महाराष्ट्र शासनाने राज्यात होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी जाहीर केली. त्यानंतर ही परवानगी फक्त ग्रामीण भागापुरतीच मर्यादित असेल, असे शासनाने जाहीर केले. ही बातमी आल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात एकच वादळ आले आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर अॅलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी डॉक्टर, अशा युद्धातच झाले.
राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात घेतलेल्या एका निर्णयाविरोधात अॅलोपॅथी डॉक्टरांच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत. होमिओपॅथी डॉक्टर आता एक वर्षांचा कोर्स करुन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करु शकतात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांनी विरोध केला असून त्याच्या विरोधात बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे सरकारचा निर्णय ज्यामुळे अॅलोपॅथीचे डॉक्टर चिडले आहेत?
ग्रामीण भागात अॅलोपॅथिक शाखेतील डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा देता यावी, यासाठी एक ब्रिज कोर्स तयार करून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टराला अॅलोपॅथीमध्ये सराव करण्याची तसेच महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेमध्ये स्वतंत्रपणे नोंदणी करण्याचा निर्णय 2014 मध्ये घेतला होता.
त्यासंदर्भात आयएमएने न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र आता अंमलबजावणी करण्याची सूचना राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेला दिल्याने, 15 जुलैपासून हा कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.मात्र यामुळे अॅलोपॅथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला धोका असल्याचा आरोप केला जातोय.
ब्रिज कोर्स पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना पूर्णपणे अॅलोपॅथीचा सराव करण्यास मुभा देण्यात येणार नाही. ही बाब रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने सीसीएमपी या ब्रिज कोर्सचा अभ्यास करून होमिओपॅथी डॉक्टरांनी किती सराव करावा यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतरच होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीचा सराव करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.
अॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचा विरोध
चार-पाच वर्ष शिकून, मेहेनत करून, पैसे खर्च करून एमबीबीएस, एमडी, एमएस अशा पदव्या मिळवणाऱ्या डॉक्टरांना या एका निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड बी एम सी, सरकारी डॉक्टरांची संघटना MAGMO आणि ए एम सी अशा सर्वच संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. नाहीतर सर्वच अॅलोपॅथी डॉक्टर संघटना एकत्रित बंदची हाक देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएने शुक्रवारी राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीतील शस्त्रक्रियाही रद्द करण्यात आल्या आहेत. या संपामध्ये जवळपास 1 लाख 80 हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.
अॅलोपॅथी विरुद्ध होमिओपॅथी… काय फरक आहे?
सर्वप्रथम अॅलोपॅथी व होमिओपॅथी या दोन पॅथी काय आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. अॅलोपॅथीमध्ये एम.बी.बी.एस. म्हणजेच बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी या डिग्री अंतर्गत रुग्णाचे शरीरशास्त्र, जीवशास्त्राचा आधार घेऊन त्याच्या लक्षणांचा इतिहास, शरीराची तपासणी करून एखाद्या आजाराचे निदान केले जाते. मग त्या आजारावर उपलब्ध औषधांवर झालेल्या संशोधनावर आधारित काही मार्गदर्शक तत्त्वांचा विचार घेऊन उपचार केले जातात. हा बेसिक अभ्यासक्रम झाल्यावर पुढे विविध विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकता येतो.
या उलट होमिओपॅथी ही उपचारपद्धत केवळ रुग्णाचा आजार व त्यावर उपचार, एवढा संकुचित विचार न करता त्याच्या मनाचा ठाव घेते व रुग्णाची मानसिकता हा होमिओपॅथीचा मुख्य आधार आहे. होमिओपॅथीमध्ये तुमची तहान, भूक, झोप, स्वप्न, तुमचे विचार, भीती, एवढेच काय; पण तुम्ही पाठीवर की पोटावर झोपता, इतका सूक्ष्म विचार करून उपलब्ध अनेक औषधांमधून एक औषध शोधले जाते व त्या नेमक्या औषधाचा एक थेंब रुग्णाचे आयुष्य बदलून टाकतो.
ब्लाटा ओरिएंटॅलिस या औषधाचा एक थेंब एखाद्या दम्याच्या रुग्णाला जीवदान देतो, ‘ऑरम मेट’चा एक थेंब एखाद्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करतो, अरसेनीकचे काही डोस एखाद्या अतिचंचल अॅग्रेसीव्ह मुलाला शांत करतात. अॅलोपॅथीच्या उपचारांना पूर्णत्व देण्यासाठी या मंडळींनी होमिओपॅथी जन्माला घातली. पण आज अनेक वर्षांनी होमिओपॅथी सोडून अॅलोपॅथीसाठी डॉक्टरांचे झगडणे हे खरे तर होमिओपॅथीचे दुर्दैव आहे.






