राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाड्यांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वेळी मुंबई माहपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिंकण्यासाठी मोठी खेळी केली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे.
आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता एकनाथ शिंदे आणि आनंजराज आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. आता या निवडणुकीत शिंदेचा शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना हे दोन्ही पक्ष एकाच मंचावर दिसतील. दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली आहे.
बाबासाहेबांचे नातू अन् काकांचे नावकरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी इंदू मिलच्या साडेबारा एकरवर मुंबईतील आंबेडकरी जनतेने ताबा मिळवला. डॉ. आंबेडकरांच्या भव्य स्मारकासाठी ही जागा देण्याची त्यांची मागणी होती. या घटनेतूनच आनंदराज या बाबासाहेबांच्या नातवाचे नाव पहिल्यांदाच राज्याच्या पटलावर चर्चेत आले. बाबासाहेबांचे पुत्र यशवंत ऊर्फ भैयासाहेब यांना तीन मुले व एक मुलगी. यातील सर्वात मोठे प्रकाश आंबेडकर. महाराष्ट्रात ते सर्वपरिचित आहेत.
प्रकाश यांच्या जन्मानंतर थोड्याच काळात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. भैयासाहेबांनी त्यानंतर झालेल्या मुलाचे नाव भीमराव ठेवले. त्याच्या पाठीवर जन्मले ते आनंदराज. हे नाव बाबासाहेबांच्या काकांचे आहे. शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात होते त्या वेळी या काकांकडेच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती.
व्यवसायाने बिल्डर असलेले आनंदराज राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. घराण्याच्या वारशाला तेदेखील अपवाद कसे राहतील. आपसूकच आंबेडकरी चळवळीत ते ओढले गेले. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या युवा संघटनेचे ते नेते होते. भारिपचे मुंबई अध्यक्षपदही त्यांच्याकडेच होते. मितभाषी व मृदू स्वभावाच्या आनंदराज यांनी संघटन कौशल्यामुळे मुंबईत पक्षाची घडी बसवली. अलीकडे चळवळीत झालेल्या पडझडीचा फटका साहजिकच भारिपलाही बसला.
त्यामुळे आनंदराज काहीसे अस्वस्थ होते. एका वेगळ्या आंदोलनाचा विचार त्यांच्या मनात घाटत होता. महाराष्ट्रभर भटकंती करून त्यांनी तरुणांचे मानस जाणून घेतले. चळवळ आक्रमकतेला मुकल्याचे लक्षात आले. त्यातूनच रिपब्लिकन सेनेचा विचार आकाराला आला. सत्तरच्या दशकातील पँथरप्रमाणे ही सेना आक्रमक असेल, पण आंदोलने हिंसक असणार नाहीत. अशा स्वरूपाची मध्यममार्गी, पण आक्रमक संघटना बांधण्याचा निर्धार त्यांनी केला.
इंदू मिलच्या आंदोलनामुळे राजकीय पटलावर
बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, ही आंबेडकरी जनतेची कित्येक दिवसांची मागणी होती. चैत्यभूमीलगतची इंदू मिलची जागा जोडली गेल्यास हे स्मारक उभे राहू शकेल, अशी मागणीही जोरकसपणे पुढे आली. 6 डिसेंबर 2011 पासून इंदू मिलच्या जागेसाठी आंदोलन छेडण्याचे आनंदराज यांनी ठरवले. मुंबईसह महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. कार्यकर्त्यांची फौज उभी केली. 6 डिसेंबरला मिलचे फाटक तोडून ताबा मिळवला. या घटनेपासून आनंदराज हे आंबेडकरी चळवळीतील तरुणांचे आशास्थान झाले. त्यांच्या रूपाने मिळालेल्या नव्या नेतृत्वाचे तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती आताची नाही. तर, ही युती प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन करण्यासाठी दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते सगळ्यांच्या सुख दु:खाशी एकरूप होण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरी समाज हा अनेक वर्षांपासून रस्त्यावरील लढाई लढत आला. पण, कार्यकर्त्याला काही मिळाले नाही. या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्तेचा लाभ व्हावा म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं आहे.”
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आनंदराज यांच्याबद्दल काय म्हटलं…?
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं, “शिवसेना आणि रिपब्लिकन दोन्ही सेना आहेत. रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा तर दुसरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन जाणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमणार आहे. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मी सीए म्हणजे कॉमन मॅन म्हमून काम केले आहे. आता मी डिसीएम आहे, म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन… सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिकली आहे.”
“आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारसदार आहेत. संविधानामुळे सर्वसामान्य माणूस उच्चपदावर पोहोचला आहे. एकनाथ शिंदे हा सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानामुळे मुख्यमंत्री झाला आहे. न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तोही मुख्यप्रवाहात आला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आनंदराज यांची पुढची वाटचाल कशी असेल, कोणता संघर्ष हाती घेतात, राजकारणातील डावपेच कसे असतील यावरच त्यांचे आणि पर्यायाने आंबेडकरी चळवळीचे भवितव्य ठरणार आहे.






