- सुजय शास्त्री
कोल्हापूरनजीकच्या नांदणी गावातील माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणीसंग्रहालयात हलवण्यावरून ऑगस्ट महिन्यात बराच गदारोळ उडालेला दिसला. कोल्हापूर शहर व आसपासच्या खेड्यांमधील हजारो लोक माधुरीच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरलेले सर्वांनी पाहिले. मुक्या जनावरावरचे असे विलक्षण प्रेम पहिल्यांदाच महाराष्ट्राने पाहिले. या निमित्ताने रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अंबानी परिवाराचे जामनगर येथील वनतारा हे प्राणीसंग्रहालयही टीकेचे लक्ष्य ठरले. वनतारामधील गैरव्यवहाराची कुजबूज होऊ लागली. लगोलग सर्वोच्च न्यायालयाने बनतारातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी चार जणांची एसआयटी नेमली. या एसआयटीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्याकडे देण्यात आले.
या एसआयटीने वनताराने अवैधरित्या ताब्यात घेतलेले वन्यजीव, या संस्थेकडून होणारा दुर्मीळ वन्यजीवांचा आंतरराष्ट्रीय व्यापार, स्मगलिंग व आर्थिक गैरव्यवहार यांची सखोल चौकशी केली. तसेच वनताराच्या कारभारासंदर्भात तक्रार करणारे याचिकाकर्ते, नियंत्रक, पत्रकार, तंटानिवाडा करणारे, कायदेशीर तज्ज्ञ यांचेही जबाब नोंदवून घेतले. तसेच वनतारा प्राणीसंग्रहालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कारभाराची पाहणीही केली. एसआयटीची निस्पृहता आणि अंबानीचा प्राणीसंग्रहालयामागचा सद्हेतू ध्यानात घेऊन कोणताही ठप्पा न मारता स्वच्छतेचे प्रमाणपत्र अर्थात क्लीन चीट देऊन टाकली. योग असा अंबानींच्या वनताराला सर्वोच्च न्यायालयाने प्रमाणपत्र दिले, काहीच दिवसात 'सेबी'ने अडाणींना निर्दोषत्व बहाल केले.
वास्तविक वनतारामधील गैरव्यवहारांबाबत एसआयटी नेमण्याचे वा या संस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची पावले अगोदरच उचलायला हवी होती. पण अंबानी परिवाराचे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांशी असलेले सख्य, खुद्द पंतप्रधानांनी वनताराला भेट देऊन येथील वन्यप्राण्यांसोबत काढलेले फोटो यावरून अंबानी यांच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे लक्षात येते.
जामनगरच्या ‘वनतारा’ला नेमकी कधी सुरूवात झाली?
प्रकल्पाच्या निमित्ताने रिलायन्स पेट्रोकेमिकल्सने जामनगरमध्ये आपला प्रकल्प विकसित करण्यास सुरूवात केली. नंतर या जागेत हजारो झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीही येथे वाढू लागली. असं म्हणतात की, आशिया खंडातील सर्वात मोठी आमराई जामनगरमध्ये आहे. शेकडो प्रकारच्या जातींचे फुले, फळे जामनगरमध्ये लावलेली दिसतात.
गेल्या वर्षी जामनगर हे चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाची एक जंगी पार्टी येथे देण्यात आली होती. संपूर्ण जामनगर व आसपासच्या गावांना गावजेवण घालण्यात आलं होतं. या विवाहाच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी वनतारा सुरू होत असल्याची जाहीर घोषणा केली होती. 'माझ्या स्वप्नातले वनतारा हे केवळ भारतच नव्हे तर जगभरात जखमी झालेल्या वन्यजीव पशुंच्या उपचारासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी राखीव असल्याचे' अनंत अंबानी यांनी घोषित केले होते. अनंत यांच्या घोषणेनंतर जामनगरची पेट्रोकेमिकल्सची ओळख तत्काळ पुसली गेली आणि जगातले सर्वात भव्यदिव्य असे प्राणीसंग्रहालय मीडियापुढे आले.
‘वनतारा’मध्ये नेमके किती वन्यजीव आहेत?
प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार अनंत यांचे वनतारा हे सुमारे 3 हजार एकर जमिनीवर वसले असून या प्राणीसंग्रहालयात सुमारे 200 हत्ती, बिबटे, वाघ, सिंह व जग्वार अशा मार्जार जातीतील 300 वन्यजीव, हरिण, चितळ, काळवीट जातीतील 3 हजाराहून अधिक वन्यजीव, सुसर, मगर, सर्प, कासव अशा सरिसृप वर्गातील 1200 हून अधिक वन्यजीव, शेकडो प्रकारचे पक्षी या वनतारामध्ये आहेत. या सर्व वन्यजीवांची काळजी घेण्यासाठी अत्यंत महागड्या अशा सोयीसुविधा आहेत.
अद्ययावत अॅम्ब्युलन्स, हायड्रो थेअरीचे तलाव, आयुर्वेदिक मसाज सेंटर, हत्तींना विशिष्ट खाद्य देण्यासाठी स्वयंपाकघर, जगभरातील प्राण्यांवर उपचार करणारे निष्णात डॉक्टर, परिचारक येथे कायमस्वरुपी तैनात आहेत. वनताराचे व्यवस्थापन राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट व ग्रीन झुऑलॉजिकल, रेस्क्यु अँड रिहॅबिलिटेशन सेंटर (ग्रीन्स) या दोन संस्थांमार्फत चालवले जाते. मध्यंतरी ग्रीन्सने आपला अहवाल सादर केला होता. त्यांच्या 2022-23 सालच्या वार्षिक अहवालात वनतारामध्ये 134 वन्यजीव प्रजातींचे 3,889 पक्षी व अन्य वन्यजीवाचे वास्तव्य असल्याचे नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे.
असं म्हणतात की वनताराचा हा पसारा इतका वाढला आहे की, त्याने दिल्लीतील नॅशनल झुऑलॉजिकल पार्कलाही मागे टाकले आहे. या पार्कमध्ये 2020-21 च्या आकडेवारीनुसार 100 वन्यजीव प्रजातीतील 1,114 वन्यजीव होते. वनताराचा हा पसारा किती मोठा आहे हे पुढे दिलेल्या माहितीनुसार लक्षात येते.
2022-23 मध्ये वनतारामध्ये 857 मगरी, 229 बिबटे, 76 संकरित सिंह, 71 वाघ, 1200 हून अधिक इग्बुआना, 225 आफ्रिकेतील कासवे, नाइल नदी व खाऱ्या पाण्यातील सुसरी, सयामी सुसरी, मगरी, थंड प्रदेशातील अस्वले, काळविटे, आफ्रिकेतील सिंह, चित्ते, नाइल परिसरातील पाणघोडे, चिम्पाझी, ओरांगउटान, कोमाडो ड्रॅगन अशा विविध प्राण्यांचा भरणा आहे. वरील आकडेवारीवरून या सर्व प्राण्यांच्या संगोपनासाठी रोज किती प्रचंड पैसा खर्च केला जात असेल, हे लक्षात आले असेल.
वनतारा…. सेवेचा फक्त आव की आणखी काही?
वास्तविक वनतारा व्यवस्थापन आपले प्राणी संग्रहालय जखमी प्राण्यांच्या सुशुश्रुषेसाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात येथे प्राणी पाळले जातात हे कुणाच्याही लक्षात येईल. पण वनतारा व्यवस्थापन हे सर्व प्राणी येथे 'लाइफ टाइम केअर' साठी आले आहेत असे आता म्हणू लागले आहेत. हे प्राणी जंगलातील वातावरणात जगण्यायोग्य नाही, ते आता येथेच सुरक्षित राहू शकतात असा दावा त्यांचा आहे. वनताराचा असा दावा हत्तींच्या बाबतीत रेटून नेला जातो, त्यामुळे कोल्हापूरचा विषय पेटला आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे.
अनंत अंबानी यांचे विशेष प्रेम हत्तीवर आहे. त्यांच्या हट्टापायी जगभरातील अनेक सर्कस, भारतातील मंदिरांतून हत्ती वनतारात आणले जाण्याचे प्रकार वाढले आहेत. हत्तीमध्ये गणपतीचा अंश असतो. आपण गणपतीभक्त आहोत. जखमी व जंगलात जगण्यायोग्य नसलेल्या हत्तींसाठी वनतारा हे शेवटचे आश्रयस्थान असल्याचे अनंत अंबानी यांचे मत आहे. मी प्राण्यांची सेवा करतो व माझ्या पुण्याईमुळे मला प्राण्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे, असेही विधान अनंत अंबानी यांनी केले होते.
प्राणीप्रेमापायी काहीही
अंबानी यांचे हत्तीप्रेम कोणत्या पराकोटीच्या पातळीवरचे आहे, हे पुढील एका उदाहरणावरून दिसून येईल. वनतारात नित्थ्या नावाचा हत्ती आहे. या हत्तीला किडनीचा कॅन्सर झाल्याने मूत्रविसर्जनाचा समस्येचा सामना करावा लागत होता. या हत्तीच्या उपचारासाठी वनताराने आजपर्यंत दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. हत्तींना झालेल्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वनताराकडून पोर्तुगाल, थायलंड अशा देशातील विशेष डॉक्टर बोलावले जातात. भारतात वन्य खात्यात तैनात झालेले व जखमी झालेले हत्ती वनतारात यावेत यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात.
2022 साली जून महिन्यात अरुणाचल प्रदेशात एक घटना घडली. मागेपुढे दोन टोयोटो फॉर्च्यूनरच्या मदतीने दहा ट्रकचा ताफा पासीघाट या भागातून जात होता. एवढा मोठा ताफा कशासाठी निघालाय, या उत्सुकतेतून स्थानिक विद्यार्थी संघटनांनी हा ताफा अडवला. या संघटनेला सात सुस्थितीतले हत्ती ट्रकमध्ये आढळून आले, त्यांनी अधिक चौकशी केली असता हे सर्व हत्ती जामनगर येथील राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या हवाली केले असल्याची माहिती त्यांना मिळाली. या ट्रस्टकडे अरुणाचल प्रदेश वनखात्याच्या ताब्यातले हत्ती गुजरातमध्ये जामनगरला हलवण्याची सर्व परवानग्या असलेली सरकारी कागदपत्रे होती. 
वास्तविक हत्तींना काहीही समस्या असल्या तर जवळच्या आसाम राज्यात ते पाठवले जाऊ शकत होते. पण सुमारे अडीच-तीन हजार किमी अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये हे हत्ती धाडण्यात येत होते. या घटनेनंतर गदारोळ उडाला. सर्वोच्च न्यायालयात काही वन्यजीव हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपील दाखल केल्यानंतर अशी धक्कादायक मिळाली की, मार्च ते जून 2022 या काळात 26 हत्ती जामनगरला हलवण्यात आले होते. अशीच घटना एप्रिल 2023 मध्येही घडली. आसाममधून 49 ट्रकच्या ताफ्यात 25 हत्ती होते. हे सर्व हत्ती जामनगरला पाठवले जात होते. त्यानंतर अशा चर्चा सुरू झाल्या की, ऑक्टोबर 2023 अखेर अजून 40 हत्ती जामनगरला पाठवले जाणार आहेत.
हत्तींचा असा कायदेशीर (?) ताबा घेणे वनताराकडून सुरू आहे. 2019 मध्ये एका सरकारी अहवालानुसार अरुणाचल प्रदेशाकडे 109 हत्ती होते, त्यातील 91 हत्ती हे वनतारामध्ये दाखल करण्यात आले होते. केवळ अरुणाचल किंवा आसाम नव्हे तर जवळच्या त्रिपुरा राज्यातूनही १२ हत्ती वनताराकडे पाठवले गेले होते.
हत्तींची अशी राजरोसपणे सुरू असलेली तस्करी प्रत्येक राज्याच्या वनखात्याच्या दिशादर्शनाखाली सुरू असल्याचे साफ दिसून आले होते. वनतारात दाखल झालेले सर्व हत्ती हे आजारी, कायमचे जायबंदी झाले होते का, याबद्दल काहीच माहिती राज्यसरकार, केंद्र सरकार देत नाही. हे हत्ती जामनगरसारख्या उष्ण भागात दीर्घ काळ राहू शकत नाहीत, असेही वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जामनगरमधील पर्यावरण हत्तींच्या जगण्याच्या विपरीत आहे, तरीही अनंत अंबानी यांच्या वेडापायी हे सर्व उद्योग राजरोसपणे सुरू आहेत, असे तज्ज्ञ सांगताहेत.
हत्तींची अशी राजरोस तस्करी कायद्याची पळवाट करून कशी केली जातेय, हे सुद्धा कालांतराने उघड झाले. 2021 केंद्र सरकारने वन्य जीव संरक्षण (दुरुस्ती) कायद्यात बदल करून हत्तींची मालकी वा त्यांचे हस्तांतरण संबंधित राज्य सरकारच्या संमतीने केले जाऊ शकते, अशी दुरुस्ती केली. या कायद्याला थोडासा आक्षेप घेत, त्यात 43 क्रमांकाची दुरुस्ती समाविष्ट करण्यात आली होती.
या दुरुस्तीनुसार ताब्यात असलेल्या हत्तींचे हस्तांतरण धार्मिक कारणाने करण्यास हरकत नसल्याचे वाक्य समाविष्ट करण्याचे काँग्रेसचे सदस्य जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या स्थायी समितीने सुचवले होते. पण या दुरुस्तीत सरकारने धार्मिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने हत्तींचे हस्तांतरण केले जाऊ शकते, असा वनताराला अनुकूल बदल करून बहुमताने हा कायदा बदलला आणि त्यानंतर वनतारामध्ये हत्तींची संख्या वाढू लागली.
वनतारामध्ये कायद्याच्या पळवाटा व अन्य मार्गाने केवळ हत्ती आणले गेले नाहीत तर मेक्सिको, व्हेनेझुएला अशा देशांतले दुर्मिळ असे वन्यजीव रेस्क्यू मिशनच्या नावाखाली आणण्यात आले आहेत. वनताराला तामिळनाडूतील मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्ट, जर्मनीतील असोसिएशन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ थ्रेटन पॅरोट्स, मेक्सिकोमधील फॉऊना झू दे मेक्सिको अशा खासगी संस्थांनीही आपल्या ताब्यातले वन्यजीव पाठवले आहेत. तसेच आसाम सरकारचे प्राणीसंग्रहालय, गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयानेही आपल्याकडचे वन्यजीव पाठवले आहेत. मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्टने तर 857 मगरी वनताराला हस्तांतरित केल्या आहेत. या ट्रस्टकडे 2020 मध्ये 1820 मगरी होत्या. या मगरींची संख्या अतिरिक्त झाल्याने त्या वनताराकडे पाठवल्याचे ट्रस्टचे अधिकारी सांगतात.
वनतारावर अशी कृपादृष्टी मेक्सिकोतील खासगी ओस्टोक अभयारण्यानेही दाखवली आहे. या अभयारण्यातील वन्यजीव वनतारात दाखल होत आहे. तसेच कोलंबियाने 60 पाणघोडे पाठवले आहेत. वनताराच्या 2022-23 च्या अहवालात फौना झू दे मेक्सिको, संयुक्त अरब अमिरातीतील अल बुसान झुलॉजीक सेंटर व कांगारु अनिमल शेल्टर, जर्मनीतील असोसिएशन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ थ्रेटन पॅरोट्स, गयानातील एका संस्थेने भेट म्हणून दिलेले आहेत.
कायद्याच्या पळवाटेने वनताराकडे
वनताराचे ग्लॅमर वाढण्यासाठी तेथे अत्यंत दुर्मीळ असे वन्यजीव, पक्षीही आणण्यात आले आहेत. हे दुर्मीळ पक्षी वा वन्यजीव वनतारापर्यंत पोहचतात, कसे याबाबतही काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. शोध पत्रकारितेतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुलित्झर सेंटरने वनताराच्या एकूण कारभारावर एक मोठा वृत्तांत प्रसिद्ध केला होता.
या वृत्तांतानुसार 2018 पर्यंत भारतात म्यानमार, चीन, व्हिएतनामकडून होणाऱ्या वन्यजीव तस्करीत कमालीची घट झाली होती. पण 2022-23 पासून दुर्मीळ वन्यजीवांच्या तस्करीच्या किमान 20 -22 केसेस आढळून आल्या आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ठाण्यानजीक डोंबिवली येथे ओरांगउटानची तस्करी वन्यजीव खात्याला आढळून आली होती. पण हा तस्करी केलेला ओरांगउटान थेट वनतारात दाखल केला गेला व त्याच्यासोबत बड्या सेलेब्रिटीजनी अगदी भारताच्या पंतप्रधानांनी फोटो काढले व ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते.
वनतारा हे एकूणच कायद्यातील पळवाटा शोधून, सर्वोच्च न्यायालयाच्या काही आदेशांचा फायदा घेत वेगाने वाढणारे प्राणीसंग्रहालय आहे. हे संग्रहालय भविष्यात जगातील मोठे पार्क होईल, यात शंका नाही. कारण अनंत अंबानी यांचा वन्यजीव पाळण्याचा हा महागडा शौक पुरा व्हावा म्हणून भारतातील भाजपशासित प्रदेशातील सर्व राज्ये त्यांच्या दिमतीला आहेत.
आता सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस चलमेश्वर यांनी एसआयटी अंतर्गत सादर केलेल्या अहवालातले निष्कर्ष ग्राह्य मानून वनताराप्रकरणी सारे काही कायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला आहे. तो देताना, यापुढे कोणत्याही न्यायिक, संविधानात्मक आणि प्रशासनात्मक पीठाने अशा प्रकारच्या आरोपांची दखल घेऊ नये, असा आदेशही काढला आहे.
एकूणच, एसआयटी नेमून गैरव्यवहार खोदण्याचे प्रयत्न झाले असले तरी वनताराच्या मागे असलेले राजकीय पाठबळ इतके प्रचंड आहे की हा प्रकल्प बंद करण्याची ताकद भारतात आता कोणत्याही घटनात्मक संस्थांमध्ये शिल्लक राहिलेली नाही, ही मनातली शंका या सर्वोच्च निकालाने खरी ठरल्याची अनेकांची भावना आहे.
या निकालावर बाजूचे विरोधातले सारेच व्यक्त झाले, मात्र त्यात उठून दिसले ते मिड-डे या सायंदैनिकात प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल यांचे 17 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेले व्यंगचित्र. त्यात डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता वनातल्या झाडांच्या पारंब्याना आनंदाने लोंबकळते आहे आणि चित्राच्या तळाला 'वेलकम टु वनतारा' अशी पाटी लावलेली आहे... हे व्यंगचित्र उद्योगस्नेही (की अंबानी-अदानी स्नेही?) पंतप्रधान मोदींच्या नेमके वाढदिवशी प्रकाशित व्हावे, हाही एक प्रतिकात्मक योग म्हटला पाहिजे.
(साभार - समतावादी मुक्त संवाद,ऑक्टोबर 2025)






