स्थळ, अमेरिकेतील टेक्सास शहर…
अमेरिकेतल्या डल्लास (टेक्सास) शहरातल्या रस्त्यावर भारतीय लोक पारंपरिक ढोल व नृत्याद्वारे जल्लोषात सण साजरा करत होते. तिथल्या एका स्थानिक अमेरिकन व्यक्तीने या जल्लोषाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने तीव्र संतापही व्यक्त केला... तो म्हणतोय की "हल्ली डल्लासच्या रस्त्यावर हे चित्र नेहमीच दिसू लागलं आहे. आता अमेरिकेने H-1B व्हिसा रद्द करायला हवाय. माझा मुलगा अमेरिकेमध्ये वाढतोय, भारतात नाही. भारतीयांनी अमेरिकन शहरांवर कब्जा केला आहे; संध्याकाळी रस्त्यांवर फिरताना मुंबईच्या रस्त्यांवर चालतोय असं वाटतं."
स्थळ, लंडन…
लंडनमधील थेम्स नदीत एका होडीतून गणेशमूर्ती घेऊन भक्त जात आहेत. त्यानंतर त्यांनी मोठ्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने गणपतीचं विसर्जन केले. हा व्हिडियो बराच व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले. तुम्ही सरळ सरळ पर्यावरणाचा ऱ्हास करत आहात असं म्हटलं आहे. तुम्ही जी मूर्ती विसर्जित करत आहात ती पर्यावरणपूरक आहे का? त्याची खात्री तुम्ही केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले गेले.
एका युजरने म्हटलं आहे तुम्ही अशा पद्धतीने विसर्जन करुन भारतातील नद्या, तलाव आणि समुद्राचं पाणी प्रदुषित केलं आहे, आता तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाणी प्रदूषण करत आहात. त्यापेक्षा घरी टबमध्ये घरगुती पद्धतीने मूर्तीचं विसर्जन करा. पृथ्वी वाचवा, पर्यावरण वाचवा असं म्हटलं. आणखी एक युजर म्हणतो तुम्ही विसर्जन करण्याची ही अत्यंत चुकीची पद्धत अवलंबली आहे. मूर्तीच्या गळ्यातील प्लास्टिकच्या माळा कोण काढणार? थर्माकोलचे दागिनेही पर्यावरणपूरक नाहीत. तसंच रंगही विषारी असतात. ते पाण्यात मिसळल्यावर काय होईल?
जगभरातील लोकं तिथे राहणाऱ्या भारतीयांना का कंटाळले आहेत?
जगभरात भारतीय लोकांना आता तिथले स्थानिक लोक कंटाळलेत. त्यातून भारतीय लोकांना मारहाण होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. गेल्या आठवडयात तर आयर्लंड देशातल्या भारतीय वकिलातीने तिथल्या भारतीय नागरिकांना घराबाहेर पडू नये अशी ॲडवायजरी जाहीर केली. अशा घटना आता जगभर होत आहेत.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, पोलंड, ब्रिटन, स्पेन, ऑस्ट्रिया या देशातही भारतीयांना इथून डिपोर्ट करा म्हणजे भारतात परत पाठवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारतीयांविरुद्ध सामाजिक तणाव, भेदभाव, कधीकधी हिंसा. राजकीय पातळीवर स्थलांतरविरोधी चळवळींना खतपाणी या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत.
संबंधित लेख वाचा:
कॅनडामध्ये 2018 नंतर सर्वाधिक भारतीय विद्यार्थांचा मृत्यू
भारतीय लोकांची संख्या जगभर वाढत चालली आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. परंतु त्याच वेळी परदेशातील स्थानिक समाज भारतीयांविषयी कंटाळलेला आणि अस्वस्थ झालेला दिसतो. यामागची कारणं खूप खोलवरची आहेत आणि त्याचा संबंध केवळ आर्थिक किंवा राजकीय नसून मुख्यत्वे वर्तन, संस्कृती आणि सामाजिक सवयींशी आहे.
…म्हणूनच सुरू होते ‘भारतीयांनो चालते व्हा’ सारखी मागणी
या संदर्भात परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ‘सिविक सेन्स’ आणि सामाजिक न्याय या मुद्द्यावरून सोशल मीडियावर घमासान सुरू आहे. छाया थोरात आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात,’’ शिक्षण नोकरीच्या निमित्ताने भारतीय लोक परदेशात जातात. तिथल्या मूलभूत गोष्टी ज्या तिथल्या स्थानिकांच्या मालकीच्या आहेत त्या शेअर करतात. पण हे शेअरिंग करताना जेंव्हा त्यांच्यात सिविक सेन्स आणि सामाजिक न्याय या दोन मूलभूत गोष्टींचा अभाव दिसतो, तेंव्हा समस्या सुरू होतात.
भारतात या गोष्टी आपण शिकलेलो नसतो, पाळायची सवय नसते. म्हणून मग परदेशातही आपल्याला त्या लक्षातही येत नाहीत. भारतीय लोकांना सामाजिक न्यायाची संकल्पना बिलकुल कळत नाही त्यामुळे परदेशात जाऊन तिथलं होऊन जाणं त्यांना जमत नाही आणि मग भारतीय लोकांचे घेट्टो करून राहणं हेच ते करू शकतात.परदेशातही "लहान लहान भारत" उभे करून वेगळेपणाची जाणीव जपत रहाणं हे भारतीयांचे उद्योग सुरू असतात. फक्त भारतीय लोकांच्यात मिसळून जगतात, पण तिथल्या समाजात मिसळत नाहीत.
‘’सार्वजनिक नियम मोडणं, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं, गोंगाट करणं, रांगेचं पालन न करणं, ट्रॅफिकमध्ये शिस्त न पाळणं हे सवयीने होतं. समानता न पाळणं, जाती-धर्म-लिंग या आधारावर भेदभाव करणं, परदेशातही हे भारतीय गटांमध्ये दिसतं.
रस्त्यांवर मिरवणुकी काढणं, नाचणं, ढोल ताशे बडवणं, तिथल्या स्थानिक संस्कृतीला न जपणं: तिथल्या समाजाचे नियम, प्रथा, लोकांचा "स्पेस" यांचा आदर न करणं. यामुळे तिथल्या सोशली ग्रुम्ड म्हणजे सिविक सेन्स अंगात मुरलेल्या, सार्वजनिक नियम पाळणाऱ्या, सामाजिक न्यायाचा आग्रह धरणाऱ्या, कायद्याने वागणाऱ्या लोकांना भारतीयांचं वर्तन खटकतं. त्यांना वाटतं की हे आपल्या देशात आलेले भारतीय लोक त्यांच्या देशाच्या संस्कृतीला आणि नियमांना तडा देत आहेत. आणि तिथून सुरू होतो संघर्ष "Go Back Indians" किंवा "Deport Indians Back" सारखी मागणी…’’
"मस्त ताई, "तुम्ही आपला वारसा तिथेही चालवत आहात हे पाहून छान वाटलं"
तेजल राऊत ही जर्मनीत राहणारी तरुणी आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ती म्हणते की, फेसबुकवर किंवा इन्स्ट्राग्रामवर आपल्याला अनेक पोस्ट्स/रील्स दिसतात. “You will not believe that this photo isn’t from a city in India but from Germany/England/Canada etc” अश्या आशयाची कॅप्शन असते आणि कुठल्यातरी भारतीय सणाच्या 'सार्वजनिक' सेलिब्रेशनचा फोटो असतो.
मग ती कुठल्या नदीच्या काठावरची आरती/पूजा असो किंवा कुठल्या तळ्यात गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करणं असो किंवा रस्त्यावर चाललेली, ढोलताश्यांच्या आवाजातली मिरवणूक असो. अश्या पोस्ट्सना, रील्सना ढिगाने लाईक्स असतात, "मस्त ताई/दादा", "तुम्ही आपला वारसा तिथेही चालवत आहात हे पाहून छान वाटलं" छाप कमेंट्स असतात.
कमेंट्स करणारे बहुतांशी भारतात राहणारे असल्याने आणि भारताबाहेर राहिले नसल्याने आणि आपली संस्कृती महान आहे हा ठाम विश्वास असल्याने त्यांच्या दृष्टीने भारतीय संस्कृती परदेशी पोहोचतेय हा महत्वाचा मुद्दा असतो. ती पोहचत असताना त्या प्रदेशातली मूळ संस्कृती, शिस्त, जीवनशैली ह्याला धक्का बसतोय का असे प्रश्न बहुतेकांना पडत नाहीत किंवा ते मुद्दे त्यांच्या लेखी गौण असतात.
पण जे भारताबाहेर मायग्रेट झाले आहेत त्यांचं काय? त्यांना ते जिथे मायग्रेट झाले आहेत तिथली संस्कृती, शिस्त, जीवनशैली कशी आहे हे माहित असतं. तरीही ते तिथल्या एकूण नियमांच्या, जीवनशैलीच्या विपरीत का वागत असावेत? लोक 'पैश्यासाठी' भारताबाहेर मायग्रेट होतात असा ढोबळमानाने समज आहे. तो काही अंशी खराही आहे. पण माझ्या मते लोक आर्थिक समृद्धीसाठी भारताबाहेर मायग्रेट होत असले तरी ते जिथे मायग्रेट होतात तिथे कायमचे/लॉन्ग टर्म राहण्याच्या निर्णयामागे त्या देशातील वर्क लाईफ बॅलन्स, स्वच्छ हवापाणी, शांतता हेदेखील deciding factors असतात. मग ज्या गोष्टी नको म्हणून ते भारत सोडून इतर ठिकाणी जातात तिथे त्याच गोष्टी का करतात, असा सवाल तेजल राऊतने केला आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी… सगळीकडून भारतीयांच्या सवयींवर राग
गेल्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये anti-immigrant आंदोलनं/protests सुरु आहेत. X सारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर तर मायग्रंट्स विरोधात वॉर सुरु आहे. अनेक ठिकाणी हे स्पेसिफिक भारतीयांच्या विरोधात आहे. हे का होतंय ह्याची कारणे स्पष्ट आहेत. जेव्हा काहीजणांच्या ‘wrongdoing’ साठी संपूर्ण समाजाला, कम्युनिटीला टार्गेट केलं जातं तेव्हा वाईट वाटतं.
आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहताना अनेक चॅलेंजेस येतात. आपल्याला आपल्याकडे गोष्टी जश्या होतात त्यांची सवय असते, त्या गोष्टी बरोबर की चूक हा भाग अलाहिदा. जर्मनीत राहायला लागले तेव्हा रविवारी वॉशिंग मशीन/vaccum क्लिनर/मिक्सर लावायचे नाहीत, अपार्टमेंट राहत असल्यास रविवारी बाल्कनीत जाऊन मोठ्यामोठ्याने गप्पा मारायच्या नाहीत इत्यादी 'बंधनं' आहेत असं समजलं. ती 'बंधनं' वाटली कारण आपल्याकडे तसं होत नव्हतं.
आपल्याकडे आवाजाची सवय असल्याने हे सगळं अंगवळणी पडायला वेळ लागला. सुरुवातीला ह्या गोष्टी जाचक वाटायच्या. आता ही शांतता अंगवळणीच पडली नाही तर खूप आवडते. पण जेव्हा आवडत नव्हती तेव्हाही रुल्स पाळायचे हे नक्की होतं. कारण ज्या देशात तुम्ही जाता, तिथे तुम्ही तुमची गरज म्हणून जाता आणि तिथल्या रुल्सचं पालन करणं, तिथल्या संस्कृतीत इंटिग्रेट होणं हे व्हायलाच हवं हा कॉमन सेन्स आहे.
संस्कृतीत इंटिग्रेट होणं ह्याचा अर्थ आपले सण किंवा उत्सव साजरे न करणं असा नाही तर त्या त्या ठिकाणच्या नियमांमध्ये बसेल अश्या रीतीने साजरे करणं असा आहे. आपले कुठलेही सण घरच्या घरी किंवा सार्वजनिकरित्या साजरे करायचे असल्यास एखादा हॉल घेऊन व्यवस्थितरित्या सेलिब्रेट करता येतात. त्यासाठी पब्लिक रस्ते, नद्या, तळी वापरून पर्यवरणाला, लोकांना त्रास द्यायची गरज नसते. ह्यातही काही मोठं decode केलंय असं नाही, हा कॉमन सेन्स आहे. तो ही नसावा, असे तेजल म्हणते.
"नॉईज कंप्लेंट" हे भारतीयांच्या कार्यक्रमांशी आता जोडलं गेलयं…
डॉ. गौरी साखरे यांनीही यासंबंधी सोशल मीडियावर भाष्य केले आहे. त्या म्हणतात की, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि शिस्त ही लोकांच्या संस्कृतीतच आहे. तिथे रात्री ठराविक वेळेनंतर शांतता पाळली जाते, आवाज कमी ठेवला जातो. लोकांना कामावरून परतल्यानंतर विश्रांती हवी असते, मुलांना अभ्यास करायचा असतो, वृद्धांना झोप घ्यायची असते. पण भारतीय जेव्हा परदेशात लग्न, वाढदिवस किंवा सण साजरे करतात तेव्हा त्यात लाऊडस्पीकर, डीजे, मोठमोठे गटागट करून नाचगाणी, फटाके हे सगळं आलंच. अशा वेळी शेजाऱ्यांना पोलिसांना बोलावण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे स्थानिक समाजात भारतीयांविषयी तिरस्कार आणि चिडचिड निर्माण होते.
युरोपमध्ये अनेकदा हे दिसून आलं आहे की भारतीय आणि पाकिस्तानी समुदायांनी केलेल्या लग्नांमध्ये रात्रभर गोंगाट झाला आणि शेजाऱ्यांनी तक्रार केल्यावर त्यांना दंड बसला. अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये तर "नॉईज कंप्लेंट" हे भारतीयांच्या कार्यक्रमांशी नेहमी जोडले गेले आहे. जर्मनीसारख्या ठिकाणी तर इतकी शिस्त आहे की रविवारी घरातसुद्धा वॉशिंग मशीन चालवायला शेजाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.
मग अशा समाजात भारतीयांचा डीजे, फटाके आणि नाचगाणी किती विचित्र वाटत असेल? स्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही भारतीय तरुणांबद्दल तक्रारी येतात की ते सार्वजनिक ठिकाणी गटागट करून मोठमोठ्याने बोलतात, गाणी लावतात, बाईकवरून रेस करतात. स्थानिक लोकांच्या दृष्टीने हे असभ्य वर्तन आहे. त्यामुळे नोकरीच्या, घरभाड्याच्या किंवा शेजारच्या बाबतीत भारतीयांना दुय्यम वागणूक मिळते.
भारतातील सण हे प्रत्यक्षात वैयक्तिक श्रद्धेचे विषय आहेत. पण कालांतराने ते रस्त्यावर उतरले. जेव्हा गणेशोत्सव, नवरात्र किंवा इतर उत्सव सुरू झाले तेव्हा गावोगाव मोठे रस्ते नव्हते. त्यामुळे चौकात किंवा मोकळ्या जागेत लोकं एकत्र येत. पण आज लाखो वाहनं, प्रचंड लोकसंख्या आणि आधुनिक शहरं उभी राहिली आहेत. तरीही आपण सण रस्त्यावरच साजरे करतो.
यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांचा वेळ वाया जातो, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अॅम्ब्युलन्समुळे रुग्ण मरतात, शाळेत जाणाऱ्या मुलांना अडथळे येतात. परदेशी लोकांना हे अजिबात पटत नाही की एखाद्या धर्माच्या नावाखाली सार्वजनिक जीवन थांबवावं. त्यांना वाटतं "जर तुम्हाला आपल्या हिंदू राष्ट्रातसुद्धा या गोष्टी त्रासदायक वाटतात, तर मग आम्ही ख्रिस्ती राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्रात राहून हे का सहन करावं?" हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे परदेशात भारतीयांविषयी नकारात्मक भावना वाढत चालल्या आहेत, असे डॉ. गौरी साखरे स्पष्ट करतात.
भारतामध्ये सतत दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा आपल्याला सुद्धा सांगितलं जातं, पाकिस्तानात चालते व्हा म्हणून…तिरस्काराचे हे जे बीज रोवले आहे, याचं हळूहळू झाड व्हायला आणि नंतर वृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे. कालपर्यंत तुम्ही सांगत होता ‘निकल जा देश के बाहर’ मात्र आता जग तुम्हाला सांगतोय की, ‘आमच्या देशातून तुमच्या देशात चालते व्हा’.






