- अप्सरा आगा
पॅलेस्टाईनमध्ये गेली तब्बल पावणे दोन वर्षे आणि त्याही आधीपासून इस्रायलकडून होत असलेल्या अत्याचाराची आता परमावधी झाली असून तिथली कोवळी बालके, स्त्रिया, पुरुष रोज बॉम्ब वर्षावात मृत्यूमुखी पडत आहेत. आता तर इस्रायलने पॅलेस्टाईनचे अन्न आणि औषधे या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही रोखून संपूर्ण पॅलेस्टाईनला भुकेने मारण्याचा डाव रचला आहे. त्याविरोधात संपूर्ण जगभरातून जनआक्रोश उमटत आहे.
पॅलेस्टाईन मधील नरसंहार थांबवा, तेथे अन्नपुरवठा तत्काळ सुरू करा आणि पॅलेस्टाईनला इस्रायलच्या पंजातून मुक्त करा, या मागण्यांसाठी जगभरात आणि भारतातही, संवेदनशील नागरिकांनी 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 या दरम्यान उपोषण करण्याचे ठरवले असून त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातही दोन दिवसांपूर्वी उपोषण करण्यात आले.
गाझापट्टीत इस्राएल पॅलेस्टाईनविरोधात करत असलेल्या मानवसंहाराच्या निषेधार्थ आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ, पुण्यातील पुरोगामी संस्था-संघटनांनी मिळून ‘एक उपोषण सहवेदनेचे - गाझासाठी!’ हे लाक्षणिक उपोषण संभाजी बाग येथे केले.
‘पॅलेस्टाईनमधील मानवसंहार थांबवा! तिथे तत्काळ अन्नपुरवठा सुरू करा!
यावेळी पॅलेस्टाईनला पाठिंबा देत या संपूर्ण मुद्द्याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. पॅलेस्टाईनसाठी उभे राहणे म्हणजे मानवतेच्या मुक्तीच्या प्रयत्नांना दिलेली साथ आहे आणि जगात कुठेही अन्याय झाला तरी आम्ही त्याच्या विरोधात उभे राहू असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. पॅलेस्टाईनच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची आपली पूर्वीची भूमिका भारत सरकारने निभवावी अशी आग्रही मागणी याप्रसंगी करण्यात आली.
स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), पुणे कलेक्टिव्ह, DYFI, SFI, नव समाजवादी पर्याय, लोकशाही उत्सव समिती, PUCL व अन्य समविचारी संघटना आणि व्यक्तींच्या पुढाकाराने उपोषणाचे आयोजन झाले. इब्राहिम खान, प्रसाद बागवे, प्राजक्ता उ. वि., स्मिता हेमलता, ज्ञानेश्वर मोटे, मालविका झा आणि अन्य कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दिवसभर चाललेल्या या लाक्षणिक उपोषणात या विषयाचे अभ्यासक प्रा. परिमल माया सुधाकर, प्रा. श्रुती तांबे, जन आरोग्य कार्यकर्ते डॉ अनंत फडके, सामाजिक कार्यकर्ते सुनीती सु र, किरण मोघे, अन्वर राजन, मिलिंद चंपानेरकर, मेधा थत्ते, शारदा वाडेकर, विनया देशपांडे, मेधा सामंत, अभय शुक्ला, विनय र र, सीमा कुलकर्णी, शैलजा आरळकर, महारुद्र डाके, गणेश मेरगू, दत्ता पाकिरे त्याचबरोबर साहित्यिक गणेश विसपुते, अंजली चिपलकट्टी, बाल हक्क कार्यकर्ते अच्युत बोरगावकर, काँग्रेसचे नेते मोहन जोशी आणि अन्य वक्त्यांनी पॅलेस्टाईन मुक्तीच्या मागणीला आपले समर्थन व्यक्त केले. यांनी या प्रश्नाची विविध अंगांनी मांडणी केली.
प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर म्हणाले की, भारताने पॅलेस्टाईनच्या फाळणीला सुरुवातीपासून विरोध केला होता. त्यानंतरही पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याच्या मागणीला भारताने नेहमीच पाठिंबा दिला. यासर अराफत यांच्या नेतृत्वाखाली तिथे चाललेल्या शांततामय आंदोलनाला साथ दिली. हमासचा जन्म इस्रायलच्या या अन्यायामुळे आणि अतिक्रमणामुळे झालेला आहे आणि आता तर इस्रायल सीरिया, जॉर्डन, लेबनॉनसह ग्रेटर इस्रायलचे स्वप्न पाहत आहे! याला वेसण घालायला हवी. भारताने आपली ऐतिहासिक भूमिका आजही पार पाडायला हवी असे प्रतिपादन प्रा.डॉ. परिमल यांनी केले.
प्रा. श्रुती तांबे यांनी इस्रायलद्वारे पॅलेस्टिनी महिला, मुलींवर केल्या जाणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना सांगितल्या. अन्न मागणाऱ्या लोकांवर गंमत म्हणून बेछूट गोळीबार केला जातो. निर्वासित छावण्यांवर बॉम्ब वर्षाव केला जातो. मागील दोन महिन्यांमध्ये पॅलेस्टाईनमधली 18000 मुले दगावली आणि आता तर उपासमारीमुळे मृत्युमुखी पडत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
संबंधित लेख वाचा: 1) गाझातील महिलांच्या मरणकळा |
कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीने बोलताना किरण मोघे म्हणाल्या की आज देशादेशातले लोक त्यांच्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारताहेत. इस्रायलमध्येही नेतन्याहूच्या विरोधात सामान्य माणसे उभी आहेत. अशावेळी आपण पॅलेस्टाईनसोबत उभे राहणे म्हणजे मानवतेवरचा आणि लोकशाहीवरचा विश्वास दृढ करणेच आहे.
भारत सरकारने पॅलेस्टाईनच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी
सुनीती सु. र. म्हणाल्या की या गाझापट्टीत केवळ माणसे मरत नसून माणुसकी मरते आहे, ही आपल्या सर्वांसाठीच शरमेची गोष्ट आहे. म्हणूनच पॅलेस्टिनी वाचवा आणि पॅलेस्टाईनला स्वतंत्र करा या मागण्यांसाठी जगभरातील नागरिक आवाज उठवत असून त्यात आपण आपला आवाज मिसळला पाहिजे.
‘हे युद्ध नाही, सामान्य नागरिकांना बेदखल करून भूमीवर ताबा मिळवण्याचा नफेखोर साम्राज्यशाहीवाद्यांचा डाव आहे,’ असे म्हणत लेखक, अभ्यासक अंजली चिपलकट्टी यांनी सांगितले की, ‘मानवी इतिहासात प्रचंड हिंसा दिसत असली तरी माणसाची मूळ वृत्ती अजिबात हिंसात्मक नाही असे अनेक शास्त्रीय अभ्यासांनीही दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या युद्धखोरीला आणि अन्यायाला विरोध करणे जरूरीचे आहे.’
मिलिंद चंपानेरकर यांनीही, भारत सरकारने सुरुवातीपासून याबाबत घेतलेली आणि बजावलेली भूमिका आणि भारताच्या नेतृत्वाखाली अलिप्तता परिषदेने एकजुटीने पॅलेस्टाईनला दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर आत्ताच्या स्थितीत तर भारताने ठामपणे पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे राहिलेच पाहिजे अशी आग्रही मागणी केली.
डॉ अनंत फडके यांनी पॅलेस्टाईनमधील वैद्यकीय स्थितीची वस्तुस्थिती मांडली. हॉस्पिटल्स उध्वस्त झाली आहेत, औषधांचा पुरवठा नाही, बाहेरील मदत मिळू दिली जात नाही अशा स्थितीत पॅलेस्टाईनच्या या जीवन मरणाच्या संघर्षात भारत सरकारने आपली मूळ भूमिका वठवायला हवी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
बाल सुरक्षा आणि बाल हक्कांवर काम करणाऱ्या अच्युत बोरगावकर यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा मुलांवरील होणारा परिणाम मांडला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या अनेक घटनांचा दाखला त्यांनी दिला आणि कुठल्याही परिस्थितीत बालकांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे अशी मागणी केली.
गांधीवादी कार्यकर्ते अन्वर राजन यांनीही गांधीजींनी त्यावेळी पॅलेस्टाईनच्या भूमीवर इस्रायल वसवण्यास केलेला विरोध किती योग्य होता हे सांगत पॅलेस्टाईनच्या मुक्तीची मागणी केली.
लाक्षणिक उपोषणातील ठळक मागण्या पुढीलप्रमाणे:
- उपासमारीचा शस्त्र म्हणून वापर करणे बंद करा
- इस्रायलच्या सत्ताधाऱ्यांनी पॅलेस्टाईनच्या सामान्य नागरिकांची नाकेबंदी त्वरित उठवावी.
- जीवनावश्यक वस्तूंची रसद तत्काळ सुरू करा
- मानव संहार थांबवा
- युद्धविराम करा
- पॅलेस्टाईन मुक्त करा
- भारत सरकारने पूर्वीप्रमाणे पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली पाहिजे, पॅलेस्टाईनच्या शांतता न्याय आणि स्वातंत्र्याला पाठिंबा दिला पाहिजे त्या दृष्टीने इस्रायल बरोबर होणारे सर्व प्रकारचे लष्करी सहकार्य थांबवले पाहिजे.
अशी मागणी करून पॅलेस्टाईनसाठी उभे राहण्याचा निर्धार याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केला.






