"डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है...लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है..." ‘डॉन’ चित्रपटातील हा डायलॉग सध्या ‘ओंकार’ला लागू पडतोय. मात्र ओंकार हा कोणी गुंड नसून तो एक हत्ती आहे आणि त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांनी जंग जंग पछाडले आहेत.
कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून सुमारे 22 वर्षांपूर्वी आलेल्या हत्तींच्या कळपाने गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या सीमेलगतचा शेती व्यवसाय संकटात आणला आहे. याच कळपातील 10-12 वर्षांचा ओंकार नावाचा हत्ती आता एकटाच चिंतेचे कारण बनू लागला आहे. गेले 15 दिवस गोव्यातील शेतांचे नुकसान करणारा हा हत्ती आता पुन्हा महाराष्ट्रात परतला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी आता महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांनी एकत्रित योजना आखली आहे.
वन्यप्राण्यांमुळे 40 हजार कोटींचे पीत मातीमोल
ओंकार हत्ती हे एक फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे. परंतू या निमित्ताने राज्यात वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे किती नुकसान होत आहे यासबंधीचा अतिशय महत्वाचा असा अहवाल नुकाच प्रसिद्ध झाला आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राने (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) हा अहवाल तयार केला असून अशा प्रकारचा हा पहिलाच राज्यव्यापी अहवाल आहे. या अहवालानुसार राज्यात वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षी 10 ते 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. 
गोखले संस्थेच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नूलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे, संशोधक वैदेही दांडेकर यांनी 'वन्य प्राणी आणि शेतकरी संघर्ष' हा अभ्यास केला. त्याचा सविस्तर अहवाल नुकताच प्रकाशित झाला. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ या सर्व विभागांचा समावेश आहे. पिकांचे नुकसान केवळ जंगलालगतच्या गावांपुरते मर्यादित नसून, घनदाट जंगल नसलेल्या भागातही नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांच्या मते दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे प्रतिहेक्टरी सरासरी वन्यप्राण्यांना सामूहिक राखण, सौर कुंपण अशा उपायांची उपयुक्तता केवळ 25 टक्के 27 हजारांचे नुकसान होते. रोखण्यासाठी बुजगावणे, काटेरी तारांचे कुंपण, सामूहिक राखण, सौर कुंपण अशा उपायांची उपयुक्तता केवळ 25 टक्के असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, असे अभ्यासात नमूद केले आहे.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाच्या केवळ एक ते दोन टक्केच भरपाई शेतकऱ्यांना मिळते. अभ्यासातील नमुना शेतकऱ्यांपैकी 54 टक्के शेतकऱ्यांनी किमान एक पीक सोडले असून, मोठ्या क्षेत्राची राखण अवघड होत असल्याने 62 टक्के शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले.
संबंधित लेख वाचा: ‘’आता रानटी हत्ती ना आमची पिकं उद्धवस्त करतात ना आमचा बळी जातो’’ |
शेतकऱ्यांचे वाढते नुकसान आणि मानव-वन्यजीव संघर्ष दुर्लक्षित करता येणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळाल्याशिवाय वन्यजीवांचे दीर्घकालीन संवर्धन शक्य नाही. याबाबत तातडीने कृती न केल्यास शेतकरी आणि वन्यजीव दोन्ही गमावण्याचा धोका असल्याचे शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नूलकर यांचे म्हणणे आहे. ‘अहवालातून केवळ शेतीचे नुकसानच नव्हे, तर त्याचा आर्थिक, सामाजिक घटकांवर होणाऱ्या परिणामांवरही प्रकाश टाकला आहे. लवकरच हा अहवाल सरकारलाही सादर करण्यात येणार आहे,’ असे डॉ. नूलकर यांनी सांगितले.
कोकणात सर्वाधिक नुकसान
वन्यप्राण्यांमुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान कोकणात होत आहे. तेथे रानडुक्कर, माकडांमुळे अनेक कुटुंबांना परसबाग बंद करून दर आठवड्याला भाजी विकत आणावी लागते. मराठवाडा, खान्देशसारख्या मर्यादित जंगल असलेल्या भागातही शेतकऱ्यांनी काही पिके पूर्णपणे सोडली आहेत. तरुणांना शेती हा स्थिर उत्पन्नाचा आश्वासक स्रोत वाटत नसल्याने शेती सोडून त्यांचे शहराकडे स्थलांतर वाढत आहे.
वाघ, बिबट्या या मांसाहारी प्राण्यांच्या हल्ल्यांबरोबरच रानडुक्कर, नीलगाय, माकड, वानर, गवा, सांबर यांसारख्या प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा अभ्यास करण्यात आला. शेती सुरक्षित वाटत नसल्याने मशागतीचा खर्चा कमी करावा लागणे किंवा एखाद्या हंगामात कोणतेही पीक न घेण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत, तर कोकणामध्ये रानडुक्कर आणि माकडांच्या त्रासामुळे अनेक कुटुंबांनी परसबाग बंद केली आहे. मराठवाडा आणि खान्देशसारख्या मर्यादित जंगल असणाऱ्या भागांतही शेतकऱ्यांनी काही पिके घेणे पूर्णपणे सोडले आहे, असे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. नुकसानभरपाईबाबतचा जागरूकतेचा अभाव, गुंतागुंतीची प्रक्रिया आणि अल्प मोबदल्यामुळे बहुतेक शेतकरी नुकसानभरपाईचे दावे करण्याचे टाळत असल्याचीही बाबही समोर येत आहे.
शाकाराही प्राण्यांनी केलेल्या शेतीच्या नुकसानाचे काय?
"जेव्हा आपण मानव-वन्यप्राणी संघर्षाबद्दल बोलतो, तेव्हा आपण मुख्यत्वे मांसभक्षक प्राण्यांच्या हल्ल्यांची नोंद झालेली बघतो. मात्र शाकाहारी प्राण्यांनी शेताच्या केलेल्या नुकसानीबद्दल फारसं बोललं जात नाही. म्हणून आम्ही वन्यप्राण्यानमुळं होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानाचं मोजमाप करणारं हे पाहिलं सर्वेक्षण केलं," या अभ्यासाच्या मुख्य लेखिका आणि संशोधक वैदेही दांडेकर म्हणतात.
"आम्ही शेतकऱ्यांशी बोलताना त्यांच्यामते वन्यप्राण्यांमुळं त्यांना शेतीत किती नुकसान सहन करावं लागतं, हे विचारलं. त्यांनी सरासरी हेक्टरी 27,000 रुपयांचं नुकसान होत असल्याचं सांगितलं. मात्र आम्ही वनविभागाची नुकसानभरपाईची आकडेवारी पहिली असता त्यात गेल्या 4 वर्षांत एकूण 210 कोटी रुपये राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून दिले असल्याचं आढळलं. म्हणजे वर्षाला साधारणपणे 50 कोटी रुपये असं धरू. ही रक्कम शेतकऱ्यांनी अंदाजे सांगितलेल्या रकमेच्या 1 टक्क्यांहूनही कमी आहे. आम्ही कोकण प्रदेशात केलेल्या सखोल अभ्यासात ही रक्कम या अंदाजित रकमेच्या कैक पटींनी अधिक असल्याचं आमच्या लक्षात आलं," दांडेकर म्हणतात.






