आगामी आशिया चषक स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामने खेळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यासाठी परवानगी दिली. यावरून देशभरात संतापाचे वातावरण पसरले असतानाच शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. “हे लोक आता आपला क्रिकेट संघ पाकिस्तानविरोधात खेळवणार आहेत. मग तुमचं गरम सिंदूर गेलं कुठे? तुम्ही घराघरात सिंदूर वाटणार होतात, तो जोश कुठे गेला? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जावेद मियाँदादला घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच होता ना? त्यामुळे एकदा आरसा बघा.” फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मग पुन्हा शिवसेनेचे (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जावेद मियाँदादला बोलावलं नव्हतं. तो स्वतः आला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोवर भारतीय संघ पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार नाही. परंतु, नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कोणी खाल्ला, पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी कोणी खाल्ली हे सर्वांना ठाऊक आहे. सिंदूर आमच्या रक्तात आहे म्हणणारे आता आपला संघ पाकिस्तानबरोबर खेळायला पाठवत आहेत. परंतु, तेच लोक पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या लोकांना विसरले आहेत. पहलगामला गेलेले पर्यटक तुमच्यावर विश्वास ठेवून तिथे गेले होते. काश्मीर सुरक्षित झालं आहे. असं त्या बिचाऱ्यांना वाटत होतं. परंतु, तुमच्यामुळेच ते मारले गेले आणि आता तुम्ही जबाबदारी झटकून पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळत आहात.”
या सगळ्या राजकीय धुराळ्यात पाकिस्तानचा एकेकाळचा आक्रमक फलंदाज जावेद मियाँदाद आणि त्याचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या जुन्या गोष्टींना आता पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. जावेद मियाँदाद ‘मातोश्री’वर का गेला होता, त्यापूर्वी शिवसेनेने पाकिस्तानी संघाला भारतात पाय ठेवू देणार नाही म्हणून गनिमीकाव्याने केलेल्या काही कृती या सगळ्यांच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
1991 साली वानखेडेवर काय घडलं?
पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कारवाया जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत त्यांना भारतात खेळू देणार नाही अशी भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. ते साल होतं 1991 चे…शिवसेनेची त्यावेळी प्रचंड ताकद होती. मुंबई बाळासाहेबांच्या एका शब्दावर थांबत होती. इतका प्रचंड वचक बाळासाहेब आणि शिवसेनेचा मुंबईत होता. अशा स्थितीत पाकिस्तानला भारतात खेळू न देण्याचा इशारा बाळासाहेबांनी दिला होता.
बाळासाहेब स्वतः क्रिकेटप्रेमी होते. पण पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट खेळण्यास त्यांचा विरोध होता. त्यामागे त्यांची स्वतःची अशी भूमिका होती. पाकिस्तानची सर्व बाजूनी कोंडी केली, क्रिकेट जगतात बदनामी झाली तर पाकिस्तानी सरकारवर दबाव येईल आणि यातून भारतातील दहशतवादी कारवाया थांबतील असा त्यांचा हिशोब होता.
संबंधित लेख वाचा: 1) बाळासाहेबांच्या विचारावर हक्क सांगणारे नेमका हाच वारसा विसरले आहेत… |
1991 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतात मालिका होणार होती. त्यातील एक सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियम होणार होता.18 ऑक्टोबर 1991 रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्यात बाळासाहेबांनी 28 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी 'मुंबई बंद' करण्याचा इशारा दिला.
वानखेडे स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना आयोजित केला तर तो उधळून लावूच, पण स्टेडियमही पेटवून भस्मसात करू, अशी धमकीच त्यावेळी बाळासाहेबांनी दिली होती. काँग्रेसचे नेते सुधाकर नाईक त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना संरक्षण देण्याचं आणि काहीही झालं तरी हा सामना खेळवण्याचं ठरवलं होतं. आता हा सामना प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता.
शिवसैनिकांनी इंजिन ऑइल खेळपट्टीवर ओतलं…
बरोबर दोन दिवसांनी म्हणजेच 21 ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास वानखेडे स्टेडियमच्या दारात चार पाच गाड्या भरून माणसं आली. पोलिस बंदोबस्त चोख होता म्हणून गाड्या थोड्या आडोशाला घेतल्या. त्यातली एक गाडी मात्र थेट गेटजवळ गेली. गाडीतल्या माणसांनी सांगितलं की, आम्हाला वास्तुविशारद प्रभू यांच्या कार्यालयात जायचं आहे.
पोलिसांनीही गाडी आत सोडली. स्टेडियममध्ये रंगरंगोटी आणि इतर कामं सुरू होती. या सात लोकांनी पार्किंगमध्ये नेलेल्या गाडीतून कुदळी आणि इंधनाचे कॅन नेले होते. ते काढले आणि धावत खेळपट्टीपाशी गेले. यातल्या एकादोघांनी कुदळीने खेळपट्टी उखडण्यास सुरुवात केली. खणताना कुदळीचे दांडे तुटले तरीही ते लोक खड्डे खणतच राहिले. बाकीच्यांनी वाहनांसाठी वापरलं जाणारं इंजिन ऑइल खेळपट्टीवर ओतलं.
खड्डय़ांमध्ये इंधन ओतल्यानं ते आतापर्यंत मुरलं होतं. खेळपट्टीचं होत असलेलं नुकसान बघून पोलीस धावत आले आणि या लोकांना बाहेर काढलं. खेळपट्टी खणनाऱ्यांत मुख्य सूत्रधार होते शिशिर शिंदे. त्यावेळी बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांनी खेळपट्टी उखडल्याचं जाहीर केलं. पण खेळपट्टी खणली तरी सामना होणारच अशी भूमिका सरकारने घेतली होती. मात्र खड्ड्यात इंधन टाकल्याने खेळपट्टीची पार वाट लागली होती. ती तीन दिवसांत दुरुस्ती होणं कठीण होतं. एकूणच साऱ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तानी संघाने भारताचा दौर रद्द केला.
शिवसैनिकांचं पुढचं मिशन दिल्लीचं फिरोझशाह कोटला मैदान
1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस भारत आणि पाकिस्तानचे नेते द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी राजनैतिक साधन म्हणून क्रिकेटकडे वळले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे क्रिकेट मुत्सद्देगिरीच्या सर्वांत मोठ्या समर्थकांपैकी एक होते. त्यांनी सप्टेंबर 1998 मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. दोघांनी जानेवारी आणि फेब्रुवारी 1999 मध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिका व्हाव्यात असं ठरवलं. यात यजमान पद भारताकडे असणार होतं.
1998 मध्ये महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचं सरकार सत्तेवर होतं. जानेवारी 1999 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान एक कसोटी मुंबई येथे होण्याची शक्यता होती. पण पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी ती कसोटी रद्द केली. त्यामुळे मुंबईत होणारा सामना दिल्लीला हलवावा लागला. परंतु दिल्लीत देखील शिवसेनेने विरोध केला.
रात्री अकरा वाजता शिवसैनिक फिरोझशाह कोटलाच्या आतमध्ये गेले. लोखंडी रॉडच्या साह्याने त्यांनी खेळपट्टी खणली. त्यानंतर त्यांनी माध्यमप्रतिनिधी आणि छायाचित्रकारांना घटनास्थळी बोलावलं. त्यांनी फोटो काढून घेतले, पाकिस्तान दौऱ्याच्या निषेधाची पत्रकं वाटली. अर्ध्या तासात शिवसेनेचा ध्वजही मैदानात रोवण्यात आला. थोड्या वेळात जवळच्या इंद्रप्रस्थ इस्टेट स्टेशनमधून पोलिसांचा ताफा कोटलामध्ये पोहोचला. मैदानात तेव्हा सुरक्षेसाठी केवळ दोनच सुरक्षारक्षक असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. 
खेळपट्टी खणल्याप्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली. शिवसेनेने दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात त्याच दिवशी संध्याकाळी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि विशेष सचिव यांची बैठक झाली होती. मात्र शिवसैनिक इतकं टोकाचं पाऊल उचलतील याची कल्पना नव्हती असं संघटनेने सांगितलं. खेळपट्टीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. खेळपट्टी पूर्ववत करण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागेल मात्र सामना नियोजित दिवशी होईल असं संघटनेनं म्हटलं होतं.
साप सोडण्याची शिवसेनेची धमकी, मैदानावर 40 सर्पमित्र तैनात
या घटनेनंतर शिवसेनेने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतात खेळण्यापासून रोखण्यासाठी ‘कोणत्याही मर्यादेपर्यंत’ जाऊ असं जाहीर केलं. या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे पहिली कसोटी चेन्नईला हलवावी लागली, तिथे प्रेक्षकांनी दोन्ही संघांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. पाकिस्तानने एक थरारक कसोटी सामना जिंकला. तिथे या संघाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीत झाला आणि भारतातील सर्वोच्च क्रिकेट संस्था बीसीसीआयने सर्व खबरदारी घेतली. शिवसैनिकांनी सामन्यादरम्यान विषारी साप मैदानात सोडू, अशी धमकी दिली होती. त्यावर उपाय म्हणून बीसीसीआयने 40 सर्पमित्र मैदानावर तैनात केले होते. अखेर सामना सुरळीत पार पडला.
जावेद मियाँदाद ‘मातोश्री’मध्ये बाळासाहेब ठाकरेंना का भेटला?
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आणखीनच दुरावले आणि शिवसेनेचा पाकिस्तान विरोध तीव्र झाला. मात्र इतकं सगळं असतानाही 30 जुलै 2004 रोजी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी बहुतांश वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर या भेटीचं छायाचित्र आणि तपशील छापून आला. या भेटीवरून शिवसेनेवर टीकाही झाली. मियांदाद-बाळासाहेब ठाकरे भेट हा टीव्ही वाहिन्यांकरता चर्चेचा विषय ठरला. या भेटीवेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि माजी खेळाडू दिलीप वेंगसरकरही उपस्थित होते.
"जावेद मियांदाद क्रिकेटपटू म्हणून मला आवडतो. 1986 साली ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेत चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर मियांदादने षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तो षटकार मी विसरू शकत नाही," असं बाळासाहेबांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
मियाँदादने या भेटीवेळी आधी जे घडलं ते विसरून जाऊया आणि भविष्याचा विचार करूया असं म्हटलं. तो म्हणाला होता की, त्यांना क्रिकेट आवडतं. अशा भेटी भविष्यातही होतील अशी आशा आहे. यातूनच दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. शिवसेनेने हिरवा कंदील दिला तर मुंबईत भारत-पाकिस्तान लढती होऊ शकतात.
मियांदादच्या 'मातोश्री' भेटीनंतर विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीका केली होती. यासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून बाळासाहेबांनी भूमिका मांडली. बाळासाहेब लिहितात, 'मियांदादच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या भेटीने शिवसेना आणि शिवसैनिकांच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाहीत. मियांदादच्या 'मातोश्री' भेटीचा वापर माध्यमांमधील काहींकडून गोबेल्स प्रपोगंडासारखा केला जात आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी मिळावी अशी विनंती मियांदाद यांनी केली. मी या विनंतीला नकार दिला, असंही बाळासाहेबांनी सांगितलं होतं.






