- पी. विठ्ठल
अभिनेत्री शेफाली जरीवालाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. दोनेक दशकांपूर्वी तिच्या 'कांटा लगा' या अल्बमने मोठा धुमाकूळ घातला होता. आजच्यासारखा तो काळ सोशल मीडिया, इंटरनेट वा AI ने व्यापलेला नव्हता. टीव्हीवर खाजगी वाहिन्यांचे जाळे विस्तारत होते. MTV, फॅशन वगैरे चॅनल्सवर अशी गाणी वाजत राहायची. आजच्या मुलांना हे सगळं अविश्वसनीय वाटेल, पण त्याकाळी फाल्गुनी पाठक, वैशाली सामंत या गायिकांनीही तरुणाईला अक्षरशः वेड लावले होते.
शेफाली जरीवालाही त्याकाळी यशाच्या शिखरावर पोहोचली होती. मादक अदा आणि सौंदर्याने तिने मनोरंजन विश्वाला व्यापून टाकले होते. एकाच गाण्याने तिला जबरदस्त यश मिळाले होते. मधल्या काळात ती 'बिग बॉस'च्या एका सीझनमध्येही दिसली. त्या व्यतिरिक्त तिने वेबसिरीज आणि इतरत्रही काम केलेले होते. चार-पाच दिवसांपूर्वी या सुंदर अभिनेत्रीचा वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी हृदयविकारामुळे मृत्यू झाला.
‘आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दिसायला हवे’, म्हणून ती (अँन्टी एजिंग) ट्रीटमेंट घेत होती (म्हणे!). शेफाली ही मुळात सुंदर होती. तरीही तिला आणखी सुंदर व्हायचे होते. प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व रुबाबदार, देखणे आणि आकर्षक असावे, असे वाटते. इतरांनी आपल्या सौंदर्याचा हेवा करावा, कौतुक करावे असे वाटणेही अस्वाभाविक नसते.
पण सुंदर दिसण्याच्या मोहापायी अनेकांनी यापूर्वी जीव गमावल्याची कित्येक उदाहरणे आहेत. अर्थात त्याविषयी इथे बोलण्याचे कारण नाही. पण सिनेसृष्टी ही एक अशी जागा आहे, जिथे तुमच्या टॅलेंटपेक्षा ‘बाजारू कंटेंट’ला अधिक महत्त्व आहे. त्यातला एक कंटेंट म्हणजे तुमचे ‘शारीरिक सौंदर्य’.
स्त्रियांच्या सौंदर्याला समाजात एवढे महत्त्व का प्राप्त झाले?
आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर आपण इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसायला हवे, अन्यथा आपले ‘करिअर’ संपेल या भीतीपोटी कितीतरी तरुण मुली, स्त्रिया शरीरावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून घेताना दिसतात. किंवा ज्यांना करिअर करायचे नसते, त्यांना कौटुंबिक पातळीवर पुरुषांना आनंद द्यायचा असतो.(?) आजच्या अवाढव्य प्रगत तंत्रज्ञानाने वेगवेगळे अवयव, त्वचेचा- केसांचा रंगही बदलणे अगदी सहज शक्य झाले आहे. एवढेच काय तर लिंगपरिवर्तनही सहज करता येते. असे ट्रान्सफॉर्मेशनही अलीकडच्या काळात खूप वाढले आहेत.
ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्या स्त्रिया या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेताना दिसतात. मुद्दा हा की, स्त्रियांच्या सौंदर्याला समाजात एवढे महत्त्व का प्राप्त झाले? प्रत्येक पुरुषाला, समाजाला सुंदर स्त्रीच का हवी असते? सौंदर्य हे केवळ शारीरिक ठेवणीवर किंवा गोरेपणावर अवलंबून असते का? स्त्रीच्या सौंदर्याचा आणि पुरुषांच्या लैंगिकतेचा काही संबंध असतो का? सौंदर्याचे विक्रीमूल्य नेमके किती? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
प्राचीन काळात तर स्त्रियांमुळे अनेक लढाया आणि युद्धे झाली आहेत. आज काळ बदलला आहे. लढायांचे आणि स्त्री शोषणाचे संदर्भ बदलले आहेत. आजचे जग हे मार्केटिंगचे, विक्रीचे जग आहे. स्त्रियांच्या सौंदर्याचा उपयोग करून कोणतेही उत्पादन ग्राहकांच्या माथी मारले जाते. सिनेमा, टीव्ही मालिकांपासून ते सोशल मीडियातल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुंदर स्त्रियांची चलती असते. जगातले खूप मोठे मार्केट स्त्रियांनी- म्हणजे 'स्त्री- देहाने' व्यापलेले आहे.
हॉटेल, बार, स्पा, रेस्टॉरंटपासून ते अगदी पॉर्न किंवा मनोरंजनाच्या इंडस्ट्रीपर्यंत. सौंदर्य हे स्त्री शोषणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. पण दुर्दैवाने ते आपल्या लक्षात येत नाही किंवा त्याला सार्वत्रिक मान्यताच जणू मिळाली आहे. सौंदर्य फक्त शरीराचेच असते का? की शरीराच्या पलीकडे मन, भावना किंवा स्वभावही महत्त्वाचा असतो? व्यावहारिक जगात चांगल्या ‘स्वभावाला’ खरंच किंमत असते का? सुदृढ आणि आकर्षक शरीरयष्टी हेच महत्त्वाचे भांडवल का मानले जाते?
संबंधित लेख वाचा: 1) अखेरच्या काळात या ‘नेक दिल’ अभिनेत्रीला चार खांदेकरीही मिळू नयेत, यासारखे दुर्दैव ते काय? |
‘बाजारू’ व्यवस्था कोणत्या महिलांना ‘टार्गेट’ करते?
मराठीतील अनेक लेखिकांनी या बाजारू प्रवृत्तीवर लिहिले आहे. हंसा वाडकर, प्रिया तेंडुलकर, वैशाली हळदणकर, कविता महाजन अशी काही प्रातिनिधिक नावे सांगता येतील. अर्थात हे केवळ फिल्म इंडस्ट्रीपुरते मर्यादित आहे का? तर नाही. अगदी क्रीडा क्षेत्र, प्रायव्हेट कंपन्या, प्रशासनासह जगण्याच्या सर्वच क्षेत्रात ही मानसिकता दिसते. मॉल्स, हॉटेल्स, एयरपोर्ट व विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यालये – अशा अनेक ठिकाणी स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागतो.
अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या स्त्रियांना स्वतःचा सन्मान जपण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. पुरुषी वर्चस्ववादाशी दोन हात करत तिला स्वतःचे अस्तित्व आणि चारित्र्य जपावे लागते. पण ‘बाजारू’ व्यवस्थेला अशा चारित्र्यवान स्त्रिया नको असतात. वय झालेल्या आणि सुंदर नसलेल्या स्त्रियांना पुरुषांच्या जगात किंमत नसते. अशावेळी समाजाची परंपरागत चौकट ओलांडून नव्या आव्हानांना सामोरे जाऊ पाहणाऱ्या स्त्रिया मानसिकदृष्ट्या खचतात. त्या या सिस्टीममधून बाहेर फेकल्या जातात.
खाजगी क्षेत्र हे तर अनिश्चित आणि बेभरवशाचे असते. आपल्याला या सिस्टीममध्ये राहायचे असेल तर स्वतःत बदल घडवायला हवा, ही जाणीव अशावेळी तीव्र होते. पर्यायाने स्त्रिया सौंदर्याची नवी परिमाणे शोधू पाहतात. विशेषत: काळ्या- सावळ्या रंगाच्या स्त्रियांना याबाबत अधिक संघर्ष वाट्याला येतो. मग सर्जरी, डाएटपासून ते वेगवेगळ्या उपचारपद्धतीपर्यंत त्या पोचतात.
त्यात त्यांना तात्पुरते यश मिळते खरे; पण हे तकलादू सौंदर्य दीर्घकाल टिकत नाही. शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसतातच. यातून काहीतरी अघटीत घडते आणि अनेकांचा अकाली मृत्यू होतो. अगदी ग्रामीण भागातील मुलींनाही आता शहरी पार्लर खुणावू लागले आहेत. त्याचे कारण सौंदर्याच्या रूढ कल्पना. (पुरुषांच्या बाबतीतही हे लागू आहे.)
आज जगण्याची नवनवीन दालने, क्षेत्रे खुली होत असताना आणि स्त्रियांच्या प्रतिभेला, नवनिर्मितीला नवनवे धुमारे फुटत असताना समाजाच्या सौंदर्यविषयक अपेक्षांचा मोठा ताण मुलींवर /स्त्रियांवर येत आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सर्जनशील समाज घडवायचा असेल तर सौंदर्याच्या खोट्या विभ्रमातून आपण सर्वांनीच बाहेर पडायला हवे. त्याशिवाय स्त्रियांच्या मनावरचे हे युगानयुगांचे ओझे उतरणार नाही.






