मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘कुणबी’ म्हणून दाखल झालेल्या नोंदी महत्त्वाच्या ठरत आहेत. जुन्या दप्तरांपासून जमीन अभिलेख, देवस्थान व दवाखाने यांचे वडिलोपार्जित कागदपत्रे शोधून काढण्याची प्रक्रिया सध्या गतीमान झाली आहे. विशेष म्हणजे या नोंदींपैकी मोठ्या प्रमाणात दस्तऐवज मोडी लिपीत असल्याने कालपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मोडी लिपीसाठी अभ्यासकांसमोर संशोधनाची नवी दारे खुली झाली आहेत.
घराघरांत जुनी कागदपत्रे शोधण्याची लगबग सुरू आहे. देवस्थानाच्या दान नोंदी, वाडवडिलांच्या जमीन खरेदीच्या चिठ्ठया यासाठी जुने पेटारे चाळले जात आहेत. अभिलेखागारांमध्ये गर्दी वाढत आहे. कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची मागणीही जोर धरत आहे. सातशे वर्षांची परंपरा असलेली मोडी लिपी पेशव्यांच्या काळात राजलिपी होती.
आजही पुण्यात पाच कोटींहून अधिक कागदपत्रे व्यवस्थित जतन आहेत, पण 1950 नंतर अभ्यासक्रमातून वगळल्याने ही लिपी लुप्त झाली होती. धुळीने झाकलेले दप्तर, फाटके कागद, धूसर शाई आणि गूढ जोडाक्षरे ही डोकेदुखी ठरत असली, तरी मोडी अभ्यासकांसाठी हीच संधी आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या अभिलेखागारापर्यंत सगळीकडे मोडी तज्ज्ञांची मागणी आहे. 
तामिळनाडू आणि बिहारमध्येही अशीच परिस्थिती…
कारणे वेगवेगळी असली तरी जुन्या लिपींच्या बाबतीत आता जी अडचण महाराष्ट्राला आली आहे तशीच अडचण तामिळनाडू आणि बिहार राज्यांनाही आली आहे. सिंधू संस्कृतीच्या शोधाला अलीकडेच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. असे असले तरी सिंंधू संस्कृतीची लिपी हे आजतागायत न उलगडलेले कोडे आहे.
संबंधित लेख वाचा:
ही कोणती ‘कैथी लिपी’…? सिव्हिल इंजिनिअर सोळाव्या शतकातील पुरातन भाषा अचानक का शिकायला लागले?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी चक्क दहा लाख डॉलर्स रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. बिहारची परिस्थिती वेगळी आहे. या राज्यात हजार वर्ष जुनी असलेल्या कैथी लिपीत राज्यातले जमिनीचे बहुतेक दस्तावेज आहेत. बिहारमधील भूमिमापनाचं काम 2025 पर्यंत संपवण्यासाठी अनेक सिव्हील इंजिनियर्स आता कैथी लिपी शिकू लागले आहेत.
मराठ्यांचा इतिहास अन् मोडी लिपीचा पूर्वापार संबंध
1950 पूर्वी महाराष्ट्रात शाळांमधून मोडी लिपी शिकवली जायची. परंतु कालांतरानं मोडीची जागा आता मराठी भाषेनं घेतलीय. 1888 मधलं मोडी लिपीचं इयत्ता दुसरीचं पुस्तक आजदेखील उपलब्ध आहे. महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास आजदेखील या मोडी लिपीतच लुप्त आहे. या मोडी लिपीचा अभ्यास केला, तर इतिहासाची नवी पानं समोर येतील. मोडी लिपीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी रोजगाराची मोठी संधीदेखील उपलब्ध असल्याची माहिती वसुंधरा भाषा, मोडी लिपी संवर्धन आणि संशोधन केंद्राचे अध्यक्ष महेश जोशी यांनी दिली आहे.
अनेक जण मोडी भाषा असा शब्दप्रयोग करतात. खरं तर तो सपशेल चुकीचा आहे. मोडी ही भाषा कधीही नव्हती आणि नाही. मोडी ही लिपीच आहे. मोडी लिपी वाचली तर तिचा प्रत्येक शब्द हा मराठीत असल्याचं लक्षात येईल. मोडी लिपी ही सातशे वर्षांपूर्वी यादव कालखंडापासून अस्तित्वात होती. काळानुरूप मोडी लिपीत बदल होत गेलेत आणि ती स्वच्छ होत गेली, असेही महेश जोशी स्पष्ट करतात.
महादेव यादव व रामदेवराय यादव यांच्या कारकीर्दीत 1260 ते 1309 या कालखंडात मोडी लिपी विकसित केली गेली, असं मानलं जातं. या लिपीचा खरा बहर पेशवाईच्या काळात पाहायला मिळतो. पेशव्यांच्या दस्तऐवजांवरून तिच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो. या लिपीची वैशिष्ट्यं म्हणजे टापटीप अक्षरं, ओळीतील समांतर अंतर, लपेटदार लेखन आणि शुद्धलेखन. शिवाजी महाराजांपासून ते उत्तर पेशवाईपर्यंतच्या काळातील मोडी लिखाणाच्या आधारे मराठी भाषेतील बदल आणि तिच्या वाटचालीचा अभ्यास करता येतो.
मोडी लिपी अभ्यासक राकेश मोरे म्हणतात की, मोडी लिपीच्या मुळासंबंधी अनेक मतप्रवाह आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि डॉ. भांडारकर यांचं मत आहे की, यादवांचा मंत्री हेमाडपंताने ती श्रीलंकेतून आणली, तर चांदोरकर यांच्या मते ती मौर्यकालीन ब्राह्मी लिपीचं पुढचं रूप आहे. वाकणकर आणि वालावलकर यांचा विश्वास आहे की, ही ब्राह्मी लिपीचीच एक शाखा आहे, परंतु हात न उचलता लिहिता येणाऱ्या गुणधर्मामुळे ती इतर लिपींप्रमाणे दिसत नाही.
मोडी श्रीलंकेहून आली हे मत किंवा मौर्यी लिपीवरून ती घडली, असे मत हे वाकणकर आणि वालावलकर मान्य करत नाहीत. मोडी लिपी सुमारे 900 वर्षांपासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. उपलब्ध असलेला सर्वात जुना मोडी दस्तऐवज इ.स. 1189 मधील असून, तो भारत इतिहास संशोधक मंडळाकडे जतन केलेला आहे. ही लिपी 1950 पर्यंत काही प्रमाणात वापरली जात होती. मात्र या दोन-तीन शतकांत तिच्यात बरेच बदल झाले आहेत.
हेमांद्री पंत यांनी सर्वात आधी मोडी भाषेचा शोध लावला…
राजवाडे यांच्या मते, ज्ञानेश्वरी रचली जात असताना मोडी लिपीची संकल्पना महाराष्ट्रात प्रचलित होत होती. याच दरम्यान भारतात पहिले मुस्लीम आक्रमण झाले. लेखनासाठी कागदाचा वापर भारतात मुस्लिमांमुळे झाला, असेही मानले जाते, कारण ‘कागद’ हा शब्द फार्सी आहे आणि त्यासाठी संस्कृतमध्ये पर्यायी शब्द नाही. ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांचा उल्लेख करून राजवाडे आपले मत स्पष्ट करतात.
यादव कालखंडातील मोडी लिपीतील कागदपत्रं उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी जी पत्र बाहेर दिली तीच उपलब्ध आहेत. ब्रिटिशांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा दप्तरखाना जाळून टाकल्यामुळं महाराजांच्या कालखंडातील मोडी लिपीतील कागदपत्रं मुबलक स्वरूपात उपलब्ध नाहीत, देवगिरीचा राजा रामदेवराय यांचा पंतप्रधान हेमांद्री पंत यांनी सर्वात आधी मोडी भाषेचा शोध लावला. 1230 मध्ये चतुर वर्गात चिंतामणी हा मोडी भाषेतला सर्वात पहिला ग्रंथ हेमाद्री पंतांनी लिहिला, असं महेश जोशी म्हणालेत.
पेशव्यांनी दिला राज लिपीचा दर्जा
मोडी लिपीतील सर्वात जास्त कागदपत्रं ही पेशव्यांच्या कालखंडातील उपलब्ध आहेत. मोडी लिपीला पेशव्यांनी राज लिपीचा दर्जा दिला होता. यामुळं पेशव्यांच्या कालखंडातले सर्वात जास्त मोडी लिपीतील कागदपत्रं आज उपलब्ध आहेत. एकट्या पुण्यात पाच कोटी कागदपत्रं व्यवस्थित ठेवलीत. पुण्यासह मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीदेखील मोडी लिपीतील कागदपत्रं जपून ठेवली आहेत. याव्यतिरिक्त काही घराण्याकडं मोडी लिपीत असणारी त्यांची वैयक्तिक कागदपत्रं उपलब्ध आहेत, असंही महेश जोशी सांगतात.
पूर्वी मराठ्यांचे एकमेकांना निरोप देण्यासाठी मोडी लिपीचा वापर केला जायचा. मराठी राज्य सत्तेतील मोडी लिपीतील पत्र मुघलांच्या हाती लागली तरी त्यातला मजकूर त्यांना कळत नव्हता. खरं तर त्या काळात मोडी लिपीचा वापर गुप्त लिपी म्हणून व्हायचा. 
मराठे ज्या भागात गेले त्या ठिकाणी त्यांनी मोडीचा वापर केला. म्हणूनच आज दिल्लीपासून तंजावरपर्यंत मोडी लिपीतील कागदपत्रे अनेक पुराभिलेखागारांत सापडतात. महाराष्ट्राबाहेरही या लिपीला ‘मुडिया’, ‘वाणियावटी’, ‘मुंडीमुंडी’, ‘रजवाडी’ अशी नावे दिली गेली आहेत. विविध ठिकाणच्या खासगी संग्रहातही मोठ्या प्रमाणावर मोडी दस्तऐवज सापडतात. परदेशातील काही अभिलेखागारांमध्ये देखील मोडीतील पत्रांचा संग्रह आहे. या लिपीतील दस्तऐवज वाचताना त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजण्यास मदत होते.
मोडी लिपीच्या छपाई तंत्रज्ञान नेमके कसे होते?
मोडी लिपीच्या छपाई तंत्रज्ञानाबद्दल राकेश मोरे सांगतात की, मुद्रणकलेची माहिती शिवाजी महाराजांच्या काळात होती, तरी मोडी लिपीमधून छपाई करणे फार कठीण होतं. चार्ल्स विल्किन्स यांनी इ.स. 1707 मध्ये मोडीसाठी धातूचे अक्षरसंच तयार केले होते. नंतर, 1805 मध्ये पं. वैजनाथ यांच्या मदतीने विल्यम कॅरे यांनी प. बंगालमधील श्रीरामपूर येथे मोडी मुद्रणाचे तंत्र विकसित करून ‘अ डिक्शनरी ऑफ द मराठा लँग्वेज’ हा शब्दकोश प्रकाशित केला. काही इतर पुस्तकंही त्यांनी मोडी लिपीत छापली. 1802 मध्ये ‘बॉम्बे कुरियर’ या इंग्रजी वृत्तपत्रात पहिल्यांदाच मोडी लिपीत जाहिराती प्रसिद्ध झाल्या.
इ.स. 1905 मध्ये ‘खबरदार’ नावाचे मोडीतील वृत्तपत्र बेळगावहून प्रकाशित झाले. १९व्या शतकात मोडी वाचनमालेची पाठ्यपुस्तके देखील प्रकाशित झाली. मात्र 18 व्या आणि 19 व्या शतकांतील राजकीय बदलांमुळे देवनागरीला अधिक महत्त्व प्राप्त झालं.
मोडीची छपाई किचकट असल्यामुळे तिचा वापर कमी झाला आणि देवनागरी सार्वत्रिक बनली. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकुनांनी देवनागरी वापरणे सक्तीचे केले. इंग्रज सत्तेच्या अखेरीस फाऊंटन पेनचा प्रसार झाला. पूर्वी बोरूने लिहिताना अक्षरांना जाडी-रुंदी येत असे, परंतु फाऊंटन पेनमुळे ती शक्यता राहिली नाही आणि मोडी अधिक गुंतागुंतीची वाटू लागली. मात्र फाऊंटन पेनमध्ये शाई जास्त काळ टिकत असल्याने सध्याचे मोडी लेखक कॅलिग्राफी निब्स वापरून जुने सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करतात.
मोडी ही देवनागरीची जलद लिपी आहे. शब्द लिहिताना लेखणी न उचलता लिहिता येतं, कारण मोडीत देवनागरीप्रमाणे शब्द तोडावे लागत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुतेक व्यवहार आणि दस्तऐवज मोडीतच होते. त्यामुळे मोडीत खूप ऐतिहासिक माहिती दडलेली आहे.
आजही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, तमिळनाडू, केरळ आदी भागात कोट्यवधी मोडीतील दस्तऐवज विविध सरकारी व खासगी दप्तरांमध्ये आहेत. अनेक घरांत परंपरेने आलेले ताम्रपट, पत्रे जतन केलेली आहेत. मोडी लिहू आणि वाचू शकणाऱ्यांना एकत्र आणून, या इतिहासाचा प्रसार करणे, लिपीचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे.






