- निळू दामले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बीबीसीवर तब्बल 1 अब्ज डॅालरचा अब्रू नुकसानीचा खटला भरू असं म्हटलंय. बीबीसीनं आपला बदनामी केलीय असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. बीबीसीच्या ॲाक्टोबर 2024 च्या पॅनोरामा कार्यक्रमात ट्रम्प यांचं एक भाषण दाखवण्यात आलं होतं. त्यात ट्रम्प कॅपिटॅाल हिलवरच्या संसदेवर हल्ला करायला गेलेल्या दंगेखोरांना हल्ला करण्याची चिथावणी देताना दिसले.
गेलं वर्षभर याचा पत्ता ट्रम्प यांना नव्हता. हा कार्यक्रम त्यांनी पाहिलाही नसावा. गेल्या आठवड्यात ब्रिटनमधल्या एका पेपरनं हे प्रकरण उकरून काढल्यावर ट्रम्पना जाग आली.
हे प्रकरण उकरलं गेलं याची कारणंही वेगळी आहेत. गेली दोन तीन वर्षं बीबीसीवर पक्षपाती वर्तनाचा आरोप प्रेक्षकांनी केला होता. गाझा, अमेरिकन निवडणुका आणि एलजीबीटी या मुद्द्यांवर बीबीसीच्या बातम्या एकतर्फी असतात अशी तक्रार करणारी खूप पत्रं बीबीसीला आली होती. त्या तक्रार पत्रात एक उदाहरण अमेरिकेत 2021 रोजी कॅपिटॅाल हिलवर झालेल्या हल्ल्यावरच्या पॅनोरामा कार्यक्रमाचं होतं.
बीबीसीच्या अंतर्गत चौकशी समितीत एकूण पक्षपात आणि पॅनोरामा यांचा विचार झाला. पॅनोरामा कार्यक्रमात ट्रम्प यांच्या सव्वा तासाच्या भाषणातली दोन सलग नसलेली वाक्यं एकत्र जोडून दाखवण्यात आली होती. वाक्याचा अर्धा भाग ट्रम्प जेव्हां बोलले होते त्यापासून 50 मिनिटांनी दुसरा अर्धा भाग बोलले होते. पण कार्यक्रमात तो सलग दाखवल्यामुळं त्या वाक्याचा अर्थ बदलला होता.
संकलन-संपादनात हे तंत्र सर्रास वापरलं जातं. पण ट्रम्पसारखी व्यक्ती गुंतलेली असतांना काळजी घ्यायला हवी होती. अर्ध वाक्य झाल्यानंतर क्षणभर रिकामा दाखवता आला असता, रिकाम्या क्षणभरात फ्लॅश वापरता आला असता. संपादकानं ती काळजी घेतली नाही. चौकशी समितीतल्या जाणकारानं सुचवलं की तांत्रिक चूक झाली अशी कबूली बीबीसीनं ताबडतोब द्यावी. तसं केलं असतं तर प्रश्न तिथंच मिटला असता. बीबीसी घोळ घालत राहिलं, चर्चा करत राहिलं, वर्षभर. याचा सुगावा पेपरला लागला, वाच्यता झाली. तेव्हां ट्रम्पना कोणी तरी सांगितलं.
हिटलर क्रूरकर्मा आहे याची खात्री पटल्यावर लेखक-पत्रकार त्याची दृश्य आणि वक्तव्यांचे तुकडे जुळवून मजकूर तयार करायचे. ते कथन काळाच्या हिशोबात सलग नसतं. कोणते वाक्यांश केव्हांचे आहेत याचा हिशोब लावत बसलं तर खरा हिटलर उभाच करता येत नाही. ट्रम्प खोटारडे आहेत, ते हिंसेला चिथावणी देतात हे साऱ्या जगाला माहीत आहे, पत्रकारांनाही ते माहीत आहे. विरोधी लिहिणाऱ्याना ठोकून काढा, तुमचा खटला मी लढवीन असं ट्रम्प म्हणालेले आहेत. आपली निवडणूक चोरण्यात आलीय, तसं ठरवणारी राज्यघटना, निवडणूक यंत्रणा आपण मानत नाही, वॅाशिंग्टनमधलं डीप स्टेट आपण उध्वस्थ करणार आहोत असं म्हणणाऱ्या ट्रम्पनी या ना त्या रूपात दंगेखोरांना चिथावणी तर दिलीच पण प्रेसिडेंट झाल्यावर त्यांनी त्या गुन्हेगारांना माफी दिली. याचा अर्थ पत्रकारांना समजतो. ही समजूत पॅनोरामात व्यक्त झाली. तरीही थोडी काळजी घेतली असती तर प्रकरण मिटलं असतं हे बीबीसीच्या लक्षात आलं नाही.
|
|
ट्रम्पनी कोटी डॅालरचा दावा लावणं हे समजण्यासारखं आहे. आजवर ट्रम्पनी अनेक पेपरवर दावे लावले, त्यात ट्रम्प हरले.अनेक धमक्यांतून शेवटी खटले उभेही राहिलेले नाहीत. ट्रम्प धमकी देतात. माणसं विचार करतात की कशाला ट्रम्पच्या नादी लागा, मांडवली करून प्रकरण मिटवतात. त्यातून बरेच पैसे ट्रम्पच्या खिशात जातात. असंही म्हणायला हरकत नाही की धमक्या देऊन पैसे मिळतात का ते पहाणं हा ट्रम्प यांचा व्यवसाय आहे. धमकी दिल्यावर समोरच्यानं दाद दिली नाही तर ट्रम्प गपचुप माघार घेतात असंही घडलं आहे.
धमक्या देण्याचं तंत्र हे ट्रम्प यांचं मुख्य व्यावसायिक हत्यार आहे. रियल इस्टेट, बांधकाम व्यवसायात ते समोरच्या माणसाच्या मनात भीती निर्माण करतात, अनेक वेळा भीतीपोटी कामं होतातही. फियर हे आपलं हातखंडा तंत्र आहे अशी कबुली ट्रम्प यांनी बॅाब वुडवर्ड यांना एका मुलाखतीत दिली आहे. त्यांच्यावरच्या एका पुस्तकाचं शीर्षकंच फियर असं आहे.
ट्रम्प यांचा माध्यमांवरचा खुन्नस जगप्रसिद्ध आहे. एकदा ते भाषणात म्हणाले की एका शहरात मेक्सिकन लोक इमिग्रंट नागरिकांची कुत्री मांजरं मारून खातात. पत्रकार त्या शहरात गेले. तिथल्या मेयर आणि पोलिस प्रमुखानं सांगितलं की तसलं काहीही त्या गावात कधीही घडलेलं नाही. पत्रकारांचा हा खुलासा फेक आहे, त्यांच्यावर आपण खटला भरणार आहोत, आपली माहिती खरी आहे, कुत्री मांजरं खाल्ली जातातच असं ट्रम्प ठासून म्हणाले. पण खटला अजून तरी झालेला नाही.
पॅनोरामा प्रसारित करणारी बीबीसी अमेरिकाद्रोही आहे, ती आपल्या विरोधात मुद्दाम मजकूर करत असते असं ट्रम्प म्हणतात. एकूणच ब्रिटीश माध्यमं आणि सरकार मैत्रीने वागत नाहीत असं म्हणून ट्रम्प मोकळे झाले आहेत.
ट्रम्पची अपेक्षा अशी आहे की ब्रिटीश सरकार नाकदुऱ्या काढत ट्रम्पसमोर येईल. बीबीसी ट्रम्पचं कौतुक करणारा एकादा कार्यक्रम प्रसारित करेल, राजा चार्ल्स आणखी एक प्रचंड शाही मेजवानी देतील.
जाता जाता…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र जोडून दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (BBC) मोठ्या प्रमाणात टीका झाली. ट्रम्प यांच्या भाषणाच्या संपादनावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि वत्त प्रमुख डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डेव्ही यांनी म्हटलं की झालेल्या चुकीबाबत आपण पूर्णपणे जबाबदारी घेऊन राजीनामा देत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी बीबीसीचे महासंचालक आणि वृत्तसेवा प्रमुख यांच्या राजीनामा देण्याच्या भूमिकेचं स्वागत करत दोघांवरही टीका केली.






