- संपत मोरे
रात्रीच्या गडद अंधारात ती निघाली होती. तिच्यासोबत होता, एक तरुण. तिचा मानलेला भाऊ. ती सरकारविरोधी काम करून आलेली. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणं तिच्यासाठी धोक्याचं होतं. ती रस्त्यावर दिसली, तर तिची रवानगी थेट तुरुंगातच होणार होती. म्हणून त्यांनी आडवाट धरली होती.
आडवाटेने जाताना त्या दोघांना काही मासेमार भेटले. त्यांना यांनी सगळं खरं सांगितलं. मग त्या मासेमार लोकांनी मांडवी नदी पार करण्यासाठी त्यांना मदत केली. नदी पार करण्यासाठी रॉकेलचे रिकामे डबे दोरीने बांधले आणि साखळी बनवली. त्या साखळीमुळे त्यांना नदी पार करता आली. अलीकडे आल्यावर मात्र तिच्यासोबत असलेल्या भावाला तिचा अभिमान वाटला. तो भाऊ गहिवरला. त्याचं कारण, असं होतं ती लेकुरवाळी होती, तिचं मूल पाळण्यात होतं. त्या मुलाला सोडून ती आली होती…
क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांनी हा रोमहर्षक प्रसंग अनेकदा सांगितला आहे. या प्रसंगातील ती म्हणजे त्या स्वत: आणि तो म्हणजे, थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड...
त्या वेळी इंग्रजांची राजवट होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात जे प्रतिसरकार उभा राहिलं, त्या प्रतिसरकारच्या सैनिकांना जी शस्त्र लागायची ती गोव्यातून आणली जायची. या कामांसाठी काही मोजकेच क्रांतिकारक सक्रीय असायचे. बाळ जोशी त्यापैकीच एक. त्यांना एकदा शस्त्र आणताना पोलिसांनी अटक करून गोव्यात जेलमध्ये ठेवले. बाळ जोशी यांच्यासारखा माणूस जेलमध्ये राहणे. हे चळवळीला परवडणारे नव्हते. मग त्यांना जेलमधून सोडवण्याची मोहीम जी. डी. बापू यांनी आखली. या मोहिमेची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना काही सूचना द्यायच्या होत्या, या कामांसाठी माणूस शोधला जावू लागला.
नाना पाटलांनी हौसाला कवटाळून हंबरडा फोडला…
प्रतिसरकारमधील लोक भन्नाट होते, त्यांच्या कल्पनाही आगळ्यावेगळ्या होत्या. मग त्याच कल्पनेतून एक गोष्ट पुढे आली. जी डी बापूंसोबत हौसाक्का यांनी गोव्याला जायचं. तिथे बाळ जोशी यांची बहीण म्हणून जेलमध्ये त्यांना भेटायचं आणि त्यांच्या सुटकेची मोहीम सांगायची. त्यांना भेटीसाठी जेवढा वेळ मिळेल, तेवढ्या वेळात ही कामगिरी फत्ते करायची, असे ठरले. मग नानांनी हौसाक्काला हे सगळं सांगितलं. पण हौसाक्का याचं मूल लहान असल्यामुळे त्यांनी नकार दिला, तेव्हा नाना म्हणाले, ती जाणार नसेल तर राहू द्या, पण ती माझी मुलगी आहे, असं तिनं वागावं. नानाचं ते बोलणं ऐकून हौसाताईला वाईट वाटलं आणि जीवावर धोंडा ठेवून, ती या मोहिमेत जायला तयार झाली. छोट्या बाळाला तिने आत्याजवळ ठेवलं.
(हौसाबाईंचे वडील, क्रांतीसिंह नाना पाटील)
ती बापूंसोबत गोव्याला गेली. जेलमध्ये गेल्यावर मिळालेल्या वेळात जोशी यांना सुटकेचा प्लान दिला. जोशी यांची साधीभोळी बहीण समजून पोलिसांनी त्यांना बोलायला वेळही दिला. या वेळातच या सख्ख्या नाही पण पक्क्या बहिणीने भावाच्या सुटकेचा रस्ता दाखवला. यानंतर जोशी जेलमधून बाहेर पडणार आणि मग पोलिसांनी नाकेबंदी केली, तर ते हौसाताईला नक्कीच ओळखतील म्हणून, त्यांनी आडवाटेने प्रवास सुरु केला.
या प्रवासाची कहाणी रोमहर्षक आहे. स्वत:च्या लहान बाळाला घरी ठेवून आलेली हौसाताई, तिचा अनवाणी पायाने झालेल्या दहा बारा दिवसांचा प्रवास, मांडवी नदीच्या खाडीतील तिची उडी ही सगळी कथा ताईंकडून ऐकताना एखादा चित्रपट पहातोय, असंच वाटत रहातं. या मोहिमेनंतर हौसाताई परत आल्यावर नाना पाटील यांनी आपल्या मुलीला कवटाळून हंबरडा फोडला होता. हा प्रसंग सांगताना हौसाताई गहिवरायच्या…
'...अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली'
पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम त्या काळात हौसाताई करायच्या. "सांगली जिल्ह्यातल्या भवानी नगर इथल्या ब्रिटीशांच्या पोलीस ठाण्यातील शस्त्र लुटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपण्यात आली होती. दिवसाढवळया शस्त्र लुटणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं. पण मला हे काम फत्ते करायचं होतं. बरोबरच्या सहकाऱ्यांना कुणी काय करायचं याची जबाबदारी समजावून सांगून मी माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांना घेतलं आणि पोलीस ठाण्याच्या आवारात गेले.
माझ्या सहकाऱ्यानं माझा भाऊ असल्याचं नाटक करत मी सासरी नांदायला जात नाही म्हणून मला मारहाण करायला सुरुवात केली. माझा भाऊ गालावर चापटी, पाठीत धपाटे घालत मला नांदायला जा म्हणून सांगत होता. आमच्या दोघांच्या वादावादीचं नाट्य पोलीस ठाण्याच्या समोर चांगलंच रंगात आलं. शेवटी मी काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर माझ्या भावानं रागानं माझ्या डोक्यात मारण्यासाठी म्हणून मोठा दगड उचचला अन् तेवढ्यात आतले दोन पोलीस त्याला थांबवण्यासाठी बाहेर पळत आले. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे बाकीचे सहकारी तेथील बंदुका आणि काडतुसं घेऊन फरार झाले. मात्र तरीसुद्धा हा कट आम्ही रचला होता हे पोलिसांच्या लक्षात आलं नाही. अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली."
अशा या शूर बाईची गोष्ट इथेच थांबत नाही. स्वातंत्र्य मिळालं. पण स्वराज्य आलं का? असा प्रश्न विचारत क्रांतिसिंह नाना पाटील हे पुन्हा गरीब शेतकरी कष्टकरी लोकांसाठी लढत राहिले. सत्तेच्या जवळ न राहता गावोगावी जावून लोकांना जागे करत राहिले. ‘आम्हाला वाटत हुत’ इंग्रज गेल्यावर गरिबांचं राज्य यील, पण कुठलं? आता गरिबांच्या राज्यासाठी लढावं लागेलं.’ असं म्हणत, ते मैदानात उतरले. मग त्यांचे जावई आणि ताईचे पती भगवानराव पाटील यांनीही शेतकरी कामगार पक्षाचा रस्ता धरला.
(क्रांतीसिंह नाना पाटील यांना ओवाळताना)
प्रस्थापित राजकरणी मंडळीकडून येणाऱ्या आमिषांना धुडकावून त्यांनी व ताईनी लोकांच्या बरोबर राहायचं ठरवल. गावोगावी कार्यकर्त्यांची फळी बांधून त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर लढे उभे केले. त्या सगळ्या लढ्यात अग्रभागी राहिल्या. रस्त्यावरच्या लढाईसोबत रात्री अपरात्री थकून येणाऱ्या कार्यकर्त्यांना उठून भाकरी करून देताना त्या सगळ्याच्या आक्का झाल्या. मोर्च्यापुढे भाषण करणारी आक्का आणि लाडक्या भावाना पिठलं-भाकरी करून घालणारी आक्का, ही आक्काची रूपं अनेकांनी पहिली आहेत.
‘’ही पोरं काय दरोडेखोर वाटली तुम्हास्नी, पुन्हा त्यांच्या वाटला जावू नका’’
काही वर्षापूर्वी सगळीकडे दुष्काळ पडला होता, तेव्हा माणसं सैरभैर झालेली आणि जनावर चाऱ्याविना तडफडत होती. त्याच वेळी मंत्रीमहोदय शासकीय इमारतीचे उद्घाटन करायला आले होते. ताई तिथे पोहोचल्या आणि जोरात घोषणाबाजी केली...
“लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. माणस मेटाकुटीला आल्याती आन् तुम्ही नारळ फोडायला. आलाय?” ताईचा तो रुद्रावतार पाहून सगळे लोक हबकले.
मंत्रीमहोदयांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यांनी ताईना तुमचं सगळं ऐकतो असं नम्रपणे सांगितले आणि शेवटी ताईनाच शासकीय इमारतीचे उद्घाटन करण्याचा आग्रह केला. ताई म्हणाल्या,
‘तुम्ही आमचीच पोर हायसा म्हणून बोललो, रागाला येवू नका. लोकांना इसरू नका. मला म्हातारीला आता कशाला लढायला लावताय?’ अशा रितीने तो प्रसंग पार पडला…
संबंधित लेख वाचा: 1) संत सोयराबाईसारख्या आद्य सामाजिक क्रांतीकारक का दुर्लक्षित राहतात? |
वयाच्या 96 व्या वर्षी 2021 मध्ये ताईंनी शेवटा श्वास घेतला. पण नव्वदीतही ताई गप्प राहिल कशी? जिथे अन्याय तिथे ताई जायची. शेतकऱ्यांचा संप झाला. त्याकाळात सांगली जिल्ह्यातील शेतकरी संपाचे पुढारपण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस त्रास द्यायला लागले. दमबाजी करायला लागले.रात्रीचं पकडून न्यायला लागले. त्यामुळे कार्यकर्ते रात्री घरी जाईनासे झाले. पैपाहुणे, मित्र यांच्या घरी मुक्कामी राहू लागले. काही जेष्ठ कार्यकर्त्याना पोलिसांनी मारहाणही केली. आंदोलन करणारे कार्यकर्ते चोरांनी लपून रहावे, तसे राहू लागले. नव्वदीत असणाऱ्या ताईला ही गोष्ट कळली.
“बापूसाब गाडी काढा” त्यांच्या मुलाला ताई म्हणाली.
ताईनी प्रशासकीय यंत्रणेला, पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला “आर, काय करताय तुम्ही. ही पोरं काय दरोडेखोर वाटली तुम्हास्नी. याद राखा.पुन्हा त्यांच्या वाटला जावू नका.सरकार हाय का भिताडं?” थेट ताईच आल्यामुळे त्यानंतर आंदोलकांच्या मागचा पोलिसी ससेमिरा थांबला.
(हौसाबाई (उजवीकडे) यशोदाबाई (डावीकडे) आणि राधाबाई (मध्यभागी) या त्यांच्या जावांसोबत.)
मोठ्या माणसांच्या वारसाची तुलनाही त्याच्यासोबत केली जाते. ‘क्रांतिसिंह नाना पाटील यांची लेक’ ही ओळख सिद्ध करण्यासाठी ताईंनी खूप खस्ता खाल्ल्या. अनेकवेळा धोका पत्करून लढाईत भाग घेतला. वांगीची कचेरी पेटवणं असो कि भवानीनगर येथून पोलिसांच्या बंदुका पळवणं असो या थरारक मोहिमा ताईंनी गाजवल्या आहेत. आईचं छत्र लहानपणी हरपलेलं, वडिलांच्या पाठीशी कायम पोलिसांचा पाठलाग असायचा त्यामुळे त्यांचा सहवास लाभला नाही. आजीने संभाळलं. त्याही हलाखीच्या वातावरणात वाढलेली ताई आयुष्यभर खंबीर राहिली.
शेवटचा श्वास घेईपर्यंत शेकापमध्येच…
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील तिचा सहभाग असो, किंवा ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशी मागणी करत तहसीलदार कचेरीवर काढलेला बैलगाडी मोर्चा असो, ताई लढत राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सत्याग्रह करताना तिला तुरुंगवासही पत्करावा लागला. तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून शेवटचा श्वास घेईपर्यंत ती त्याच पक्षात राहिली. भले भले मार्क्सवादी पंडित प्रस्थापितांच्या वळचणीला गेले. मोठे झाले. पण ताईने तरुणपणात खांद्यावर घेतलेला शेकापचा लाल बावटा शेवटपर्यंत सोडला नाही. तिचा मार्क्सवादाचा अभ्यास नव्हता, तिला त्यातील बोजड भाषा वाचताही येत नव्हती. आणि वाचली तरी तिला ती समजणारही नव्हती.
मार्क्सवाद कोळून पिलेल्या बहाद्दरांनी सत्तेच्या जवळ जाण्याच्या व्यवहारवाद पत्करला, पण ताई मात्र नवऱ्यानंतरही शेकापची कार्यकर्ती म्हणून लढत राहिली. तिने फारशी पुस्तकं वाचलेली नाहीत, पण तिचं जगणं पुस्तकाचा विषय बनलं आहे. पुस्तकाचा विषय असणारी हौसाताई विजापूर - कराड या राज्यमार्गावर विट्यापासून चौदा किलोमीटर असलेल्या हनमंतवडीये उर्फ धाकलं वडव या गावात रहायची. आजही जाताना ती दारात बसलेली असल्याचा भास येणाऱ्या-जाणाऱ्यांना होतो. पावलं आपोआप तिकडे वळतात, कारण इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकीलाही, न घाबरणारी, ही ताई म्हणजे एक सळसळती उर्जा होती.
(साभार : मुलुखमाती - लेखक संपत मोरे)






