(ज्योती कुमारी)
अलिकडील एका अहवालात असं दिसून आलंय की, फेब्रुवारी 2025 हा मागील 125 वर्षांतील सर्वांत उष्ण फेब्रुवारी महिना होता. सध्या हवामान बदल आणि पर्यावरणीय विध्वंसामुळे कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य धोक्यात आलं आहे. प्रचंड उष्णतेमुळे काम करताना त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता दोन्हींवर विपरीत परिणाम होत आहे. परिघावर राहणाऱ्या लोकांना हवामान बदलाचे परिणाम जास्त भोगावे लागतात ज्यांच्यासाठी सुखकर स्थितीत राहणं शक्य नसतं.
घरगुती आणि रोजंदारी कामगार हवामान बदलांप्रति अधिक संवेदनशील असतात. पण आर्थिक लाचारीमुळे त्यांना कष्टाच्या आणि अमानवीय परिस्थितीतही काम करावं लागतं. प्रचंड उष्णतेमुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यात हीट-स्ट्रोक, हीट-क्रॅम्प, ह्दय रोगाच्या समस्यांचा समावेश होतो. यापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांची सुरक्षा निश्चित करणे आणि धोरणात्मक उपायांची गरज आहे. शरीराचे सामान्य तापमान हे 37 डिग्री सेल्सियस असते आणि 38 डिग्री सेल्सियस पेक्षा ते वाढलं तर मानसिक व शारिरीक अडचणी वाढू लागतात. मुले, स्त्रिया आणि कामगारांना याचा जास्त त्रास होतो. स्त्री कामगार आणि ज्या उष्ण वातावरणात काम करतात त्यांना आरोग्याच्या समस्या जास्त जाणवतात.
हवामान बदलाचा परिणाम परिघावर राहणाऱ्या लोकांना अधिक त्रासदायक
उत्तर प्रदेशच्या 30 वर्षीय ज्योती दिल्लीत घरकामगार आहेत. त्या सांगतात, “मी दिल्लीत 13 वर्षांपासून राहत आहे. पण पहिल्यांदाच मार्च महिन्यातच जूनप्रमाणे गरमी जाणवली. मी दिल्लीत आले तेव्हा काम करण्याशिवाय मला पर्याय नव्हता. जास्त न शिकल्यामुळे नोकरी मिळणं कठीण होतं. पण मला स्वयंपाक करता येत होता. मी यालाच व्यवसायाचं रुप दिलं ज्यामुळे कुटुंबासाठी काही पैसे जमवता येतील. माझ्या कुटुंबात बाकीचे लोकही लहानमोठ्या नोकरीवर आहेत त्यामुळे घरखर्चात सर्वांचं योगदान असतं. सध्या माझ्यासाठी मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे. कारण कमी शिक्षणाचे परिणाम मला चांगले माहिती आहेत. मी सकाळी 6 वाजता घराबाहेर पडते आणि दुपारी 12 पर्यंत परत येते. दिल्लीचं वातावरण आता खूप खराब झालंय. घराबाहेर पडताच तीव्र उष्णतेमुळे चेहरा तापू लागतो. मार्चमध्येच मे-जूनची गरमी आल्यासारखं वाटतंय. काम वेगवेगळ्या ठिकाणी असतं त्यामुळे धावपळ होते. गॅससमोर उभं रहावं लागतं त्याची उष्णता आणखी जाणवते. पण पर्याय नाही. त्यामुळे करावंच लागतं.”
भारत हा उष्णतेच्या बाबतीत फार संवेदनशील प्रदेश आहे. उष्ण रात्री आणि दिवसांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 2050 पर्यंत यांची संख्या दुप्पट ते चौपट होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच उष्णतेच्या लाटा येत आहेत, जास्तकाळ टिकत आहेत आणि त्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वांधिक फटका मजूरांना बसणार आहे.
दिल्लीच्या 40 वर्षीय प्रियंवदा या रोजंदारीवर काम करतात. त्या बांधकाम मजूर आहेत. त्या म्हणतात, “ऊन आहे पण काम न करण्याचा बहाणा करता येत नाही. काम केलं नाही तर घर कसं चालणार? त्यामुळे जे काम मिळेत ते करत राहते. दिल्लीत आता मला 20 तरी वर्षँ झाली आहेत. पण इतकी गरमी कधी पडल्याचं आठवत नाही. आतातर वाटतं की काम करता करता शुद्ध हरपेल की काय म्हणून.
इतकं काम करूनही इतके पैसे मिळत नाही की एक खोली घेऊन राहू शकेन. त्यामुळे झोपडीत रहावं लागतंय. पंखा चालवला तर त्यातून गरम हवा येते आणि अनेकदा वीजही नसते. पण करणार काय? अनेकदा रात्रीची झोप लागत नाही. घरी कोणालाच पक्की नोकरी नाही. त्यामुळे निश्चित उत्पन्न नाही. अशा गरमीत रहाणं कठीण आहे. पण लाचारी आहे. आत्ताच मार्च इतका तापलाय अजून पुढे काय होईल काय माहिती.”
संबंधित लेख वाचा: 1) COP 28 परिषदेचा अहवाल, 2011 ते 2020 आतापर्यंतचे सर्वात उष्ण दशक… |
तीव्र उष्णतेमुळे तब्बल 167.2 अब्ज श्रम तासांचे नुकसान
एका अहवालानुसार, उष्णतेमुळे, 2021 मध्ये भारतात 167.2 अब्ज श्रम तासांचं नुकसान झालं होतं. ज्यामुळे देशाच्या जीडीपी मधील 5.4 टक्के उत्पन्नावर प्रभाव पडला. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या जागतिक अहवालानुसार बदलतं हवामान कामगारांच्या आरोग्यावर व सुरक्षेवर परिणाम करतं. शेतकरी, रोजंदार मजूर यांना याचा जास्त धोका आहे. वाढत्या गरमीत काम करणं त्यांना कठीण जात आहे. त्यामुळे उत्पन्न कमी होत आहे आणि आरोग्याचे धोके वाढत आहेत.
राजस्थानच्या 50 वर्षीय सुलताना ज्या दिल्लीत कचरा वेचण्याचं काम करतात, त्या सांगतात, “वाढत्या गरमीत काम करणं फार कठीण आहे. पण लाचारी आहे. नाहीतर दिवसाची मजूरी कापली जाते. घरी माझी काळजी घेणारं कोणी नाही. त्यामुळे रोज काही पैसे कमावण्याचा प्रयत्न असतो. ज्या दिवशी कमाई नाही, त्या दिवशी जेवण करणंही कठीण होतं. कामामुळे मोकळ्या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे त्रास जास्त वाढतो. गरमी आणि गरमीत काम करणं फार त्रासाचं जातं. अनेकदा कामासाठी दूरवर जावं लागतं. कुठंतरी सावलीत बसायची इच्छा होते पण दिल्लीत सावली मिळणं कठीण झालंय. अनेकदा चक्कर येऊन पडले आहे.”
एका अहवालानुसार 2024 मध्ये भारतात सर्वांत दीर्घ उष्णता लाट आली होती. उत्तर प्रदेशात 1 मार्च ते 9 जून दरम्यान 20 दिवस उष्णतेची लाट होती. या दरम्यान 110 लोकांचा हीट-स्ट्रोकमुळे मृत्यू ओढवला होता. 40 हजारांहून जास्त लोकांना उष्णतेचा त्रास झाला होता. कामाशी संबंधीत तसेच उष्णतेशी संबंधीत मृत्यूंचा आधिकारीक डेटा उपलब्ध नाही. पण माध्यमांच्या वृत्तांतानुसार दिल्ली व उत्तर प्रदेशात अनेकांचा यामुळे मृत्यू झाला होता.
हिट एक्शन प्लॅनचा गरिबांना काय फायदा?
याचा सर्वाधिक परिणाम परीघावरील रोजंदारांवर जास्त होतो. विश्व बँकेच्या 2022 च्या अहवालानुसार 2030 पर्यंत भारतात 16 ते 20 कोटी लोकांवर उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे आरोग्य आणि जगण्यावर गंभीर परिणाम होतील. उत्तर प्रदेशच्या 40 वर्षीय नैना, ज्या आता दिल्लीत यमुनेच्या काठावर शेती करतात त्या सांगतात, “दहा वर्षांपूर्वी मी दिल्लीत कामासाठी आले होते. पण काम मिळणं कठीण होतं. मग इथं यमुनेच्या काठावर झोपडीत राहून शेती करू लागले. त्यातूनच उत्पन्न मिळतं. घरी नवरा आणि दोन मुलं आहेत आणि त्यांचा सांभाळ मलाच करावा लागतो. बदलत्या वातावरणामुळे आमच्या आरोग्यावरच नाहीतर शेतावरही परिणाम होत आहे. अति गरमी, अति पाऊस आणि अति थंडी यामुळे पिक उध्वस्त होतं. उत्पन्न कमी होतं. वाढत्या गरमीत काम करणं कठीण जात आहे पण कुटुंबासाठी करावं लागतं काम. शेती करणं काही सोपं काम नाही. सारा दिवस उघड्या आकाशाखाली बसून पिकांची देखभाल करावी लागते. जनावरांवर लक्ष द्यावं लागतं. शेतीची सफाई, खत टाकणं, पाणी देणं सारंच गरजेचं असतं. वाढत्या गरमीत ही कामं अधिक त्रासदायक होतात.”
भारतात वाढत्या गरमीचा घरगुती व रोजंदारी स्त्री कामगारांवर सर्वांधिक परिणाम होत आहे. त्यांना असुरक्षित आणि असंघटीत ठिकाणी काम करण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात काही शहरात हिट एक्शन प्लॅनिंग केलं जात आहे. पण या योजना परीघावरील स्त्रियांच्या आवाक्यातल्या नाहीत. त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतही नाहीत. देशातील गरमीशी संबंधीत अडचणी सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाय करण्याची गरज आहे.
कामाच्या ठिकाणी पिण्याचं थंड पाणी, आरामासाठी सावलीची व्यवस्था आणि फर्स्ट-एडची सुविधा गरजेची आहे. आरोग्य विमा तसेच आकस्मिक वैद्यकीय मदत पुरवणं गरजेचं आहे. येत्या काळात याविषयी गांभीर्यानं मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे अन्यथा गरीब लोकांना जगणं आणि काम करणंही कठीण होऊन बसेल.






