- टीम बाईमाणूस
6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयाने नव्हे, तर सूर्यास्ताने उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वप्रथम ही प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, यूएनआय आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून कळवण्यात आली. ही वार्ता वणव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदनाही वणव्याच्या वेगानं देशभर पसरल्या.
नागपूर शहरातील प्रत्येक रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये बाबासाहेब गेल्याची बातमी लोकांना समजली ती दामू मोरे यांच्यामुळे… दामोदर मोरे नावाचे एक गृहस्थ नागपूरमध्ये राहात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते अनुयायी होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची हृदयद्रावक बातमी त्यांनी रिक्षावर शहरभर फिरून रडत रडत सांगितली.
बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा दामू हे 12 वर्षाचे होते. त्या दिवशी दुकानात काम करत असताना बातमी मिळाली ‘बाबासाहेब गेले’. घरातील मोठ्यांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून, ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लहानग्या दामूवर सोपवली. त्या दिवशी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये एका रिक्षातून फिरणारा हा छोटा मुलगा, हातात माईक घेऊन, संपूर्ण देशाच्या भावनांवर घाला घालणारी बातमी सांगत होता.
महापरिनिर्वाणाची बातमी साउंड सर्व्हिसवरून देणारे दामू मोरे यांचे निधन
ही हृदयद्रावक बातमी रिक्षावर शहरभर फिरून रडत रडत सांगणारे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते दामू मोरे यांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे मेडिकलला देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.
‘’लोकांच्या डोळ्यांत पाणी आलं, काहींनी विश्वास न बसून त्याच्यावर ओरड केली, काहींनी रागाने धाव घेतली; पण त्या आवाजामागे फक्त एक पोरगं नव्हतं, तर एक जबाबदारी होती, एक सत्य होतं आणि एक असीम वेदना होती.’’ दामू मोरे ही आठवण नेहमी सांगायचे. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी मेडिकलमध्ये त्यांचे देहदान केले.
दामू मोरे यांचा जन्म एका आंबेडकरी कुटुंबात झाला. नागपूर शहरात साउंड सर्व्हिसचा त्यांच्या घरगुती व्यवसाय होता. मोरे साऊंड सर्व्हिस तेव्हा चांगलेच प्रसिद्ध होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा दामू हे 12 वर्षाचे होते. त्या दिवशी दुकानात असताना बातमी मिळाली ‘बाबासाहेब गेले’. घरातील मोठ्यांनी स्वतःचा शोक बाजूला ठेवून, ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लहानग्या दामूवर सोपवली. त्या दिवशी नागपूरच्या गल्लीबोळांमध्ये एका रिक्षातून फिरणारा हा छोटा मुलगा, हातात माईक घेऊन, संपूर्ण देशाच्या भावनांवर घाला घालणारी बातमी सांगत होता.
संबंधित लेख वाचा: 1) कुणी गाडी तर कुणी खुर्ची जपून ठेवलीये… बाबासाहेबांच्या आठवणींचे असेही जतन…! |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 ऑक्टोबर 1956 च्या धम्मदीक्षा सोहळ्यात दामूदांचे काका नामदेव मोरे अग्रणी होते. दीक्षा समारंभात नामदेव मोरे यांनी लाऊडस्पीकर लावला होता. काकांसोबत बाबासाहेबांचे दर्शन घेण्याची संधी दामुदांना मिळाली होती. बाबासाहेबांचा डावा पाय चेपून देण्याचं भाग्य लाभलं. भाग्य मानत नाही. परंतु बाबासाहेबांच्या अंगाला हात लावण्यामुळे आयुष्य सफल झाल्याचं दामू मोरे सागंत असत.
बाबासाहेब गेले तो दिवस…
पहाटेची वेळ…रिक्षात बॅटरी. हातात माईक अन् डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा, कंठ दाटून येत होता. तोंडून शब्द फुटत नव्हता…पण, “बाबासाहेब गेले…’ येवढेच शब्द बाहेर येत होते अन् त्यापाठोपाठ रडू… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणाचा सांगावा घेतला. नागपुरातील आंबेडकरवाद्यांच्या वस्त्या त्यांनी पालथ्या घातल्या होत्या. काहींना बाबासाहेब गेले ही वार्ताच सहन होत नसल्याने खोटे सांगतोस असे म्हणत, बाबांच्या अनेक कार्यकर्त्यांकडून मार खावा लागला होता. सहा डिसेंबर 1956 च्या दुःखद घटनेच्या गाठी उकलताना त्यांचे डोळे नेहमी भरून यायचे. डोळ्यांच्या काठावरचे पाणी ते बोटांनी टिपायचे आणि पुन्हा आठवणी सांगू लागायचे.
दामुदा ढसाढसा रडले
दामी मोरे सांगायचे, ‘’रिक्षात बसून सांगावा सांगण्यासाठी आनंदनगर, भानखेडा, नवी शुक्रवारी, कर्नलबाग, जोगीनगर, इंदोरा या वस्त्यांमध्ये सांगावा पोहचविला. त्यानंतर रिक्षातून रेल्वेस्टेशनवर गाठले. साऱ्या फलांटावर गर्दीच गर्दी होती. सारी गर्दी रडणारी होती. दुःखाचा डोंगर कोसळल्याने टाहो फोडणारी ती गर्दी, आक्रोश आक्रंदन करणाऱ्या गर्दीचे एकच ध्येय होते. मुंबईत बाबासाहेबांच्या अंतिम दर्शन घेणे. “बाबासाहेब अमर रहे’च्या घोषणांचा आवाज देत जी गाडी दिसेल त्या गाडीत लोकांचे लोंढेच्या लोंढे बसत होते. धम्मदीक्षा सोहळ्याचा आनंद अनुभवणाऱ्या नागपूर शहराने अवघ्या दोन महिन्यांत काळोखे दुःख अनुभवले.’’
इतवारीतील दोन माळ्याच्या घरात मी काकासोबतच राहत होतो. जमिनीवर झोपलो होते. दरवाज्यावर थाप पडताच काकांनी दरवाजा उघडला. दरवाजात रेवाराम कवाडे, एच. एल. कोसारे, माणके गुरुजी ही मंडळी होती. काकाला आवाज देण्यास सांगितले. काका नामदेवराव यांना पाहताच रेवाराम कवाडे यांच्या तोंडातून “बाबा गेले’ हे दोनच शब्द बाहेर आले आणि रडायला लागले. निधनाचे वृत्त पोहोचवण्याची जबाबदारी काकांनी माझ्याकडे दिली.
रिक्षातून लाऊडस्पीकर घेऊन शहरात फिरलो. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी लोकांना कशी सांगायची. ते मला लिहून देण्यात आले होते. ते मी वाचत होतो. बाबासाहेब गेले. वाचलं की, लोक रडायचे. काहींनी वृत्त खोटे निघाल्यास जिवंत गाडण्याची धमकीच दिली. सांगावा सांगत असताना माझ्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहत असल्याचे पाहून लोक शांत झाले.
या आठवणींना उजाळा देताना दामुदांनी अजूनही बाबासाहेबांच्या डाव्या पायावर आपला हात असल्याचा भास होत असल्याचे सांगत असत.
इंदिरा गांधींनी केले होते कौतुक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून निवडणूक लढवीत होते. त्यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सभा पुसदला होणार होती. या सभेच्या ध्वनिक्षेपणाची व्यवस्था नागपूरच्या मोरे साउंड सर्व्हिसेसकडे होती. नाईक यांनी दामोदर मोरे यांना सभेच्या दिवशी सकाळी बंगल्यावर बोलवले. इंदिरा गांधी यांनी सभेसाठी ध्वनिव्यवस्था कुणाची आहे, अशी विचारणा केली. नाईक यांनी सागितले की, नागपूरच्या मोरे यांची. इंदिरा गांधी उद्गारल्या, मग काही टेन्शन नाही.
दामोदर मोरे हे नाट्य आणि ध्वनिक्षेत्रात दामू मोरे म्हणून ओळखले जात. नागपुरातील प्रसिद्ध अशा पोद्दारेश्वर मंदिर रामनवमी यात्रा, दीक्षाभूमी येथील धम्मचक्र परिवर्तन दिनासाठीही त्यांची साऊंड सर्व्हिस राहत असे.
लतादीदींचा होता विश्वास
नागपुरात एका कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर गानकोकीळा लता मंगेशकर यांनी नागपुरात कार्यक्रम करणे थांबविले होते. पुढे अनेक वर्षांनी त्यांचा आणि मंगेशकर भावंडांचा सत्कार नागपुरात ठरला. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लतादीदी सगळी माहिती देत होत्या. ध्वनिव्यवस्था कुणाची राहील, या त्यांच्या प्रश्नाला कुणीतरी ‘मोरे अँड कंपनी’ची असे उत्तर दिले. लतादीदी लगोलग उत्तरल्या, ‘अच्छा, दामू आहे, मग काही हरकत नाही’, अशी आठवण नागपुरातील रंगकर्मी भागवत तिवारी यांनी लिहून ठेवली आहे.






