- मिशेल एलनर
मी मूळ व्हेनेझुएला वंशाची अमेरिकन नागरिक असल्याने, मारिया कोरिना मचाडो कोणत्या विचारधारेच्या आहेत हे मला चांगलेच माहित आहे. वॉशिंग्टनमधून इतर देशातील राजवटी बदलण्याच्या यंत्रणेचा त्या चेहरा असून लोकशाहीच्या वेशात निर्बंध, खाजगीकरण आणि परकीय हस्तक्षेप लादणाऱ्या त्या प्रतिनिधी आहेत.
जेव्हा मी "मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला" ही बातमी पाहिली तेव्हा मला हसूच आले. पण मी हसले नाही, कारण ज्या व्यक्तीच्या राजकारणाने अपार दुःख जनतेला दिले आहे अशा व्यक्तीला पुरस्कार देण्यात विनोद सुद्धा नाही. ज्यांना या व्यक्तीची विचारसरणी माहित आहे ते जाणतात की त्यांच्या राजकारणात शांततेचे कसलेही तत्व नाही. जर 2025 मध्ये यालाच "शांतता" समजले जात असेल तर या पुरस्काराने त्याची उरलीसुरली विश्वासार्हता पण गमावली आहे.
मचाडो यांचे राजकारण हिंसाचाराने भरलेले आहे. त्यांनी त्यांच्याच देशात परकीय शक्तींना हस्तक्षेपाचे आवाहन केले आहे. अगदी गाझाच्या विनाशाचे शिल्पकार इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना त्यांनी थेट आवाहन केले आहे की, त्यांनी व्हेनेझुएलाच्या "स्वातंत्र्या"साठी त्यावर बॉम्बवर्षाव करून त्यास "मुक्त" करावे. त्यांनी त्यांच्याच देशावर निर्बंधांची मागणी केली आहे. हे निर्बंध टाकणे म्हणजे युद्धाची एक मूक पद्धत असते, ज्याद्वारे युद्धापेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत आणि मोठ्या लोकसंख्येला औषध,अन्न आणि उर्जेचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ‘द लॅन्सेट’ आणि इतर जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासांनुसार सिद्ध झाले आहे.
मचाडो यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द अंतर्गत विभाजनाला चालना देण्यात, व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाला कमकुवत करण्यात आणि तेथील लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारण्यात घालवली आहे. मारिया कोरिना मचाडो कोणाचे अनुसरण करत आहे,ते पाहा..
मचाडो यांनी 2002 च्या उठावाचे नेतृत्व केले ज्याने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या राष्ट्रपतीला थोड्या काळासाठी पदच्युत केले आणि कार्मोना डिक्रीवर स्वाक्षरी केली. यामुळे व्हेनेझुएलाचे संविधान निरस्त्र झाले आणि सर्व सार्वजनिक संस्था रातोरात विसर्जित झाल्या.
त्यांनी सत्ता बदलाचे समर्थन करण्यासाठी वॉशिंग्टनशी संधान साधून काम केले. व्हेनेझुएलाला जबरदस्तीने "मुक्त" करण्याची आवई उठवून परदेशी लष्करी हस्तक्षेपाचे आवाहन त्यांच्या व्यासपीठावरून करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमणाच्या धमक्या आणि कॅरिबियनमध्ये त्यांच्या नौदलाच्या तैनातीचे मचाडो यांनी स्वागत केले. "ड्रग्ज तस्करीशी लढाई" या बहाण्याने प्रादेशिक युद्ध भडकवण्याची धमकी देणारे हे शक्ती प्रदर्शन होते. ट्रम्प युद्धनौका पाठवत होते, मालमत्ता जप्त करत होते आणि मचाडो त्यांचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम करण्यास तयार होत्या. त्यांनी व्हेनेझुएलाचे सार्वभौमत्व ट्रम्प यांना थाळीत वाढून देण्याचे वाचन दिले.
संबंधित लेख वाचा: निहोन हिंडांक्यो या संस्थेला व हान कांग या लेखिकेला मिळालेल्या नोबेलचे महत्त्व |
अर्थव्यवस्थेचा गळा घोटणाऱ्या अमेरिकेच्या निर्बंधांना त्यांनी पुढे रेटले ज्यामुळे व्हेनेझुएलातील गरीब, आजारी आणि कामगार वर्गाला भयानक किंमत मोजावी लागली.
त्यांनी तथाकथित "अंतरिम सरकार" तयार करण्यास मदत केली, जे वॉशिंग्टन समर्थित कठपुतळी सरकार होते. ते एक स्वयंघोषित "अध्यक्ष" चालवत होता ज्याने देशात जनता उपाशी असताना व्हेनेझुएलाची संसाधने परदेशात लुटवली.
मचाडो यांनी जेरुसलेममधील व्हेनेझुएलाचे दूतावास पुन्हा सुरू करण्याची शपथ घेतली आणि रुग्णालयांवर बॉम्बफेक करणाऱ्या आणि त्याला स्वसंरक्षण म्हणणाऱ्या वर्णभेदी इस्राईलला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आता त्यांना देशाचे तेल, पाणी आणि पायाभूत सुविधा खाजगी कंपन्यांना सोपवायच्या आहेत. 1990 च्या दशकात लॅटिन अमेरिकेला नवउदारमतवादी दुःखाच्या प्रयोगशाळेत रूपांतरित करणारी हीच ती कृत्ये होती.
मचाडो 2014 च्या विरोधी पक्षांच्या ला सलिदा या अभियानाच्या एक नेत्या होत्या ज्याने ग्वारिम्बा या राजकीय डावपेचा अंतर्गत तीव्र निदर्शने केली होती. परदेशी प्रेसने दावा केल्याप्रमाणे ती काही "शांततापूर्ण निदर्शने" नव्हती. देशाला कमकुवत करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी नियोजित केलेले ते संघटित स्वरूपाचे हल्ले होते. कचरा - काटेरी तारांनी रस्ते अडवले गेले, कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसेसना आग लावण्यात आली आणि चाविस्ता असल्याचा संशय असलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली किंवा जिवानिशी मारण्यात आले. 
रुग्णवाहिका आणि डॉक्टरांवरही हल्ले करण्यात आले. काही क्यूबन वैद्यकीय पथके जवळजवळ जिवंत जाळण्यात आली. सार्वजनिक इमारती, अन्न धान्याच्या ट्रक आणि शाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या. संपूर्ण देश भीतीखाली ओलीस धरला होता. मचाडो यांच्यासारखे नेते त्यावेळी बाजूला राहून टाळ्या वाजवून यास "प्रतिकार" असे म्हणत होते.
मचाडो या ट्रम्पच्या "निर्णायक कारवाई"याचे कौतुक करतात. स्थलांतरित मुलांना पिंजऱ्यात बंद करणाऱ्या आणि ICE देखरेखीखाली कुटुंब उध्वस्त करणाऱ्या ट्रम्प यांना त्या त्यांचा नेता मानतात. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे व्हेनेझुएलाच्या आया मात्र बेपत्ता झालेल्या त्यांच्या मुलांना शोधत फिरत आहेत.
जर हेन्री किसिंजर शांतता पुरस्कार जिंकू शकतात, तर मारिया कोरिना मचाडो का नाही? कदाचित पुढच्या वर्षी ते गाझा मानवतावादी फाउंडेशनला "कब्जा करताना दाखवलेल्या करुणे" साठी पुरस्कार देतील. मचाडो या शांतता किंवा प्रगतीचे प्रतीक नाहीत. त्या फॅसिझम, झिओनिझम आणि नवउदारमतवाद यांच्यातील जागतिक युतीचा भाग आहे. त्या एक अशी प्रवक्ता आहेत जी लोकशाही आणि शांततेच्या भाषेत वर्चस्वाचा पुरस्कार करते. व्हेनेझुएलामध्ये या युतीचा अर्थ सत्तापालट, निर्बंध आणि खाजगीकरण आहे. गाझामध्ये याचा अर्थ नरसंहार आहे.
या सगळ्यांची विचारसरणी एकच आहे: काही जीवांचे बलिदान दिलेच पाहिजे, सार्वभौमत्वावर वाटाघाटी करता येतात आणि हिंसाचार ऑर्डर म्हणून विकला जाऊ शकतो असा या लोकांचा विश्वास आहे.हा शांतता पुरस्कार हिंसाचार करणाऱ्याला दिले जाणे म्हणजे शांततेसाठी लढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर थुंकण्यासारखे आहे. ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणारे पॅलेस्टिनी डॉक्टर, गाझामध्ये सत्य आणि विश्वासाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी आपले जीवन धोक्यात घालणारे पत्रकार यांचा हा घोर अपमान आहे.
पण खरी शांतता बोर्डरूम वाटाघाटी किंवा व्यासपीठांवरून मिळत नाही. नाकेबंदी असताना जेवणाची सोय करणाऱ्या महिला, नद्यांचे रक्षण करणारे आदिवासी समुदाय, उपासमार नाकारणारे कामगार, अमेरिकेच्या निर्बंधांखाली जप्त केलेल्या मुलांना परत करण्याची मागणी करण्यासाठी एकत्र आलेल्या व्हेनेझुएलाच्या माता, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नियंत्रणाची व स्थलांतराची धोरणे आणि गुलामगिरीपेक्षाही सार्वभौमत्व निवडणारी राष्ट्रे ... हे एकत्र येऊन खरी शांती निर्माण होते. व्हेनेझुएला, क्युबा, पॅलेस्टाईन आणि "वैश्विक दक्षिण" मधील प्रत्येक देश या शांततेला पात्र आहे.
(मराठी अनुवाद :- सुदेश इंगळे)






