(रितू)
रामायणावर आधारीत मौखिक आख्यानांनुसार, मिथिलाधिपति राजा जनक याने आपली मुलगी सीता हिच्या रामासोबतच्या विवाहाच्या वेळी मिथिलेतील महिलांना असा आदेश दिला की, त्यांनी संपूर्ण राज्याला चित्रांनी रंगवून टाकावं. त्यानुसार त्या महिलांनी गायीचं शेण आणि नैसर्गिक रंगांचा उपयोग करून आपआपल्या घराच्या भिंती सुंदर चित्रांनी रंगवून काढल्या. या चित्रांची ओळख मधुबनी शैलीची चित्र अशी केली जाते.
मात्र या आख्यायिकेत त्या महिलांची जात कोणती होती त्याचा सुगावा लागत नाही. मधुबनी चित्रकलेवर सुरुवातीपासूनच तथाकथित उच्च जातींचा एकाधिकार राहिला आहे. परंतु 1960 च्या दशकात बिहारमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे या कलेला व्यवसायात बदलून टाकलं. त्यानंतर दलित आणि अतिमागास जातीजमातींमधील स्त्रियांनीही ही कला आपलीशी केली आणि त्यावर त्यांनी त्यांचा विशिष्ट ठसाही उमटवला.
1960 च्या दशकाच्या पूर्वार्धात बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. भूख आणि गरीबी यांचाच सगळीकडे सुकाळ होता. तत्कालीन शासनाने दुष्काळ मदत योजनेअंतर्गत दलित वंचित लोकांना शेतीवगळून अन्य व्यवसायांमध्ये जगण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान राबवलं. याच अभियानातून मुंबईतील कलाकार भास्कर कुलकर्णी यांनाही 50 हजार रुपयांची मदत मिळाली होती.
भास्कर कुलकर्णी यांनी बिहारमधील विविध जागांचा दौरा केला. यातच त्यांना मधुबनी जिल्ह्यातील दक्षिण-पूर्व भागातील जितवारपूर गावात मातीच्या भिंतींवर लोककथांवर आधारीत रंगवलेली चित्रं दिसली. नैसर्गिक रंगांनी सजवलेल्या या चित्रांच्या सौंदर्याने प्रभावित झालेल्या कुलकर्णींनी गावातील महिलांना चित्रं कागदावर काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या महिलांची ही चित्रं नंतर 1962 मध्ये दिल्लीत आयोजित एका औद्योगिक प्रदर्शनात ठेवण्यात आली आणि 5 ते 35 रुपये दरांनी विकण्यात आली.
त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशा पद्धतीने एक कला व्यवसायात बदलली, गावातील त्या गरीब महिलांना जगण्याचं एक साधन मिळालं आणि जगासमोर त्यांची प्रतिभाही आली. पण सर्वच जातींमधील बायकांना समानपणे ही संधी लाभली होती का? त्या सर्वांमध्येच आपल्या प्रतिभेच्या जोरावर पैसा कमावण्याची क्षमता होती का?
‘हरिजनी’ पेंटिंग
वूमेंस आर्ट जर्नल, वर्ष 11, अंक 1 (वसंत-ग्रीष्म 1990) मध्ये प्रकाशित झालेल्या, ‘द नैरेटिव पेंटिंग्स ऑफ़ इंडियाज जितवारपुरी वीमेन’ या लेखात, जगदीश जे. चावला लिहितात की, “मधुबनी चित्रांमध्ये मुख्यतः ब्राह्मण, कायस्थ आणि दुसाध जातींच्या महिला असतात. ब्राह्मण आणि कायस्थ जातीच्या महिलांच्या चित्रांमध्ये एक निश्चित अशी अभिव्यक्ती दिसून येते. त्यांच्या चित्रांमध्ये दुर्गा, काली, गणेश, राम-सीता कथा, शिव-पार्वती विवाह असे विषय दिसतात.
दुसरीकडे, ‘हरिजनी’ चित्रांमध्ये जी दलित आणि अन्य मागास जातीतील महिलांनी काढलेली होती, त्यांत दुसाध जातीची संख्या जास्त आहे. या चित्रांतील विषय हे रोजच्या जगण्याशी संबंधित असतात. त्यांत बकरी, मोर, हत्ती, आणि अन्य प्राणी दिसतात. स्वयंपाक करणाऱ्या महिला दिसतात. या महिला त्यांच्या जातीतील लोकनायक जसे राजा सलहेस, राहु-केतु यांची चित्रं काढतात. पण त्यांच्या जातीमुळे त्यांना हिंदू देवी-देवतांची चित्रं काढण्याची मनाई होती का? की त्या आपल्या मनानेच असं करतात?”
संबंधित लेख वाचा: 1) एमएफ हुसेन… प्रश्न चित्रांचा आणि कलावंताच्या स्वातंत्र्याचाही नाही. धर्माचे राजकारण करू पाहणाऱ्या टोळीबाज पुढाऱ्यांचा आहे! |
हिंदू देव-देवतांची चित्रं काढण्यास दलितांना मनाई
शांती देवी या मिथिलेतील दुसाध जातीमधून आहेत आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मधुबनी चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘फोकार्टोपीडिया’ सोबत दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली गृहिणी ते चित्रकार या प्रवासाची माहिती दिली आहे. त्या सांगतात की, एका दलित जातीत जन्म झाल्यामुळे त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नाही. लहानपणी उच्च जातीतील मुलेमुली शाळेत शिकायला जात तेव्हा त्यांनाही शाळेत जायची इच्छा व्हायची.
मात्र त्यांच्या शेतमजूर आईची कमाई शाळेचा खर्च करण्याइतपत नव्हती. शिवाय दलितांनी शिकण्यावर जी बंधनं होती, ती तोडण्याचीही त्यांच्या आईची हिम्मत नव्हती. पण या सगळ्या अडचणींवर मात करून शांती देवी शाळेत गेल्याच. तिथे त्यांना जातीभेदाला सामोरं जावं लागलं. त्यांचे शिक्षक अस्पृश्यतेवर विश्वास ठेवणारे होते, त्यामुळे या मुलीला ते इतरांपासून दूर बसवायचे. उच्च जातीचे शिक्षक त्यांचा सर्रास अपमान करायचे.
या सर्व अडथळ्यांना बाजूला सारून शांती देवी शेवटी मॅट्रीक झाल्याच. पण लवकरच त्यांचं लग्न उरकण्यात आलं. त्या 15 वर्षांच्या होत्या. त्यांच्या नवऱ्याकडे ना स्वतःचं चांगलं घर होतं ना खाण्यापिण्याची काही व्यवस्था.
शांती देवींनी आपल्या आईला घराच्या भिंतींवर चित्रं काढताना पाहिलं होतं. त्यांचे सासरेही चित्रकार होते. मात्र शांती देवींना याची कल्पना नव्हती की चित्र काढून पैसेही कमावता येतात. त्यांना वाटलंही नाही की त्या कधीकाळी व्यावसायिक चित्रकार होतील. लहेरियागंज या त्यांच्या गावात त्यांच्या चित्राला कधीच मान्यता प्रशंसा लाभली नाही. कलेवर तिथल्या उच्च जातीच्या लोकांचा अधिकार होता. पण नशिबानं एक अमेरिकी शोधार्थी त्यांच्या गावात आला आणि त्यांची चित्रं पाहून तो प्रभावित झाला. त्यांची प्रतिभा ओळखून त्यानं शांती देवीला प्रोत्साहन दिलं.
मधुबनी चित्रकला शैली त्यांनी का स्विकारली यावर त्या म्हणतात की दलितांना हिंदू देवी-देवतांची चित्रं काढण्याची मनाई होती. त्या सांगतात की एकदा त्यांना एका म्हाताऱ्या ब्राह्मणाने चित्रं काढताना अडवलं आणि त्यांच्या नवऱ्यालाही धमकी दिली की त्यांच्या बायकोनं काली, दुर्गा, शिव-पार्वती अशी चित्रं काढली तर त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील.
त्यामुळे शांती देवींनी गावातील झाडं, प्राणी, रोजच्या जगण्याचे विषय चित्रांसाठी निवडले. त्यांच्या जातीतील नायक राजा सलहेस, मचर्कंद, मैना सती यांचीही चित्रं काढायला सुरुवात केली. शांती देवी सांगतात की गावात जर कोणी मधुबनी चित्रकलेची माहिती घेण्यासाठी आलं तर त्याला गावातील उच्च जातीचे लोक त्यांच्या जातीच्या चित्रकारांकडेच पाठवायचे. दलितांना या कलेतून वगळण्यातच यायचं.
शांती देवी - ‘’ट्रॉफी ठेवायला घरच नाही, हा पद्मश्री पुरस्कार परत घ्या…’’
शांती देवी यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपतिंना परत केला आहे. त्या वेळी त्यांनी लिहिलं की, “माझ्याकडे हा पुरस्कार ठेवण्यासाठी चांगलं घर नाही. मग याचं मी काय करणार?” सरकारला त्यामुळे झटका बसला आणि त्यांना घरासाठी 62 हजार रुपयांचं अनुदान देण्यात आलं. त्यामुळे गावातील उच्च जातीच्या लोकांच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या.
(शांती देवी)
त्यांनी त्यांचा राग शांती देवींचं घर बांधण्यात अडथळे आणून काढला. शांती देवी यांच्या कथेतून हे स्पष्ट होतं की जगण्याच्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच, कलेचं क्षेत्रंही जातीय भेदभावातून मुक्त नाही. त्या सांगतात, लोक आजही अस्पृश्यता पाळतात. आजही दलितांच्या संधी उच्च जातीचे लोक हिसकावून घेतात. त्या नाराजी व्यक्त करतात की 1980 पासून आजपर्यंत मधुबनी चित्रकलेच्या अनेक प्रदर्शनी भरवल्या मात्र अधिकाऱ्यांनी याची माहिती दलित चित्रकारांना होईल यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. अनेक दलित चित्रकार अशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना प्रदर्शनीच्या जाहिराती वाचताही येत नाहीत.
दुलारी देवी : मजूर ते चित्रकार
दुलारी देवी यांनी ‘सिराक्युज आर्ट्स सायंसेस चॅनेल’ सोबत बोलताना आपल्या संघर्षाची कथा सांगितली. त्या मछुआरा या अतिमागास जातीतून येतात. एका उच्च जातीच्या चित्रकाराच्या घरी त्या मोलकाम करायच्या. घरातील बायकांना चित्रं काढताना बघून त्यांनाही चित्रं काढायची इच्छा झाली. पण तसं सांगण्याची त्यांची बराच काळ हिम्मत होईना. शेवटी धीर धरून एक दिवस त्यांनी घरातील मुख्याला सांगितलं की त्यांना एखाद्या कला केंद्रात जाऊन चित्रकला शिकायची आहे.
(दुलारी देवी)
कुटुंब चांगल्या विचाराचे होते. त्यांनी दुलारी देवींना मदत केली. पण इथं हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना स्वतःच्या बळावर मात्र हे करता आलं नाही. त्यासाठी त्यांना एका उच्च जातीच्या कुटुंबाचीच मदत घ्यावी लागली. दुलारी देवी आता एक तज्ञ चित्रकार आहेत आणि ‘मिथिला आर्ट इंस्टिट्यूट’मध्ये प्रशिक्षक आहेत. त्यांना 2013 च्या बिहार सरकारच्या उत्कृष्ट कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या पहिला मैथिली चित्रकार आहेत ज्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. ‘फॉलोइंग माय पेंट ब्रश’ (तारा बुक्स, 2010) या आत्मचरित्राला पुरस्कारही लाभले आहेत.
शांती देवी आणि दुलारी देवी यांच्या अनुभवातून असं स्पष्ट दिसून येतं की दलित, मागास जातीतील कलाकारांना आजही आपल्या कलेतून रोजगार करण्याची संधी सहजपणे उपलब्ध होत नाही. पारंपरिक मान्यतेनुसार उच्च जातीय महिलाच मधुबनी चित्रकार होतात आणि दलित मागास महिलांना जगण्यासाठी लैंगिक किंवा जातीय व्यवसाय करावे लागतात. आर्थिक अडचणींमुळे त्या अन्य व्यवसायाकडे वळू शकत नाहीत. वळल्या तरी त्यांत उच्च जातीय लोक अडथळे आणतात.
आपलं वर्चस्व कायम ठेवू पाहतात. आज अनेक दलित बहुजन मागास महिला, शांती देवी, दुलारी देवी यांच्यापासून प्रेरणा घेऊन मधुबनी चित्रकार होण्यासाठी उत्सुक आहेत. मधुबनी चित्रकलेची नवी शैली ही केवळ एक कला नाही. महिला सशक्तिकरणाचा तो प्रयोग आहे. साधन आहे. या महिलांची ही इच्छा आहे की त्यांनादेखील देशविदेशातील कला प्रदर्शनांमध्ये सहभाग घेता यावा, नाव कमावता यावं. त्यासाठी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. कारण त्यांना माहिती आहे की केवळ पुरस्कारावर पोट भरता येत नाही.






