच्या काळात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. घाशीराम कोतवालाचं प्रकरण सवाई माधवरावांच्या काळातच घडलेलं आहे.
1791च्या ऑगस्ट महिन्यात उत्सवप्रिया ब्राह्मणांचा एक मोठ्ठा तांडा रात्रीच्या वेळी शहरात शिरला होता. त्या काळात पुण्यात तोफेचा आवाज झाल्यानंतर रस्त्यावरून फिरण्यास बंदी होती. रात्री अकरा वाजता तोफेचा आवाज होई. त्यानंतर रस्त्यावरून फिरणाऱ्यांना अटक केली जात असे. रात्रीच्या वेळी शिरलेल्या त्या 34 ब्राम्हणांना घाशीराम कोतवालाच्या शिपायांनी अटक केली.
याशिवाय तेलंगी ब्राह्मणांच्या या समूहाने माळ्याची परवानगी न घेता बागेतील फळे तोडली (ती बाग खुद्द घाशीरामची होती असे काहींचे मत आहे,) माळ्याने ती तक्रार घाशीरामाकडे केली. घाशीरामाने त्याच्या नोकरांना त्या सगळ्या तेलंगी ब्राह्मणांना पकडण्याचा आदेश दिला.त्या सगळ्यांना भवानी पेठेतील एका भुयारातील खोलीत कोंडून ठेवण्यात आले. अशा भुयारात जेथे हवा येण्याजाण्यास कुठलीही खिडकी नव्हती.
राघोबादादाचा निकट मानाजी फाकडे यास ही गोष्ट समजल्यानंतर त्याने कुलूप तोडून त्या ब्राह्मणांना बाहेर काढले.त्या एकवीस जणांपैकी 18 जण गुदमरून मेले होते,उरलेले ३ जण बाहेर काढल्यानंतर मेले.ह्या घटनेने पुण्यात एकाच खळबळ उडाली.ब्राह्मणांचे मोर्चे नानांच्या वाड्यावर धडकू लागले. नानांनी घाशीरामला याचा जाब विचारला, त्यावर घाशीरामाने ते सगळे धाक दाखवून चोरी करणारे चोर होते असे यशस्वीपणे नानांना पटवून दिले.
(पुण्यामध्ये अस्तित्वात असलेला ‘घाशीराम कोतवाल’चा वाडा)
नानांना ते पटले आणि त्यांनी त्या मृत ब्राह्मणांची प्रेते जाळण्याची परवानगी दिली. पण राघोबादादाचा विश्वासू मानाजी फाकडेला नानांना कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली होती ती तो कसा सोडेल.त्याने जोपर्यंत ह्या मृत ब्राम्हणांच्या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत एकही प्रेत जाळले जाणार नाही अशी भूमिका घेतली.
… आणि घाशीराम कोतवालला लोकांनी दगडांनी ठेचून मारलं
एव्हाना हजाराच्या घरात तेलंगी ब्राह्मण पुण्यात वाड्यासमोर जमले होते.तिथे मारामारी आणि दंगा सुरू झाला.शेवटी नानांनी घाशीरामावर चौकशी बसविली. तेलंगी ब्राह्मणांच्या दबावाखाली अय्याशास्त्री नामक न्यायाधीशाने घाशीरामला देहांताची शिक्षा फर्माविली. घाशीरामाची गाढवावरून धिंड काढण्यात आली, त्याला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली,तेलंगी ब्राह्मण त्याच्यावर दगडफेक करू लागले. घाशीराम आता पुरता रक्तबंबाळ झाला.एका संतापलेल्या तेलंगी ब्राह्मणाने त्याला खाली पाडले आणि मोठा दगड उचलून घाशीरामाच्या मस्तकात घातला. घाशीराम जागीच ठार झाला. त्यानंतरच ब्राह्मणांची प्रेते जाळण्यात आली.
कधीकाळी याच घाशीराम कोतवालाने पुण्यात शिस्त निर्माण केली होती. आजच्या नवीन पेठेची स्थापना देखील घाशीराम कोतवालाने केली होती. अशा घाशीरामास रस्त्यावर फटफटत नेवून मारण्यात आले. या घटनेनंतर आनंदराव काशीची कोतवाल पदावर नियुक्ती करण्यात आली.






