- डॉ. शाह आलम
इतिहास हा फक्त विजेत्यांचाच नसतो तर अनेकदा पराभूतांच्या रक्ताने, अश्रूंनी आणि न बोललेल्या वेदनांनी लिहिला गेलेलाही इतिहास असू शकतो. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील महुआ डाबर गावाची कहाणी अशीच एक, इतिहासाच्या पानांतून जाणीवपूर्वक लपवली गेलेली, पण जमिनीखाली अजूनही धगधगणारी कहाणी आहे.
जुलै 3, 1857… भारतात स्वातंत्र्याची पहिली मोठी लाट उसळली होती. मेरठपासून सुरू झालेला उठाव गोरखपूर, फैजाबाद, बस्तीपर्यंत पोहोचला होता आणि त्याच संघर्षाच्या आगीत होरपळले गेले महुआ डाबर गावातील तब्बल पाच हजार निरपराध जीव.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात, मनोरमा नदीच्या काठावर वसलेलं महुआ डाबर नावाचं गाव 1857 च्या उठावापूर्वी समृद्धी आणि सौहार्दाचं प्रतीक होतं. इथल्या बाजारपेठा मसाले, तंबाखू, तांबे-पीतळ आणि कापसाच्या व्यापाराने गजबजलेल्या, विणकरांच्या घरातून हातमागांच्या आवाजांनी भरलेल्या आणि गल्लीबोळांतून मेहनती लोकांच्या स्वप्नांनी उजळलेलं होतं. दूरवरपर्यंत प्रसिद्ध असलेलं इथलं छपाई आणि रंगाईचं वस्त्र व्यवसाय हे या गावाचं वैभव होतं. पण 1857 च्या जून-जुलै महिन्यातील एका क्रूर सकाळी, हे सर्व स्वप्न धूर आणि राखेत विरून गेलं. हजारो विणकर, रंगकाम करणारे कारागीर, व्यापारी इथे राहायचे. गावात प्रशस्त दुमजली घरे होती, मस्जिदी, शाळा आणि बाजारपेठा होत्या.
महुआ डाबरमध्ये उठलेले बंडाचे वादळ
5 जून 1857 रोजी आजमगढमध्ये 17व्या नेटिव्ह इन्फंट्रीने बंड पुकारले आणि गोरखपूर, फैजाबादमध्ये इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू झाला. जेल तोडण्याचा, खजाना लुटण्याचा प्रयत्न झाला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना पळ काढावा लागला. भयभीत झालेले इंग्रज अधिकारी जंगलातून, पायवाटांमधून, आपल्या प्राण वाचवत महुआ डाबरच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांना वाटलं नसेल की, महुआ डाबर हे त्यांचं अंतिम ठिकाण ठरेल.
महुआ डाबरच्या लोकांमध्ये सामान्यपणाच्या आड लपलेली असामान्य बंडाची ज्वाला होती. गुलाब खाँ, अमीर खाँ, पिरई खाँ, वज़ीर खाँ, जफर अली यांसारख्या युवकांनी गावातील लोकांना एकत्र करून ब्रिटिशांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. मनोरमा नदीच्या काठावर, जिथे पूर्वी हसणं-खेळणं असायचं, तिथे त्या रात्री तलवारींच्या, भाल्यांच्या आणि बंदुकांच्या आवाजाने आकाश फाटलं. हा गुरिल्ला युद्धाचा प्रकार होता, गनिमीकाव्याने अचानक होणारा आणि आक्रमक हल्ला…
संबंधित लेख वाचा: 1) खबरदार, जर मुस्लिमांना मदत केली तर… शेकडो वर्षांचा ‘भाईचारा’ असलेल्या ‘गुहा’ गावात आता नेमकं काय बिनसलं? |
10 जूनच्या रात्री चंद्रप्रकाशात नदी पार करत असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर अचानक हल्ला झाला. त्या संघर्षात लेफ्टनंट इंग्लिश, लिंडसे, थॉमस, कॉटली, रिची आणि सार्जंट एडवर्ड ठार झाले. केवळ सार्जंट बुशर बचावला, पण नंतर कलवारीच्या जमिनदाराने त्यालाही बंदी बनवलं.
या विजयाची खूप मोठी किंमत महुआ डाबरला भोगावी लागली. 3 जुलै 1857 रोजी, गोरखपूरचा कलेक्टर पेप्पे विल्यम्स 12व्या घोडदळ फौजेसह महुआ डाबरला घेरून बसला. त्याने गावाच्या तीन बाजूंनी वेढा घालून गावावर गोळीबार केला, घरांना, दुकांनांना आग लावली, आणि सर्व ठिकाणं पूर्णपणे राख करून टाकलं. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना निर्दयतेने मारलं गेलं, जिवंत जाळलं गेलं. ज्या मनोरमा नदीने जीवनरेषा दिली होती, तिथेच रक्ताच्या लाटा उसळल्या. नंतर सबंध गाव पेटवले गेले आणि गावाचे प्रत्येक अस्तित्व जाळून टाकले गेले. महुआ डाबर 'गैरचिरागी' म्हणजेच अंधाराचे, निर्वासितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले.
John William Kaye यांच्या "A History Of The Sepoy War In India 1857-1858" या पुस्तकात महुआ डाबर हे एका मुस्लिम बहुल, समृद्ध व्यापारिक गाव म्हणून उल्लेखले गेले आहे. चार्ल्स बॉल यांच्या "The History Of The Indian Mutiny" मध्येही या गावाच्या विध्वंसाचा तपशीलवार उल्लेख आहे.
एक गाव, जे इतिहासातून पुसले गेले
इतकेच नव्हे, तर गावाचा नामोनिशान पुसण्यासाठी आणखी एक षड्यंत्र रचले गेले. महुआ डाबरला जाळल्यानंतर, त्याच नावाने 50 किलोमीटर दूर बस्ती-गोंडा सीमेवर नव्या गावाची स्थापना करण्यात आली. जेणेकरून खऱ्या घटनास्थळी कोणी परत येणार नाही आणि इतिहासाचा मागमूस उरणार नाही. 1907 साली बस्ती गॅझेटियरमध्ये महुआ डाबरचे वर्णन करताना धूर्ततेने त्या नव्या गावाचा उल्लेख करण्यात आला. जिथे खरे महुआ डाबर होते, तिथे आजही केवळ राख आणि विस्मृतीचे ढग दाटलेले आहेत.
महुआ डाबरच्या क्रांतिकाऱ्यांनी पराभव स्वीकारला नाही. 21 मे 1858 रोजी त्यांनी पेप्पे विलियम्सवर हल्ला केला, 17 इंग्रज मारले गेले. पुढे 12 जून 1859 रोजी झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात पेप्पे गंभीर जखमी झाला आणि त्याला एक बोट कायमचे गमावावे लागले. महुआ डाबर जरी जाळलं गेलं, तरी बंडाची ज्योत मावळली नाही.
स्वातंत्र्यलढ्यातील विस्मृतीत गेलेली कहाणी
महुआ डाबरच्या नरसंहाराचे स्मरण आजवर राष्ट्रीय पातळीवर फारसे झाले नाही. जालियानवाला बागच्या हत्याकांडावर जागतिक स्तरावर शोक व्यक्त केला गेला, ब्रिटनच्या राणी आणि पंतप्रधानांनीही त्यावर खेद व्यक्त केला. पण महुआ डाबर? त्याचा उल्लेखही फार क्वचित ऐकू येतो. का? कारण येथे मारले गेलेले लोक गरीब, ग्रामीण आणि बहुतेक मुस्लिम समाजातील होते ,ज्यांच्या कथा इतिहासाच्या मुख्य प्रवाहात क्वचितच येतात.
शोध आणि पुनरुज्जीवनाचा प्रयत्न
डॉ. शाह आलम राणा आणि डॉ. शालीन सिंह यांच्या संशोधनात असं दिसतं की, महुआ डाबर नरसंहारानंतरच्या ब्रिटिश कोर्टाच्या कार्यवाहीत अनेक विसंगती आढळतात. काही साक्षीदारांचे पुरावे लपवले गेले, दोषारोप करण्यात पक्षपातीपणा दिसला. मेहरबान खाँला फाशी, बदलू खाँला आणि इतरांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. पण सत्य कायमचे दडपलं गेलं.
जालियांवाला बाग हत्याकांडावर ब्रिटिशांनी माफी मागितली, तिथे श्रद्धांजली दिली गेली. पण महुआ डाबरच्या नरसंहारावर आजही मौन आहे. डॉ. राणा म्हणतात, "महुआ डाबरचं दुःख जालियांवाला बागपेक्षा कित्येक पटींनी मोठं होतं, पण भारतीय राजकारण आणि इतिहासाने त्याला विसरलं."
1999 मध्ये डॉ. शाह आलम राणा यांच्या प्रयत्नांनी 'महुआ डाबर संग्रहालय' सुरू झाले. येथे त्या काळातील दस्तऐवज, वस्तू, नाणी, औषधे, हत्यारे आणि फोटोंचा संग्रह करण्यात आला. २०१० साली लखनऊ विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू झाले आणि त्या खालच्या जमिनीतून जळलेले लाकडी तुकडे, विटांचे अवशेष, भांडी, शिल्पकलेची उपकरणे आणि प्राचीन नाणी मिळाली, जे महुआ डाबरच्या अस्तित्वाचे साक्षीदार होते.
2010 च्या उत्खननात उघड झालेल्या वस्तू आजही सांगतात की महुआ डाबर केवळ एक गाव नव्हते, तर ते एक जिवंत संस्कृतीचे केंद्र होते. जिथे उद्योग, शिक्षण आणि व्यापार फुलायचे पण इंग्रजांच्या सूडापोटी त्या संस्कृतीला जाळून टाकण्यात आले. डॉ. राणा यांच्या अथक प्रयत्नांनी महुआ डाबरला उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या 'स्वातंत्र्य संग्राम सर्किट'मध्ये 2022 मध्ये स्थान मिळाले. 2025 पासून येथे क्रांतिकारकांना अधिकृत शस्त्र सलामी दिली जात आहे.
आजचा महुआ डाबर आणि एक अपूर्ण इतिहास
आज गौरजवळील महुआ डाबर हे नाव घेणारे गाव अस्तित्वात आहे, पण खऱ्या महुआ डाबरच्या राखेवर उभे राहिलेले स्मारक अजून उभे राहिलेले नाही. इतिहासकारांनीही यावर फारसे प्रकाश टाकला नाही. स्वातंत्र्यानंतरच्या भारतानेही या गावाच्या वेदनेला न्याय दिला नाही. आज महुआ डाबरचं मूळ ठिकाण ओसाड आहे. मनोरमा नदी अजूनही गप्प आहे, पण त्या मातीखाली पाच हजार निरपराध जीवांच्या आर्त किंकाळ्या अजूनही झिरपत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हे गाव एका राष्ट्रीय स्मारकाची प्रतीक्षा करत आहे.
महुआ डाबरची कहाणी आपल्याला सांगते की इतिहासात केवळ मोठ्या शहरांच्या, राजांच्या किंवा सेनापतींच्या कथा नसतात. कधी कधी गावाकडच्या शेतकऱ्यांच्या, विणकरांच्या आणि सामान्य लोकांच्या रक्तातूनही स्वातंत्र्याची बीजे उगम पावतात.






