- मनीषा मोंडल
मेहरुलनिशा उर्फ परी आणि महक… उत्तर प्रदेशच्या संभल गावातील सख्ख्या बहिणी. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी दोघीही जिवापाड मेहनत करायच्या. मस्ती, विनोद, मादक इशारे आणि गलिच्छ शिव्या या ‘कंटेट’च्या जोरावर त्यांचे mehakpari143 हे इंस्टाग्राम पेज चांगलचं चर्चेत होतं. आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्या व्हिडियोंना एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज आणि पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. अनेक फॉलोअर्स त्यांनावाईट भाषेत ट्रोल करायचे, त्यांच्यावर टीका करायचे… या दोघींना त्याची पर्वा नव्हती कारण त्या आता इंफ्लुएंसर बनल्या होत्या.
मात्र परी आणि मेहक यांना ठाऊकही नव्हतं की त्यांचा तो ‘त्या’ दिवसाचाफक्त 30 सेकंदाचा व्हिडियो त्यांना थेट तुरूंगाची हवा खायला लावेल.
मेहक आणि परी या भगिनींना कोणत्या अश्लील कंटेटवरून अटक झाली?
‘’इन्स्टाग्रामवर तो व्हिडियो पोस्ट केल्यानंतर, मात्र आम्हाला जरा वाईट वाटलं. आम्ही फक्त व्हिडियोमध्ये शिव्या दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र आम्ही असं कधीच बोलत नाही’’ 20 वर्षाची मेहक बोलत होती. तिला आणि तिच्या 21 वर्षाच्या बहिणीला 15 जुलै रोजी अश्लील कंटेटवरून अटक झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला. बॉलिवूडचे दोघींना प्रचंड आकर्षण होतं, श्रीदेवी, करीना कपूर आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्री त्यांच्यासाठी आदर्श होत्या. मात्र बॉलिवूडपर्यंत जाण्याचा मार्ग किती खडतर आहे, याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी मोठ्या पडद्याऐवजी छोटा स्क्रीन म्हणजे सोशल मीडिया हा पर्याय स्वीकारला.
आता सबंध शहरभर या भगिनींचीच चर्चा सुरू आहे. इतक्या लवकर त्यांना जामीन मिळाल्यामुळे शहरातील लोकं नाखुश आहेत. ‘’त्या दोघींना आणखी काही दिवस तुरुंगाची हवा खायला लावली पाहिजे, मगच त्यांना कळलं असतं की त्यांनी काय चुक केली आहे ती,’’बप्पू नावाचा एक रिक्शाचालक सांगत होता. बप्पूने त्यांचे इन्स्टा पेज फॉलो केलं होतं.
संबंधित लेख वाचा: 1) भोजपूरी गाण्यांत इतकी अश्लीलता का असते…? |
संभलचे रहिवासी या भगिनींचा इतका तिरस्कार का करतात?
गावात या भगिनींविरुद्धची नाराजी फक्त या अश्लील व्हिडियोमुळे नव्हे तर आधापासूनच वाढत होती. मेहक आणि परी त्यांच्या बिनधास्त वागणुकीमुळे ओळखल्या जायच्या. मुक्त आयुष्य जगणाऱ्या या भगिनी गावातील लोकांच्या निशाण्यावर होत्या. गावातील लोकांना त्याची ही वर्तणूक अतिशय लजास्पद वाटायची. त्यातच त्यांच्या सोशल मीडियाची भर पडली आणि गावात आणि गावाबाहेरचे फॉलोअर्स दोन्हीकडून या भगिनी टार्गेट व्हायला लागल्या. मेहक आणि परीने शिव्यांचा भडिमार असलेला व्हिडियो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी तो व्हिडियो संभल पोलिसांना ‘टॅग’ रून त्यांच्या अटकेची मागणी केली. वाढता दबाव बघून अखेर पोलिसांनी परी, मेहक, हिना आणि जर्रार आलम यांच्याविरुद्ध केस दाखल केली. हे सगळे संभलचे इंफ्लुएंसर होते आणि या भगिनींसोबत काम करायचे. आलम येथील एका स्टुडियोमध्ये आयटी एक्ट कलम 67 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील साहित्य प्रसिद्ध करणे) आणि बीएनएसचे कलम 296 (सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता) या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना बेड्या घातल्या.
सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे अश्लील कृत्य कोणी करत असले तर ते नैतिकतेचे अध:पतन तर आहेच, परंतू सार्वजनिक स्थळांच्या पावित्र्याचेही उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया संभलचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी व्यक्त केली.
देशभरात मेहक आणि परी हे असे एकमेव इंफ्लुएंसर नाहीत ज्यांनी अशाप्रकारचे अश्लील कृत्य केले आहे. सोशल मीडियावर सनसनाटी निर्माण करण्यासाठी असा ‘कंटेट’ करणाऱ्यांची सध्या लाट तयार झाली आहे. छोट्या शहरातील अनेक मुलींनी प्रसिद्ध होण्यासाठी अशाचप्रकारचा मार्ग स्वीकारलाय, घाणेरड्या शिव्या देणं आणि ‘सेक्स’बद्दल खुलेआम बोलणं… एकदा का असा कंटेट तयार करून पोस्ट केला की लोकांचे लक्ष तुमच्याकडे वळलेच म्हणून समजा... संभलच्या या भगिनींनी हेच सूत्र वापरलं. तंग आणि छोटे कपडे घालून हिंदीमध्ये शिव्यांचा भडीमार करणारे व्हिडियो तयार करून फेमस होण्याचा यशस्वी मार्ग त्यांना सापडला होता.
मेहक आणि परीला पैसे मिळवण्याचा मार्ग कळला होता
इथे प्रश्न फक्त प्रसिद्ध होण्याचा नसून पैशांचा देखील आहे. सध्याच्या काळात नियमित उत्पन्न मिळवून देणारा हा एक धंदा सुरू झालाय. मेहक आणि परीने सांगितलं की, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या ब्रँडशी करार करून तशा रिल्स अपलोड केल्यामुळे त्यांना महिन्याला दहा हजार रुपये मिळायचे. गावातील लोकांना हे सहन झालं नाही आणि समाजातील शांती आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी त्यांनी या भगिनींना बहिष्कृत केलं.
‘’आमच्या घरी लहान लहान मुलं आहेत, ते काय शिकतील? या बहिणी समाजात घाण पसरवत आहेत’’ असे मेहक आणि परीच्या शेजारी राहणाऱ्या मोहम्मद कामिलने सांगितले. 
एका स्कुटरने या भगिनींच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली?
संभल येथील शाहबाजपुर कला गावामध्ये मेहक आणि परी त्यांच्या आई आणि आठ भावंडांसोबत राहतात. त्यांच एक मजल्याचे घर आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या वस्तीत प्रामुख्याने चांदीला वर्क लावण्याचे काम केले जाते. मेहक आणि परीच्या घरातील लोकंदेखील हेच काम करतात. वयाच्या आठवीपासून मेहक आणि परीने देखील कुटुंबाला हातभार लावण्यासाठी चांदीला वर्क लावण्याच्या कामाला सुरूवात केली. त्यांनी त्यातून मिळणाऱ्या पैशांची बचत केली आणि वडिलांच्या मदतीने एक स्कुटर खरेदी केली. या स्कुटरनेच मेहक आणि परीच्या आयुष्याला कलाटणी दिली.
गावात स्कुटर चालवणे ही त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यासारखी बाब होती. गावामध्ये ही एकदम अनपेक्षित आणि धक्कादायक गोष्ट होती. तोपर्यंत गावात आजवर एकाही मुलीने स्कुटर चालवली नव्हती. गावातील पुरुष मंडळी या गोष्टीमुळे नाराज झाले होते.
‘’आम्ही कितीतरी वर्षांपासून स्कुटर चालवण्याचे स्वप्न बघत होतो, परंतू आमचे शेजारी आणि गावातील पुरुषांना ते आवडायचं नाही. ते आम्हाला टोमणे मारायचे, ‘बघा, पापाची परी आली’ असे हिणवायचे. मेहक सांगते की, आमच्या इंस्टाग्राम हँण्डलचे नावदेखील आम्ही गावातील पुरुषांकडून मिळणाऱ्या टोमण्यांमुळेच तसे ठेवले आहे.
इंस्टाग्राम अकाऊंट व्हायरल होण्याच्या अगोदरपासून गावातील लोकं आम्हाला तुच्छ लेखायचे… मेहक सांगते, ’महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहणं, स्वत: कमवणं हे त्यांना सहनच होत नाही आणि म्हणून जिथे जिथे संधी मिळेल तिथे ते आमचा अपमान करायचे.’
मेहक आणि परीच्या घरची आर्थिक परिस्थिती
2022 मध्ये त्यांच्या वडिलांचे किडनीच्या विकारामुळे निधन झाले. सततचे डायलिसिस आणि रुग्णालयाच्या फेऱ्या यामुळे चांदीचे काम पूर्णपणे थांबले होते. मग त्यावेळी त्यांची आई नईमाने घरातल्या पुरुषांची भूमिका बजावली. याचा गावातल्या लोकांना राग यायचा.
नईमा म्हणते, या घराचे छत मी माझ्या मेहनतीने बनवलं आहे. मी कधीच सोशल मीडिया वापरला नाही. माझ्या मुलींना जी अटक झाली ती घटना आणि त्यांच्या रिल्स या गोष्टी मला दोन दिवसांनी कळल्या. माझ्या मुली भोळ्या आहेत, कुणाचं मन दुखावण्याचा त्यांचा जराही इरादा नव्हता. मला आता भीती वाटतेय की त्यांच्यासोबत काही वाईट तर होणार नाही ना? काहीही असलं तरी मी माझ्या मुलींच्या पाठीमागे भक्कपणे उभी राहीन…’’
मेहक आणि परी आपल्या बिनधास्त वृत्तीमुळे, कोणाचीही तमा न बाळगण्याच्या स्वभावामुळे आणि तोंडाने फटकळ असल्याकारणाने नेहमीच गावातील मुख्य केंद्रबिंदू राहिल्या आहेत. मेहक सांगते, गावात आम्हाला एकही मित्र-मैत्रीण नव्हती. आम्ही बहिणीच एकमेकांसाठी सर्वस्व होतो.
जामीनावर बाहेर पडल्यानंतर आता त्या मोरादाबाद येथील आलम स्टुडियोमध्ये राहतात. जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्या काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या कुर्तीमध्ये पूर्ण मेकअप वगैरे करूनच नटल्या होत्या. जे काही झालं त्याने आम्ही खचून गेलेलो नाही हेच त्यांना सिद्ध करायचं होतं.
एक वर्षांपूर्वी जेव्हा या भगिनींनी त्यांचे इंस्टाग्राम सुरू केले तेव्हा त्या नियमित कंटेट पोस्ट करत होत्या. उदाहरणार्थ हॉटेलमध्ये जेवताना, रस्त्यांवरून स्कुटर चालवताना वगैरे वगैरे…दोन महिन्यांपूर्वी त्यांनी असा कंटेट टाकायला सुरूवात केली ज्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली. तोकडे कपडे, स्पोर्ट्स ब्रा, शिव्या आणि मादक इशारे…
‘’रिल्स बनवू नका असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये, परंतू त्यांची अश्लीलता ही सहन करण्यापलीकडची आहे,’’२० वर्षाचा राजा जो त्यांचा शेजारी आहे तो सांगत होता. 
स्पोर्ट्स ब्रा, तंग कपडे आणि घाणेरड्या शिव्यांसह मादक इशारे…
दोन्ही बहिणी रिल्स बनवण्यासाठी गावापासून जरा लांब असलेल्या परिसरात जायच्या. तिथे गेल्यावर त्या शर्ट काढून टाकायच्या आणि स्पोर्ट्स ब्रा वरच व्हिडियो तयार करायच्या. अलीकडेच अशा पेहरावात त्यांनी एक व्हिडियो पोस्ट केला होता, ज्यात त्या म्हणतात,’’“दुश्मन बनाना पड़ता है, जमाना बी\*\*\*\*\*\*के इतना आसान नहीं है हमारे जैसा नाम कमाना.”
या व्हिडियोला मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 50 हजार लाईक्स मिळाले. एप्रिल महिन्यात त्यांनी त्यांचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आणि तीन महिन्यातच या चॅनेलचे 45,000 सब्सक्राइबर्स झाले. मेहक म्हणते,’’दर महिन्याला आम्हाला इंस्टाग्रामकडून 5 ते दहा हजार रुपये मिळायचे आणि यूट्यूब चॅनेल अद्याप मोनेटाइज नाही झालेले.’’
या भगिनी त्यांच्या मिळकतीचा अर्धा हस्सा घरी देतात, पण त्यांची आई म्हणते की तरीही घराचा खर्च भागत नाही. मांस विकत आणून खाणं अजूनही आम्हाला परवडत नाही.
इंफ्लुएंसर असलेल्या हिना आणि जर्रार आलम जेव्हा या भगिनींच्या आयुष्यात आले तेव्हापासून त्यांना योग्य ती दिशा सापडली. इंस्टाग्रामच्या मार्फतच त्यांनी मेहक आणि परीशी संपर्क साधला होता. हिनाने चार वर्षांपूर्वीच तिचं सोशल मीडियावरचं करिअर सुरू केलं होतं. तिच्या इंस्टाग्रामचे एक लाख फॉलोअर्स आहेत आणि ती तिच्या नृत्याचे व्हिडियो पोस्ट करते, जे बऱ्यापैकी अश्लील कॅटेगरीत मो़डतात. आलम एक युट्युबर असून त्याच्या चॅमेलचे जवळपास सहा लाख आहेत.
आलम म्हणतो, ‘’ज्याप्रकारे मेहक आणि परी कंटेट तयार करत होत्या त्याची स्टाईल मला खूप आवडली. मग मी ठरवलं की माझ्या युट्युब चॅनेलशी यांना जोडून घ्यायचं.’’
या दोन्ही बहिणींना आलम आणि हिना यांनी त्यांच्या ‘जुगनू परी’ या युट्युब सिरीजमध्ये सहभागी करून घेतलं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनणाऱ्या या दोघींची कथा या व्हिडियो सिरीजमध्ये दाखवण्यात आली असून त्याचे आतापर्यंत 18 भाग प्रसारित झाले आहेत.
या भगिनी आता पुढे काय करणार?
अगोदर अटक आणि मग जामीन यामुळे आता मेहक आणि परी यांनी आपल्या कामापासून ब्रेक घेतला आहे. दोघीही घाबरल्या असून झाल्याप्रकाराबद्दल त्यांना वाईट वाटत आहे. कोर्टाने त्यांना आदेश दिले आहेत की यापुढे अशाप्रकारच्या रिल्स बनवायच्या नाहीत आणि आतापर्यंतच्या सगळ्या अश्लील रिल्स डिलीट करून टाकायच्या. सुनावणीच्यावेळी या दोघींना बघण्यासाठी कोर्टात प्रचंड गर्दी झाली होती.
मेहक सांगते, कोर्टात एका वकिलाने आम्हाला सांगितलं की तुम्ही इतक्या गोऱ्या आणि सपंदर आहात की तुम्ही सोशल मीडियावर काहीही टाकलं तरी तुम्ही व्हायरल व्हाल…’’
(सौजन्य - द प्रिंट)






