बैलपोळा संपला की दुसऱ्या दिवशी विदर्भात ‘मारबत आणि बडग्या’चा जल्लोष पाहायला मिळतो. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक प्रश्नांना आवाज देण्यासाठी अकराव्या शतकात म्हणजे ब्रिटिश राजवटीत या परंपरेची सुरुवात झाली होती. आजही समाजातील व्यथा, समस्या आणि अन्याय यांचे प्रतीक म्हणून “ईडा, पीडा घेऊन जा रे... मारबत” अशा हाकाट्यांनी मारबत शहरभर फिरवली जाते. जगात केवळ विदर्भातच ही अद्वितीय सांस्कृतिक परंपरा पाहायला मिळते.
ब्रिटिश जुलूमशाहीला उत्तर म्हणून उभा राहिला ‘मारबत उत्सव’
ब्रिटिश राजवटीच्या काळात लोकांमध्ये असलेला असंतोष आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी या उत्सवाची सुरुवात झाली. इतिहासावर नजर टाकली तर कळते की भोसले राजघराण्यातील बाकाबाई हिने इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. तिच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी काळी मारबत काढली जाते. मात्र बाकाबाईच्या या कृत्याची माहिती असतानाही तिच्या नवऱ्याने विरोध केला नाही. त्यामुळे निषेध म्हणून त्याचाही पुतळा काढण्यात येतो, आणि या पुतळ्यालाच “बडग्या” असे म्हटले जाते.
गेल्या सुमारे 144 वर्षांपासून काळ्या मारबतीसोबतच बडग्यांचीही मिरवणूक काढली जाते. यामध्ये केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमीच नाही तर समाज जागृतीचाही संदेश असतो. वर्षभरात घडलेल्या विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटनांवर भाष्य करणारी घोषवाक्ये बडग्यांवर लिहिली जातात आणि त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात.
‘मारबत’ म्हणजे काय?
‘मारबत’ म्हणजे संकट, दुःख आणि अन्यायाचं प्रतीक. समाजाला जे त्रास देतंय, जसं की ब्रिटिशांची जुलूमशाही, अन्यायकारी धोरणं किंवा स्थानिक पातळीवरील वाईट प्रथा, त्यांना दूर करण्याची सामूहिक भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्सव सुरू झाला.
बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गावोगाव मारबत आणि बडग्या तयार करण्याची लगबग सुरू होते. बांबू, गवत, कापड, रंगीत कागद वापरून हे पुतळे बनवले जातात. त्यामध्ये काळी मारबत, पिवळी मारबत उभारली जाते. मारबत म्हणजे वाईट शक्तींचं प्रतीक तर बडग्या म्हणजे त्याचा साथीदार. दुपारनंतर मिरवणूक काढून हे दोन्ही पुतळे शहरभर फिरवले जातात. आणि “ईडा, पीडा घेऊन जा रे... मारबत!” अशा आरोळ्यांमधून लोकं आपले दुःख, सामाजिक समस्या आणि असंतोष जणू त्या मारबतीत भरून टाकतात. अखेरीस ही मारबत आणि बडग्या जाळून टाकले जातात.
आजच्या घडीला मारबत समाजातील विविध वाईट गोष्टींचं प्रतीक ठरते — महागाई, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, महिला अत्याचार, पर्यावरण प्रदूषण अशा समस्या लोक मारबत बनवून जाळतात. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक वा सांस्कृतिक न राहता सामाजिक चळवळीचा मंच बनतो. लोकांच्या मनातील व्यथा व्यक्त करण्याचा आणि बदल घडवून आणण्याचा हा एक सामूहिक मार्ग ठरतो.
जगात फक्त विदर्भातच अशी अद्वितीय परंपरा आजही टिकून आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या शहरांत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गावोगावी मात्र त्याचे वेगळे स्वरूप दिसते. उत्सवाच्या निमित्ताने एकोपा, सामूहिक विचार आणि सामाजिक जाण यांचे दर्शन घडते.
बडग्या काढण्याची पारंपरिक प्रथा
ही प्रथा केवळ उत्सवापुरती मर्यादित नसून त्यामागे खोल सामाजिक, आरोग्यविषयक आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान दडलेले आहे. विदर्भातील खेड्यापाड्यात अजूनही जोपासली जाणारी बडग्या काढण्याची प्रथा याचे उत्तम उदाहरण ठरते.
पोळ्याच्या आदल्या दिवशी खेड्यातील प्रत्येक घरातून पळसाच्या फांद्या तोडून आणल्या जातात. त्यांना स्थानिक बोलीत मेडी म्हणतात. पोळ्याच्या सकाळी या फांद्या घरातील प्रत्येक दरवाज्यासमोर उभ्या करून ठेवतात. हा एक प्रकारचा संरक्षणकवच मानला जातो.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या मेडींचा वापर करून घराघरांतून बडग्या काढला जातो. “इडा, पिडा, रोगराई ने रे... बडग्या” अशी हाक मारत ही फांदी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवली जाते. जणू रोगराईला हुसकावून लावण्याचा तो सामूहिक विधीच असतो. त्यानंतर पळसाच्या पानांना आगीत गरम करून प्रत्येक कुटुंबातील सदस्याला हलकेसे चटके दिले जातात. हा क्षण वेदनादायी असला तरी त्यामागे रोगप्रतिकार वाढविण्याचा, नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचा लोकविश्वास आहे.
या प्रथेमागे एक प्रकारचे लोकवैद्यकीय शहाणपण आहे. पळसाच्या फांद्या आणि पानांचे औषधी गुणधर्म आयुर्वेदीय ग्रंथांत वर्णिलेले आहेत. त्यामुळे ही प्रथा केवळ अंधश्रद्धा नसून आरोग्यरक्षणाशी जोडलेली लोकसंस्कृती आहे.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक जुन्या परंपरा मागे पडल्या असल्या तरी विदर्भातील ग्रामीण समाजात बडग्या काढण्याची प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. या प्रथेमुळे केवळ आरोग्यच नव्हे तर एकात्मता, सामूहिकता आणि संस्कृतीचे सातत्य टिकून राहते.
यंदा मारबतीतून नागपूरकरांचा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर थेट प्रहार
नागपूरमध्ये यंदा पिवळी मारबत उत्सवाचे 144 वे वर्ष साजरे होत आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाने शहरभर विशेष होर्डिंग्ज लावून वातावरणाला रंगत आणली आहे.
2025 हे वर्ष भारतासाठी अनेक कारणांनी कठीण ठरले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ला, अमेरिका-भारत करविषयक संघर्ष या सर्व घडामोडींचा प्रभाव नागपूरकरांनी जाणवला आहे. म्हणून यंदा मारबतची चमक काहीशी वेगळी दिसणार आहे. शहरातील मारबत उत्सव यंदा केवळ पारंपरिक रंगात मर्यादित न राहता सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत गाजणार आहे. शहरातील विविध मंडळांतर्फे होणाऱ्या या महोत्सवात महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटरविरोधातील संताप, व्यसनाधीनता अशा गंभीर प्रश्नांवर जनजागृती करणारे बडगे उभारण्यात येणार आहेत.
नागपूर शहरातील नेहरू पुतळा चौक, कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक, व्ही.टी. पार्क आणि अमरावती रोडसह विविध ठिकाणी पिवळी मारबत, काळी मारबत तसेच वेगवेगळ्या विषयांवरचे निघणारे बडगे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. “इडा-पिडा, रोगराई घेऊन जा रे मारबत!” अशा घोषणांनी संपूर्ण शहरभर मारबतची मिरवणूक काढली जाईल. विविध विषयांवर निघणारे बडगे हेच या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.






