- अप्सरा आगा
अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईपासून साधारण 86 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध अशा 'माथेरान हिल स्टेशन'वरील घोड्यांना डोळ्यांच्या एका अज्ञात आजारानं ग्रासलं होतं. सुरुवातीला घोड्यांच्या डोळ्यांना सूज येणं, डोळ्यांचा रंग बदलणं, सतत पाणी येणं यांसारखी लक्षणं दिसू लागली. नंतर हळूहळू दृष्टी कमी होऊ लागल्यानं अनेक घोड्यांचे हाल झाले. या आजारामुळे अश्वपालकांच्या दैनंदिन जीवन आणि उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे.
या आजारातून सावरत असतानाच आता पुन्हा एकदा माथेरानच्या घोड्यांना आणि अश्वपालकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. माथेरानच्या दस्तुरी नाका परिसरात स्थानिक प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल चारशे घोड्यांचे निवारे पाडण्यात आले. त्यामुळे हे घोडे आता उघड्यावर आले आहेत. घोडेस्वारी आणि मालवाहतूक या व्यवसायावर आपले जीवन अवलंबून ठेवणाऱ्या शेकडो अश्वपाल कुटुंबांच्या उपजीविकेवर या कारवाईमुळे मोठं संकट आलं आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने घोड्यांचे आरोग्य धोक्यात आलं असून, या घटनेविरोधात अश्वपाल समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
नेरळ रेल्वेस्थानकापासून 7.6 किलोमीटरवर असलेलं आणि सुमारे 800 मीटर उंचीवर असलेलं मुंबईजवळील माथेरान हिल स्टेशन हे देशातील एक थंड हवेचं पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी पोहचण्यासाठी नेरळ रेल्वेस्टेशनपासून टॉय ट्रेन किंवा मग काही अंतरापासून घोड्यावर बसून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. माथेरान हिल स्टेशनवर बहुतांश पर्यटक हे घोड्यावर बसून फिरणं पसंत करतात. इथे सुमारे 450-500 कुटुंबाचा उदारनिर्वाह यावर सुरू आहे. सुमारे 700 घोडे हिल स्टेशनवर असून यापैकी जवळपास 400 घोडे हे पर्यटकांसाठी तर उर्वरित घोडे हे मालवाहतुकीसाठी वापरले जातात.
(photo: maharashtra times)
माथेरानच्या घोड्यांचे निवारे का तोडण्यात आले?
नगरपालिका आणि महसूल विभागाने भूखंड क्र. 93 वर उभारण्यात आलेले घोड्यांचे प्लास्टिक शेड हटवले आहे. दस्तुरी नाका परिसरातील भूखंड क्रमांक 93 हे सुमारे साडेपाच एकर क्षेत्रफळाचं आहे. या ठिकाणी अश्वपालांनी घोड्यांसाठी ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण देण्यासाठी लहान शेड उभारले होते. मात्र, प्रशासनाने हे शेड अनधिकृत घोषित केले आणि मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि पोलिस बंदोबस्तासह कारवाई केली. प्रशासनाचं म्हणणं आहे की या अनियंत्रित शेडमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती, पार्किंगची समस्या वाढत होती आणि वनजमिनीचे नुकसान होत होते. माथेरान हा ‘नो व्हेईकल झोन’ असल्याने वाहतुकीचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण आहे.
संबंधित लेख वाचा: माणसाने माणसाला ओढून नेण्याची पद्धत तर बंद झाली, पण आता आयुष्याचा गाडा कसा हाकणार? |
माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितलं, “दस्तुरी नाका परिसरातील काही प्लॉट्सवर शासनाचे मालकी हक्क आहेत. त्या ठिकाणी अतिक्रमण वाढल्याने प्रवाशांच्या पार्किंगची समस्या गंभीर झाली होती. शासनाच्या निर्देशानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई नगरपालिका, पोलिस प्रशासन आणि अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्तपणे केली गेली. शासनाला काही पर्यायी जागा घोड्यांच्या तबल्यांसाठी सुचवण्यात आल्या आहेत आणि त्याबाबत काही विभाग प्रयत्न करत आहेत.”
अतिक्रमण की उपजीविका?
गेल्या पन्नास वर्षांपासून घोडेस्वारीचा व्यवसाय करणारे विलास चव्हाण सांगतात, “आमच्या आजोबांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय. घोड्यांच्या मदतीने आम्ही प्रवाशांची वाहतूक करतो, सामान आणि गॅस सिलिंडर आणतो. आमचे घोडे उघड्यावरच असतात, आणि पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून फक्त काही बांबू टाकून त्यावर ताडपत्री लावली होती. इतकंच… पण प्रशासनाने त्यालाच अतिक्रमण मानलं आणि आमच्या घोड्यांचे निवारे पाडले. आता घोडे उघड्यावर आहेत, पावसात भिजत आहेत. एवढी वर्षं आम्ही या जमिनीवर कोणताही कब्जा केला नाही. आमच्या घोड्यांच्या जोरावरच इथले रस्ते तयार झाले. सुरुवातीला फॉरेस्टवाल्यांनीच आम्हाला शेडसाठी जागा दिली होती, पाण्याची टाकी दिली होती. आता मात्र प्रशासन म्हणतंय आम्ही अतिक्रमण केलं. गावात मोठमोठं अतिक्रमण चालू आहे, पण कारवाई फक्त आमच्यावरच होते.”
विलास चव्हाण यांच्यासारखे शेकडो अश्वपाल कुटुंबे माथेरानमध्ये राहतात. घोडेस्वारी, मालवाहतूक आणि पर्यटक सेवा हा त्यांच्या जगण्याचा आधार आहे. त्यांच्या मते, प्रशासनाने घोड्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांना उघड्यावर आणून आणखी अडचण निर्माण केली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला अश्वपाल समाजाने विरोध दर्शवला आहे. त्यांची मागणी आहे की, शासनाने घोड्यांच्या तबल्यांसाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करावी, जेणेकरून घोडे आणि त्यांच्या मालकांची उपजीविका सुरक्षित राहील.
“आमचे घोडे ऊन-पावसात, हिवाळ्यात कोठे राहणार?
या कारवाईविरोधात अश्वपाल संघटनेच्या महिलांनी दस्तुरी नाक्यावर मोठा आक्रोश केला. "आमच्या घोड्यांसाठी कायमस्वरूपी तबेल्यांची जागा उपलब्ध करून द्यावी," अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी प्रशासनाच्या निर्णयावर रोष व्यक्त करत विचारलं की “आमचे घोडे ऊन-पावसात, हिवाळ्यात कोठे राहणार? त्यांची काळजी कोण घेणार?” दरम्यान, स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी वर्गातही चिंता पसरली आहे. कारण घोड्यांशिवाय माथेरानमधील सर्व मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पर्यटनावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
माथेरान...महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पर्यावरणपूरक हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे माथेरान आज एका गंभीर संकटाला सामोरे जात आहे. 1850 मध्ये शोध लागलेले हे ठिकाण आजही ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. येथे आजही मोटारगाड्यांना प्रवेश नाही; घोडे, हातरिक्षा आणि पायी चालणे हीच वाहतुकीची साधने आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले गेले आणि माथेरानची वेगळी ओळख निर्माण झाली. परंतु या ओळखीचा अविभाज्य भाग असलेले घोडे आणि त्यांच्यावर उपजीविका चालवणारे अश्वपाल समाज आज गंभीर संकटात सापडले आहेत.
माथेरान हे भारतातील एकमेव ‘नो व्हेईकल झोन’ क्षेत्र आहे. येथे वाहनबंदी असल्याने, हॉटेल्ससाठी अन्नपदार्थ, बांधकाम साहित्य, जीवनावश्यक वस्तू तसेच पर्यटकांची मालवाहतूक ही पूर्णपणे घोड्यांवर अवलंबून असते. त्यामुळे घोड्यांचा व्यवसाय हा या प्रदेशाच्या अर्थचक्राचा अविभाज्य भाग बनला आहे. पण आता या घोड्यांना निवारा उरला नाही, त्यामुळे अश्वपाल समाज अक्षरशः उघड्यावर आला आहे.
माथेरानचा इतिहास आणि ओळख ही घोड्यांच्या टापांशी जोडलेली आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा हा सुंदर आदर्श म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आता प्रशासन आणि अश्वपाल समाज यांच्यातील संघर्षामुळे अडचणीत आलं आहे. या संघर्षाचा तोडगा निघेपर्यंत माथेरानची ओळख ‘घोड्यावरची सवारी’ धोक्यात राहणार, हे निश्चित आहे. अश्वपाल समाजाचा उपजीविकेचा आधार हिरावल्यामुळे संपूर्ण माथेरान हादरलं आहे. प्रशासनाच्या निर्णयावरून आता राजकीय स्तरावरही चर्चा रंगू लागली आहे. वारसा जपणाऱ्या माथेरानच्या या घोड्यांचा विस्थापितपणा पर्यटनाचं भविष्य बिघडवणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे..
माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं?
अश्वपाल संघटनेच्या सदस्य निधी जाधव यांनी सांगितलं की, "घोड्यांना संसर्ग झाल्याने समस्या येत होत्या. काही दिवसांपूर्वी घोड्यांमध्ये डोळ्यांना सूज येत होती. डोळे लालसर आणि पिवळसर दिसत होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे दिसत होतं. अंधत्व आल्याचंही दिसलं आम्हाला. घोड्यांच्या चालण्यावरून आम्हाला लक्षात आलं. घोडे ग्राहकांना घ्यायला जातात. घोडे वाट चुकू लागले किंवा पाय वेगळीकडे टाकत होते. घोडे भरकटत असल्याचं दिसलं. मोजून आठ ते दहा घोड्यांमध्ये आम्हाला हे दिसलं. आम्ही डॉक्टरांना बोलवलं. त्यांनी उपचार सुरू केले आणि बाकी घोड्यांमध्येही आम्ही उपचाराला सुरुवात केली. संसर्ग किंवा जळजळ यामुळे होऊ शकतं असं आम्हाला सांगितलं. इतर घोड्यांसाठीही आम्ही खबरदारी घेण्यास सुरुवात केली. यामुळे यात लवकर उपचार घेतल्याने घोड्यांचे डोळे आता बरे होत आहेत. इथे डॉक्टर नव्हते. आम्ही बाहेरून डॉक्टर बोलवले. सात दिवसांचा उपचाराचा कोर्स होता. यात 80 टक्के रकव्हरी झाल्याचं दिसत होतं."






