- ग्रीष्मा कुठार
तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना केवळ एका युवकाच्या हत्येची कहाणी नाही. ही कथा आहे, जातीय अहंकाराच्या विळख्यात अडकलेल्या समाजाची, प्रेम करणाऱ्या दलित युवकाच्या छिन्नविछिन्न स्वप्नांची आणि एका आईच्या न्यायासाठी चाललेल्या झगड्याची. ही कथा आहे कविन सेल्वगणेशची जो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता…ज्याचं आयुष्य आणि प्रेम दोन्ही जातीय अभिमानाच्या आगीत भस्मसात झालं.
तमिळनाडूत ऑनर किलिंगची हादरवणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या दलित सॉफ्टवेअर इंजिनिअरची उच्च जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे हत्या करण्यात आली. मुलीच्या भावाने तरुणाला रस्त्यात गाठत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. तू खालच्या जातीचा असून माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमतच कशी झाली? असं म्हणत मुलीच्या भावाने सॉफ्टवेअर इंजिनिअरवर हल्ला केला होता.
माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमतच कशी झाली?
27 जुलै रोजी तामिळनाडूमध्ये दलित तरुणाची त्याच्या प्रेयसीच्या भावाने दिवसाढवळ्या हत्या केली. मृतक 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कविन सेल्वा गणेशची भररस्त्यात हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर, आरोपी स्वतः पोलिसांसमोर शरण गेला. पोलिस आणि कविनच्या कुटुंबीयांनी हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे म्हटलं. कविनच्या प्रेयसीच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते अशी माहिती समोर आली. त्यामुळेच कवीनच्या प्रेयसीच्या भावानेच कोयत्याचे वार करुन त्याची हत्या केली.
(कविन सेल्वा गणेश)
कविन सेल्वा गणेश हा तुतीकोरिन जिल्ह्यातील अरुमुगमंगलम गावचा रहिवासी होता आणि चेन्नईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तो शालेय जीवनापासूनच एका मुलीच्या प्रेमात होता. कविन आणि त्याच्या प्रेयसीची जात वेगवेगळी होती. कविनची हत्या करणारा आरोपी २१ वर्षीय सुरजित हा त्याच्या प्रेयसीचा भाऊ आहे. मुलीचे कुटुंबिय पोलिसात आहे. मुलीच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते कारण ते एकाच जातीचे नव्हते. मुलीच्या पालकांनी कविनला अनेक वेळा धमकीही दिली होती.
सहा आकडी पगार, मात्र तरीही जात आडवी आलीच
कविनच्या आईच्या तक्रारीनुसार, रविवारी कविन त्याच्या आजोबांच्या तब्येतीबद्दल मुलीला माहिती देण्यासाठी गेला होता. सुरजीतही तिथे होता. त्याने कविनला माझ्या पालकांना तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून सोबत नेले. कविनने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो त्याच्यासोबत गेला. पण सुरजीतने अचानक बाईक मध्येच थांबवली. मग तो मोठ्याने ओरडू लागला की दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी हिंमत कशी होऊ शकते? यानंतर, सुरजीतने कोयता काढून कविनवर हल्ला केला. कविनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरजीतने त्याचा पाठलाग केला आणि रुग्णालयापासून सुमारे २०० मीटर अंतरावर त्याला ठार मारले. सुरुवातीला तो घटनास्थळावरून पळून गेला मात्र नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
संबंधित लेख वाचा: 1) ऐकत कुणीच नाही तरीही आपल्या गल्लीतील, घरातील तृप्ती, मुकेश, किशोरी या ‘ऑनर किलिंग’मध्ये बळी गेलेल्यांसाठी…! |
दरम्यान, पोलिसांनी सुरजीतला अटक केली आहे. त्याच्यावर आणि त्याच्या पालकांवर बीएनएस तसेच एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविन सेल्वगणेश हा देवेंद्र कुल वेलालर (पल्लर) समाजाचा होता. ही जात तामिळनाडूमधील अनुसूचित जातींपैकी एक समजली जाते. कविनने आपलं शिक्षण कष्टाने पूर्ण केलं. लहानपणी वडिलांचे छत्र हरवले, पण त्याची आई तमिळसेल्वीने मजुरी करून त्याला शिकवलं. शेवटी तो एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करू लागला. चेन्नईच्या उपनगरात त्याचं स्वप्नवत आयुष्य सुरू झालं होतं. त्याला सहा आकडी पगार होता, स्वतःची ओळख होती. पण तरीही त्याची गावाशी आणि गावातील समाजाशी असलेली नाळ तुटलेली नव्हती. 
कॉलेजमध्ये असताना त्याची भेट झाली सुभाषिनीशी. ती होती मरावर (थेवर) समाजाची. तमिळनाडूत थेवर समाज हा अत्यंत प्रभावशाली आणि अनेकदा दलितविरोधी भूमिका घेणारा उच्चवर्णीय समाज म्हणून ओळखला जातो. कविन आणि सुभाषिनी दोघांची ओळख वाढली, नातं जुळलं आणि मग प्रेमात रूपांतर झालं. पण समाज आणि जात यांचं काय? त्या दोघांमधल्या प्रेमाचं प्रतिबिंब घरच्यांना सहन झालं नाही.
मुलीचे कुटुंब पोलिस खात्यात असल्यामुळे…
विशेषतः सुभाषिनीचा भाऊ सुरजित. त्याचे वडील माजी पोलिस उपनिरीक्षक होते. त्यांचं गावात मोठं वर्चस्व होतं. सुरजितला हे नातं मंजूर नव्हतं. त्याने सुरुवातीला बहिणीवर दबाव आणला. दोघांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण प्रेम उधळून लावणं इतकं सोपं नसतं. जेव्हा त्याला कळलं की ते दोघं अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत, तेव्हा त्याने टोकाचं पाऊल उचललं.
त्या दिवशी कविन कामावरून घरी परतला नव्हता. त्याच्या फोनचे शेवटचे लोकेशन एका वाळवंटासारख्या मोकळ्या भागात सापडले. त्याच्या मित्रांनी आणि आईने पोलिसांत तक्रार केली, पण सुरुवातीला कोणीच गांभीर्याने घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी एका गटारजवळ त्याचा मृतदेह सापडला. चेहरा विद्रूप, डोळे फोडलेले, हाताची नखं उपटलेली, शरीरावर जखमांच्या स्पष्ट खुणा. पोस्टमार्टममध्ये सांगितलं गेलं की त्याला मारहाण करण्यापूर्वी बेशुद्ध केलं गेलं होतं.
सुरजितने त्यानंतर स्वतःच आत्मसमर्पण केलं, पण त्याच्यावर केवळ "मारहाणीचा" गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एफआयआरमध्ये हत्या, जातीवाचक द्वेष किंवा दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा उल्लेख केला नव्हता. कविनच्या आईने सांगितलं की तिला एफआयआर नीट वाचू दिला गेला नाही, जबरदस्तीने तिच्याकडून सही घेण्यात आली.
तमिळसेल्वी, एक साधी, कठोर परिश्रम करणारी महिला, पण तिचा मुलगा तिच्यासाठी सर्वस्व होता. कविनच्या मृत्यूनंतर ती कोसळली नाही, उलट ती त्वेषाने उभी राहिली… न्यायासाठी, मुलाच्या स्वप्नासाठी. तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तक्रारी दाखल केल्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली. पण सत्तेच्या, जातीय अहंकाराच्या आणि पोलीस यंत्रणेच्या भिंती भेदणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.
ऑनर किलिंगची घटना असूनही माध्यमांचा दूजाभाव
माध्यमांनी या घटनेला फारशी प्रसिद्धी दिली नाही. उलट काही स्थानिक वाहिन्यांनी उलट बातम्या चालवल्या… "दलित तरुणाचा एकतर्फी प्रेमप्रकरणात मृत्यू", "इज्जत वाचवण्यासाठी भावाने उचललं पाऊल", अशा मथळ्यांनी प्रसारण केलं गेलं. सोशल मीडियावर कविनला सूभाषिनीला बळजबरी त्रास देणारा असं ठरवलं गेलं तर काहींनी सुरजितला "सम्मान रक्षक" म्हणत गौरवले. ही केवळ विकृती नव्हती, तर एक समाज म्हणून आपलं अपयश होतं. जिथे दलित युवकाचं प्रेम म्हणजे अपमान मानलं जातं, आणि त्याची हत्या समाजासाठी प्रतिष्ठेचं प्रतीक बनतं.
कविनच्या हत्येनंतर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले, पण अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. दलित अत्याचार निवारण अधिनियम लागू करूनही पोलिसांची निष्क्रीयता ही एक गंभीर समस्या ठरली आहे. दलितांविरुद्ध अत्याचार होत असताना एफआयआर योग्य प्रकारे नोंदवला जात नाही, तपासात अडथळे आणले जातात, किंवा आरोपींना राजकीय आधार मिळतो.
कविनचा मृत्यू केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता तर ते एक सामाजिक अध:पतनाचं लक्षण होतं. जातीच्या नावावर आजही शिक्षण, प्रेम, आणि माणुसकीला गळा द्यावा लागतो, हे वास्तव या प्रकरणाने अधोरेखित केलं.
कविनचं गाव, त्याचं घर, त्याची खोली आजही तशीच आहे. त्याच्या आईने त्याचा कॉम्प्युटर, नोट्स, पुस्तके जपून ठेवली आहेत. त्या प्रत्येक वस्तूत तिच्या मुलाचं भविष्य दडलं आहे. ती म्हणते, "माझा मुलगा मरून गेला, पण त्याचं स्वप्न अजूनही इथं जिवंत आहे."
ती प्रत्येक दिवस कोर्टाच्या तारखा मोजत असते. तिला खात्री आहे की, एक दिवस असा येईल, जेव्हा सुरजितला कठोर शिक्षा होईल. जेव्हा तिच्या मुलाला ‘दलित’ म्हणून नव्हे, तर ‘माणूस’ म्हणून न्याय मिळेल.
(सौजन्य - द प्रिंट)






