आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या तीन दिवस अगोदर लंडनमध्ये अतिशय लज्जास्पद घटना घडली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नायक असलेल्या महात्मा गांधीजींच्या लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअरमधील पुतळ्यावर सोमवारी आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची 156 वी जयंती आहे. त्याच्या काही दिवस आधीच ही घटना घडली आहे. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून देखील साजरा केला जातो.
महात्मा गांधींच्या पुतळ्यावर स्प्रे पेंटिंग करून गांधी, मोदी आणि भारतीयांना दहशतवादी म्हटले.लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअरमध्ये 1968 साली गांधीजींचा कास्य पुतळा उभारण्यात आला होता. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये महात्मा गांधी कायद्याचे विद्यार्थी होते. त्यांच्या या कालखंडाला आदरांजली देण्यासाठी म्हणून हा पुतळा बांधण्यात आला होता.
"ही फक्त पुतळ्याची विटंबना नाही, तर अहिंसेच्या विचारांवर हिंसक हल्ला आहे," असं भारताच्या उच्चायुक्तालयानं एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही 'लज्जास्पद' कृती असल्याचं भारताच्या उच्चायुक्तालयानं म्हटलं आहे. या कृत्यामागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र यासंदर्भात अद्याप कोणत्याही व्यक्ती किंवा गटाची ओळख पटलेली नाही.
नेमकं काय घडलं?
महात्मा गांधींच्या पुतळा ज्या चबुतऱ्यावर आहे त्यावर काळ्या रंगानं 'दहशतवादी' असं लिहिण्यात आलं होतं. त्यासोबत 'गांधी, मोदी आणि हिंदुस्तानी (इंडियन्स)' असंही लिहिलेलं होतं.
संबंधित लेख वाचा: आफ्रिकेच्या ‘घाना’मध्ये महात्मा गांधींएवजी बाबासाहेबांच्या पुतळ्याची मागणी…! |
भारताच्या उच्चायुक्तालयानं पुतळ्याचे विटंबनाच्या स्थितीतील फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र एक्सवरील अनेक अकाउंट्स आणि भारतीय मीडियानं पुतळ्याची विटंबना दाखवणारे फोटो आधीच दाखवले होते. मेट्रोपोलिटन पोलीस आणि कॅम्डेन कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी पीटीआय या भारतीय वृत्तसंस्थेला सांगितलं होतं की ते पुतळ्याच्या विटंबनेच्या वृत्तांची चौकशी करत आहेत. मेट्रोपोलिटन पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की ते लवकरच एक निवेदन जारी करतील. भारताच्या उच्चायुक्तालयानं म्हटलं आहे की त्यांची टीमदेखील घटनास्थळी पोहोचली होती आणि "पुतळ्याला त्याच्या मूळ प्रतिष्ठेत पुन्हा आणण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधत आहे."
जगातील 70 देशांमध्ये आहेत बापूंचे पुतळे
महात्मा गांधी यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्यांचे भारतासह सुमारे 70 देशांमध्ये पुतळे आहेत. जगातिल महाशक्ती म्हणजे अमेरिकेचा विचार केला तर येथे त्यांचे तब्बल 30 पेक्षा जास्त पुतळे आहेत. बापू एवढे लोकप्रिय आहेत, की रशिया आणि कॉम्युनिस्ट देश चीनमध्येही त्यांचे पुतळे दिसून येतात. काही वर्षांपूर्वी पाकि्तानच्या कराचीमध्ये महात्मा गांधी यांचा एक पुतळा होता. सिंध हायकोर्ट बिल्डिंगसमोर असलेल्या रस्त्यावर त्यांचा पुतळा होता. परंतु, आता तो तेथे नाही. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील पाकिस्तान मॉन्युमेंट म्यूझिअममध्ये बापूंचा पुतळा आहे. पाकिस्तानचे संस्थापक महमंद अली जिना यांच्यासोबत त्यांचा पुतळा आहे.
मात्र महात्मा गांधींच्या पुतळ्यांची विटंबना होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. लंडनपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत अनेक ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटबंना झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
जोहान्सबर्गमध्ये गांधींच्या पुतळ्यावर पांढरा रंग फेकला
20व्या शतकातील जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये गांधींचा समावेश होतो. अहिंसेच्या मार्गाने भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तरुणपणीचा त्यांचा काळ दक्षिण आफ्रिकेत गेला आहे. त्यांनी जगभरातील व्यक्तींना प्रेरणा दिली असली तरी त्यांचे कृष्णवर्णियांबद्दलचे विचार वादग्रस्त ठरले आहेत. सुरुवातीच्या त्यांच्या लिखाणात कृष्ण वर्णियांचा उल्लेख काफीर असा केला आहे. हा उल्लेख अत्यंत वर्णद्वेषी मानला जातो. भारतीय लोक कृष्ण वर्णीय लोकांपेक्षा सदैव श्रेष्ठ आहेत, असं गांधी म्हणाले होते.
महात्मा गांधींच्या याच लेखनामुळे काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधील गांधीजींच्या पुतळ्यावर काही अज्ञात व्यक्तींनी पांढरा रंग उडवून वर्णभेदी टिप्पणी केली होती. जोहान्सबर्ग शहराच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. गांधी स्क्वेअर म्हणूनच हा भाग ओळखला जातो. 2015 साली काही वर्णद्वेषी मंडळी कारमधून या पुतळ्याजवळ आली आणि त्यांनी सोबत आणलेला पांढरा रंग या पुतळ्यावर उडवला. वर्णभेदी गांधींचा पुतळा पाडलाच पाहिजे, अशा आशयाची नारेबाजीही ते करत होते. सुरक्षारक्षकाच्या म्हणण्यानुसार, या तरुणांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या टोप्या घातल्या होत्या. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू नका, असंही ते ओरडत होते.
‘’महात्मा गांधी हे वर्णद्वेषी, त्यांचा पुतळा हटवा’’
2018 साली घानाची राजधानी अक्रामधल्या विद्यापीठातला महात्मा गांधींचा पुतळा ‘महात्मा गांधी हे वर्णभेदी होते’ असे ठरवून हटवण्यात आला होता. भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता. 2016मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. यानंतर विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी एक याचिका दाखल करून गांधींना वर्णद्वेषी संबोधलं होतं.
गांधींजींना ‘रेसिस्ट अशी उपाधी देऊन घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली तसेच त्यासाठी आंदोलनही सुरु झाले. त्यानंतर विद्यापीठाने हा पुतळा हटवला. तसंच आफ्रिकन नायकांचे पुतळे सर्वांत अगोदर उभारायला हवेत, असं त्यांनी म्हटलं होतं. हा पुतळा नवीन जागेवर उभारण्यात येईल, असं त्यावेळी घाना सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
ब्रिटनमध्ये "गांधी मस्ट फॉल' अभियान
२०२० साली ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मँचेस्टरमधील मुख्य चर्चसमोर महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. गांधींचा पुतळा उभारण्याच्या विरोधात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी "गांधी मस्ट फॉल' नावाचे एक अभियान सुरू केले होते. गांधींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून मँचेस्टर मुख्य चर्चसमोर गांधींचा 9 फुटी कास्याचा पुतळा उभारला जाणार होता..
मात्र, हा निर्णय नगरपरिषदेने रद्द करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी केली. मँचेस्टर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले. त्यामध्ये महात्मा गांधींना "अँटी-ब्लॅक वंशवादी' असे संबोधले आहे. आफ्रिकेत ब्रिटनच्या शासनाने केलेल्या कारवाईला महात्मा गांधींचा पाठिंबा होता, असा या विद्यार्थ्यांचा आरोप होता. महात्मा गांधी यांनी आफ्रिकी जनतेचा "असभ्य', "अर्धे मूलनिवासी', "जंगली', "घाणेरडे', "जनावरांसारखे', असे हिणवले असल्याचे या विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले होते.
भारत सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या कांस्य पुतळ्याची ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये 2021 साली तोडफोड करण्यात होती., पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे महावाणिज्य दूत ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसमवेत रोविल येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पुतळ्याचे अनावरण केले आणि त्यानंतर काही तासांनंतर ही घटना घडली होती. हा पुतळा भारत सरकारने भेट म्हणून दिला होता. अज्ञात गुन्हेगारांनी पुतळा तोडण्यासाठी पॉवर टूल्सचा वापर केला.
अमेरिकेत सहा महिन्यात दोन वेळा बापूंच्या पुतळ्याची विटंबना
अमेरिकेतल्या भारतीय दुतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची सहा महिन्याच्या कालावधीत दोन वेळा विटंबना झाली. भारतातील कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेतील तरुणांनी तिथं आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी काही समाजकंटकाच्या एका गटाने भारतीय दूतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विंटबना केली.
अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेनसिल्व्हानियासह अनेक राज्यातून शेकडो शीख नागरिकांना वॉशिंग्टन डीसी इथे भारतीय दूतावासापर्यंत कार रॅली काढली होती. त्यावेळी भारत विरोधी पोस्टर आणि खलिस्थानी झेंडे घेऊन काही आंदोलक तिथे पोहोचले होते. त्यातील खलिस्तानी समर्थकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एक पोस्टर चिटकवले आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
'बापूंवर वर्णद्वेषाचा आरोप लावणे चूक'
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी म्हणतात की, बापूंना वर्णद्वेषी म्हणणं हे फक्त भारतीयच नव्हे तर सर्व मानवजातीच्या कल्पनेत येणं असंभव आहे. याचं कारण हे दोन्ही शब्द परस्परविरोधी आहेत. बापूंवर हे आक्षेप त्यांच्या विचारांबद्दल असलेल्या अज्ञानामुळे घेतले जातात. मला ही जाणीवपूर्वक चालवलेली मोहीम वाटते. त्यांच्या जीवनाचे अवलोकन केले तर ते वर्णद्वेषी होते असं म्हणता येणार नाही.
त्यांनी वापरलेल्या काही शब्दांमुळे असा आरोप होत असेल तर ते न्याय्य नाही असं मला वाटते. बापूंनी सुरुवातीच्या काळात जे लेखन केलं त्यातील काही शब्द आज बहिष्कृत झाले आहेत. पण हे शब्द त्यांच्यापर्यंत कसे आले याचा विचार व्हायला हवा. बापू गुजरातच्या एका लहान शहरातून परदेशात गेले होते. परदेशी संस्कृती आणि भाषेचे संस्कार त्यंच्यावर इंग्लंडमध्ये झाले.
नंतर दक्षिण अफ्रिकेत गेल्यावर त्यांना तेथील संस्कृतीची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे अफ्रिकेतील मूळनिवासींबद्दल त्यांनी काफिरसारखे जे शब्द वापरले ते तेव्हा प्रचलित शब्द होते, ते सामान्यपणे वापरले जायचे. त्या शब्दांमागे भावना द्वेषाची असल्यामुळे ते शब्द नंतर बहिष्कृत झाले आहेत. मात्र बापूंनी नंतर जे कार्य केलं ते पाहिल्यावर त्यांच्यावर केवळ या शब्दांमुळे वंर्णद्वेषाचा आरोप लावणं चूक ठरेल, असेही तुषार गांधी स्पष्ट करतात.






