2019 सालची ही गोष्ट आहे. नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होणार होती. वास्तविक पाहता नोबेल समिती कधीही संभाव्य विजेते अथवा नामांकित व्यक्तींची नावे जाहीर करत नाही. पण या पुरस्कारांसाठी जगभरातून ‘नोबेल शांतता पुरस्कारा’साठी जेन गुडाल यांचे नाव सुचवण्यात आले होते.
जगभरातून अनेक मोठे नेते, संशोधक, माजी नोबेल पुरस्कार विजेते आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी नोबेल शांतता पुरस्कार जेन गुडाल यांना देण्यात यावा, अशी मागणी पत्रांद्वारे नोबेल समितीला केली. असं पहिल्यांदाच घडत होतं दुर्दैवाने जेनला नोबेल पुरस्कार मिळाला नाही हा भाग वेगळा, परंतू या पुरस्कारापेक्षाही खुप मोठं काम जेन गुडालने करून ठेवलं आहे. ‘जे स्वतःसाठी स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मी बोलत राहीन '... डॉ. जेन गुडाल एकदा म्हणाल्या होत्या. एक ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेईपर्यंत त्या हे करत राहिल्या. आयुष्याचा तब्बल सहा दशकांहून अधिक काळ चिम्पांझींसाठी व्यतित करणाऱ्या गुडाल यांनी विज्ञान, अधिवास संरक्षण, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण चळवळीमध्ये परिवर्तन तर घडवलेच, पण लाखो लोकांना पर्यावरण रक्षण आणि अभ्यासासाठी प्रेरणा दिली.
‘जे स्वतःसाठी स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मी बोलत राहीन '.
लहानपणी जेनला तिच्या वडिलांनी एक माकडाची बाहुली दिली. ती निर्जीव बाहुली जेनला मोठेपणी खऱ्या माकडांकडे आकृष्ट करती झाली. अन्य कोणाही लहानग्याप्रमाणे कुतूहल हे जेनमध्ये ठासून भरलेले होते. कोंबडीचे अंडे नक्की येते कोठून हे पाहण्यासाठी लहानग्या जेनने आपल्या परसातील खुराड्यात मुक्काम ठोकला. आईला वाटले जेन हरवली. प्रकरण पोलिसांत तक्रार करण्यापर्यंत गेले. तिच्या शोधमोहिमेत पोलिसांची तुकडी घरात यायला आणि खुराड्यातून ताजे ताजे अंडे हातात घेऊन जेन बाहेर यायला एकच गाठ पडली. जेन भाग्यवान अशी की इतके रामायण घडत होते तरी तिची आई एका चकार शब्दाने तिला रागावली तर नाहीच; उलट अंडे बाहेर कसे येते याची बालसुलभ उत्साहीकथा पोलिसांच्या देखत तिने जेनला सांगू दिली.
संबंधित लेख वाचा: जळगावच्या मातीतून पर्यावरणासाठी धडपडणारा अवलिया : गिरीश पाटील |
त्यामुळे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जेन कधीही न पाहिलेल्या, अत्यंत मागास अशा बदलौकिक झालेल्या आफ्रिकी देशात नवे काही करण्याच्या शोधात जेव्हा जायला निघाली तेव्हा मुलींना एकट्याने प्रवासाची परवानगी नसल्याने ‘‘मी येते तुझ्याबरोबर’’ असे म्हणत आईनेच तिला साथ दिली. खुद्द जेन यांनीच आपल्या आईचे हे वर्णन लिहून ठेवलेले आहे. जेनच्या मैत्रिणीच्या वडिलांनी नैरोबीत एक व्यवसाय सुरू केला होता आणि तेथे काम करण्यासाठी तिला विचारणा केली होती. इंग्लंडपेक्षा वेगळ्या, खऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात जगायला मिळेल या एकाच विचाराने जेनने होकार दिला. जेनचे आफ्रिकेत जाणे हे कोलंबसाने अमेरिकेत जाण्याइतकेच महत्त्वाचे होते. दोघांनीही नव्या संस्कृतीचा वेध घेतला.
माणसांप्रमाणे ‘चिंपांझी’ देखील हत्यारांचा वापर करतात हा शोध लावला
एकदा एक चिंपांझी गवताची काडी घेऊन जमीन उकरत असताना तिला दिसून आला. तो तिथून एक प्रकारचा कीटक बाहेर काढून तोंडात टाकायचा. असं खूप वेळ चाललं. नंतर ती काडी मोडली. चिंपांझीने दुसरी एक गवताची काडी घेतली. त्यावरील पाने खुडून काढली आणि पुन्हा ती काडी जमिनीत खुपसली. जेन ते दृश्य अवाक होऊन पाहत राहिली. याआधी माणूस सोडून इतर कुठला प्राणी हत्यारांचा वापर करत नाही असं समजलं जात असे. ते खरं नसल्याचं जेन प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहत होती. जेनने या निरीक्षणानंतर चिम्पांझीवर, त्याच्या टोळीवर अधिक लक्ष केंद्रित केले.
अधिक निरीक्षणे नोंदवली, जमेल तशी छायाचित्रे घेतली आणि 30-40 पानांचा त्यावर आधारित लेख ‘नॅशनल जिऑग्राफिक’ला धाडून दिला. वयाची तिशीदेखील न गाठलेल्या जेनचा हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्राणी-अभ्यासक जगात एकच खळबळ उडाली. पहिल्या प्रतिक्रियेत अर्थातच तुच्छतेने हे सर्व झिडकारले गेले. पण जेनच्या सातत्यपूर्ण निरीक्षणांनी सर्व तत्कालीन ढुढ्ढाचार्यांना आपापली मते बदलावी लागली. चिम्पांझी जातीची माकडे माणसांप्रमाणे टोळ्या बनवतात, माणसांप्रमाणे एकमेकांशी शब्द-नादाद्वारे संवाद साधतात, त्यांची स्वत:ची युद्धधोरणे ठरतात, माणसाप्रमाणेच त्यासाठीची अस्त्रे तयार करतात इत्यादी त्यांच्या निरीक्षणांनी इतिहास घडला. जेनची ही निरीक्षणे सर्वमान्य झाली, चिम्पांझी हे प्रगतीबाबत मनुष्यप्राण्याच्या जवळ आहेत हे जेव्हा सिद्ध झाले.
स्नेहबंध फक्त माणसातच नसतात तर चिंपांझीमध्येही असतात
चिंपांझी मांसाहार करतात हेही जेननेच प्रथम शोधून काढलं. एका चिंपांझीच्या कळपाला मांस खाताना तिने कॅमेऱ्यात कैद केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, चिंपांझींमध्येही माता आणि पिल्लांत दृढ भावबंध असतात हे तिने सिद्ध केलं. एका पिलाची आई गेली तेव्हा तिचं मूल तिच्या प्रेताशेजारून हलायला तयार नव्हतं. पुन्हापुन्हा ते पिल्लू आईला हलवून जागं करू पाहायचं.
आपली आई आता पुन्हा कधीच जागी होणार नाही हे ध्यानात आल्यावर पिल्लाने अन्न-पाणी सोडून दिलं आणि दोन आठवड्यांतच मरून गेलं. आई आणि मुलांतील असे स्नेहबंध फक्त माणसातच असतात या समजुतीला तिने फाटा दिला. अशा अनेक गोष्टी जेन चिंपांझींच्या सहवासात शिकली. या साऱ्या निरीक्षणांतून ती केवळ चिंपांझी या प्राण्याविषयी शिकत नव्हती तर आदिमानवाच्या विश्वाशी जुळवून घेण्याच्या पहिल्यावाहिल्या प्रयासांना पाहत होती.
‘My life with Chimpanzee’
जेन गुडाल आपल्याला ठाऊक आहेत ते मुख्यत: चिंपांझींवरील त्यांनी दीर्घकाळ केलेल्या संशोधन आणि लेखनामुळे. त्यांचे ‘My life with Chimpanzee’ आणि ‘In the shadow of man’ हे दोन आत्मचरित्रात्मक ग्रंथ जगभर नावाजले गेले आहेत. जेनने चिंपांझींसंबंधी भरपूर संशोधनात्मक लेखन केले असले तरी तिच्या लेखनात कुठेही बोजडपणा वा किचकटपणा नाही. सर्वसामान्य वाचकांना रुचेल, समजेल अशा सुबोध शैलीत तिने लेखन केले. यामुळेच किती उपरोल्लेखित पुस्तके लहान वयातल्या वाचकांमध्येही लोकप्रिय ठरली आहेत.
‘My life with Chimpanzee’ या विलक्षण सुंदर पुस्तकात जेनने आपल्या संशोधनाची कथा सांगितली आहे. जेनला अगदी लहान वयापासून प्राण्यांच्या सहवासात राहणं आवडायचं. वयाच्या सातव्या वर्षी जेनच्या आजीनं तिला आफ्रिका देशाची ओळख करून देणारं एक पुस्तक नाताळला भेट दिलं. ते पुस्तक वाचल्यानंतर जेनने आपणही कधीतरी आफ्रिकेला जायचं असं ठरविलं होतं. त्यानंतर जेन आफ्रिका आणि तेथील जैव-विविधतेसंबंधी मिळेल ती पुस्तकं अधाशासारखी वाचू लागली.
त्यातून तिला आफ्रिकेची ओळख तर होत होतीच; शिवाय पुस्तकांचे समृद्ध दालनही तिच्यासमोर खुले होत होते. वाचनासंबंधी आपल्या आत्मचरित्रात जेनने लिहिले आहे; “मला जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे फार दु:ख व्हायचं, तेव्हा मी पुस्तक वाचायला घ्यायचे. आईनेच मला तसं शिकविलं होतं. ती म्हणायची; त्यामुळे तुला दु:खाचा विसर पडेल, किमान पुस्तक तुझ्या हातात आहे तोवर तरी. पुस्तक हातात घेतल्यावर मात्र मला फारसं वाईट वाटायचं नाही. आजही मला कशाने अतीव दु:ख झालं तर मी पुस्तकांकडेच वळते.”
मुक्काम पोस्ट आफ्रिका…
पुढे जेनचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्या. सहा महिने एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. तिला ते काम आवडतही असे. नंतर काही काळ ऑक्सफर्ड विद्यापीठात तर काही काळ एका फिल्म स्टुडिओमध्येही तिने काम केलं. जीवन तिच्या गतीने जात राहिलं. पण जेनच्या आफ्रिकेला जायच्या स्वप्नाचं काय? जेन ते स्वप्न कधीच विसरली नव्हती. ती जे म्हणून काम आजवर करत आली होती; त्यातून केवळ काळाचा एक तुकडा जगून काढत होती. आफ्रिकेला जायच्या स्वप्नाने तिच्या मनात कायमचे घर केले होते. ती फक्त संधीची वाट पाहत होती. तशी संधी येईल असा तिला ठाम विश्वास होता. लवकरच तशी संधी जेनला प्राप्तही झाली.
जेनला एके दिवशी तिची शाळेतील मैत्रीण क्लोचे पत्र मिळाले. क्लोच्या आईवडिलांनी केनियामध्ये मोठी जमीन खरेदी केली होती. आणि तिथं येण्यासाठी क्लोने जेनला आमंत्रित केलं होतं. हा एक चमत्कारच होता. शाळा संपल्यानंतर जेनचा क्लोशी काहीच संपर्क नव्हता की कधी भेट झाली नव्हती आणि आज अचानक तिने केनियाला जेनला येण्याचे निमंत्रण दिले होते. जेनला हे सारे स्वप्नवत वाटत होते. आणि जेन ही संधी नक्कीच सोडणार नव्हती. पण त्यासाठी पैशांचा प्रश्न होता. जेनने एका हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी केली. पुरेसे पैसे जमविले आणि तिच्या स्वप्नातील भूमीकडे प्रस्थान केले. आफ्रिका.
आफ्रिकेत तिने क्लोच्या फार्मवर काही दिवस काढले. पण तिला परत जायचं नव्हतं. ती आफ्रिकेतच काम करणार होती. एव्हाना आिफ्रकेलाच तिने तिचं सर्वस्व मानलं होतं. तिथे तिला लुईस किले या संशोधकाला साहाय्यकाची गरज असल्याचं समजलं. तिने त्यासाठी मुलाखतही दिली. मात्र तिच्या निवडीविषयी ती साशंक होती. संशोधनासाठी आवश्यक असणारे औपचारिक शिक्षण तिने पूर्ण केले नव्हते. पण लुईसला शिक्षणापेक्षा प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या साहाय्यकाची गरज होती. त्याने जेनला आनंदाने हे काम देऊ केलं. जेनने लुईससोबत काम करणं सुरू केलं; तो काळ जेनसाठी फार महत्त्वाचा काळ होता.
तिथे जेनला प्राण्यांसंबंधी खूप काही शिकायला मिळत होतं. लुईस जेनसोबत नेहमी ‘तंगानिका’ येथील सरोवराच्या आजूबाजूला राहणाऱ्या चिंपांझींविषयी बोलत असायचा. चिंपांझींवर आजवर कुणी गंभीर संशोधन केलं नव्हतं. लुईसला त्याची नितांत गरज वाटत होती. त्याला आदिमानवाच्या जीवनात फार रस होता. चिंपांझी हे जैविकदृष्ट्या मानवाच्या सर्वात जवळचा प्राणी असल्याने म्हणा की मानवाच्या उत्क्रांतीमधील तो एक दुवा होता म्हणून म्हणा; पण चिंपांझींविषयी अधिकाधिक माहिती मिळवून आदिमानवाच्या जीवनाविषयीच्या आपल्या ज्ञानात मोलाची भर पडेल असं त्याला वाटत होतं. हे सारं तो जेनला एका विशिष्ट हेतूने सांगत होता. आणि जेनलाही नेमकं तेच हवं होतं.
‘इथं येण्याचं स्वप्नच तर मी आयुष्यभर पाहत आले होते.”
पण तिची निवड आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात या दोन घटनांत एक वर्षाचा काळ जावा लागला. अनेक अडचणी पार करून जेनने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली तेव्हा तिला कोण आनंद झाला. त्या दिवसाविषयी तिने नंतर लिहिले; “माझ्या आयुष्यातील तो सर्वात आनंदी दिवस होता. मी आता कुठल्याही मानवी वस्तीपासून दूर अशा आफ्रिकेच्या जंगलात होते. आजूबाजूच्या कभिन्न काळोखात मला फक्त जंगली प्राण्यांचाच काय तो शेजार होता. केवळ मुक्त जंगली प्राणी. हेच तर मला हवं होतं. इथं येण्याचं स्वप्नच तर मी आयुष्यभर पाहत आले होते.”
प्राण्यांचा अभ्यास आणि निरीक्षण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट होती त्यांचं जवळून निरीक्षण करणं. पण चिंपांझींना तिचा सुगावा जरी लागला तरी ती झाडांत दिसेनाशी होत असत आणि जेन तिथून जाईतो पुन्हा बाहेर येत नसत. तेव्हा दुरून निरीक्षण करणं हा एकच मार्ग तिच्यासमोर होता; पण त्याने फार काही हाती लागत नसे. हळूहळू त्यांना जेनच्या अस्तित्वाची सवय होऊ लागली. जेन त्यांच्यासाठी कधी एखादं फळ घेऊन येत असे तर कधी एखादी नवी वस्तू ज्याने आकर्षित होऊन त्यांतील काही वानरे तिच्या जवळही येऊ लागली होती.
या गोऱ्या बाईपासून आपल्याला कसलाच धोका नाही असा विश्वास चिंपांझींमध्ये निर्माण करण्यात ती यशस्वी झाली. पण हे काही एका दिवसात घडले नाही. सुमारे दोन वर्षाहून अधिक काळ यासाठी जावा लागला. मात्र त्यानंतर तिच्या संशोधनाचा मार्ग पुष्कळच सुकर झाला. एकदा ती ज्या कळपाचं निरीक्षण करत होती, त्या कळपातील मादीने आपली नवजात पिले जेनला दाखविण्यासाठी तिच्या कॅम्पजवळ आणली. जेनने तो भावबंध आयुष्यभर जीवाशी सांभाळला.
चिंपांझींसंबंधी तिला जशा अनेक गोष्टी समजू लागल्या तसे मानवाबरोबर असणारी त्यांच्यातील साम्ये पाहून ती अचंबित झाली. जेन निर्भीड आणि हाडाची संशोधक होती. निर्मनुष्य अरण्यात रात्ररात्र ती चिंपांझींच्या कळपाचं निरीक्षण करत होती. काही जीवावर बेतणारे प्रसंग आले. पण जेनने न डगमगता आपले संशोधन कार्य पुढे नेले. त्या संशोधनातूनच जेनने आधी ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी जगासमोर आणल्या. त्यासंबंधी तिने ‘My life with Chimpanzee’ मध्ये लिहिले आहे.
अलविदा डॉ. जेन गुडॉल…
1964 मध्ये जेनने व्हॅन लॉविक यांच्याशी लग्न केले. 1967 मध्ये त्यांच्या मुलाचा, ह्युगोचा जन्म झाला. एक चांगली आई होण्याचे श्रेय जेन चिम्पांझींना देतात. गुडॉल यांनी गोम्बे स्ट्रीम रिसर्च सेंटर आणि जेन गुडॉल इन्स्टिट्यूटची स्थापना केली, अनेक माहितीपट बनवले, असंख्य लेख आणि पुस्तके लिहिली. त्यांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले.
गुडॉल यांच्या जीवनात क्रांतिकारी परिवर्तन झाले 1986 मध्ये, एका वैज्ञानिक परिषदेत. जगातील चिम्पांझींची संख्या 20 लाखांवरून दोन लाखांपर्यंत घसरल्याचे त्यांना कळाले. शहरीकरण आणि जंगलतोडीची किंमत चिम्पांझींना चुकवावी लागत होती. त्यानंतर त्यांनी 'कार्यकर्ती' होऊन लढायचे ठरवले ते अखेरपर्यंत. त्या जगभर फिरत राहिल्या. गेल्याच वर्षी 'होप ग्लोबल टूर' मध्ये त्या मुंबईत आल्या होत्या. नव्या पिढीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या 'रूट्स अँड शूट्स' या संघटनेचे 60 हून अधिक देशांत 12 हजार सक्रिय गट आहेत. जगभर त्यांनी ताज्या दमाचे पर्यावरण कार्यकर्ते तयार केले. आताही त्या मुलांसाठी एका पुस्तकावर काम करत होत्या. विषय हत्ती आणि त्या आगामी पुस्तकाचे शीर्षक ‘एव्हरी एलिफंट हॅज अ नेम’. ते पुस्तक पूर्ण करणे ही आता जेन यांच्या सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. या सर्वांच्या कामामधून डॉ. जेन गुडॉल कायम जिवंत राहतील.
(संदर्भ - विलक्षण संशोधक जेन गुडाल, अभिषेक धनगर, द वायर)






