रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना साताऱ्यातून समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे ज्यामध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरने शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आपल्या आयुष्याची शेवट केली. सदर महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या. शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आपले जीवन संपवलं.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली.
सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?
“माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्याने माझा पाच वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागील पाच महिन्यांपासून माझा शारीरिक व मानसिक छळ केला.” असे या महिला डॉक्टरने हातावर पेनाने लिहिलं होतं. महिलेच्या हातावरील सुसाइड नोटची आता फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डॉक्टर तरुणीने तब्बल 21 वेळा तक्रार केली होती, पण…?
या धक्कादायक प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून डॉक्टर तरुणीने तब्बल 21 वेळा तक्रार केल्याचे समोर आले आहे. खोटे रिपोर्ट देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, अशा प्रकारची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. याबाबतचे पत्रही आता समोर आले असून त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांची नावेही देण्यात आली आहेत.
मी, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा फलटण येथे कार्यरत असून फलटण ग्रामीण पोलिस रुग्णांना रुग्णालयात आणतात आणि पेशंट फिट नसतानाही मॅडम फिट असल्याचा रिपोर्ट द्या असे दबाव वारंवार टाकतात. याची पोलिस निरीक्षक मा. महाडीक सर यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली.
तरी माननीय महोदय आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी त त्यांस योग्य ते मार्गदर्शन करावे, असं या तक्रारीत म्हटले आहे. तसेच यामध्ये तीन अधिकाऱ्यांची नावेही दिली आहेत. ज्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक माननीय पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायपत्रे, पोलिस उपनिरीक्षक बदने अशी या पोलिसांची नावे आहेत.
या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला असून याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कडक कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये नावे असणाऱ्या पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
आरोपी फरार, शोधपथक रवाना
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.
राज्य महिला आयोगाने काय सांगितले?
फलटणमधील या घटनेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या की, घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत. यामधील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. हे दोघेही फरार आहेत.
त्यांच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आलेले आहेत. पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तर या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील आणि तपास करणे सोयीचे ठरेल. परंतु घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. रक्षकानेच असे कृत्य करावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामधील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटले.
महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? - खा. सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शासन करावं. त्यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की “सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने गेल्या काही दिवसांपासून तिचा शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं वरीष्ठांना वारंवार कळवलं होतं.
परंतु, तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं. या विषयाच्या मूळाशी नेमकं कोणतं कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावं. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे.”
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव
दरम्यान,आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पीएसआय गोपाल बदने याने अत्याचार केल्याचं तर, पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं हातावर लिहून ठेवत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचं कळतंय आणि हे अत्यंत भयानक आहे. या घटनेमुळं गृहखात्याची अब्रू वेशीवर टांगली गेलीच पण पोलीसच असा अत्याचार करत असतील तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील सगळेच पोलीस वाईट नाहीत पण अशा नराधम पोलिसांमुळं चांगलं काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला काळीमा लागतो.या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जनतेचे रक्षक असूनही भक्षक बनलेल्यांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे.”
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या घटनेवर सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या ही महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे याचे निदर्शक आहे. कायद्याचे रक्षक असलेले पोलीसच जर भक्षक बनत असतील तर यापेक्षा काय वाईट आहे? या डॉक्टर महिलेने पीएसआय बदनेने चार वेळा अत्याचार केला. पोलिस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिला असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.
या महिलेला काय त्रास सहन करावा लागला असेल याची कल्पना करवत नाही. सुशिक्षित महिलेला असे पाऊल उचलावे लागत असेल तर सामान्य महिलांची काय परिस्थिती असेल? ज्यांच्याकडून सुरक्षेची हमी मिळाली पाहिजे तेच मारेकरी झाले तर काय करायचे? या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालले पाहिजे.






