(प्रभाकर ओव्हाळ)
आजवर अनेक अभ्यासक संशोधकांनी आपल्या परिने लोकसंस्कृती-लोक-साहित्याचे जतन-संवर्धन केले आहे. अशाच परंपरेतलं आजच्या काळातलं अग्रगणी नाव डॉ. प्रा. प्रकाश खांडगे होत. त्यांच्या नावाने लोकसाहित्यावर इंग्रजी-मराठीतून ग्रंथ आहेत. लोककलांची स्वतंत्र अभ्यास पद्धती त्यांनी निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील तमाशा, लावणी, शाहिरी, दशावतार, नमणे, खडीगंमत, भारूड, संगीत पार्टी, गोंधळी, वासूदेव, भूते अशा अगणीत लोककला-लोकपरंपरा त्यानी राज्य-राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तिवर पोहोचवले आहेत.
त्यांनी संगीत नाट्य अकादमीच्या कामकाजात स्वतःचा ठसा उमटवला लोककलांचा त्यांचा अभ्यासही सर्वश्रुत आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथही अभ्यासपूर्ण, वाचनीय आहेत. त्या मालिकेतील ‘लोकरंगनायिका’ हा त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ग्रंथ लोकपरंपरांचे सौंदर्य आणि सामर्थ्य दर्शविणारा आहे.
'लोकरंगनायिका' या पुस्तकांत चितारलेल्या दहा लोकवतींची चरित्रे अस्वस्थ आणि थक्क करणाऱ्या गाथाच आहेत. यात अंतर्भूत मराठी मातीतल्या चौघी आणि महाराष्ट्राचा पैस ओलांडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या सहा महान कलावतींचा समावेश आहे. यामध्ये मराठी मानाच्या पद्मश्री यमुनाबाई वाईकर, 'पद्म' पुरस्कार विभूषीत लावणी गायिका सुलोचना चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगांवकर आहेत.
याशिवाय अभिजात लावण्यांना अर्थवाही करून लावणी लोकाभिमूख करणाऱ्या राजश्री नगरकरही आहेत. शिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या लोकाभिनयाज कीर्तिवान असलेल्या छत्तीसगडच्या तीजनबाई आहेत. कच्छच्या रणातील ‘रानवेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनाबाई कारा आहेत. पश्चिम बंगालमधील ख्यातनाम पार्वती बाउल आहेत. राजस्थानातील गुलाबो सपेरा, उत्तर प्रदेशातील गुलाबबाई नौटंकी आणि कर्नाटकातील महान लोकवती मंजम्माही आहेत.
ह्या साऱ्या लोकपरंपरेतल्या स्त्रिया मेरेवरच्या जनसमूहातून आलेल्या आहेत. उपेक्षितांच्या जगतातून आलेल्या या लोकवतींची चितारलेल्या कथा अत्यंत संवेदनशील आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. लोकसाहित्यात मराठी पैस सोडून लिहिलेलं अशा प्रकारचा हा बहुधा पहिलाच ग्रंथ असल्याने त्याचे मोल अधिक आहे. यात समाविष्ट लोकनायिकांच्या सानिध्यात लेखक डॉ. प्रकाश खांडगे प्रत्यक्षी आल्यानं लोकरंगाशी एकरूप झालेल्या लेखकाला वेगळे शब्द शोधायला लागले नाहीत.
हर एक लोकनायिकेची कथा त्यांच्या जीवघेण्या व्यथांतून चपखलपणे बसवताना लेखकाचा अंतरीचा उमाळा पदोपदी जाणवत राहतो. लेखकाची लोकसाहित्याची भाषा वास्तव चित्रण उभे करते. त्यातून संवेदनेची, दुर्दशेची, करुणा आणि प्रार्थनेची तंतोतंत भाषा वाचकाला अस्वस्थ करीत राहते. सुरावटीसाठी हाती घेतलेलं तुणतुणं कुठेही बेसूर न होता नेमकेपणानं सुर उमटवल्याचा प्रत्यय येत राहतो.
संबंधित लेख वाचा: 1) आठवड्याचं पुस्तक : महाराष्ट्राच्या काही प्रश्नांचा आणि आंदोलनांचा परामर्श |
'लोकरंगनायिका' पहिली नायिका आहे, पद्म पुरस्कार विभूषीत लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर. महाराष्ट्राची लाडकी लेक (डॉटर्स ऑफ महाराष्ट्र) संबोधल्या गेलेल्या यमुनाबाईंच्या सानिध्यात राहून अनेक पैलू लेखकाने या लेखांतून मांडल्या आहेत. यमुनाबाईंनी हस्तमुद्रा, पदन्यास आणि मुद्राभिनयाच्या जोरावर मराठमोळी लावणी देशभर मिरवली-गाजवली. भरताच्या नाट्यशास्त्रातील अपरिहार्य अंगीक-वाचिक अभिनयाचे धडे यमुनाबाईनी दिले; ख्यातनाम पं. बिरजू महाराजांनी लुब्ध होत यमुनाबाईच्या लावणीवर कथ्थकनृत्य सादर करणं हा मराठीचा केवढा मोठा सन्मान होता.
बैठकीची लावणी अजरामर करणाऱ्या या लोकवतीस 'पद्मश्री' किताबाने गौरविलं गेलं. लोकसंगीतात मिळालेला हा एकमेव पुरस्कार होता. यमुनाबाईंच्या कथा व्यथांचा वेध लेखकांनी मोठ्या खुबीनं चितारला आहे. यमुनाबाई केवळ लावणी गात नव्हत्या, तर जगत होत्या. त्यांचे डोळे गात होते. चेहरा गात होता. शरीर गात होते... त्यांच्या शरीराचेच जणू गाणे झाले होते.
... ज्या गावात कीर्तन झालं नाही आणि ज्या गावानं तमाशा पाहिला नाही असं महाराष्ट्रातलं एकही गाव नाही. मराठी लोकजीवनाशी एकरूप झालेला मनोरंजनाचा अविष्कार म्हणजे 'तमाशा'। अशा तमाशातील अनभिषिक्त तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ नाराणगावकर सर्वश्रुत आहेत. विठाबाईंना सर्वार्थानं रुढ करण्यात लेखकांचा मोठा सहभाग राहिला आहे. तमाशा कलेतलं अढळ ध्रुवपद विठाबाईंनी ज्या कष्टाने, संघर्षाने, जिद्दीने आणि निष्ठेने मिळविले, त्याचे साक्षीदार राहिलेले लेखक इथंपासून इतिपर्यंतचा इतिहास सहजतेने लिहू शकतात. वाचताना ते लक्षात येते.
महाराष्ट्राची अस्सल लावणी गायिका म्हणजे सुलोचना चव्हाण. त्यांच्या जडघडणीचा काळ पाहिलेले त्यांच्या कैकदा मुलाखती घेतलेले, त्यांच्या कुटुंबियांत समरस झालेले लेखक आपल्या आठवणी शब्द कुंचल्यांनी सहजतेने रेखाटतात. सुलोचनाबाईच्या गायकीची नजाकतता जीवनातील चढ-उतारांसह नेमकेपणानं टिपतात. मराठमोठी लावणी माजघरापर्यंत आणि पांढरपेशा महिलांना गुणगुणायला लावीपर्यंतचा सर्वार्थानं मान सुलोचनाबाईंचाच. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर संवादी लावणीचं मर्म 'काल म्हणे तुम्ही जत्रेला गेला' याचे भाव शब्दातून उभे करताना शब्द आणि भावना यांची जादू सुलोचनाबाईंनी ज्या पद्धतीने साकारली आहे, हे महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक जीवनांच वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. असा आशयगर्भ लेखकांच्या जाणिवेची प्रगल्भताच दर्शवते.
मराठी मानाची चौथी रंगनायिका म्हणजे राजश्री काळे-नगरकर, वयाच्या तेराव्या वर्षीं त्यांच्या पायात चाळ बांधले गेले. पण आपल्या कर्माला दोष न देता त्यांनी चाळांनाच सुख-दुःखाचे सोबती केले. आयुष्यभर केलेले कलेच्या सारीपाठात जे-जे भोग वाट्याला आले, त्यातून स्वतःबरोबरच कुटुंबाची, मुलाबाळांची ससेहोलपट मोठ्या खुबीने लेखकांनी मांडली आहे. भटक्यांच्या उपेक्षा त्यांच्याही वाट्याला आल्या. पण आयुष्यात आलेल्या सुवर्णक्षणांना त्यांनी मोठ्या खुबीनं कवटाळलही. राजश्रींची कलेची वाटचालही लेखकांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानं त्यात विविधांगी नाटके फुलले. त्याच एक उदाहरण पुस्तकात दिलं आहे.
राजश्रीबाईंनी एकदा गाण्यांच्या मैफीलीत चार चांद लावले. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या बंगल्याच्या बैठकीत पंढरपूरचे ज्ञानोबा उत्पात, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद झाकिर हुसेन, तौफिक कुरेशी, पं. जसराज, शंकर महादेवन, पं. भवानी शंकर असा शास्त्रीय संगीतातल्या महानुभावांसमोर पेश केलेली लावणी बहुआयामी आणि प्रशंसास पात्र ठरली. लावणीचे निवेदन स्वतः लेखकच करीत असल्याने शब्द-ताला-सुरांची आतेषबाजी झाल्याचे वर्णन वाचनीय झालेले आहे.
माना-सन्मानाच्या मराठमोळ्या कलावती शिवाय डॉ. प्रा. खांडगेंनी भारतभरातल्या विशेषतः उत्तर भारतातल्या लोकवतींचे अनोखे दर्शनही 'लोकरंगनायिका'त घडविलेले आहे. ते लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पंडवानी ही छत्तीसगडमधील आदिवासी गायनशैली जगभरात लोकप्रिय करणाऱ्या लोककलावंत तीजनबाई ! लेखकांना प्रत्यक्षात भेटीतून आपला जीवन प्रवास त्या उलगडत राहतात. पंडवानी म्हणजे पाच पांडवांच्या आयुष्यातील विविध प्रसंगातील कथा. 'स्त्री' शक्तीचा जागर महाभारतातील पंडवनीसारख्या मिथकाचा वापर करून त्यांनी आयुष्यभर साकारला. भटक्यांचे जीवनभोग वाट्याला आलेल्या आणि पतीला सोडून तीन मुलांना घेऊन घराबाहेर पडलेल्या तीजनबाईची वेदना उराशी कवटाळून केलेला संघर्ष म्हणजे तीजनबाई. आयुष्यभर त्या मातीने गाणे गायल्या.
छत्तीसगडच्या नाच्या शैलीचे संस्कार तीजनबाईच्या अभिनय आणि गायनात होते. त्यामुळे त्यांच्या अभिनय गायनाला संमोहित करणारी लयबद्धता प्राप्त झाली होती. त्यांच्याकडून द्रौपदी वस्त्रहरण कथा ऐकूण पंडित जसराजही हळहळले होते. त्यांना 1985 मध्ये पॅरिसमध्ये पंडवानी सादरण्याची संधी मिळाली तेव्हा 'परदेशातील लोकांना पंडवानी समजली का? असे विचारताच 'देश-विदेशातील व्यवहाराची भाषा वेगळी आणि कलेची वेगळी, पण कलेची भाषा विश्वात्मक असते' असे त्यांचे उत्तर आश्चर्यजनक होते.
त्यांनी मुंबईत येऊनही कार्यक्रम सादरले. तीजनबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा चित्रपट कथेला शोभेल अशीच आहे असे नमुद करून 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविलेल्या तीजनबाई समकालीन संदर्भासह प्रकट होणार यशोगाथा आहेत, या यशोगाथेच्या शीर्षस्थ लोककलावंत तीजनबाई तीजनबाई खरोखरच मिथक आहेत. पंडवानीची पताका आहेत असं लेखकांनी सार्थ केलेलं वर्णन त्यांची कथा वाचताच सहजपणे पटत.
कच्छच्या रणातील रानवेल अशा सार्थ उक्तीने प्रशंसा केलेली लोकवती म्हणजे धनबाई कारा. गुजरातमधील लोककला संगितातील प्रसिद्ध नाव. त्या जशा लोकगीत गायिका होत्या तशा प्रतिभाशाली कवयित्रीदेखील होत्या. त्यांची गीते अजूनही गुजरात आणि त्यातही कच्छच्या भूमीत लोकगीतांसारखी अधिराज्य गाजवून आहेत. लेखक धनाबाईंच वर्णन करताना म्हणतात धनाबाई म्हणजे मातीला पडलेले मातीचे स्वप्न, तहानेला लागलेली तहान आणि लोकधूनीची आर्त तान...! 'धनाबाई कारा गुजरातच्या लोकसंगिताचा, लोकगीतांचा, लोकनृत्याचा मानदंड झाल्या हा विलक्षण चमत्कार आहे.'
एकदा एका मेळाव्यात भारतातील ज्येष्ठ विचारवंतांनी आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती आणि आदिवासी साहित्य यांवर मौलिक विचारमंथन वरोरा, चंद्रपूर येथे 'इंडियन नॅशलन थिएटर तर्फे' आयोजित केले होते. त्यासाठी अनेक विचारवंतांना पाचारण करण्यात आले होते. त्यात दुर्गाबाई भागवत, प्रभाकर मांडे, अशोक रानडे, गंगाधर मोरजे, अशोक परांजपे आणि स्वतः लेखकही होते. या साऱ्यांसमोर धनाबाई कारा नृत्य करत होत्या. गात होत्या. त्यांची लोकगीते आतड्यापासून येत होती. आणि ती धरती-आकाशाला साथ देत होती.
झाडा-पानांच्या, वाऱ्या-वावटळीच्या आवाजाला साथ देत होती. ते जे कच्छी भाषेतलं गाणं दुर्गा भागवतांनी नेमकेपणानं टिपलं होत. सादरीकरणातली उत्स्फूर्तता, बेभानपणा, अंगभूत सळसळणारी ऊर्जा सारं अनोखं होतं. लेखकांनी ती आठवण अधोरेखीत करताना म्हटलं की ते ज्यावेळी ते दुर्गाबाईंच्या भेटीस गेले, तेव्हा धनाबाईचा विषय काढताच त्या म्हणाल्या, "तिचे गाणे नुसते करुणरसपूर्ण नाही तर तिच्या कष्टांत कारुण्य आहे आणि तिच्या गाण्यात निरागसता आहे." दुर्गाबाईंच्या प्रशंसावरूनच धनाबाईंची महती कळते.
लोकरंगनायिका या लेखसंग्रहात समाविष्ट पार्वती बाउल हा या सगळ्यांमधला अपवाद सनातनी ब्राह्मण कुटूंबातला त्यांचा जन्म, पार्वती बाउल स्वेच्छेने बाउल परंपरेकडे वळल्या. एखाद्या अभिजात परंपरेतल्या कलावंताने एखाद्या लोककलेकडे आवडीने, स्वयंस्फूर्तीने वळावं तशा वळल्या आणि त्यांनी स्वतःच्या पूर्वसिद्ध कलानिपुणतेच्या बळावर बाउल संगिताला राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला.
डुग्गी, नुपूर, एकतारा या वाद्यांच्या साथीने पार्वतीजींनी आपले कार्यक्रम सुरू केले. त्यांची खासीयत अशी की त्यांच्या कार्यक्रमांत नाट्यतंत्राचा वापर असे. पदगायन, निरुपण, नर्तन, वादन यांचा सुमेळ म्हणून पार्वतीजींचा प्रयोग ओळखला जातो. पार्वतीजींची अशी अनेक विध रूपे लेखकांनी नेमकेपणाने मांडल्याने कृष्णरंगी रंगलेली बंगकन्या सहजतेने समजत राहते.
या मालिकेतील मंजम्मांची कहाणी चित्तथरारक आणि वेधक आहे. लेखकांनी मंजम्मांचं उत्कट भावनेने केलेलं शब्दचित्रण वास्तव असल्यानं त्यातली दाहकता अस्वस्थ करते. पाचव्या इयत्तेत शिकत असतानाच मंजुनाथाला आपल्यातल्या स्त्रीत्वाची जाणीव झाली. तो काळ त्याच्यासाठी मोठ्या मानसिक आणि शारीरिक संघर्षाचा होता. साधारणतः बाराव्या वर्षापासून मंजूनान एक स्त्री म्हणून वावरू लागला. साडी नेसू लागला. कुंकू, पावडर लावू लागला.
आईला मदत म्हणून पाणी आणू लागला. रांगोळी काढू लागला. असे शारीरिक-मानसिक बदल टिपल्यानं मंजम्मा जोगतीनीचं आयुष्य डोळ्यांपुढे सहज तरळू लागतं. स्वतः लेखक त्यांना भेटण्यासाठी कर्नाटकातील इलाख्यात जाऊन त्यांची कथा आत्मीयतेनं उभी करताना दिसतात. पुर्वाश्रमाचा मंजुनाथ मंजम्मा जोगती कसा झाला, त्यातल्या व्यथा काळीज कुरतडवून टाकणाऱ्या आहेत. मंजम्मांना 'पद्म' पुरस्कार मिळतानाचा सोहळ्यात राष्ट्रपती भवनातील शिष्टाचारांहून भारतीय परंपरा कशी श्रेष्ठ आहे याचा वस्तुपाठ लेखकांनी अतिशय तन्मयतेनं मांडला आहे.
राजस्थानात लोकनृत्याची समृद्ध परंपरा आहे. राजस्थानातील सर्पकन्या गुलाबो सपेरा. त्यांनी कालबेलिया या लोकनृत्य शैलीतून आपला ठसा उमटवला आहे. सपेरा म्हणजे साप. सापाचं नृत्य करून दाखविणारी ही राजस्थानातील आदिवासी जमात. 'अपना उत्सव'च्या प्रसिद्धी समन्वयक म्हणून काम करताना आणि विविध वेळी लेखकांना गुलाबो सपेरांना भेटण्याचा, त्यांचे लोकनृत्य पाहण्याचा योग आला. त्यातून गुलाबो उमटत गेल्या.
स्त्री मुक्तीचा त्यांनी दिलेला लढा... तिसरी मुलगी झाली म्हणून मातीत पुरली गेलेली सपेरा पुढे सगळ्या वाईट प्रथांना पुरून उरलीचा प्रवास उत्कट शब्दांतून गुंफला आहे. कालबेलिया याचा अर्थ काल म्हणजे मृत्यू आणि बेली म्हणजे मित्र. मृत्यूशी केलेली मैत्री. या प्रख्यात लोकनायिकेने 165 देशांमध्ये कालबेलियाचे कार्यक्रम करून जगभर दिगंती कीर्ती मिळवली आहे. 1916 मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. या लोकरंगनायिकेची जीवनकहाणी वाचून वाचक एका वेगळ्याच अनुभूतीचा द्रष्टा अनुभव येतो.
लोकरंगनायिकेच्या मालिकेतील पुढची नायिका या गुलाबबाई नौटंकी. या लोकवतीवर आधारित आहे. महाराष्ट्रात जसा तमाशा तशीच उत्तर प्रदेशातील लोकप्रिय झालेली नौटंकी हा लोककला प्रकार. आपल्या तमाशात पहिली स्त्रीनर्तिका म्हणून पवळा हिवरगावकर होऊन गेल्या तशाच नौटंकित काम करणाऱ्या पहिल्या स्त्री कलावंत म्हणजे गुलाबबाई. त्यांच्यापासूनच स्त्री कलावंतांची परंपरा सुरू झाली. त्यांची कन्या मधू यांजकडून लेखकांनी जे वास्तव जमा केलं त्यातून गुलाबबाईंच्या जीवन व्यथा त्यांना चितारता आल्या.
गुलाबबाई उत्तम गायकही होत्या. अंगभूत अभिनय आणि गायन यांतून त्यांनी नौटंकीला अमाप प्रसिद्धी मिळवून दिल्याचा बारीकसारीक तपशील लेखकांनी तन्मयतेने मांडल्यानं हा भागही उत्कंठावर्धक आणि वाचनीय आहे. या कलावतीस भारत सरकारने १९९० साली 'पद्मश्री' देऊन सन्मानीले आहे. गुलाबबाईनी या कलेसाठी जे आयुष्य पणाला लावलं म्हणूनच आजवर नौटंकी बरोबर त्यांचं नाव टिकून आहे, असंही लेखक नमूद करतात.
'लोकरंगनायिका' ही शब्दरुपी कलाकृती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहिलेल्या डॉ. प्रा. प्रकाश खांडगे यांनी अभिनिवेषाने मांडल्या आहेत, ज्या अंतरिक तळमळीतून रेखाटल्या आहेत त्यांच मोल नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. हरएक रंगनायिकेच्या वाट्याला आलेलं शोषण, उपेक्षा, दारिद्र, अवहेलना भारलेपणासह मांडल्यानं या ग्रंथाच मोल अधिक आहे. प्रत्येक कलावंतीनीचा ध्यास, त्यांची कलेवरची निष्ठा, लढावू वृत्ती ज्या लोकबोलीतून साकारली आहे अशी कलाकृती लोकसाहित्यात पहिल्यांदाच उमटली आहे. मराठी वाणा-बाणाचे तमाम वाचक भरभरून प्रतिसाद देतील.
‘लोकरंगनायिका’
लेखक - डॉ. प्रकाश खांडगे
प्रकाशन - पद्मगंधा प्रकाशन
मूल्य - 265 रु.






