-ए,डावा हात काय पुढे करतोस? प्रसाद आहे ना तो….
-अरे, मंदिरात जातोय आपण, उजवा पाय पुढे ठेवायचा असतो नेहमी...
-डाव्या हाताने पाणी पितात, उजव्या हाताने जेवतात, साधं कळत नाही तुला?
घरातलं मूल मोठं व्हायला लागलं आणि डावखु-या हालचाली करू लागलं की साधारणपणे असे संवाद आपल्याला त्या घरात ऐकू येतात. हे संवाद नवीन नाहीत; पण त्याचे होणारे परिणाम मात्र गांभीर्याने विचार करण्यासारखे आहेत. देवघरात पूजा झाल्यानंतर वाटीतली साखर हातावर घेण्याकरिता डावा हात पुढे केला तर लहानपणी अनेकांच्या त्या हातावर वडीलधा-यांचा फटका बसला असेल.
डाव्या हातात चमचा धरून भात खाताना कित्येकदा आई ओरडली असेल. या आयांना, आजींना आइनस्टाइन दोन्ही हातांनी लिहिणारा होता, असं सांगितलं तर तो आइनस्टाइन होता, माझं पोरगं थोडंच त्याच्याइतकं बुद्धिमान आहे, असं म्हणत उजव्या हाताने सगळे काही करायला लावतात; पण त्याच्या बुद्धीची वाढ मात्र असे करण्यामुळे नीट होणार नाही, हे मात्र यांना कोण सांगणार?
ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असलेल्या युरोप व उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील कित्येक राष्ट्रामध्ये डावखुरेपणाचा संबंध पापकृत्याशी, सैतानी वृत्तीशी किंवा परमेश्वराला न आवडणार्या गोष्टींशी जोडलेला गोष्टींशी जोडला आहे हिदू धर्मातसुद्धा स्त्रियांचे गौण स्थान अधोरेखित करण्यासाठी बायकोला नवऱ्याच्या डावीकडे बसण्यास भाग पाडतात. इस्लाम धर्मसुद्धा डाव्या हाताने केलेल्या कृत्याला निषिद्ध मानतो.
‘बाएं‘ हाथ का खेल…
एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्यांमध्ये अनेकदा एक डावखुरा व दुसरा उजवा हात वापरणारे असतात. त्यांना मिरर ट्विन्स म्हणतात. निसर्गानेच त्यांना बॅलन्स करण्यासाठी तसे केलेले असते. पण या जुळ्यांपैकी एकाला उजवेच असल्यामुळे सहजपणे सगळे व्यवहार करता येतात; पण दुसऱ्याला मात्र डावखुरे असल्यामुळे शिकवावे लागते, डावा वाईट असतो म्हणून. डाव्या मेंदूच्या नियंत्रणात उजव्या असणाऱ्यांची कौशल्ये विकसित होतात.
यात भाषेवर प्रभुत्व, कलाक्षेत्रात मातब्बर असणं सगळं येतं तर उजव्या मेंदूच्या नियंत्रणात डावखु-या असणाऱ्यांची कौशल्ये विकसित होतात. यामध्ये गणित, अॅनालिटिकल माइंड अधिक विकसित असते. मात्र, डावखु-यांना जर उजव्या हातानेच काम करण्यास सतत प्रवृत्त केले गेले तर त्यांचा मेंदू हव्या त्या प्रमाणात विकसित होत नाही. थोडक्यात त्यांच्या अंगभूत कौशल्यांच्या विकासावर परिणाम होतो. हे पालकांना अनेकदा समजत नाही आणि पारंपरिक गैरसमजुतींमुळे पालक आपल्या पाल्याला उजव्या हाताचा वापर अधिक करायला लावतात.
हे गैरसमज अलीकडे कमी झालेले असले तरी मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबांमध्ये अजूनही ते बरेच आहेत. यामुळे आपल्या मुलाचा बुद्ध्यंक वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक पालक या डावखु-या असण्याची शास्त्रीय कारणे डावलूनच प्रयत्न करताना दिसतात.
लोक डावखुरे का असतात?
अनुवांशिक कारणांमुळे एखादा व्यक्ती डावखुरा असतो, असं सांगितलं जातं. याशिवाय, मुलींपेक्षा जास्त मुले डावखुरी असतात, असंही सामोरं आलं आहे. त्यामागे टेस्टोस्टेरॉन हार्मोन जबाबदार मानला जातो. काही तज्ञांनी असंही मत मांडलं आहे कि, लहान वयातच मेंदूला झालेल्या सौम्य नुकसानीमुळे हे होतं असावं. मात्र, डावा हात आणि मेंदू यांच्या संदर्भात कोणताही वैध सिद्धांत समोर आलेला नाही.
काही अभ्यासामध्ये हे सिद्ध झालं आहे की, एखादी व्यक्ती डावखुरी आहे का? हे मातेच्या गर्भाशयातच निश्चित होतं. पालकांकडून विशिष्ट प्रकारचा जनुक वारसा मिळाले असतो. त्याला डाव्या हाताची जनुकं म्हणता येईल. मात्र, या जनुकामागची कारणं कोणती यावर अद्याप संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या तज्ञांची मतं देखील भिन्न आहेत.
डावखुरं असणं किंवा उजवं असणं, हे जनुकांशी संबंधित आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण नेमक्या कोणत्या जनुकांवर हे अवलंबून आहे, हे मात्र अजून समजलेलं नाही. जवळपास 40 वेगवेगळे जीन्स याच्याशी संबंधित असतील, असं म्हटलं जातं. म्हणजेच डावखुरेपणाच नेमकं कारण अजूनही समजलेलं नाही, असं म्हणता येईल. डावखुरं असण्याचा मेंदूशी काय संबंध आहे, यावर बऱ्याच वर्षं वादविवाद सुरू आहेत. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतं आणि डावा भाग उजवी बाजू नियंत्रित करतं. म्हणजेच डावखुरं असणं म्हणजे मेंदूच्या रचनेवर मोठा परिणाम करणारं असतं.
जगभरात एकूणच उजव्या हाताचा प्रामुख्याने वापर करणा-यांची संख्या अधिक असल्याने सगळीच कामाची साधने वा उपकरणे ही उजव्या हाताला डोळ्यासमोर ठेवून बनविलेली आहेत. उदाहरणार्थ, मोटार, स्क्रूड्रायव्हर, कात्री. त्यामुळे अनेक पालक, ज्यांना परंपरागत समजुतींशी काही देणे-घेणे नसते, ते ही साधने वापरताना आपल्या पाल्याला अडचणी येऊ नयेत म्हणूनही उजव्या हाताच्या वापरावर जोर देताना दिसतात.
शिवाय, डावखु-या मुलांबाबत ही मुले कमी आत्मविश्वास असलेली, गोंधळलेली, उनाड असतात असाही समज असतो. मात्र, त्यांना जबरदस्तीने उजवं व्हायला प्रवृत्त केल्यास त्यांचा जास्त गोंधळ होऊ शकतो. अनेकदा नवखे असताना चमचा उजव्या हातात धरायचा की डाव्या, कात्री कोणत्या हातात धरायची असा गोंधळ होऊ शकतो.
डावखुऱ्या व्यक्ती विशेषतः महिलांसमोरच्या अडचणी
1. फ्रिज, मायक्रोवेव्ह यासारख्या गोष्टींचे दरवाजे उजव्या हाताच्या लोकांना सहजतेने उघडता येतील अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात. त्यामुळे डावखुऱ्या महिलांची चांगलीच अडचण होते.
2. स्वयंपाक घरातली अनेक कामं सोयीची आणि झटपट करण्यासाठी कात्री अतिशय उपयुक्त ठरते. पण मोठ्या आकाराच्या कात्रीची पकड अशा पद्धतीने डिझाईन् केलेली असते की त्यामुळे ती उजव्या हातात पकडणे सोयीचे होईल.
3. बहुतांश स्वयंपाक घरात गॅस ओट्याजवळ वस्तू ठेवण्याची जागा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेली असते की त्या वस्तू उजव्या हाताने घेणे सहज शक्य होईल. अशा स्वयंपाकघरात डावखुऱ्या महिलांना काम करणे कठीण जाते.
डावखुऱ्या व्यक्तींना या अडचणी येतात.
- टु- व्हिलर, फोर व्हिलर सुरु करण्यासाठी चावी ज्या ठिकाणी लावावी लागते, ते सगळे पॉईटदेखील उजव्या हातानेच असतात. विशेषतः टु व्हिलर चालवताना गाडी बॅलेन्स करत डावा हात पुर्णपणे उजवीकडे घेत चावी फिरवणे, लेफ्ट हॅण्डर्ससाठी कठीण जाते.
- ऑफिसमध्ये डेस्कवर काम करताना डेस्कची रचना उजव्या हाताने काम करता येईल, अशा पद्धतीने अधिक असते.
- एटीएम मशिनची बटणं देखील उजव्या हातालाच असतात.
आपण निसर्गाच्या विरुद्ध कशाला जायचे?
डावखु-या लोकांची संख्या जगामध्ये सात ते दहाच टक्के आहेत. म्हणजे उजव्या हाताने काम करणा-यांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे या अल्पसंख्य डावखु-यांना एक तरी दिवस स्वत:चा म्हणून साजरा करता यावा म्हणून जगभरात 13 ऑगस्ट हा लेफ्ट हँडर्स डे साजरा केला जातो. आज जगभरात लेफ्ट हँडर्स असोसिएशन्स आहेत, ज्या डावखु-यांबाबतच्या गैरसमजुती मिटविण्याबाबत प्रयत्न करीत असतात.
आपल्याकडे पुण्या-मुंबईतही अशा संस्था आहेत. डावखु-या मुलांना लहानपणापासूनच त्यांचे डावखुरे असणे लक्षात आल्यानंतर ते स्वीकारून त्यांना तसेच संस्कार व शिकवण द्यावी. शाळांमध्ये उपकरणे हाताळताना मुलांचे डावखुरे असणे लक्षात घेतले जावे. त्यांची डावखुरे असल्याने जी अंगभूत कौशल्ये असतात ती विकसित करण्याचा प्रयत्न केला जावा.
अमेरिकेमध्ये एके काळी डावखु-यांचे प्रमाण अधिक होते. आताच्या बराक ओबामांसह पूर्वीचे सात राष्ट्राध्यक्ष हे डावखुरे होते. त्यात बिल क्लिंटन, सिनिअर जॉर्ज बुश, ज्युनिअर जॉर्ज बुश यांचा समावेश आहे. शपथ घेताना त्यांचे हे डावखुरे असणे विशेषत्वाने लक्षात यायचे. आपल्याकडे गुजराती समाजात डावखु-यांचे प्रमाण अधिक आहे. अमिताभ व अभिषेक बच्चन, रतन टाटा, आशुतोष गोवारीकर, सुरेश रैना डावखुरे आहेत.
क्वचितच जगामध्ये दोन्ही हातांचा वापर करणा-या व्यक्ती सापडतात. त्यात आइनस्टाइन तर सर्वश्रुत आहेच, शिवाय लॉन टेनिस प्लेअर जॉन मॅकेन्रो वा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन अशा मातब्बर व्यक्तींची उदाहरणे देता येतील. ही उदाहरणे सांगायचा मुद्दा हा की, दोन्ही हात हे आपल्याच शरीराचे अवयव आहेत, मग एकाला शुभ आणि दुस-याला अशुभ असे मानून कसे चालेल? विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाने जगाचा कायापालट केला हे सत्य असूनसुद्धा समाज अंधश्रद्धेला बळी पडत आहे.
रोजच्या जगण्याच्या कृतीतूनच आपल्या समाजात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्था समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तरीही डाव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तींना अनेक वेळा कुटुंबातून, समाजातून अवहेलना सहन करावी लागते, नैसर्गिकरीत्या मिळालेल्या सवयी बदलाव्या लागतात. कुठं तरी ही आपल्या मानवी हक्कांच्या विरोधातली कृती म्हणून याकडे पाहणं गरजेचं आहे. वैयक्तिक पाळीवर किंवा सामाजिक स्तरावर आपणच आपल्या अवयवांबद्दल करत असलेला हा भेदभाव, यावर आता तरी विचार करूया. हार्मोन्ससुद्धा डावखुरे असण्याशी निगडित असतात. आपण निसर्गाच्या विरुद्ध कशाला जायचे?






