- अप्सरा आगा
‘’लावणी नर्तिकेच्या प्रेमात झाला वेडा, माजी उपसरपंच बगेंचा भयानक शेवट… अशा बायांपासून सावध राहा…’’
बीडच्या माजी उपसरपंचाला नादाला लावणारी नर्तिका पूजा गायकवाड कोण आहे?
‘’मेरे पास तेरे जैसे चार है’’ असं म्हणणारी लावणी नर्तिका पूजा गायकवाड कोण आहे?
अशा मथळ्याच्या अनेक बातम्या, रिल्स आणि व्हिडियो गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये पहायला मिळत आहेत.
घटना काय होती तर, बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांना लावणी, तमाशाचे वेड होते. गोविंद हे मागील काही वर्षांपासून थापडीतांडा येथील कला केंद्रात सातत्याने जात आणि तिथे त्यांची ओळख 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत झाली. हळूहळू दोघांची ओळख इतकी जास्त वाढले की, एकमेकांच्या प्रेमात पडले. पूजाला त्याने आयफोन यासोबतच काही सोन्याचे महागडे दागिनेही दिले. मात्र, पूजाच्या मागण्या सातत्याने वाढत होत्या. असे म्हटले जाते की, पूजाने पैशांसाठी त्याला त्रास देण्यास सुरूवात केली. हेच नाही तर त्याच्याशी बोलणेही बंद केले.
(लावणी नृत्यांगना पूजा गायकवाडशी मतभेद झाल्याने उपसरपंच गोविंद बर्गेने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.)
पूजा बोलत नसल्याने गोविंद सैरभैर झाला होता. शेवटी त्याने आपल्या चारचाकी गाडीत बसून पूजाच्या घरासमोरच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली आणि जीवनयात्रा संपवली. गोविंद बर्गेलाआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुळजाभवानी कला केंद्र पारगाव ता. वाशी, जि. धाराशिव येथील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला. नर्तिकी पूजा हिला ताब्यात घेऊन वैराग पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
कलाकेंद्राशी संबंधित दोनच दिवसांपूर्वी घडलेली ही आणखी एक घटना… लोकनाट्य कला केंद्रात नृत्यांगनांची बैठक लावण्याच्या कारणावरून पंढरपूर तालुक्यातून टेंभुर्णीला आलेल्या तरूणांच्या दोन गटात मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. बैठक लावण्यावरून त्यांच्यात ईर्षा पेटली आणि त्यातून वादाची ठिणगी पडली. काही वेळानंतर वाद विकोपाला गेला आणि त्यांच्यातील एकाने चक्क गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली. या गोळीबारात दोन जणं जखमी झाले.
दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रावर सोमवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारात एक लावणी नर्तिका जखमी झाल्याचे वृत्त आहे आणि याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.
संबंधित लेख वाचा: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी जो आरोप केलाय, त्या कलाकेंद्राचे रुपांतर खरोखर ‘डान्सबार’मध्ये झालयं का? |
या सगळ्या घटनांमुळे राज्यातील कलाकेंद्र आणि त्यात नाचणाऱ्या लावणी नर्तिका यांच्याकडे बघणारा समाजाचा दृष्टीकोन आणखी बदलत चालल्याचे दिसून येतयं. दोष कुणाचाही असला तरी ‘बदनाम’ मात्र लावणी नर्तिकेलाच केलं जातयं. अशा बायांपासून सावध रहा किंवा नादाला लावणी नर्तिका अशी विशेषण लावणं हे त्यापैकीच काही उदाहरणे आहेत.
संगीतबारीची कलाकेंद्र म्हटलं की चर्चा व्हायचीच. तिथल्या बायकांची, नाचगाण्याची, तिथे सादर केल्या जाणाऱ्या लावण्यांची आणि ‘खाजगी बैठकींचीही’. मोठमोठ्या राजकारण्यांपासून ते गावखेड्यातल्या खिशात नुकताच पैसा खुळखुळू लागलेल्या तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा विषय म्हणजे ही कलाकेंद्र... अर्थात इथे 'तसले' उद्योग चालतात, 'बाई आणि बाटलीचा हा व्यापार आहे', अनेकांनी या 'नादात' त्यांच्या इस्टेटी गमावल्यात असे अनेक किस्से कानावरून जात असतात.
वास्तविक राज्य शासनाने संगीतबारी कलाकेंद्राचं स्वरूप हे पारंपरिक लावणीचे शिक्षण, त्याचे सांस्कृतिक जतन-संवर्धन आणि लावणी कलाकारांना व्यासपीठ प्रदान करण्यासाठी सुरू केलं आहे. राज्यात सध्या 80 पेक्षा अधिक कलाकेद्र कार्यरत आहेत.
(लावणी नृत्यांगना पूजा गायकवाड)
बदनामी फक्त पूजाचीच होत नाही तर आमचीही होते - प्रमिला लोदगेकर
याच पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने कला केंद्रात नाचणाऱ्या लावणी नर्तिकांशी संवाद साधला. प्रख्यात लावणी नर्तिका प्रमिला लोदगेकर म्हणतात की, 'कलाकेंद्रामध्ये नाचणाऱ्या महिला या समाजापुढे अगोदरपासूनच बदनाम आहेत. एकतर थिएटरमधील बाई म्हटली की तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला असतो. त्यामुळे असं काही घडलं की आमची बदनामी सुरू होते. आता जे प्रकरण घडलं. ते सोशल मीडियामुळे आमच्यापर्यंत पोहोचलं. पूजा गायकवाडचे जे व्हिडीओदिसू लागले आहेत, ते मान्य केले तरी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. जे खरं आहे ते लोकांसमोर आणा. एखादीला किती बदनाम करायचं? ज्याप्रकारे तिला बदनाम केलं जातंय ते तिच्या एकीटीची बदनामी नाही.
त्याचा फटका आम्हा कलावंतांनाही बसतोय.पूजा गायकवाड कोण आहे हे मला माहित नाही, मी माझ्या जोरावर इतकं नाव कमावलय, शासन दरबारी आम्हाला मान आहे. संगीतबारीत एकेकाळी कोल्हाटी, डोंबारी समाजाच्या महिला नाचकाम करायच्या, पण आता तसं राहिलेलं नाही. इतर जातींच्या मुलीही आता कला केंद्राच नाचायला लागल्या आहेत. डान्सबारच्या मुलींनी तर कलाकेंद्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केलीये. मात्र होतं काय की, एख प्रकरण घडलं तर आम्ही सगळेच बदनाम होऊन जातो. आम्ही कुणालाही लुबाडत नाही, आम्ही आमची कला पेश करतो, परंतू समाजाची मानसिकताच तशी बनली आहे की आम्हीच पुरुषांना नादाला लावतो.’’
लावणी नर्तिका प्रमिला लोदगेकर पुढे म्हणतात, ‘’माझीदेखील काही स्वप्न होती, पण परिस्थितीमुळे ती तशीच विरून गेली. कला केंद्रात नाचणाऱ्या आम्हा बायांच आयुष्य खूप खडतर असतं. स्वत:चा विचार न करता कुटुंबासाठी आम्ही आमचं सबंध आयुष्य जाळत असतो. पण बदल्यात काय मिळतं? आमची मुलं शाळेत जातात, टोमणे सहन करतात, कायम एका मानसिक दबावाखाली असतात. काहींनी तर आत्महत्यादेखील केल्या आहेत. मुलांच्या भविष्यासाठी कलाकेंद्राच नाचतो, पण शेवटी बदनामी मात्र आमच्याच वाट्याला येते.’’
(प्रख्यात लावणी नृत्यांगना प्रमिला लोदगेकर)
'जी लोक कलाकेंद्रात येतात. ते खरंच कला बघायला येतात का? - रेश्मा मुसळे परितेकर
लावणी नृत्यांगना रेश्मा मुसळे-परितेकर यासंदर्भात एकच सवाल करतात. त्या म्हणतात,
'जी लोक कलाकेंद्रात येतात. ते खरंच कला बघायला येतात का? हा माझा सवाल आहे. या बायांना कलाकेंद्रात येण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. कोणाला पैसा नकोय आजच्या जगात. कमी वेळेत पैसा मिळत असेल तर त्या बाया लागतात नादी. मात्र त्या बायांना जो शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जातो त्याचं काय? आजपर्यंत किती बायांना मारून टाकलं ज्यचा आजपर्यंत तपासदेखील केला गेला नाही. मग त्यांच्या कुटूंबाचा आजपर्यंत कोणी विचार केला का? कलाकेंद्रातील कित्येक मुली गायब आहेत. अशा मुली गायब केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तींशी प्रामाणिक कशा काय राहतील?’’
पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड सांगतात, 'आता कलाकेंद्रामध्ये डीजे आला आहे. त्यामुळे जी पारंपरिक लोककला होती ती आता नष्ट झालीये. कलाकेंद्रातील अनेक महिलांनी एक काळ गाजवला आहे. पण आता झालयं असं की जे कलाकेंद्रचे प्रमुख आहेत, त्यांनी त्यात बदल केलेत. पारंपरिक लोककला जाऊन डीजे प्रकार आला. डीजे आल्यामुळे महिला पारंपरिक वेशभूषा करत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. मग तिथे येणार जो वर्ग आहे तो कलेचा चाहता नसतो. कलाकेंद्रात बिल्डर, श्रीमंत लोक येतात. नृत्य करताना महिलांकडे अश्लीलतेने बघतात. आम्ही आता शिफारस करणार आहोत की, पारंपरिक कला सोडून ज्या कला केंद्रात डीजे लावून नृत्य सादर केली जातात, अशा केंद्रांना सरकारने लोकनाट्य कला केंद्र, तमाशा कला केंद्र, नाट्य कला केंद्र अशी नाव देऊ नयेत. त्याऐवजी त्यांना नाईट म्युझिक सारखी नाव द्यावीत.’’
(लावणी कलावंत रेश्मा मुसळे परितेकर)
‘’तमाशा वेगळा, संगीतबारी वेगळी… उगीच आम्हाला बदनाम करू नका’’ - रघुवीर खेडकर
तमाशा-लावणी क्षेत्रात फार पूर्वीपासून ढोलकी फडाचा तमाशा विरुद्ध संगीतबारी लावणी कला केंद्र असा वाद सुरू आहे. पूजा गायकवाड प्रकरण घडल्यानंतर हा वाद आणखी उफाळून आलाय. महाराष्ट्राचे आघाडीचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी यासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
ते म्हणतात की, पूजा गायकवाडसंबंधीचे जिते व्हिडियो व्हायरल होत आहेत त्याच्या खाली कॉमेंटमध्ये अनेकांनी तमाशा बंद करा असे म्हटले आहे. पण तमाशाचा आणि कला केंद्राचा काहीही संबंध नाही. तमाशा हा अठरापगड जातीचा असतो आणि कलाकेंद्रातील बायका या एकाच जातीच्या असतात. त्यांचा आणि आमचा काहीही संबंध येत नाही . तमाशात कोणतीही खाजगी बैठक होत नाही, कोणतेही खाजगी शो होत नाही. तमाशा हा हजारो लोकांच्या समोर दाखवला जातो. त्यामुळे त्यांचं आणि आमचं नातं जोडू नका. आमच्या पोटावर पाय आणू नका. कारण आम्हाला रात्रीची झोप लागत नसते, दिवसाची झोप नसते.
आम्हाला काहीच वेळेवर मिळत नाही. अनेक संकटांचा सामना करत आम्ही पोटाची खळगी भरायला गावोगावी फिरत असतो. लावणीच्या काही मुली खाजगी शो करतात, त्यावर कोणी बंदी आणायची, कलाकेंद्रात बैठक नावाचा हा एक प्रकार आहे. ते कोणी बंद करायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. कलाकेंद्रात जाणारी माणसं पैसेवाली असतात, पुढारी असतात, त्यांच्याशी आम्ही पंगा कसा घेणार? त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट आहेत की लावण्या बंद करा, तमाशा बंद करा. कृपया अशा कॉमेंट करू नका जेणेकरून खऱ्या लोक कलावंतांची भाकरी बंद होईल.'
रघुवीर खेडकर प्रमाणेच ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनीही यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणतात की, दोन तीन दिवसापूर्वी काही भागामध्ये कलाकेंद्रातील एका नर्तिकेपायी एका उपसरपंचाने गोळी मारून घेतली आणि आत्महत्या केली. हे प्रकरण कलाकेंद्रात झालं आहे. पण तमाशा बदनाम केला आहे. हे चुकीचं आहे. तमाशा हे लोकनाट्य आहे, कलाकेंद्र हे वेगळं आहे. त्यात सात - आठ मुली असतात आणि तमाशामध्ये सत्तर ते शंभर मुली असतात. आम्ही कला सादर करून पोट भरतो. कलाकेंद्राचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यामुळे तमाशा या लोकनाट्याला अजिबात बदनाम करू नका.'
(जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर)
नेमकं काय असतं लोकनाट्य कला केंद्रामध्ये…?
पुणे-नगर, पुणे - छ. संभाजी नगर, पुणे- कोल्हापूर या मार्गावर हायवेला लागूनच लोकनाट्य कलाकेंद्राचे बोर्ड दिसतात. संध्याकाळ टळून गेली, की इथे कामाची गडबड सुरू होते. नटून थटून बसायचं. या कलाकेंद्रांची रचनाही तशीच असते. मध्ये मोकळी जागा. त्याच्या चारीबाजूने खोल्या.
या खोल्यांवर प्रत्येक पार्टी मालकिणीचं नाव टाकलेलं. पार्टी मालकीण म्हणजे एक जरा सिनियर बाई, तिची स्वतःची पेटी, गाणारी, तबला/ढोलकीवाला आणि चार-दोन नाचणाऱ्या मुली. एकेका कलाकेंद्रात 8-10 पार्ट्या असतात.एका पार्टीत किमान 8 ते 10 लोक काम करतात. 18 ते 40 वयोगटातल्या 5 नाचणाऱ्या कलावंतिणी, त्यांच्यासाठी गाणारी एक गायिका आणि हार्मोनियम, ढोलकीच्या आवाजाने बैठकीची खोली दणाणून सोडणारे मास्तर आणि वस्ताद. अशा 7 ते 10 पार्ट्या एका कलाकेंद्रात असतात.
रात्रभर नाचून जमा होणाऱ्या पैश्यांची कलाकेंद्राचे मालक आणि पार्टी मालकी यांच्यात विभागणी केली जाते. पार्टी मालकीणीच्या हातात आलेले पैसे त्या पार्टीत काम करणाऱ्या कलाकारांना वाटले जातात. पार्टी मालकीणीने कलाकेंद्र चालकाला दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात कलाकेंद्रचालक त्यांना एक सुरक्षितता, महिन्याला लागणारं राशनपाणी आणि जगण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा देऊ करतो असा सरळ सरळ व्यवहार आहे. प्रत्येक पार्टीच्या वाटेला दोन खोल्या. तेवढ्या खोलीत सगळ्या बायकांनी राहायचं, जेवायचं, झोपायचं, नटायचं. वरच्या मजल्यावर किंवा मागच्या साईडला साथीदारांच्या म्हणजे पेटी,ढोलकी,तबलावाल्यांची खोली.
प्रत्येक कलाकेंद्रातील बंदिस्त बैठकांचा भाव वेगवेगळा, प्रत्येक तासाला काही हजार रुपये मोजले की रसिकांना बंदिस्त बैठकीत लावणीचा आस्वाद घेता येतो अर्थात आता लावणीपेक्षा चित्रपटातील ढिनच्यॅक गाण्यांची मागणी वाढली असल्याने ती गाणी वाजवली जातात. मधूनच एखादा माणूस उठतो आणि नाच आवडला तर या कलावंतीणींवर 'दौलतजादा' करतो.
गरिबी, विंवचना आणि शोषण हे दुष्टचक्र इतक्या लवकर संपणारं नाही. या व्यवसायात अजूनही नवीन मुली येतच राहातात. बऱ्याचशा एकल असतात, कोणाला नवऱ्याने सोडलेलं असतं, कोणाला प्रियकराने फसवलेलं असतं, कोणाचा नवरा मेलेला असतो, तर कोणावर अत्याचार झालेला असतो. या सगळ्या बायकांना एक हक्काचं, पैसे कमवण्याचं ठिकाण म्हणजे संगीतबारी.






