- कोमल ठोंबरे
घटना गेल्या वर्षीची आहे. मुंबईमध्ये खार जिमखाना नावाचा फार जुना क्लब आहे. इव्हान रॉड्रिग्ज हे या खार जिमखाना क्लबचे अनेक वर्षांपासूनचे सदस्य… अचानक क्लबने इव्हान यांचे कल्बचे सदस्यत्व रद्द केले. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की, क्लबच्या परिसराचा वापर त्यांनी धार्मिक कार्यक्रमांसाठी केला म्हणून आम्ही तुमचे क्लबचे सदस्यत्व रद्द करत आहोत. त्यादरम्यान इव्हान रॉड्रिग्ज यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. ते धर्मांतर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता.
या खोट्या आरोपांमुळे वडील तर व्यथित झाले होतेच परंतू त्यांची मुलीलाही मोठा धक्का बसला होता. परंतू प्रचंड मानसिक दबाव असूनही ती तिचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत होती. ती मेहनत करत राहिली आणि अखेर यशाचे शिखर तिने गाठलेच.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तिने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 127 धावा ठोकत भारताला एक अविस्मरणीय विजय आणि फायनलचं तिकीट मिळवून दिलं. सामन्यानंतर तिने, आई-वडील आणि जिझसचे आभार मानत भारताला विजयी करण्याचे ध्येय ठेवल्याचे सांगितले. या ध्येयवेड्या मुलीचे नाव आहे जेमिमाह रॉड्रिग्ज…
रडत रडत सर्वांना नमस्कार, वडिलांना मिठी!
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तिने जे साध्य केलं, जेमिमाहने केवळ भारतीय क्रिकेटप्रेमींचंच नाही तर तिच्या वडिलांचंही छाती अभिमानाने भरून आलं. सामना संपल्यानंतर जेव्हा बाप लेकीची भेट झाली, तो क्षण खुपच भावनिक होता. भारताला विजय मिळवून दिल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात जेमिमा आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारून रडताना दिसते. तिच्या डोळ्यांतील ते अश्रू दु:खाचे नाही, तर अभिमानाचे होते.
संबंधित लेख वाचा: Women's ODI World Cup 2025: भारताचं विजेतेपदाचं स्वप्न हरमनप्रीतच्या नेतृत्वात पूर्ण होणार का? |
एका वडिलांच्या स्वप्नपूर्तीचे, एका मुलीच्या कष्टाचे फळ मिळाल्याचे. या दिवसासाठीच तिच्या वडिलांनी तिला खेळाडू बनवलं होतं, आणि या दिवसासाठीच जेमिमाने बॅट हातात घेतली होती. विजयाच्या त्या क्षणी दोघांनाही भावना आवरल्या नाहीत. वडिलांना मिठी मारल्यानंतर जेमिमा आपल्या आईच्या कुशीत शिरली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी मैदानात रडत रडत जेमिमा रॉड्रिग्जने सर्वांना नमस्कार केला.
जेमिमाची ऐतिहासिक खेळी
सेमी फायलमध्ये भारतासमोर 339 धावांचं आव्हान होतं. महिला वनडे वर्ल्ड कप इतिहासातील हे सर्वात मोठं लक्ष्य होते. 13 धावांवर शेफाली वर्मा आणि 59 धावांवर स्मृती मानधना बाद झाल्यानंतर संघ संकटात सापडला होता. पण याच निर्णायक क्षणी जेमिमा रॉड्रिग्जने जबाबदारी घेतली आणि एक अविस्मरणीय डाव खेळला. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेली जेमिमा शेवटपर्यंत नाबाद राहिली. भारताने 48.3 षटकांत 5 बाद 341 धावा करून विजय मिळवला आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. जेमिमाने 134 चेंडूत 14 चौकारांसह नाबाद 127 धावा ठोकल्या. तिच्या या अद्वितीय खेळीसाठी तिला “प्लेअर ऑफ द मॅच” पुरस्कार मिळाला.
सेमीफायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेली जेमिमा रॉड्रिग्ज सामन्यानंतर म्हणाली की, “सर्वात आधी मी देवाचे आभार मानते, कारण हे सर्व मी एकटीने करू शकत नव्हते. मला माहित आहे, आजच्या या कठीण प्रसंगातून देवानेच मला बाहेर काढले. माझे आई-वडील, कोच आणि ज्यांनी या काळात माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचे मी आभार मानते. गेले चार महिने खूप कठीण गेले, पण आज जे घडले ते एखाद्या स्वप्नासारखे वाटते, अजूनही विश्वास बसत नाही.”
जेमिमाचा इथवरचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खाण्यापासून ते संघातून वगळल्याचं दुःख सहन करण्यापर्यंत, जेमिमानं अनेक अडथळ्यांना तोंड दिलं आहे. 2022 साली तर तिला वन डे विश्वचषकासाठीच्या भारतीय महिला संघातून वगळण्यात आलं होतं. पण तीन वर्षानंतर त्याच जेमिमानं भारताला वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचवलं. जेमिमासाठी असा संघर्ष ही नवी गोष्ट नाही. पण घरच्यांचा पाठिंबा, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, टीममेट्सची साथ आणि अंगभूत गुणवत्ता यांच्या जोरावर तिनं आज क्रिकेटमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे.
बार्बी डॉल आवडत नाही म्हणून बॅट दिली…
जेमिमा, म्हणजेच चाहत्यांची लाडकी जेमी, साधारण तीन वर्षांची असताना तिच्या आजोबांनी तिला प्लॅस्टिकची क्रिकेट बॅट भेट दिली होती. "मला बार्बी डॉल वगैरे आवडत नसे. आजोबांना ते माहिती होतं, म्हणून त्यांनी मला बॅट भेट दिली. आम्ही गल्लीतच क्रिकेट खेळायचो. दरवेळी हातात बॅट घेतली की मला अतिशय आनंद वाटायचा."
तिथून जेमिमाचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला ती तिच्या दोन भावांसोबतच, इनॉक आणि एली यांच्यासोबत खेळत असे. वडील आयव्हन रॉड्रिग्जच तिघांचे पहिले कोच होते. पण पुढे एली वांद्र्याच्या एमआयजी क्लब अकॅडमीसाठी खेळू लागला, जिथे कोच प्रशांत शेट्टी मार्गदर्शन करायचे. एक दिवस आयव्हन आणि जेमिमाची आई लविता प्रशांत यांना भेटले आणि आमच्या मुलीचाही खेळ एकदा पाहा, अशी विनंती त्यांना केली. जेमिमा प्रशांत यांना भेटली तेव्हा आठ-नऊ वर्षांची होती. एक तर मुलगी आणि तीही एवढी लहान असताना क्रिकेट खेळायचं म्हणतेय, म्हटल्यावर प्रशांत यांना सुरुवातीला प्रश्न पडला.
"त्या काळी म्हणजे 2007-08 साली फारच कमी मुली क्रिकेट खेळायच्या. मी कधी एमआयजी क्लबवर मुलींना क्रिकेट खेळताना पाहिलं नव्हतं," असं प्रशांत शेट्टी एका मुलाखतीत सांगतात.
तरीही प्रशांत यांनी जेमिमाच्या आई-वडिलांना होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेमिमा मैदानात आली आणि सरावासाठी उतरली. जेमिमानं पहिलाच बॉल खेळला तो कव्हर ड्राईव्ह होता. या मुलीत काहीतरी वेगळं आहे, याची जाणीव प्रशांत यांना झाली. मुलगी असूनही एमआयजीमध्ये तिला क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली. अर्थात त्या काळी ती मुलांसोबतच खेळायची. मुलीला क्रिकेट कसं खेळू देताय, असं नातेवाईक म्हणायचे. पण आई वडील आणि प्रशिक्षकांनी जेमिमाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असं तिनं नंतर मुलाखतीत सांगितलं आहे.
हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल की क्रिकेट?
त्या दिवसांत जेमिमा फक्त हॉकी आणि क्रिकेटच नाही, तर शाळेसाठी फुटबॉल आणि बास्केटबॉलही खेळायची. बारा वर्षांची होईपर्यंत हॉकीत तिनं लहान वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि क्रिकेटमध्येही तिच्या वयोगटात झोनल स्पर्धेत खेळली होती. मुंबईचे दिग्गज ऑलिंपियन आणि भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार-प्रशिक्षक जोआकिम कार्व्हालो यांनी तर तुमची मुलगी भारतासाठी खेळू शकते, असं एकदा जेमिमाच्या वडिलांना सांगितलं होतं.
हॉकी खेळून ऑलिंपिक गाठायचं की क्रिकेटमध्ये करियर करायचं, असे दोन पर्याय समोर ठेवले गेले, तेव्हा अकरा वर्षांच्या जेमिमानं क्रिकेटला प्राधान्य द्यायचं ठरवलं. क्रिकेटमध्ये आपण आणखी पुढे जाऊ असं तिला तेव्हा वाटलं होतं. तो निर्णय किती सार्थ होता, हे लगेच दिसूनही आलं. 2012-13 साली, अवघ्या तेरा वर्षांच्या वयातच जेमिमानं मुंबईच्या अंडर-19 संघात स्थान मिळवलं.
मुंबई क्रिकेटमध्ये, विशेषतः महिलांच्या क्रिकेटमध्ये तेव्हा जेमिमाच्या नावाची चर्चा होत असे. पण लवकरच देशाला तिच्यातली चुणूक दिसून आली. 2017 साली देशांतर्गत अंडर-19 वन डे स्पर्धेत जेमिमानं सौराष्ट्रविरुद्ध नाबाद 202 धावांची खेळी केली. स्मृती मंधानानंतर अशी कामगिरी करणारी जेमी दुसरीच खेळाडू. त्या खेळीनं जेमिमाचं नाव गाजू लागलं. मग चॅलेंजर ट्रॉफीतलं यश आणि भारत अ संघासाठीची उत्तम कामगिरी यांच्या जोरावर जेमिमाला 2018 च्या सुरुवातीला भारताच्या वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली. त्याच वर्षी ट्वेन्टी20 वर्ल्ड कपमधलं पदार्पण तिनं अर्धशतकासह साजरं केलं.
लहान बेबीप्रमाणे इतर खेळाडू काळजी घ्यायचे
अगदी सुरुवातीच्या दिवसांत इतर खेळाडूंपेक्षा लहान असल्यानं जेमीला सगळे एखाद्या बेबीसारखं, बाळासारखं जपायचे. तिची काळजी घ्यायचे. वयातील फरकामुळे जेमिमाला कधीकधी काहीसं एकटंही वाटायचं. त्यावेळी स्मृती मंधानासोबत तिची मैत्री जुळली. सुरुवातीच्या त्या दिवसांमध्ये दोघी एकमेकींच्या रूममेट्स होत्या आणि आता जणू एकमेकींच्या बहिणीसारख्या आहेत. दरम्यान क्रिकेटच्या मैदानात जेमिमाची लोकप्रियता वाढू लागली. खेळासोबतच तिचं गिटार वाजवणं आणि सोशल मीडियावरचा उत्स्फूर्त वावर यांचीही चर्चा होऊ लागली. जेमिमा बिग बॅश लीगसारख्या ट्वेन्टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळू लागली आणि अनेकदा या स्पर्धांचा चेहराच बनली. आज भारतात महिला क्रिकेटच्या प्रमुख ब्रँड अँबॅसेडर्समध्ये जेमिमाचं नाव घेतलं जातं.
भारतीय संघात मात्र जेमिमाच्या वाटचालीत चढ उतार येत राहिले. जेमिमाला 2022 च्या एप्रिलमध्ये झालेल्या वन डे विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. पण लवकरच तिनं संघात पुनरागमन केलं. जेमिमाचा समावेश असलेल्या भारतीय संघानं ऑगस्ट 2022 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं. तर पुढच्याच वर्षी म्हणजे2023 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. 2023 साली विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात ती दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून खेळली. डिसेंबर 2023 मध्ये तिला इंग्लंडविरुद्ध सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.
(संदर्भ - बीबीसी मराठी)






