- संजना खंडारे
-“एकदा का बुद्ध धर्मात गेलात तर खायला, प्यायला भरपूर, भिक्षा भरपूर आणि वेळेला 'भिक्षुणी' ही भरपूर मिळतात…”
-‘’माझा पुत्र महाराज शुद्धोधनाचा तनय,या शाक्य राष्ट्राचा युवराज अस्पृश्यांच्या गल्यांतून तुकडे वेचीत हिंडतोय. कोण बुद्ध? कुठला बुद्ध?? कसला बुद्ध???
-‘’कुठाय तो सिद्धार्थ, राजकुलाला कलंक लावणारा तो भिकारी कुठयं.’’?
-‘’तथागत गौतम बुद्ध हा अडाण्यांचा आचार्य आहे''
-‘’काय रे भिक्कु, तुला भिक्षा मागताना लाज वाटत नाही का? भिक्कु घाणेरड्या, निघ इथून.’’
वर उल्लेख केलेले हे संवाद आहेत विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाचे… नुकतचं सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर प्रदर्शित झालं आहे. मात्र महाराष्ट्रात जिथे जिथे ‘संन्यस्त खड्ग' चे प्रयोग होतात तिथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते पोहचतात आणि या नाटकाचे प्रयोग बंद करण्याचा प्रयत्न करतात.
या नाटकात तथागत गौतम बुद्ध आणि भिक्खू संघाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानकारक संवाद असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात कुठेही 'संगीत संन्यस्त खड्ग'चा प्रयोग होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात हा वाद सूरू असून वंचितच्या कार्यकर्त्यांनी पुणे आणि मुंबई येथील नाटकांचे प्रयोग बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
"हे नाटक होऊ देणार नाही हीच वंचितची भूमिका आहे. ज्या ज्या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या त्या ठिकाणी ते प्रयोग बंद पाडण्यात येतील. तिथे निदर्शने केली जातील. सरकारलाही आम्ही सांगू इच्छितो की, हे नाटक बंद करण्यात यावं आणि परीक्षण मंडळातर्फे जी मान्यता देण्यात आली आहे ती रद्द करण्यात यावी." असे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर 1931 साली म्हणजे तब्बल 94 वर्षांपूर्वी सावरकरांनी हे संगीत नाटक का लिहिले…? या नाटकामधून गौतम बुद्धांची बदनामी झाली आहे का…? हे नाटक आयोजित करण्यामागे नेमका काय हेतू आहे…? या नाटकाला पुरोगामी महाराष्ट्रात फक्त वंचित बहुजन आघाडी पक्षच का विरोध करत आहे…? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संबंधित लेख वाचा: 1) घाशीराम कोतवालच्या पन्नाशीच्या निमित्ताने… |
‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकात नेमकं काय आहे?
संगीत सन्यस्त खड्ग हे नाटक वि. दा. सावरकरांनी 1931 ला लिहिलं. संगीत सन्यस्त खड्ग नाटकाचा पहिला प्रयोग बळवंत संगीत मंडळींनी मुंबईच्या ग्रँट मार्गावरील एलफिस्टन नाट्यमंदिरात शुक्रवार दिनांक 18 सप्टें 1931 ला सादर केला गेला. संगीत सन्यस्त खड्ग नाटक गौतम बुध्दाच्या काळाशी संबंधित आहे. गौतम बुध्दांच्या सांगण्यावरून 'शाक्य' सेनापती विक्रमसिंह शस्त्रत्याग करून संन्यासी होतो. बुध्दांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्रत्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते.
जेव्हा शेजारचा कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभाच्या सेनापतीत्वाखाली असलेले शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकी वेष धारण करून रणांगणात उतरते. पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूतपूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुध्दाशी अहिंसा व नैतिकता ह्यावर वाद-विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (सन्यस्त खड्ग) उपसून शाक्यांना विजयी करतो, असे या नाटकाचे कथानक आहे.
सावरकरांनी ‘आपण संन्यस्त खड्ग हे नाटक का लिहिले..’ असे एक व्याख्यान मुंबईच्या शिवाजी मंदिरात 1954 मध्ये केले होते. तेव्हा ते बरेच थकले होते. त्यांनी ज्या अहिंसेच्या अतिरेकी समर्थनाच्या श्लोकामुळे नाटकाची प्रेरणा मिळाली, त्याचा उल्लेख भाषणात केला होता. तो या नाटकात आहे. मात्र, या नाटकाची ठिणगी आपल्या मनात अंदमानात असतानाच पडली होती, असे सावरकरांनी म्हटले होते.
‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या संचात कोणी आणले?
सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्यसंपदा कलामंच यांनी संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या संचात, नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आणले आहे. आता हे नाटक नवीन स्वरूपात रंगभूमीवर आणताना रंगावृत्ती व दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तसेच, नेपथ्य संदेश बेंद्रे, पार्श्वसंगीत कौशल इनामदार, प्रकाशयोजना अमोघ फडके, नृत्य सोनिया परचुरे, वेशभूषा मयुरा रानडे, रंगभूषा श्रीकांत देसाई आणि सूत्रधार दीपक गोडबोले आहेत. तर हृषिकेश जोशी यांच्यासह मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आदी कलाकार नाटकात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 8 जुलै 1910 रोजी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून उडी मारली होती. या दिवसाचे औचित्य साधून 8 जुलै 2025 रोजी शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाटकाचे 100 प्रयोग करण्याचा मानस असल्याचे सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी सांगितले.
‘आजच्या काळाची गरज ओळखून म्हणजेच कालसुसंगत बदल ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकात करण्यात आले आहेत. मूळ नाटक हे जवळपास पाच तासांचे होते, मात्र नाट्यगृहाची वेळ आणि इतर गोष्टींच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण पद्धतीने आवश्यक त्याच गोष्टी घेऊन अडीच तासांचे करण्यात आले आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तत्त्वज्ञान प्रकर्षाने मांडण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे’ असे दिग्दर्शक ह्रषिकेश जोशी यांनी सांगितले. या नाटकातील कलाकार हे मुंबई, पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकलेले प्रशिक्षित नट आहेत,’ असेही हृषिकेश जोशी यांनी सांगितले.
‘संगीत संन्यस्त खड्ग’च्या पहिल्या प्रयोगादरम्यान नेमकं काय झालं?
पुण्याच्या कोथरुडमध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग 12 जुलैला होता. या प्रयोगाच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात जाऊन गोंधळ घातला. या नाटकात गौतम बुद्धांच्या शांततेचा मार्ग चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला, असा आरोप 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी केला. सायंकाळी ६ वाजता हे नाटक सुरु झालं होतं. तब्बल अडीच तास हे नाटक चाललं. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होत्या. त्यांनी आमच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप वंचित बहुजन आघडीच्या कार्यकर्त्यांनी केला. कुलकर्णी यांनी या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नाटकात गोंधळ झाल्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली होती. आपल्या पोस्टमध्ये हृषिकेश जोशी म्हणतात की, "१२ जुलै रोजी संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग पुण्यात यशवंत नाट्यगृहात साजरा झाला. प्रयोगादरम्यान काही आंदोलकांनी प्रयोग संपत आला असताना अचानक घोषणा बाजी सुरु केली, त्यांना पोलिसांनी थांबवलं आणि ते त्यांना बाहेर घेऊन गेले. जे आंदोलक नेते होते, ते नाटक पाहायला शेवटपर्यंत बसले होते. अडीच तासाच्या नाटकात शेवटचा प्रसंग सुरू झाला. अगदी सामान्य प्रेक्षकालाही लक्षात येत होतं, की पुढच्या एखाद मिनिटात नाटक संपणार आहे.
विक्रमसिंग या पात्राच्या तोंडी जी दोन वाक्ये होती त्यातील पहिले वाक्य झाले, आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या त्याचवेळी हे आंदोलक घोषणा देत रंगमंचाकडे आले, स्टेजवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवले, मंचावर सर्वच पात्रे होती आंदोलकांच्या घोषणा होईपर्यंत कलाकार आणि शांतपणे जागेवर उभे राहिले, प्रयोगाला खासदार मेधाताई कुलकर्णी पहिल्या रांगेत नाटक बघायला बसल्या होत्या. त्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती उत्तमरित्या हाताळली, घोषणा देणारे बाहेर गेले. प्रेक्षकांनी आवाज दिला. 'सुरू करा नाटक' दिग्दर्शक या नात्याने मी पुढे होऊन प्रयोग सुरू केला.
नाटकाच्या प्रयोगादरम्यान ज्यांनी गोंधळ घातला त्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, सावरकर लिखित हे नाटक आहे. सावरकरांचे लिखाण नेहमी फुले,शाहू, आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या विरोधात राहिलेलं आहे. आम्ही नाटक पहायला आलो होतो, नाटक पूर्ण पाहिले. यात सावरकरांना जगासाठी बुद्ध कामाचा नसून युद्ध कामाचे आहे असा संदेश दिला आहे. या नाटकात हिंसेचे समर्थन करण्यात आले आहे.
एका महिला कार्यकर्त्याने सांगितले की, शांततेने नव्हे तर भांडणातून मार्ग निघू शकतो, असे नाटकामधून सावरकरांनी सांगितले आहे. शांततेत सर्व प्रश्न सुटू शकतात या गौतम बुद्धांच्या शिकवणीला नाटकातून विरोध करण्यात आला आहे. आणखी एका कार्यकर्त्यांने सांगितले की, या नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांचे पूर्णपणे हनन करण्यात आले आहे. या देशात बुद्धांचे तत्वज्ञान कामाचे नाही, इथे फक्त भांडणे करुन प्रश्न सुटू शकतो असे दाखवण्यात आले आहे. या नाटकाच्या शेवटी बुद्धांवरती तलवार उगारण्यात आली आहे.
'संगीत सन्यस्त खड्ग' नाटकाला विरोध का?
नाटकाला हा विरोध करण्याचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’ने वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता, सिद्धार्थ मोकळे यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितलं, "संगीत सन्यस्त खडग या नाटकामध्ये सावरकरांनी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची तोडमोड करून बुद्धांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या बदनामीलाच आमचा विरोध आहे. इथे जो सतत चालत आलेला संघर्ष आहे ज्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की 'वैदिक ब्राम्हणवादी विचारसरणी आणि बुद्ध यांचा जीवघेणा संघर्ष आहे.' तोच संघर्ष आज इथे दिसतोय.
या मातीतला बुद्धांचा विचार संपवायचा, त्याला बदनाम करायचं, चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडायचं आणि लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करायचं. या पद्धतीचे सातत्याने प्रयत्न वैदिक विचारसरणी करत आलेली आहे. याच विचारसरणीतून वि. दा. सावरकरांनी वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धांची बदनामी करणायचा प्रयत्न केला आहे, बुद्धांवर चुकीचा आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्धांच्या विचारांमुळे देश पारतंत्र्यात गेला अशी चुकीच्या पद्धतीची मांडणी केली आहे. आमचा विरोध हा चुकीच्या विचारांना आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी या नाटकाला विरोध करत आहे.
अतिशय चुकीच्या पद्धतीची विधानं त्या नाटकात आहे. ‘अडाण्यांचा आचार्य’ असा त्यांनी बुद्धांचा उल्लेख केला आहे. बुद्धांचे विचार तोडून मोडून चुकीच्या पद्धतीने नाटकात सादर केलं आहे. ज्या भिक्खू संघाने बुद्धांचा विचार जगभर पसरवला त्या भिक्खू समाजाला ही बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भिक्षुणीच्या अनुषंगाने भिक्खुंवरच टीका करण्याचा घाणेरडा प्रकार करण्यात आला आहे. या विकृतीला आमचा विरोध आहे." असेही सिद्धार्थ मोकळे म्हणतात.
‘’एकही विरोधी पक्ष या नाटकाविरुद्ध बोलायला तयार नाही याचे आश्चर्य’’
वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पुढे सांगितले की, "एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान जगभर फिरतात तेव्हा ‘मी बुद्धांच्या देशातून आलोय’ असे जगभर सांगतात. मात्र त्याच पक्षाशी संबंधित असलेली लोकं, त्याच विचारसरणीशी संबंधित असलेले कलाकार बुद्धांच्या धम्माचा अपमान करणारे नाटक या ठिकाणी सादर करतात. वाईट आणखी एका गोष्टीचे वाटते ते म्हणजे, जो विरोधी पक्ष उठताबसता फुले, शाहू,आंबेडकरांचं नाव घेतात, स्वतःला बुद्धांच्या विचारांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतात त्या विरोधी पक्षांपैकी एकाही पक्षाच्या नेत्याने किंवा पक्षाने या नाटकाचा विरोध केला नाहीये. या नाटकाचा निषेध केला नाहीये." 
‘संगीत सन्यस्त खड्ग’ या नाटकाचे महाराष्ट्रात तीन ठिकाणी प्रयोग करण्याचे प्रयत्न केले गेले, आणि तिन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जाऊन निषेध नोंदवला आहे. विरोधी पक्षातील जे स्वतःला फुले-शाहू-आंबेडकरवादी म्हणवून घेतात त्यांनी किती ठिकाणी जाऊन विरोध नोंदवला? किमान स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट करूनतरी यांनी निषेध नोंदवलाय का? तर असं कुठेही आपल्याला दिसणार नाही. कारण, त्यांनाच या वैदिक विचारसरणीलाच पुढे न्यायचं आहे. ब्राम्हण्यवादी विचारसरणीची ही A आणि B टीम आहे आणि या निमित्ताने आपल्याच लोकांचा खरा चेहरा समोर येत आहे." असा आरोप सिद्धार्थ मोकळे करतात.
"वंचितच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक बघितलं आणि मगच विरोध केला..."
वंचितच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक बसून बघितलं, त्या नाटकातील आक्षेपार्ह्य दृश्यांचं रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर त्या नाटकाला विरोध केला, असं सिद्धार्थ मोकळे ‘बाईमाणूस’शी बोलतांना सांगत होते. ते पुढे म्हणाले की, " हे स्पष्टपणे दिसत आहे की या नाटकाद्वारे तथागतांच्या विचारांची टिंगल-टवाळी केली जातेय. भिक्खू संघाबद्दल अतिशय घाणेरडे विचार त्याठिकाणी मांडले आहेत. ज्यावेळी बाबासाहेबानी बुद्ध धम्म स्वीकारणार हे जाहीर केलं होतं. त्यावेळी सावरकरांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देतांना बाबासाहेब म्हणाले होते की, "लोक म्हणतात की सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकर नरक ओकले..." सावरकरांच्या टीकेला अतिशय योग्य पद्धतीने बाबासाहेबांनी प्रत्युत्तर दिले होते.
बाबासाहेब म्हणाले होते की, "की जर सावरकर म्हणतात बुद्धांच्या विचारामुळे हा देश पारतंत्र्यात गेला तर पुण्यातले पेशवे हे बौद्ध होते का? जर नव्हते तर ते कसे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत गेले? त्याचं कारण इथल्या चातुर्वर्णात आहे. कारण केवळ एका विशिष्ट वर्णातल्या लोकांनाच लढण्याची परवानगी दिली जायची. बाकी वर्णातील लोकांना लढाईची शस्त्र हातात धरणं वर्ज्य करण्यात आलं.. त्यामुळे क्षत्रिय हरला, देश हरला, ते राज्य हरलं, राज्य पारतंत्र्यात गेलं.. कारण शूद्राला हातात शस्त्र घेण्यास मनाई होती. त्यामुळे देश हा बुद्धांमुळे पारतंत्र्यात नाही गेला तर चातुर्वर्णामुळे पारतंत्र्यात गेला.
देश पारतंत्र्यात जाण्याची कारणं वेगळी आहे, पण कुठे तरी हिंसेला प्रवृत्त करण्यासाठी बुद्धांच्या विचारावर ठपका ठेवण्याचा प्रकार चालू आहे. विनायक दामोदर सावरकरांनी लिहलेलं नाटक हे घाणेरड्या पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे, त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी या नाटकाला विरोध करते.
बुद्ध पलायन शिकवत नाही तर परिस्थितीला, समस्येला सामोरं जायला, योग्य पद्धतीने हाताळायला आणि प्रश्न सोडवायला शिकवतात. बुद्धाने अहिंसेचा विचार मांडला असला तरी अहिंसेचा अतिरेक केलेला नाही. बुध्दाचा मार्ग हा सम्यक मार्ग आहे, मध्यम मार्ग आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या अतिरेकाला थारा नाही. स्वसंरक्षणार्थ कराव्या लागणाऱ्या हिंसेला बुध्दाचा विरोध नाही. अनेक वर्षे बौद्ध राजांनी या देशावर राज्य केलं आहे, सैन्याच्या जोरावर आपल्या राज्याचं आणि प्रजेचं संरक्षण केलं आहे. राजा आणि गृहस्थांसाठी बुध्दाचे नियम वेगळे होते आणि भिक्खूसाठी वेगळे होते. मात्र बुद्धाने शिकवलेली समता, बंधुता, मैत्री भाव ज्यांना नकोसा वाटतो ते बुद्ध विचारांची मोडतोड करून बदनामी करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यावर विकृत टीका करतात. गेली अडीच हजार वर्षे बुद्धाला बदनाम करण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न वैदिक ब्राम्हण्यग्रस्त विचारांचे लोक करीत आले आहेत. तरीही बुद्ध विचार संपला नाही उलट जगभरात पसरला." अशी स्पष्ट भूमिका सिद्धार्थ मोकळे यांनी मांडली आहे.
'संगीत सन्यस्त खड्ग' नाटकाच्या मूळ संहितेतील आक्षेपार्ह मुद्दे
1) शीलवान बुद्धांवर पत्नी यशोधरा शिवाय मधुरा, मंजुळा अशा अनेक स्त्रिया बुद्धांच्या आयुष्यात आल्या असा खोटा उल्लेख या नाटकात आहे. (पान क्रमांक 123)
2) तथागतांनी स्त्रियांना पापयोनी म्हणून अपमानित केल्याचा आरोप. (पान क्रमांक 129)
3) बुद्धांच्या पवित्र भिक्षु संघास भिक-मांग्या संघ संबोधून हिणवले आहे पान क्रमांक 130
4) भगवान बुद्धांनी भीक देणाऱ्यास भिकारी केल्याचा आरोप नाटकात केला आहे (पान क्रमांक 130)
5) बुद्धांच्या पवित्र भिक्षु आणि भिक्षुनी संघास कामसुखाचा आनंद उपभोगणारा संघ म्हंटले आहे.(पान क्रमांक 136)
6) ऐश्वर्या संपन्न व आळशी जीवन जगण्यासाठी स्त्री पुरुष संघात सामील झाल्याचा आरोप. (पान क्रमांक 156-157)
7) बौद्ध भिक्खूंना टोळ, टोळधाड आणू म्हणून अपमानित केले आहे. (पान क्रमांक 157-158)
8) फुकटचे पोटभर खायला मिळते म्हणून लोकं बौद्ध भिक्षु संघात गेल्याचा आरोप केला आहे. (पान क्रमांक 157)
9) बुद्धांच्या मानवनिर्मित दुःखमुक्तीच्या धम्मशोधाला मनुष्यमात्राचे मरण टाळण्याचा मार्ग समजले आहे. (पान क्रमांक 160)
10) पत्नी वारलेल्या विदुरांना काम सुखाचा लाभ मिळण्यासाठी भिक्षुनी संघात सोय असल्याचा आरोप. (पान क्रमांक 160-184)
11) बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी अपार कष्ट सोसणाऱ्या भिक्षु संघास श्रीमंत संघातील संन्यास संबोधले. (पान क्रमांक 181)
12) वंदनीय स्थवीर भिक्षुना थेरडा व महास्थवीर भिक्षुना महानंदी संबोधून अपमानित केले आहे. (पान क्रमांक 184)
13) वैर सोडा शस्त्र खाली ठेवा दंडबलाहुन क्षमा हितकार आहे या बुद्ध वाणीला भंगड छदाचे वेड ठरवले आहे. (पान क्रमांक 176)
14) बुद्धवाणीचे अनुसरणं करणाऱ्या शाक्य यांना नेभळट बुद्धधर्मीय शाक्य असे म्हटले आहे. (पान क्रमांक 176)
15) विज्ञाननिष्ठ बुद्ध धम्माकडे जनतेने वळू नये म्हणून बुद्ध वेडास बळी पडू नये असा अपप्रचार केला आहे. (पान क्रमांक 176)
16) बुद्ध वाणी ऐकून वनाचा सिंह आपली नखाग्रे व दाढी कापली तर त्याच्या पाठीवर माकडे बसतीलअसा बुद्ध धम्माचा उपहास केला आहे. ( क्रमांक 176 आणि 177)
17) भिक्षुनी संदर्भात वाईट शब्दात टीका केली आहे. (पान क्रमांक 182-184-185)
19) गांजापेक्षाही मादक ठरणारी भांगेची गोळी खाणारा भिक्षु नाटकात रंगून बुद्धांच्या पवित्र भिक्खू संघास घोर अपमानित केला आहे. (पान क्रमांक 185)
20) बुद्ध धम्मातील पवित्र ”निर्वाण ” संकल्पनेला नरक संबोधून पात्राच्या तोंडी धिक्कर केला आहे. (पान क्रमांक 211)
21) कोसल सेनापती चंडाच्या मुखी तथागतांना नीच बुद्ध समजून त्याची जीभ कापायची भाषा वापरून विश्वगुरू बुद्धाचा घोर अपमान केला आहे. (पान क्रमांक 210.)
22) बुद्ध धर्मा मुळे देश गुलाम होईल, बुद्ध पलायन शिकवितो असा संदेश या नाटकातून दिला आहे.






